हर्णेची दुर्गचौकडी

अजय काकडे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

जलदुर्ग

सुमारे सातशे किलोमीटरचा किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. साहजिकच व्यापारी बंदरे, मिठागरे, मच्छीमारीस पोषक खाड्या इथे आहेत. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्या रूढी परंपरा टिकवून ठेवलेल्या छोट्या छोट्या वाड्या आणि तिथली प्रेमळ कोकणी माणसे ही या भूमीची ओळखच बनली आहे.

पश्‍चिमेला सिंधुसागर आणि पूर्वेला उत्तुंग शिखरांची सह्याद्री रांग अशा भौगोलिक रचनेत हजारो वर्षे नांदत आहे ते कोकण !!

सुमारे सातशे किलोमीटरचा किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. साहजिकच व्यापारी बंदरे, मिठागरे, मच्छीमारीस पोषक खाड्या इथे आहेत. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्या रूढी परंपरा टिकवून ठेवलेल्या छोट्या छोट्या वाड्या आणि तिथली प्रेमळ कोकणी माणसे ही या भूमीची ओळखच बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीजवळचा हर्णे-मुरुडचा परिसर तर कोकणच्या संस्कृतीचे प्रातिनिधिक उदाहरणच म्हटले पाहिजे. इथं शांत सुंदर समुद्रकिनारे आहेत, खाड्या आहे, बंदर आहेत आणि नारळी,पोफळी, आंबा,फणस, कोकमाने भरलेल्या वाड्या आहेत. तसेच या सगळ्यांना इतिहासाची किनार देणारे सागरी दुर्ग आहेत.

प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली अनेक बंदरे कोकणच्या किनारपट्टीवर आहेत. यापैकी कल्याण, शूर्पारक, दाभोळ ही प्रमुख बंदरे आणि व्यापार उदीम म्हटले की परकीय आक्रमणाची भीती ही आलीच. अशा ठिकाणी संरक्षणासाठी हमखास एखादा सागरी दुर्ग उभारलेला असतो.

हर्णे बंदर हे असेच प्राचीन बंदर दापोली तालुक्‍यात आहे आणि या बंदराजवळ एक नाही तर चार-चार दुर्ग बांधले गेले. निसर्गाने मुक्तपणे उधळण केलेले हर्णे हे गाव आणि त्याच्या किनाऱ्यावर असलेले गोवा-फत्तेदुर्ग-कनकदुर्ग-सुवर्णदुर्ग ही दुर्गचौकडी तशी अपरिचितच म्हटली पाहिजे कारण सिंधुदुर्ग जंजिऱ्यासारखी पर्यटकांची ये-जा इकडे फारशी दिसत नाही.

गोवा किल्ला 
हर्णे गावातून बाहेर बंदराकडे एक रस्ता जातो, त्या रस्त्यावर एका वळणावर अचानक तटबंदी आणि  कमान असलेला दरवाजा समोर येतो. हाच गोवा किल्ला . गोवा राज्याचा या किल्ल्याशी संबंध नाही हे इथे ध्यानात घ्यावे.

गोवा किल्ल्याची तटबंदी अजूनही बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे. किल्ल्याच्या रस्त्याकडे असणाऱ्या बाजूस एक कमान आहे येथे सध्या लोखंडी दरवाजा बसवला आहे. या कमानवजा दरवाज्याने प्रवेश करून थोडे पुढे उजव्या हातास आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दर्शन होते. सध्या हा दरवाजा चिरे रचून बंद करून टाकला आहे. त्यामुळे ओहोटीच्या वेळी किल्ल्याला बाहेरून वळसा मारून जाऊन तो पाहणे शक्‍य आहे. या दरवाज्यात बाहेरच्या बाजूस काही शिल्प  कोरलेली आहेत. त्यात दोन व्याघ्र शिल्प आणि हत्तीला पकडून ठेवणाऱ्या गंडभेरुंडाचे शिल्प पाहण्यासारखे आहे. किल्ल्याच्या उत्तर-पश्‍चिम भागात काही जोत्याचे अवशेष आहेत. या टोकाच्या बुरुजावरून समोरच्या समुद्रात लाटा झेलीत उभा असलेला सुवर्णदुर्ग दिसतो.  किल्ल्यावर काही नवी-जुनी बांधकामे पडीक अवस्थेत आहेत. हे बहुधा ब्रिटिशकालीन बंगले असावेत. दुर्दैवाने सध्या या ठिकाणी कचरा आणि बाटल्या विखुरलेल्या आढळतात.

