देखण्या कॅनडाची सफर 

डॉ. संजीव मोतीलाल भंडारी, सोलापूर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

पर्यटन

अनेक वर्षांपासून बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले, स्वच्छ निळेशार पाणी असलेले तळे आणि त्या तळ्यातील एखादे शांत नितांत सुंदर बेट असे भिंतीवरील निसर्गचित्र पाहिले, की वाटे अशा ठिकाणाला आयुष्यात एकदा तरी भेट  द्यायलाच हवी! बरेच वर्षांची ही इच्छा कॅनडाच्या टूरमध्ये पूर्ण होण्याचा योग आला. आजवर जगाच्या पाठीवरील अनेक देश पालथे  घालण्याची संधी मला मिळाली, पण आत्तापर्यंतच्या प्रवासातील सर्वात निसर्गरम्य व भुरळ पाडणारा देश कुठला, असे विचारल्यास  मी कॅनडाला  प्रथम क्रमांक देईन!    

गेली अनेक वर्षे कंपन्यांच्या साचेबंद कंडक्टेड टूरमधून जाण्याऐवजी चार ते सहा महिने आधीपासून त्या देशाविषयी पूर्ण माहिती काढून आपल्या आवडीप्रमाणे स्थळदर्शन ठरविणे व त्याचे इंटरनेटवरून सर्व बुकिंग करणे हा माझा आवडता छंद आहे. त्यानुसार माझ्या नेहमीच्या ग्रुप समोर मी  कॅनडाला जाण्याचा प्रस्ताव ठेवला व सर्वसंमतीने  आमच्या ट्रिपविषयी इंटरनेटवरून माहिती काढण्यास सुरुवात केली. एक गोष्ट इथे नमूद करावी वाटते, की कॅनडाचा  व्हिसा फक्त कागदपत्रांच्या आधारे दिल्लीहून मिळत असल्यामुळे त्याच्यासाठी दोन-अडीच महिने लवकर सुरुवात केलेली नेहमी बरी. प्रथमच आम्हा आठजणांच्या ग्रुपमधील तिघांना व्हिसा न मिळाल्याने खूप मोठा आर्थिक भुर्दंड पडला व त्यांच्या प्रवासाचा योगही हुकला!

कॅनडाला जाण्यासाठी सर्वात उत्तम  सीझन म्हणजे जुलै व ऑगस्ट महिने, पण जून व सप्टेंबर महिन्यामध्येसुद्धा गर्दी कमी व हवामान सुंदर असते. हा तेथील उन्हाळा असल्यामुळे वातावरण खूपच आल्हाददायक असते. कॅनडा म्हणजे अतिशय थंडी व सगळीकडे बर्फच बर्फ हा अतिशय चुकीचा समज असून अनेक वेळा तर उन्हाळ्यामध्ये चटका बसेल असे ऊन असते - बहुधा हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असावा.

पर्यटनाच्या दृष्टीने कॅनडाचे पूर्व व पश्‍चिम असे दोन भाग करता येतील. संपूर्ण कॅनडा व्यवस्थित बघायचा असेल, तर त्याला अठरा ते वीस दिवस कमीत कमी लागतील असे लक्षात आले. पूर्वेकडील टोरंटोपासून पश्‍चिमेकडील कॅलगरीपर्यंतचा कॅनडाचा मध्यभाग हा प्रवासाच्या दृष्टीने शुष्क व  विराण असल्याने टुरिझमसाठी तेथे वेळ घालवण्यात अर्थ नाही. त्यामुळे नियोजन करताना प्रथम आठ दिवस पूर्व कॅनडा व नंतर चार तासाची फ्लाईट घेऊन पश्‍चिमेकडील कॅलगरीला जाण्याचे ठरवले.

ठरल्याप्रमाणे जुलैच्या मध्यास मुंबईहून झुरीकमार्गे लांबचा विमान प्रवास करून आम्ही टोरंटोला पोचलो. विमानतळावर ड्रायव्हर मोहम्मद मोठी गाडी घेऊन हजर होता. त्यामधून आम्ही पाचजण शहराच्या मध्यभागी असलेल्या रमादा प्लाझा हॉटेलवर पोचलो. मोहम्मद हा आमचा पाकिस्तानी ड्रायव्हर अतिशय चांगला होता व पुढील पाच दिवस त्याने आम्हाला पूर्व कॅनडाची अतिशय सुंदर सफर घडविली. संपूर्ण प्रवासभर तो जुन्या हिंदी गाण्याची फर्माईश करायचा व आम्ही ती मोबाईलवर लावल्यावर खूप एंजॉय करायचा.

