केरळमधले परदेशी मासे

रोहित हरीप
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

नोंदी
 

केरळमधले परदेशी मासे
केरळच्या पुराला आता महिनाभराचा काळ उलटला आहे. देशभरातून केरळमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. देशभरातले कार्यकर्ते केरळच्या पुर्ननिर्मितीसाठी हातभार लावत आहेत. महापुराचा हा काळ उलटल्यानंतर आता केरळच्या पुरासंबंधी नवनवीन माहिती उघड होत आहे. एकूण झालेले नुकसान, त्याचे प्रमाण, भीषणता याचा अंदाज आता सरकारला येत आहे. या पुरात झालेली मनुष्यहानी आणि वित्तहानीची माहिती माध्यमांतर्फे सर्वांपर्यंत पोचलीच आहे. या महापुरामुळे केरळच्या गोड्या पाण्यातील माशांपुढे एक वेगळंच संकट उभे राहिले आहे.

केरळ विद्यापीठ आणि केरळ मत्स्यशेती प्रशिक्षण केंद्र या केरळमधल्या संस्थानी पुरानंतर केरळमध्ये पाहणी केली असता, त्यांना केरळच्या नद्यांमध्ये आणि खाड्यांमध्ये लाल पोटाची पिरान्हा, आफ्रिकन कॅटफिश, अरापैमा यासारख्या परदेशी प्रजातीचे मासे आढळून आले आहेत. परदेशी प्रजातीच्या या माशांमुळे केरळमधल्या स्थानिक माशांच्या आस्तिवाला धोका निर्माण झाल्याची माहिती केरळमधल्या तज्ज्ञांनी दिली आहे.

पिरान्हासारखा मासा हा जगातला सर्वांत क्रूर मासा ओळखला जातो. त्यांची पैदास ॲमेझॉनच्या खोऱ्यातल्या गोड्या पाण्यात होते. आफ्रिकन कॅट फिश हा मासा गोड्या पाण्यात पन्नास किलोपर्यंत वाढतो आणि त्याचा नैसर्गिक भक्षक कोणीच नसतो. अरापैमा हा ब्राझीलियन वंशाचा मासा पाण्याबाहेर बराच काळ जिवंत राहू शकतो, तो मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्यातल्या माशांची शिकार करतो.

हे परदेशी प्रजातीचे मासे केरळच्या नद्यांमध्ये कुठून आले याबद्दल नेमकी माहिती अद्याप हाती आली नसली, तरी विदेशी माशांची चालणारी तस्करी आणि बेकायदेशीर मस्यशेती याकडे बोट दाखवले जात आहे. केरळमध्ये चालणारी बेकायदेशीर मस्यशेती, परदेशी माशांची तस्करी या निमित्ताने उघड झाली आहे.  या प्रजातींमुळे केरळमधील माशांच्या स्थानिक प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. तसेच यामुळे पर्यावरणाचा समतोलही ढासळू शकतो. गोड्या माशांच्या वैविध्यपूर्ण प्रजातींसाठी केरळ जगातील एक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. मात्र या माशांमुळे एक नवे संकट उभे ठाकले आहे. 


सौदीतल्या महिला बनणार पायलट
या  वर्षाच्या जून महिन्यात सौदी अरेबियातील महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचा ऐतिहासिक निर्णय सौदी सरकारकडून घेण्यात आला. या निर्णयामागे सौदी अरेबियाचे राजे महम्मद बीन सलमान यांची महत्त्वाची भूमिका होती. या ऐतिहासिक निर्णयानंतर आता सौदीतील महिलांना विमानात सहवैमानिक आणि फ्लाइट अटेंडन्ट होण्याचे दरवाजे मोकळे झाले आहेत. सौदी अरेबियातील ‘फ्लायनास’ या विमान कंपनीने त्यांच्या कंपनीत सहवैमानिक आणि हवाई सुंदरीच्या जागांसाठी सौदी अरेबियातल्या महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आजमितीला सौदी विमान कंपन्यांमध्ये हवाई सुंदरी म्हणून फिलीपाईन्स देशातील युवती काम करत होत्या. त्यांचा जागी आता सौदी अरेबियातील महिलांची वर्णी लागणार आहे.

सौदी अरेबियात विमान कंपनीत काम करण्यासाठी महिलांना कायद्याने बंदी नसली, तरी विमान कंपन्यांचे कर्मचारी म्हणून फिलिपिन्स या देशाच्या युवती प्रामुख्याने काम करतात. नोकरीच्या या संधीबद्दल माहिती मिळताच, गेल्या चोवीस तासात हजारो सौदी महिलांना नोकरीसाठी नाव नोंदणी केली आहे. सौदी अरेबिया या देशात महिलांवर अनेक बंधने आहेत. अशा वेळी या प्रकारचे निर्णय हे नक्कीच आश्‍वासक भासतात.