गोवा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याची एक  बाजू समुद्राकडे आणि एक बाजू जमिनीकडे आहे. जमिनीकडे असणारी बाजू ही एक छोटीशी टेकडीच आहे. दुर्गबांधणीमधे तिचा उपयोग खुबीने केलेला दिसतो.

या टेकडीवजा उंचावट्याला अंतर्गत भिंत घालून वर जाण्यासाठी एक जिना आणि दरवाजा केला आहे.हा दरवाजा सध्या नामशेष झालेला आहे. पायऱ्या चढून किल्ल्याच्या या भागात प्रवेश केल्यानंतर समोरच सुस्थितीत असलेली एक उतरत्या छपराची इमारत  दिसते. या बाजूचे चार बुरूज चांगले भक्कम आणि इतर बुरुजांच्यापेक्षा थोडे मोठे आहेत. पैकी दक्षिणेचा बुरूज हा संपूर्ण गोलाकार  आहे.

या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. गोवा किल्ला पाहायला अर्धा तास पुरेसा होतो. पण पश्‍चिमेला अस्त पावणारा सूर्य पाहायचा असेल तर अजून थोडा काळ इथे घालवायला हरकत नाही. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी इथे असाल तर या बुरुजावरून दिसणारा सूर्यास्त चुकवू नये. गोवा किल्ल्याच्या दक्षिणेला समुद्रालागत एका टेकडीवर एक वसाहत दिसते तो आहे फत्तेगड.

फत्तेदुर्ग
गोवा किल्ल्यापासून एक डांबरी रस्ता दक्षिणेला थेट हर्णे बंदरापर्यंत जातो. हा रस्ता जिथे संपतो त्या टेकडीवर आहे कनकदुर्ग. पण तत्पूर्वी उजव्या हातास अजून एक टेकडी आपल्याला दिसते. ही टेकडी म्हणजे फत्तेदुर्ग. आजमितीस फत्तेदुर्ग म्हणजे एका खडकाळ उंचवट्यावर असलेली कोळी वसाहत आहे. किल्ला म्हणावे असे अवशेष सध्या शिल्लक  नाहीत किंबहुना ते दिसतच नाहीत इतकी दाट घरे इथे झालेली आहेत. या टेकडीच्या उत्तर पश्‍चिम भागात थोडीफार पडझड झालेली भिंत आहे. ती पाहून किल्ल्याची रचना ध्यानात येते.

कनकदुर्ग
फत्तेदुर्गपासून जाणारा रस्ता पुढे जिथे संपतो तिथे दक्षिण टोकाला जो उंचवटा आहे तो आहे कनकदुर्ग!! हर्णे बंदरावर मच्छीमारांच्या बोटी दाटीवाटीने उभ्या असतात, जोडीला सुकत घातलेल्या मासळीचा वास सर्वत्र पसरलेला असतो अशा सगळ्या वातावरणात आपण उजवीकडे जाणाऱ्या पायऱ्या चढायला सुरवात करायची. 

एक वळण घेतल्यावर एका ठिकाणी पूर्वीच्या दरवाजाच्या खुणा जाणवतात. इथून आपण कनकदुर्गाच्या माथ्यावर पोहोचतो. कनकदुर्गचा माथा अगदीच लहान आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडे एक दीपगृह नजरेस पडते. तिथवर जाताना उजव्या बाजूला थोड्या उतारावर काही पाण्याची टाकी आहेत. आता आपण दीपगृहाच्या दिशेने चालू लागायचे. दीपगृहाजवळ काही खोल्या बांधलेल्या आहेत आणि त्याच्या पाठीमागे एक खड्डा आहे जे बहुधा बुजलेले टाके असावे. इथून अजून दक्षिणेकडे गेल्यास थोडीफार तटबंदी आणि  बुरुजाचे अवशेष कळून येतात.

कनकदुर्गची गडफेरी पूर्ण करायला १५ मिनिटेही खूप होतात. कनकदुर्गावरून समुद्राच्या दिशेने नजर टाकल्यास समोर भक्कम तटबंदीचा सुवर्णदुर्ग आपल्याला खुणावत असतो. त्यामुळे घाई करून सुवर्णदुर्गाची होडी ठरवण्यासाठी आपण पुन्हा बंदरावरील जेट्टीवर यायचे.