पूर्व कॅनडामध्ये टोरंटो, राजधानी ओटावा, माँट्रियल व क्युबेक अशी चार महत्त्वाची शहरे आहेत - त्यापैकी आपल्याकडील  मुंबईसारखे टोरंटो हे महत्त्वाचे शहर आहे. पहिल्या दिवशी संध्याकाळी जवळच्याच  ‘टोरंटो ईटॉन सेंटर’मध्ये  फेरफटका मारला, लोकल सिम कार्ड घेतले व जवळच्याच भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. 

कुठल्याही शहराची प्रथम ओळख करून घेण्यासाठी ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बस हा एक उत्तम पर्याय असतो.  या बसचे तिकीट आधीच बुक करून ठेवल्यामुळे हॉटेलजवळच्याच बस स्टॉपवरून आम्ही सर्वजण दुसऱ्या दिवशी सकाळीच टोरंटो शहर दर्शनाला निघालो. जवळपास दोन तीन तास या सुंदर शहराचा बसच्या उघड्या टपावरून आस्वाद घेतल्यावर आम्ही  टोरंटोमधील सर्वात उंच अशा ‘सी एन टॉवर’ला भेट देण्यासाठी जवळच्या स्टॉपवर उतरलो.

सी एन टॉवरच्या वरील काचेच्या व्ह्युइंग गॅलरीमधून विस्तीर्ण असे ऑन्टॅरिओ लेक आणि त्यामध्ये असलेल्या अनेक बेटांचे विहंगम दृश्य खरोखर अवर्णनीय आहे. त्यातीलच एका बेटावर  एक छोटासा  विमानतळ होता आणि त्यावरून उडणारी छोटी प्रायव्हेट विमाने, हे दृश्य बघतच राहावे असे वाटत होते. नंतर चारी बाजूंनी फिरून टोरंटो शहराचे विहंगम दृश्य पाहता पाहता वेळ कसा गेला कळलेच नाही. एका भागात काचेच्या फ्लोरिंग मधून सत्तर-ऐंशी मजले खालील व्यक्ती, रस्ते व त्यावरील वाहने, हे दृश्य पाहताना छातीत धडकीच  भरत होती. वेगवान लिफ्टमधून खाली आल्यावर जवळच  असलेल्या हार्बरफ्रन्टला जाऊन  ऑन्टॅरिओ लेकमधील बेटांचे दर्शन घडवणारी हार्बर क्रूझ घेतली. अथांग पाणी, सुंदर बेट समूह आणि किनाऱ्यावर दिसणाऱ्या सी एन टॉवर आणि इतर उंचच-उंच चमकदार इमारती, सारे काही डोळ्यांचे पारणे फेडत होते. क्रूझमधून उतरल्यावर मोहम्मद गाडी घेऊन हजर होता. त्याच्याबरोबर हॉटेलवर जाऊन सामान घेऊन आम्ही नायगारा फॉल्सकडे प्रस्थान केले. 

टोरंटो ते नायगारा फॉल्स हे अंतर अंदाजे सव्वाशे किलोमीटर असून ऑन्टॅरिओ लेकच्या काठाकाठाने रस्ता जातो. अमेरिका आणि कॅनडाच्या सीमारेषेवर पाच समुद्राएवढे विस्तीर्ण तलाव (The Great Lakes) असून त्यातीलच एक म्हणजे ऑन्टॅरिओ लेक! त्यातीलच एरी आणि ऑन्टॅरिओ लेक यांना जोडणारी नदी म्हणजे नायगरा नदी. या नायगरा नदीवरच जगप्रसिद्ध नायगरा फॉल्स आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत लख्ख सूर्यप्रकाश असल्याने आरामात गप्पाटप्पा मारत व मधे चहा पाण्यासाठी थांबूनसुद्धा आम्ही दिवसाउजेडीच नायगरा फॉल्सला पोचलो. 

