निसर्गसौंदर्याचा अनोखा नजराणा

अभिजित खुरासणे
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

पर्यटन
महाराष्ट्राचे नंदनवन, निसर्गाने परिपूर्ण भरलेले आणि सह्याद्रीच्या गिरिशिखरावर वसलेले एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्वरला ओळखले जाते. वेगवेगळ्या ऋतूतील निसर्ग सौंदर्याचा अनोखा नजराणा येथे पहावयास मिळतो. त्यामुळे देशातीलच नव्हे, तर विदेशी पर्यटकांना येथे येण्याचा मोह आवरता येत नाही. बदलत्या महाराष्ट्रातील महाबळेश्वरही विविध मार्गाने आपले रूप बदलत आहे. पर्यटनातून विकासाला चालना देणारी ही स्मार्ट सिटी भविष्यातील एक जागतिक दर्जाचे शहर अर्थात जगातील पर्यटकांचे जागतिक 'डेस्टिनेशन' होईल यात शंकाच नाही.

महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले तसेच इतिहासातील शौर्याचे व पराक्रमाचे साक्षीदार असलेले ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर. वर्षाकाठी लाखो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशनचा 'लौकिक' आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्‍चिम घाटांच्या रांगेत ते वसले आहे. माल्कम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंदोळाचा भाग, अशा तीन खेडेगावांचे मिळून हे शहर निर्माण झालेले आहे. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचे उगमस्थान आणि पवित्र 'महाबळेश्वर'चे व 'अतिबळेश्वर'चे देऊळ म्हणजेच क्षेत्र महाबळेश्वर. महाबळेश्वर हे उंचीवर वसलेले हे एक रम्य ठिकाण आहे. इथे जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. ऑक्‍टोबर ते जून या काळात येथील हवामान आल्हाददायक असते, तर मार्च ते मे या काळात पर्यटकांची जास्त वर्दळ असते. महाबळेश्वरचा संपूर्ण परिसर दाट वनश्रींनी वेढलेला असून अनेकविध वनस्पती येथे आढळतात. त्यांत जांभूळ, ओक, हिरडा, अंजन, आंबा, बेहडा, वरस, कारवी यांचे प्रमाण जास्त आहे. जंगलात बिबट्या, तरस, कोल्हे, ससे, रानडुक्कर, वानर, माकडे इत्यादी प्राणी व वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात. बुलबूल, स्परफाउल, बर्ड ऑफ पॅरडाइज, सोनेरी हळदी, पाणकावळा, सुतार पक्षी, सारिका पक्षी, कोकिळा तसेच हनीसकर यांसारखे विविध प्रकारचे पक्षीही दिसून येतात. क्षेत्र महाबळेश्वरला (जुने महाबळेश्वर) धोम महाबळेश्वर असेही म्हणतात. येथील एका कड्यावर सर्वांत प्राचीन असे हेमाडपंथी शिवमंदिर आहे. त्यात ठेवलेल्या कृष्णेच्या मूर्तीमुळे त्याला कृष्णाबाई मंदिर असेही म्हणतात. याठिकाणी अतिमहाबळेश्वर व महाबळेश्वर ही दोन मोठी शिवमंदिरे बांधलेली आहेत. या हेमाडपंथी मंदिराजवळ पंचगंगा मंदिर आहे. त्यात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्या उगम पावल्या आहेत. या मंदिरामुळेच या भागाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. समर्थ रामदास स्वामींनी बांधलेले पहिले मारुतीचे मंदिर जुने क्षेत्र महाबळेश्वरमध्ये आहे. 

विल्सन पॉइंट : महाबळेश्वरमधील महत्त्वाचा व उंच पॉइंट म्हणजे विल्सन पॉइंट. या पॉइंटवर तीन बुरूज आहेत. पहिल्या बुरुजाच्या दक्षिणेकडे पोलो ग्राऊंड, मकरंदगड आणि कोयना खोऱ्याचा आसमंत दिसतो. दुसऱ्या बुरुजावर प्रातःकाली सूर्योदयाचे अप्रतिम दर्शन घडते. पूर्वेला पाचगणी दिसते. तिसऱ्या बुरुजावरून उत्तरेकडील क्षेत्र महाबळेश्वर एल्फिस्टन पॉइंट, कॅनॉट पॉइंट, रांजणवाडी गाव आणि वेण्णा नदीचे खोरे दिसते. 

गहू गेरवा संशोधन केंद्र : विल्सन पॉइंटच्या जवळच गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. येथे गव्हावरील तांबोरा रोगाचा अभ्यास व संशोधन चालते. या रोगापासून पिकाचे संरक्षण उपाय शोधले जातात. 

