बेडकाचा ‘व्हॅलेंटाइन डे’

रोहित हरीप
शुक्रवार, 9 मार्च 2018

नोंदी

व्हॅलेंटाइन डे जवळ आला की प्रत्येकाची त्याच्या प्रियकरासाठी किंवा प्रेयसीसाठीच्या खास बेताची आखणी सुरू होते. बोलिव्हियातील रोमिओ नावाच्या बेडकाचीसुध्दा यंदाच्या व्हॅलेंटाईनसाठी जोरदार तयारी सुरू आहे. यावेळेस या रोमिओला त्याची ज्युलिएट मिळावी यासाठी सगळा देश प्रार्थना करत आहे. यासाठी रोमिओ बेडकाची विशेष प्रोफाइल तयार करून समाज माध्यमांवर टाकण्यात आली आहे. या हा बेडूक कसा आहे ? त्याची वैशिष्टे कोणती ? त्याच्या जोडिदाराबद्दल काय अपेक्षा आहेत अशी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

या रोमिओ नावाच्या बेडकाचे इतके कौतुक का केले जात आहे ? त्याला जोडीदार मिळावा म्हणून सगळा बोलिव्हिया देश प्रयत्न का करत आहे ?  

याचे कारण या बेडकात दडलंय ! ‘सेव्हेनकस’ प्रजातीचा उभयचर वर्गातला हा नर बेडूक आजमितीला या ग्रहावरचा शेवटचा बेडूक आहे. या बेडकांचा वंश पुढे चालू राहावा, त्यांच्या प्रजातीचे पुनरुत्पादन सुरू राहावे यासाठी या बेडकाला जोडीदाराची गरज आहे. रोमिओसाठी जोडीदार शोधण्याचे प्रयत्न बोलिव्हियातील प्राणीतज्ञांकडून गेल्या दहा वर्षापासून सुरू आहेत. मात्र या प्रजातीतील एकही मादी बेडूक आजतागायत सापडलेला नाही. थोडक्‍यात बेडकांची ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या दोन वर्षात या बेडकाला जर त्याची जोडीदार मिळाली नाही तर या बेडकाची पूर्ण प्रजातीच या पृथ्वीवरून नामशेष होईल. या बेडकासाठी मादी शोधण्यासाठी सरकारी पातळीवरून मोहीम आखण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत बोलिव्हियातील बेडकांचे सर्व अधिवास धुंडाळण्यात आले होते. पण एकही मादी यामध्ये सापडली नाही. हवामान बदलाचा किती गंभीर आणि दूरगामी परिणाम जीवसृष्टीवर होतो याचे हे बोलके उदाहरण आहे. मागील दशकात ‘गॅलपॅगोज’ जातीच्या कासवाची एक पोटजात अशाच प्रकारे पृथ्वीवरून नामशेष झाली.

‘सेव्हेनकस’ या प्रजातींच्या बेडकांते सरासरी आयुष्यमान हे पंधरा वर्षांचे असते. आज हा बेडूक दहा वर्षाचा झाला आहे. पुढच्या एक-दोन वर्षात या बेडकाला जोडीदार न मिळाल्यास हा बेडूक त्याच्या प्रजातीमधला शेवटचा बेडूक ठरेल.

दहा वर्षापूर्वी जेव्हा रोमिओला बोलिव्हियातील प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले तेव्हा पहिले दोन वर्ष तो अपेक्षेने जोडीदाराच्या आशेने साद घालत राहायचा पण कालांतराने त्याची आशा मावळत गेली आणि नंतर रोमिओचा आवाज कायमचा बंद झाला. रोमिओसाठी ज्युलिएट शोधण्यासाठी पंचवीस हजार डॉलरचा विशेष निधी सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.

यंदाच्या ’व्हॅलेंटाइन डे’ला तरी रोमियोला त्याची ज्युलिएट मिळावी आणि त्याचा वंश सुरू राहावा. 

संबंधित बातम्या