इंटरनेटवर बराच शोध घेतल्यानंतर नायगारा फॉल्सच्या अगदी समोरच असलेल्या एम्बसी स्वीट्स या हॉटेलच्या ३३ व्या मजल्यावरील एक मोठा स्वीट मी बुक केलेला होता. रूममधील काचेच्या मोठ्या खिडकीतून नायगारा फॉल्सचा जगप्रसिद्ध हॉर्स शू प्रपात अगदी समोरच दिसत होता. संध्याकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये डावीकडे अमेरिकन फॉल, समोर घोड्याच्या नालीच्या आकाराचा कॅनेडियन हॉर्स-शू फॉल व मधे गोट आयलंड आणि नंतर रात्रीच्या विविध रंगी दिव्यांच्या झोताने उजळून निघालेला नायगारा धबधबा आणि त्याचे उंच उडणारे तुषारढग आमच्या रूममधून इतके सुंदर दिसत होते, की रात्री उशिरा झोप असह्य होईपर्यंत आम्ही ते दृश्य डोळ्यात आणि आमच्या कॅमेरामध्ये साठवत बसलो. त्यानंतर अमेरिकन फॉलच्या पाण्यावर जवळ जवळ अर्ध्या तासाचा अतिशय सुंदर असा रंगीबेरंगी फायरवर्क शो झाला. आजही ते  विलोभनीय दृश्य आम्ही विसरू शकत नाही. कंडक्टेड टूरपेक्षा स्वतः शोध घेऊन केलेल्या बुकिंगचा हा मोठा फायदा  असतो व सर्वांनी एकमताने मला  त्यासाठी मनापासून धन्यवाद दिले! 

पहाटे सूर्योदयाच्या वेळी उठून बिछान्यावर पडल्या पडल्या काचेच्या खिडकीतून पुन्हा एकदा  नायगारा फॉल्स डोळे भरून बघितला व नंतर नाश्त्यासाठी खाली गेलो. तेथूनही नाष्टा घेता घेता  समोर धबधब्याचे पडणारे पाणी  व त्याच्या तुषारांनी तयार झालेले ढग दिसत होते.

नायगारा फॉल्स व्हिजिटर सेंटरमधून आमच्या ग्रुपची आधीच बुक केलेली तिकिटे घेऊन आम्ही प्रथम धबधब्याच्या पाण्याच्या थेट खाली नेणाऱ्या ‘हॉर्नब्लोवर क्रूझ’कडे प्रयाण केले. नायगारा धबधबा अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांच्या सीमेवर असल्यामुळे त्याला अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशातून भेट देता येते, पण खरे सौंदर्य दिसते ते कॅनडाच्या बाजूने! क्रूझमधून थेट धबधब्याच्या पाण्याच्या खाली गेल्यावर पाण्याच्या प्रवाहाचे व त्याच्या शक्तीचे ते रौद्र रूप पाहून निसर्गासमोर खरोखर माणूस नतमस्तक होतो. त्यानंतर ‘Journey Behind Falls’ म्हणजे धबधब्याच्या कातळाच्या आत तयार केलेल्या लिफ्टमधून खाली थेट पडणाऱ्या पाण्याच्या मागील बाजूला गेलो. समोरून अविरत पडणारे ते धबधब्याचे पाणी हा एक थरारक अनुभव होता. वर व्हिजिटर सेंटरपाशी धबधब्याच्या तुषारांवर छान इंद्रधनुष्य तयार झाले होते, ते पाहून मन प्रसन्न झाले. अशा पर्यटनस्थळावर गेल्यावर एक नेहमी जाणवत राहते, की भारतामध्येसुद्धा असे अनेक धबधबे आहेत, पण तेथे जी सोय केलेली असते त्यामुळे त्या धबधब्याचे सौंदर्य अजून वाढते -  पर्यटन वाढीसाठी ते खरोखर फार महत्त्वाचे आहे. 

शेवटी धबधब्याच्या प्रवाहाच्या चार किलोमीटर खालच्या बाजूला ‘White Water Boardwalk’मध्ये अरुंद घळीमधून अत्यंत वेगाने जाणाऱ्या मयूरपंखी रंगाच्या उसळत्या नायगारा नदीचे मोहक रूप पाहून संध्याकाळी पुन्हा मोहम्मदबरोबर त्याच्या गाडीने टोरंटोच्या हॉटेलात परतलो.