कंबोडियातला स्नेक कॅफे
कॅफे म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते सीसीडी किंवा बरिस्ता...  वाफाळती कॉफी, मनसोक्त गप्पा, आवडत्या व्यक्तीचा सहवास आणि हाताशी असलेला मोकळा वेळ...गेल्या काही वर्षात पुस्तक प्रेमींसाठी बुक कॅफेची संकल्पना हळूहळू रुजत आहे. कंबोडियाच्या राजधानीच्या शहरात फेनॉम पेन्ह येथे मात्र एक वेगळाच कॅफे सुरू झालाय. या कॅफेत कॉफी तर उत्तम मिळतेच. पण तुम्ही कॉफी प्यायला बसलात आणि शेजारी एखादा इग्वाना (घोरपड) किंवा अजगर येऊन बसला, तर अजिबात किंचाळत उठू नका. कारण ही घोरपड किंवा अजगर हे पाळीव असून, हे पाळलेले सरीसृपच या कॅफेची मुख्य थीम आहे. या आधी कंबोडियात ‘कॅट कॅफे’ मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले होते. ची रॅटी या बत्तीस वर्षीय तरुणाने हा जगातला पहिला रेप्टाईल कॅफे सुरू केला आहे. या कॅफेमध्ये हे विविध जातीचे सरिसृप पाळण्याचे मुख्य कारण आपल्यापैकी बहुतांश लोकांना सापांविषयी एक प्रकारचा असलेली किळस, घृणा किंवा भीती असते. सर्वसामान्यांच्या मनात असणारी ही किळस किंवा भीती दूर करणे हा मुख्य उद्देश आगळावेगळा कॅफे सुरू करण्यामागे आहे.

येथे कॅफेच्या भिंतीला चिटकवून वेगवेगळ्या आकाराच्या मोठ्या काचेच्या बरण्या ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये ऑरेंज कॉर्न स्नेक, ड्रॅगन इग्वाना, अलबिनो पायथॉन (पांढरा अजगर) असे प्राणी ठेवलेले असतात. कॅफेला भेट देणारे कॉफीचा मग घेऊन हे प्राणी न्याहाळत कॅफेत फिरत असतात. काही थोडे धाडसी गटातले लोकं हे प्राणी हाताळण्याचा अनुभवही घेताना दिसतात. या आगळ्यावेगळ्या प्रकारामुळे कंबोडियाला भेट देणारे पर्यटक या कॅफेला आवर्जून भेट देत आहेत. काही प्राणीप्रेमींनी या प्राण्यांना असे डांबून ठेवण्याबाबत तक्रारही केली ,पण कॅफे मालकाच्या माहितीनुसार हे सगळे प्राणी पाळीव असून त्यांना जंगलात सोडले तर तग धरू शकणार नाहीत. हे सगळे प्राणी थायलंड देशातून आयात करण्यात आले आहेत.


स्पेस एक्‍स नव्या विक्रमाच्या तयारीत
स्पेस एक्‍स आणि इलॉन मस्क ही दोन नावं ऐकली, की काहीतरी विस्मयकारी, अद्‌भुत ऐकायला, बघायला किंवा वाचायला मिळणार याची खात्री असते. इलॉन मस्क या अवलियाने अंतराळात थेट चारचाकी पाठवून सगळ्या जगाला आश्‍चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर लगेचच त्याने चंद्रावर पर्यटकांना नेणार असल्याची घोषणा केली होती. स्पेस एक्‍स कंपनीने त्यांची पहिली खासगी चांद्रमोहीम आखली असून, त्यासाठी जपानमधल्या युसुकू मझेवा या उद्योगपतीने नोंदणी केली आहे. युसुकू हा जपानमधल्या झोझो या अॉनलाइन क्षेत्रातील कपड्यांच्या कंपनीचा मालक आहे, आणि अंतराळात जाणार तो पहिला पर्यटक ठरणार आहे.

इलॉन मस्कच्या नियोजित संकल्पनेनुसार दोन खासगी पर्यटकांना दोन दिवसात चंद्राभोवती प्रदक्षिणा घालायची संधी मिळणार होती. यासाठी स्पेस एक्‍स कंपनी, फाल्कन हेव्ही रॉकेट आणि ड्रॅगन क्रू कॅप्सूलचा वापर करणार होती. मात्र आता नवीन नियोजित मोहिमेनुसार केवळ एकाच व्यक्तीला अंतराळात जाता येणार आहे. पण यावेळेस या मोहिमेसाठी एक नवीन यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. या यानासंबंधीचे एक ट्विट आणि फोटो कंपनीच्या अधिकृत ट्‌विटर खात्यावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या ट्विटनुसार ‘स्पेस एक्‍स कंपनीने अंतराळातील पर्यटनासाठी पहिल्या पर्यटकाशी खासगी करार केला आहे. सर्वसामान्य माणसांना अंतराळात जाण्यासाठी हे इतिहासातले एक महत्त्वाचे पाऊस ठरणार आहे. अंतराळात पर्यटक म्हणून कोण जाणार याची नावे लवकरच जाहीर केली जातील.’ 

आत्तापर्यंत चंद्रावर केवळ २४ माणसे चंद्रापर्यंत पोचू शकलेली आहेत. वर्ष १९७२च्या अपोलो मोहिमेनंतर चंद्रावर कोणीच गेलेले नाही. त्यामुळे स्पेस एक्‍स कंपनीची ही मोहीम एक नवा विक्रम ठरणार आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या