बॉम्बे पॉइंट : जुन्या मुंबई रस्त्याजवळ हा पॉइंट असल्याने त्याला बॉम्बे पॉइंट हे नाव पडले. पर्यटकांच्या सर्वांत आवडत्या पॉइंटपैकी हा एक पॉइंट आहे. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे दर्शन हे या पॉइंटचे खास आकर्षण आहे. सूर्य मावळताना त्याचा आकार लंबगोल, घागरीसारखा, चौकोनी, पतंगाकृती असा वेगवेगळा होत असतो. 

हत्तीचा माथा : पर्वत शिखरांचे हे पश्‍चिमेकडील सर्वांत लांबचे टोक आहे. त्याची रुंदी ३.७ मीटर असून खोली खालच्या कोयना खोऱ्यापर्यंत सुमारे ८०० मीटर इतकी आहे. त्यामुळे या पॉइंटचा आकार हत्तीचा माथा आणि सोंडेसारखा दिसतो. हत्तीच्या माथ्यावरून खाली पाहिले असता डोळे गरगरतात. समोर प्रतापगड अगदी स्पष्ट दिसतो. जावळीच्या घनदाट अरण्यात लपलेले जावळी गाव दिसते. 

आर्थरसीट व विंडो पॉइंट : महाबळेश्वरच्या कड्यावरती असलेला आर्थरसीट नावाचा सर्वांत प्रेक्षणीय असा पॉइंट आहे. आर्थर मॅलेटच्या स्मरणार्थ या पॉइंटला त्याचे नाव दिले आहे. या कड्यावरून डाव्या बाजूला सावित्रीच्या खोऱ्याचे खोल कडे दिसतात, तर उजव्या बाजूला जोर खोऱ्याचे घनदाट अरण्य दिसते. सर्वत्र खाली दूरवर पर्वत शिखरे दिसतात. तोरणा, रायगड, कांगारी हे किल्ले दिसतात. आर्थरसीटकडे जाताना 'टायगर स्प्रिंग' नावाचा झरा लागतो. येथे सर्व ऋतूत पाण्याचा प्रवाह वाहतो. आर्थरसीटपासून खाली २०० फूट अंतरावर 'विंडो पॉइंट' आहे. येथे दगडांची खिडकीसारखी नैसर्गिक रचना पहावयास मिळते. या खिडकीतून निसर्गाचे अद््भुत दर्शन घडते. 

वेण्णा लेक : महाबळेश्वरच्या वैभवात भर टाकणारे पर्यटकांच्या आकर्षणाने व हमखास वेळ घालविण्याचे नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे वेण्णा लेक. वेण्णा लेक म्हणजे चौपाटीचा फीलच. नौकाविहार, घोडे सवारी व खवय्यांसाठी येथील मका कणीस, फ्रॅकी, पॅटीस, आइस्क्रीम, भेळ यांसारख्या खाद्यपदार्थांवर पर्यटक ताव मारताना दिसतात. दिवाळी व उन्हाळी हंगामामध्ये वेण्णा लेक पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाते.

वनौषधींमुळे रोजगाराची संधी 
महाबळेश्वरच्या विस्तीर्ण जंगलामध्ये जांभूळ, गेळा, हिरडा, पिसा यांसारखी वनौषधी झाडे विपुल प्रमाणात आढळतात. ही बाब लक्षात घेऊन भारत सरकारने १९४७ मध्ये मधुमक्षिका पालन केंद्र व मधुसागर सोसायटीची स्थापना केली. त्यामुळे महाबळेश्वर पंचक्रोशीत असणाऱ्या खेडेगावातील अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला. स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी यांसारख्या फळांची शेती, ग्लाडीओ, स्टाटीस, गुलाब यांसारख्या फुलझाडांची शेती, तसेच जांभूळ, करवंदे, अंबूळकी, तोरणे यांसारख्या रानमेव्याची विक्री हा व्यवसाय महाबळेश्वरमध्ये पूर्वीपासून चालत आला आहे. गाजर, लाल मुळा, बिटासारख्या कंदमुळांची विक्री येथे होते.

स्ट्रॉबेरीची वेगळी ओळख 
स्ट्रॉबेरीसाठी आवश्‍यक असलेली थंड हवा, लाल हलकी माती, समुद्रसपाटीपासून ४,३०० फुटांची उंची या परिसराला लाभली असल्याने भारत सरकारने स्ट्रॉबेरी या फळाला जिओग्राफिकल आयडेंटीफिकेशन घोषित केले आहे. त्यामुळे आज स्ट्रॉबेरीला स्वतःची अशी प्रादेशिक ओळख मिळाली आहे. महाबळेश्वर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरी उत्पादनात स्वीटचार्ली, कामारोजा, विंटरडाऊ, सेल्वा या प्रमुख चार जाती असून यामध्ये स्वीटचार्लीचे फळ हे टुमदार, रसाळ व गोड असल्याने एकूण उत्पादनाच्या ७० ते ८० टक्के या फळाचेच उत्पादन घेतले जाते.

संबंधित बातम्या