पुढील दिवशी सकाळीच आम्ही कॅनडाची राजधानी ओटावा शहराच्या दिशेने निघालो. विस्तीर्ण अशा त्या ऑन्टॅरिओ लेकच्या काठाने विरुद्ध दिशेला बराच वेळ प्रवास केल्यावर रस्त्यातच  किंग्स्टन येथे ‘वन थाउजंड आयलंड क्रूझ’ घेतली. ऑन्टॅरिओ लेकमध्ये असलेल्या अनेक छोट्या छोट्या बेटांजवळून सुमारे दीड तास बोटीवरून सफर केली. नंतर तेथील सुप्रसिद्ध क्वीन्स विद्यापीठाला भेट देऊन व तेथेच एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये दुपारचे जेवण घेऊन संध्याकाळी चार वाजता आम्ही ओटावाला पोचलो. ओटावामध्ये ८५ वर्षांच्या आमच्याच नात्यातल्या शहा काका यांनी त्यांच्या घरी उतरण्याचे अत्यंत आग्रहाचे निमंत्रण दिले होते. दोन वर्षांपूर्वी काकींचे  निधन झाल्यापासून ते एकटेच एवढ्या मोठ्या बंगल्यात राहत असल्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले, पण त्यांनी कॅनडातील सुरक्षितता व एका फोन कॉलवर पोलीस व आरोग्य सुविधा मिळत असल्याने कसलीही भीती नसल्याचे ठासून सांगितले. या वयातील त्यांचा उत्साह खरोखर वाखाणण्याजोगा होता. आमच्या येण्याने त्यांना मनापासून अतिशय आनंद झाल्याचे जाणवल्याने आमचा संकोच दूर झाला. 

शहा काका आम्हाला त्याच दिवशी संध्याकाळी ओटावा शहर आणि तेथील पार्लमेंटची बिल्डिंग पाहावयास घेऊन गेले. ओटावा शहर हे पूर्व कॅनडातील  इतर सर्व शहरांपेक्षा खूपच सुंदर व शांत आहे. योगायोगाने त्याच दिवशी यूएस आर्मी डे असल्याने पार्लमेंट हिल समोरील विस्तीर्ण हिरवळीवर सुंदर अशी लयबद्ध परेड होती, ती आम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर पार्लमेंट बिल्डिंगभोवती फिरून नंतर मागील बाजूस असलेल्या विस्तीर्ण ओटावा नदीचा व त्यावरील सुंदर अशा अलेक्झांड्रा पुलाचा सूर्यास्ताच्या वेळीचा नयनरम्य देखावा पाहून मन तृप्त झाले. अंधार पडायला जवळजवळ रात्रीचे दहा वाजले आणि त्यानंतर पार्लमेंट बिल्डिंगवर अतिशय सुंदर असा विविधरंगी लेझर किरणांद्वारे ‘लाईट व साउंड शो’ सुरू झाला. हिरवळीवर आरामशीर बसून कॅनडाचा सर्व इतिहास या शोद्वारे आम्हाला पाहायला मिळाला.

दुसऱ्‍या दिवशी आम्ही ओटावातच सामान ठेवून मोहम्मदबरोबर मॉन्ट्रियल शहराची एक दिवसाची टूर करायला गेलो. मॉन्ट्रियल म्हटल्यावर ‘हरे रामा हरे कृष्णा’ या देव आनंदच्या जुन्या चित्रपटाची प्रकर्षाने आठवण झाली. तेथीलच एक तरुणी गाइड  म्हणून आमच्याबरोबर आमच्या गाडीतून आली आणि तिथे आम्हाला ऑलिंपिक स्टेडियम, लोकल मार्केट, नॉट्रेडम चर्च, सेंट लॉरेन्स नदी व तिच्या वरील अनेक सुंदर पूल हे सर्व दाखवून शेवटी डोंगर माथ्यावरील एका पॉइंटवर नेले. तेथून सर्व मॉन्ट्रियल शहराचे विहंगम दृश्य दिसत होते. एका सुंदर भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवण घेऊन संध्याकाळी आम्हाला ओटावाला सोडून मोहम्मद पुन्हा टोरंटोला परत गेला. 

