मुक्काम अंतराळातला!

रोहित हरीप
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नोंदी

पर्यटन हा प्रकार हळूहळू हौस न राहता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनत आहे. रोजच्या धावपळीतून चार दिवस रजा घेऊन कुठेतरी निवांत वेळ घालवणे हे सगळ्यानांच आवडते. पर्यटनाच्या कक्षाही आता रुंदावत आहेत. पूर्वी देशांतर्गत मर्यादित असलेले पर्यटन आता जगभर पसरले आहे. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोचलेले हे पर्यटन आता लवकरच पृथ्वीच्या बाहेरील अंतराळात पोचणार आहे. ’स्पेस टुरिझम’ म्हणजेच ‘अंतराळातील पर्यटन’ हा एकेकाळी अशक्‍यप्राय वाटणारा प्रकार आता प्रत्यक्षात येत आहे.

अमेरिकेतील अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी कंपनी ‘ओरियान स्पॅन’ या कंपनीने यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून २०२२ या वर्षी अंतराळ पर्यटकांची पहिली तुकडी अंतराळात पर्यटक म्हणून जाणार आहे. या पर्यटकांची मुक्कामाची सोय अंतराळात करण्यासाठी ‘ओरियान स्पॅन’ कंपनीने ‘ऑरोरा स्टेशन’ नावाचे आलिशान हॉटेलही अंतराळात उभारले आहे.

अमेरिकेतील कॅलिफ्रोर्नियातील सॅन जोसे या शहरात ‘स्पेस २.०’ नावाची अंतराळ परिषद झाली यामध्ये यासंबंधीची घोषणा ‘ओरियान स्पॅन’ कंपनीमार्फत करण्यात आली. या मोहिमेसाठी ऑनलाइन नोंदणीची सुरवात करण्यात आली आहे. यासाठी पर्यटकांना पन्नास लाख रुपये आगाऊ जमा करावे लागणार आहेत. काही कारणास्तव जर ही मोहीम रद्द झाली तर ही सर्व रक्कम संबंधितांना परत मिळणार आहे. 

या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचा खर्च ५ कोटी १४ लाख इतका असणार आहे. बारा दिवसाच्या या मोहिमेसाठी एकूण ६१ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. थोडक्‍यात जगभरातील केवळ अतिश्रीमंत व्यक्तींना याचा लाभ घेता येणे शक्‍य आहे.

या हॉटेलमध्ये एका वेळी सहा व्यक्तींच्या मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते. या मुक्कामादरम्यान एक प्रक्षिशित अंतराळवीर या पर्यटकांसोबत असणार आहे. या प्रवासात पर्यटकांना ‘झिरो ग्रॅव्हिटी’ या अवस्थेचा अनुभव घेता येणार आहे. तसेच जे पर्यटक यात सहभागी होतील त्यांना त्यांच्या गावाचा, शहराचा फोटो अंतराळातून काढण्याची संधी मिळणार आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० किलोमीटर अंतरावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणाऱ्या या हॉटेलमधून पर्यटकांना दर दिवशी सोळा सूर्योदय आणि सुर्यास्तांचे नयनरम्य क्षण अनुभवता येणार आहेत. 

ही सफर ज्यांना अनुभवायची आहे त्यांना यासाठी खास प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. हा प्रशिक्षण कालावधी सुमारे तीन महिन्यांचा असणार आहे.

 

माकडांचा ‘स्पा’
गरम पाण्याचा ’स्पा बाथ’ घेतल्यामुळे आयुष्यातल्या ताणतणावांचा विसर पडतो आणि काही काळापुरते का होईना आपण ‘रिलॅक्‍स’ होतो. ‘स्पा बाथ’चे महत्त्व आता वैद्यकीयदृष्ट्‌या सिद्ध झाले आहे. निसर्गातली प्राण्यांना जेव्हा अशा ताणतणावांचा सामना करावा लागतो तेव्हा ते काय बरे करत असतील ?

