अति तेथे माती 

श्रीनिवास शारंगपाणी
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

निरीक्षण
 

आपण बारकाईनं विचार केला तर असं दिसून येईल, की आज जगासमोर ज्या समस्या आ वासून उभ्या ठाकलेल्या आहेत त्याचं मूळ अतिरेकामध्ये आहे. प्रदूषणाचा विचार केला तर असं लक्षात येईल, की काही वर्षांपूर्वी सध्या वापरात असलेल्याच वस्तू किंवा प्रक्रिया यांचा आपल्या जीवनात अंतर्भाव होता. मात्र, अलीकडे त्या वस्तू - म्हणजे प्लॅस्टिक असो अथवा कीटनाशकं असोत वा रासायनिक खतं असोत - या सर्वांचा वारेमाप वापर झाल्यामुळं प्रदूषणाचा महाकाय विळखा निसर्गाभोवती पडलेला आहे. तीच गोष्ट खनिज इंधनाचा वापर करणाऱ्या वाहनांची. दिवसाकाठी हजारो वाहनांचं उत्पादन होत आहे, हे कशाचं निदर्शक आहे? आपण मुळी परिणामांचा विचारच न करता वस्तूंचा अतिरेकी उपभोग घेत असतो.

आता स्मार्टफोनचंच पाहा ना. केवळ काही वर्षांपूर्वीच अस्तित्वात आलेलं हे साधन आज प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनलं आहे. शाळेत जाण्याच्या वयाच्या आधीच मुलांच्या हाती स्मार्टफोन दिसू लागलेला आहे. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरापायी गुन्हे, आत्महत्या घडत आहेत. यात दोष स्मार्टफोनचा नसून त्याच्या अतिरेकी वापराचा आहे. स्मार्टफोन हे एक अतिशय उपयुक्त उपकरण आहे यात शंकाच नाही. स्मार्टफोन विविधकार्यी उत्पादन म्हणजेच ज्याला इंग्रजीत multi-functional product म्हणतात, ते आहे. खरं सांगायचं तर तो वैयक्तिक साहाय्यक आहे. पण सकाळी उठल्यावर अगदी तोंडही न धुता त्याच्याकडे वळणं आणि अगदी लहान वयापासून त्याची सवय लावणं कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा.

आपण आजूबाजूला निरखून पाहिलं, तर पदोपदी गोष्टींचा अतिरेक होताना दिसून येईल. नगरांचं आपण जे काँक्रीट-जंगल केलं आहे, तेही अतिरेकापायीच. वृक्षतोड, धरणं बांधणं यामध्ये तर आपण अतिरेकाचाही अतिरेक करून आपलं जीवन समृद्ध करण्याऐवजी अधिक दुरापास्त केलं आहे. जंकफूड म्हणजे तयार आणि ताबडतोब उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ यांचा तर इतका अतिरेक झाला आहे, की त्यापायी एक संपूर्ण पिढी अनारोग्याच्या विळख्यात सापडली आहे असंच म्हणावं लागेल. पिझ्झा, बर्गर अथवा चिकन नगेट्स हे पदार्थ खाण्याच्या विरोधात मी हे विधान करीत नाही, तर त्याच्या अतिरेकाबद्दल ही टीका आहे. टीव्हीवर मॅच सुरू आहे, मागव पिझ्झा; कामावरून येता-जाता फास्टफूड जॉइंटवर जाऊन खा बर्गर अशा पद्धतीची जीवनशैली ही खरी घातक आहे. सर्वांत गंभीर अतिरेक आपण लोकसंख्येच्या बाबतीत केला आहे. आपल्यापेक्षा चीनची लोकसंख्या जास्त आहे हे विदितच आहे, परंतु चीनचं क्षेत्रफळ भारताच्या तुलनेनं तिप्पट आहे हे लक्षात घेतलं, की आपण आपल्यावरच कसं संकट ओढवून घेत आहोत ते लक्षात येईल. अजूनही समाजात मुलगा हवा या हव्यासापायी अनेक मुलं होऊन देत मुलाची वाट पाहणं सुरूच आहे. तळागाळातील समाजामध्येही आपण योग्य ती जागृती करू न शकल्यानं लोकसंख्येचा अतिरेक झाला आहे, होत आहे आणि योग्य उपाययोजना न केल्यास होत राहील यात शंका नाही. वाढीव लोकसंख्येला आपण अन्न, वस्त्र, निवारा याखेरीज आरोग्य, शिक्षण यांची तरतूद करू शकणार आहोत का, याचा कोणीही विचार केलेला दिसत नाही. व्यक्तिगत स्वातंत्र्यावर आक्रमण होईल या भीतीनं कुणाही राजकारण्यानं वा समाजशास्त्रज्ञानं याबाबत कोणता कायदा करावा वा पावलं उचलावीत म्हणून या समस्येवर भाष्य केलेलं दिसत नाही.