पुढील दिवशी दुपारी आम्हाला ओटावाहून क्युबेक या फ्रेंच बहुभाषीय शहराला रेल्वेने जायचे होते. सकाळचा वेळ मोकळा असल्यामुळे आम्ही ओटावा नदीवरील Lady Dive या अनोख्या डकबोट सफारीसाठी गेलो. ही एक अजबच बस-कम-बोट होती. सुरुवातीला सुंदरशा अलेक्झांड्रा ब्रीज वरून नदीपलीकडील क्युबेक या राज्यातील गॅटीन्याऊ (Gatineau) शहराचा फेरफटका मारून ही बस चक्क नदीच्या पाण्यामध्ये घुसली. विस्तीर्ण अशा ओटावा नदीमधून या बस-बोटीतून पार्लमेंट हिल व इतर ओटावा आणि गॅटीन्याऊ शहरातील नदीकाठची ठिकाणे दाखवून ती पुन्हा रस्त्यावर आली. शेवटी ओटावा शहरातील विविध देशांच्या दूतावास असलेल्या भागातून फिरून त्या बसने आम्हाला पुन्हा मुख्य चौकात सोडले. क्युबेकच्या ट्रेनला अजून वेळ असल्यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या ‘जॅक कार्टीयर बोटॅनिकल पार्क’मध्ये जाण्याचे ठरविले. रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये अतिशय सुंदररीत्या प्राणी, पक्षी, रेल्वे, बोट, पियानो, नाचणारी बाहुली अशा विविध आकाराच्या व रंगाच्या पानाफुलांपासून तयार केलेल्या प्रतिकृती पाहून दुबई येथील सुप्रसिद्ध मिरॅकल गार्डनची आठवण झाली.

दुपारी ओटावा रेल्वे स्टेशन वरून क्युबेक शहराला जाणारी सुपरफास्ट ट्रेन पकडली व संध्याकाळच्या सुमाराला क्युबेकमधील आमच्या हॉटेलवर टॅक्सीने पोचलो. संध्याकाळी चारी बाजूंनी भिंतीने बंदिस्त अशा ओल्ड क्युबेक शहराला भेट देऊन तिथेच जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही हॉटेलवर परतलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी हलका पाऊस असूनदेखील क्युबेक शहर व शेजारीच असलेल्या मॉँटमोरेंसी धबधब्याची आधीच बुक करून ठेवलेली टूर आम्ही घेतली. क्युबेक शहर पूर्वीच्या फ्रेंच वसाहतीचा भाग असल्याने सर्व शहरावर फ्रेंच वास्तुकलेची छाप आहे व या देखण्या शहराने आपला जुना वारसा पूर्णपणे राखून ठेवलेला आहे. कॅनडासारख्या इंग्लिश भाषिक राष्ट्रामध्ये असूनसुद्धा क्युबेक राज्य व शहर हे पूर्णपणे  फ्रेंचभाषिक आहे व अनेक लोकांना तिथे इंग्लिश समजत नाही हे बघून आश्चर्य वाटले. शहरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला भव्य व उंच असा मॉँटमोरेंसी धबधबादेखील खूप सुंदर आहे आणि त्या ठिकाणी वर जाण्यासाठी रस्ता व  शिवाय केबल कारही आहे. बोर्ड वॉक, धबधब्याच्या वरील बाजूस केलेला पूल आणि झीप लाईन  अशा सुविधा पाहून आपल्याकडील निसर्गरम्य ठिकाणी असलेली दुरवस्था आठवल्याशिवाय राहत नाही. 

हा पूर्व कॅनडातील आमचा शेवटचा दिवस होता.  संध्याकाळी रेल्वेने पुन्हा क्युबेकहून ओटावाला निघालो आणि उशिरा शहा काकांच्या घरी पोचलो. पहाटे सात वाजता ओटावावरून पश्चिम कॅनडातील कॅलगरीला जाण्यासाठी चार तासाची फ्लाइट असल्याने पटापट सामानाची आवराआवर करून शहा काकांशी थोडावेळ गप्पा मारून निद्राधीन झालो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या