जपानमध्ये सापडणारी ’स्नो मंकी’ प्रजातीची माकडं त्याच्या विलक्षण वर्तनामुळे सध्या चर्चेत आहेत. इथल्या ‘जिगोकुडानी अभयारण्यात’ गरम पाण्याचे झरे आढळतात. माकडांसाठी राखीव असणाऱ्या या अभयारण्यातील अनेक माकडे या झऱ्यावर दरवर्षी येतात आणि तासन्‌तास गरम पाण्यात बसून राहतात. माकडांच्या ‘स्पा बाथ’ चा उद्देश केवळ थंडीपासून बचाव हा नसून, त्याचा उपयोग ताण कमी करण्यासाठी होतो असे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. या माकडांच्या शरीरात ‘ग्युक्‍लोकॉर्टिकॉईड’ नावाचे हार्मोन सापडते. जेव्हा मानसिक ताण वाढतो तेव्हा या संप्रेरकाची पातळी वाढते. गरम पाण्यात स्पा बाथ घेणाऱ्या बारा मादी माकडांच्या शरीरातील या संप्रेरकाची पातळी ही इतर माकडांपेक्षा वीस टक्‍क्‍याने कमी आढळून आली. गरोदरपणाच्या काळात या माद्या गरम पाण्यात जास्तीत जास्त वेळ घालवतात असाही निष्कर्ष या संशोधनाद्वारे काढण्यात आला आहे. फेसबुक व इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या माकडांच्या फोटोमुळे या अभयारण्यात सध्या पर्यटकांची झुंबड उडाली आहे.

 

दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी
नेपाळ सरकारच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका ऐतिहासिक निकालाद्वारे अपंग आणि अंध व्यक्तींना एव्हरेस्ट शिखर मोहिमेत सहभागी होता येणार असे जाहीर केले. याआधी नेपाळ सरकारने काही महिन्यापूर्वी दिव्यांग व्यक्तींना अशा प्रकारच्या कुठल्याच मोहिमेत सहभागी होता येणार नाही असा स्वरूपाचा कायदा केला होता. दरवर्षी जगातील सर्व श्रीमंत देशातील गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होत असल्यामुळे सर्व जगाचे लक्ष या निकालाने वेधून घेतले. आंतररराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांमधून या निकालावर टीकेची झोड उठवण्यात आली. परिणामी नेपाळमधील दिव्यांगासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

या निकालामुळे चीनमधील शिया बोयु या जिद्दी गिर्यारोहकाला सर्वांत जास्त दिलासा मिळाला आहे. ६९ वर्षीय शिया बोयुची कहाणी अत्यंत प्रेरणादायी अशी आहे. वर्ष १९७५ मध्ये चीनने एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी जी राष्ट्रीय मोहीम आखली होती त्या चमूचा शिया बोयु हे सदस्य होते. या मोहिमेदरम्यान हिमालयातील लहरी हवामानाचा फटका बसल्यामुळे ही मोहीम अयशस्वी ठरली व एव्हरेस्ट सर करण्याचा बेत रद्द करावा लागला. मात्र या मोहिमेदरम्यान अतिथंड हवामान आणि ऑक्‍सिजनची कमतरता यामुळे हिमदंशाचा फटका शिया बोयु यांना बसला. परिणामी काही काळानंतर त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून त्यांना गमवावे लागले. एखादा लेचापेचा माणूस असता तर आयुष्याची उमेद हरवून बसला असता. पण शिया बोयु  त्यातले नव्हते. ते या संकटातूनही उभे राहिले आणि एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न उरी बाळगले. तेव्हापासून हार न मानता गेली चाळीस वर्षे त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यासाठी ते सतत कार्यशील आहेत.

शिया बोयु २०१४ पासून सतत एव्हरेस्ट मोहिमेवर जात आहेत. मात्र दरवर्षी कोणत्या न कोणत्या कारणामुळे ही मोहीम अर्धवटच राहिली आहे. २०१४ मध्ये झालेल्या हिमवादळात १६ शेर्पांचा मृत्यू झाल्याने ही मोहीम रद्द करावी लागली. तर २०१५ मध्ये नेपाळमध्ये जो भूकंप झाला त्यामुळे ही मोहीम रद्द करण्यात आली. २०१६ मध्ये तर शिखरापासून केवळ २०० मीटर लांब असताना खराब हवामानामुळे मोहीम आवरती घ्यावी लागली होती. अडथळ्यांची ही शर्यत जिंकत आता २०१८ मध्ये आता पुन्हा शिया बोयु एव्हरेस्ट शिखर मोहिमेवर जात आहेत. त्यांनी उराशी बाळगलेले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व जगातून त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळेस पर्वतराज हिमालय त्यांच्या जिद्दीवर प्रसन्न होत त्यांना यश देवो हीच सदिच्छा !!

फोटो फीचर

संबंधित बातम्या