थोडक्यात नैसर्गिक स्रोतांचा आणि घटकांचा अतिरेकी वापर हाच आजच्या पर्यावरणीय असंतुलनाला कारणीभूत आहे, तर सामाजिक पातळीवर अतिरेकी स्वातंत्र्य आणि भोगवाद यामुळेच आजच्या अजस्र समस्या आ वासून उभ्या आहेत. असहिष्णुतेच्या अतिरेकामुळं आजच्या दहशतवादाला खतपाणी मिळतं आणि सर्व आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्रितपणे लढा दिल्याशिवाय दहशतवाद संपुष्टात येऊ शकणार नाही. त्यातही अतिरेकी व्यापारी तृष्णेमुळं हे शक्य दिसत नाही याला कारण म्हणजे विकसित राष्ट्रांचा अतिरेकी शस्त्रास्त्र-पुरवठा. खरंतर अतिरेकी व्यापारी लोभापायीच वसुंधरेचे लचके तोडले जात आहेत आणि त्यालाच आधुनिक शब्दकोशात ‘विकास’ असं संबोधलं जातं.

एक गोष्ट इथं नमूद केली पाहिजे. अगदी जीवनावश्यक गोष्टींचा अतिरेकही अपायकारक ठरू शकतो. जीवनासाठी अत्यावश्यक प्राणवायू हादेखील जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात घेतला गेला, तर केवळ हानिकारकच नव्हे तर मृत्यूलाही आमंत्रण देऊ शकतो. या प्रकाराला प्राणवायू विषाक्तता किंवा इंग्रजीत Hyperoxia/Oxygen Toxicity असे नामाभिधान आहे. अशाच प्रकारे पाणीही मोठ्या प्रमाणात प्राशन केल्यास जलविषाक्तता किंवा Hyperhydration/Water Toxicity याची बाधा होऊन मृत्यूही ओढवू शकतो. जास्तीत जास्त पाणी पिण्याच्या काही स्पर्धांमध्ये अशी जीवितहानी झालेली आहे. असे अनेक पदार्थही ज्ञात आहेत, की ज्यांच्या अतिसेवनामुळे व्यक्तींना या जगाचा निरोप घ्यावा लागला आहे. अशा पदार्थांमध्ये मीठ, तिखट, मद्य इ. पदार्थांचा समावेश होतो.  

यामुळे मला असं वाटतं, की लहान मुलांना, तरुणांना केवळ “फार वेळ स्मार्टफोन वापरू नका,” “फार वेळ टीव्ही बघायचा नाही हं,” असं तुकड्याताकड्यांनी न सांगता कुठलीही वस्तू किंवा पदार्थ यांचा अतिरेकी वापर न टाळल्यास तो आत्मघातकी ठरू शकतो, याची जाणीव करून दिली पाहिजे. मला विश्‍वास वाटतो की अतिरेकाला आपण जर टाळू शकलो, तर आपलं आरोग्य आणि जीवन खचितपणे समृद्ध होईल. जाता जाता मला असंही सुचवावंसं वाटतं, की अतिरेक करायचाच असेल तर ज्ञानवृद्धी, ज्ञानसंपादन, सहकार्य अशा बाबींमध्ये करायला हवा. 

संबंधित बातम्या