सुवर्णदुर्ग
हर्णे दुर्गचौकडी मधला सर्वांत महत्त्वाचा आणि प्रमुख किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग !! हर्णे बंदरातून होडी ठरवून सुवर्णदुर्गला जाता येते. ऐन समुद्रात एका प्रचंड खडकाळ बेटावर हा किल्ला बांधला आहे.या किल्ल्याला सुमारे २० बुरूज,भक्कम तटबंदी, दोन दरवाजे आणि तीन ते चार पाण्याची टाकी आहेत.

साधारण १०, १५ मिनिटांचा होडीचा प्रवास करून आपण किल्ल्याच्या पूर्वेस असलेल्या पुळणीवर पायउतार व्हायचे.होडीवाल्यास तिथेच थांबायला सांगून किल्ला बघण्यासाठी चालू लागायचे. किनाऱ्याजवळ जुन्या भिंतीचे अवशेष नजरेस पडतात.ही पूर्वीची चौकी किंवा दरवाजा असावा. इथून थोडे पुढे चालत गेले की तटबंदीमध्ये आत्तापर्यंत लपून राहिलेला भव्य दरवाजा समोर येतो.या आवारात ३ गंजलेल्या तोफा पडून आहेत. दरवाजाच्या उजव्या हातास भिंतीवर मारुतीचे शिल्प कोरलेले आहे तर जवळच पायरीवर एक कासव कोरलेले आहे. हा दरवाजा पाहून आपण आत प्रवेश करायचा.दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहे.

आता समोर झाडीभरला प्रदेश नजरेस पडतो. आत प्रवेश केल्यावर तटबंदीवर जाणारा जिना आहे. गड पाहताना एक संपूर्ण फेरी तटावरून करावी त्याचा फायदा असा की तट बुरूज व तिथले अवशेष तर पाहता येतातच पण उंचावरून किल्ल्यामध्ये कुठे काय काय अवशेष आहेत त्याचा अंदाज येतो .तटबंदीवरुन फेरी पूर्ण करून आपण पुन्हा मुख्य दरवाजाजवळ यायचे.

सुवर्णदुर्गाचा आतील भाग हा काटेरी झाडीने भरलेला आहे त्यामुळे थोडे काळजीपूर्वक आपल्याला फिरावे लागते. मुख्य प्रवेशव्दारापासून किल्ल्याच्या उत्तरेच्या म्हणजे उजव्या बाजूस वळावे. उत्तरेस तटबंदीलगत पाण्याची तीन टाकी आहेत.उन्हाळ्यात ही कोरडी असली तरी पावसाळ्यात ती भरून काही काळ पाणी टिकत असावे. जवळच काही जोती आणि कोठाराची इमारत आहे.किल्ल्याच्या याच भागात एक प्रचंड वृक्ष आहे.त्यावर हजारो वटवाघूळांचा गोंगाट चालू असतो.

हे अवशेष पाहून किल्ल्याच्या दक्षिण बाजूस चालू लागायचे. परतीच्या वाटेवर किल्ल्याच्या पश्‍चिम तटात असलेले किल्ल्याचे दुसरे द्वार आपल्याला दिसते. हे समुद्राच्या बाजूस उतरते.

किल्ल्याच्या दक्षिण भागात एक तलाव, काही उध्वस्त वास्तू आणि झाडीमध्ये लपलेली काही जोती आहेत.हे सर्व पाहून आपल्याला पुन्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी येता येईल.सुवर्णदुर्गची फेरी साधारण एक तासात पूर्ण होते. हा किल्ला अवशेषसंपन्न पण थोडासा अपरिचित असल्यामुळे किल्ल्यात राबता कमी ,परिणामी झाडी भरपूर वाढलेली आहे. पायात चांगले बूट असणे गरजेचे.

सुवर्णदुर्ग इतिहास
या किल्ल्याची बांधणी नक्की कोणी केली यावर एकमत नसले तरी हा किल्ला साधारण १६६० नंतर शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला असावा. नंतरच्या काळात १६७४ला या किल्ल्याची दुरुस्ती करून हा किल्ला अजून बळकट करण्यात आला. शहाजी राजांच्या सोबत असलेल्या तुकोजी आंग्रे यांचे पुत्र कान्होजी आंग्रे याच परिसरात लहानाचे मोठे झाले. आपल्या सवंगड्यांना घेऊन कान्होजी या परिसरात थोड्याच कालावधीत प्रसिद्ध झाले.सुरवातीच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्गाच्या किल्लेदाराच्या हाताखाली काम करत होते. पुढे एका युद्धप्रसंगी सुवर्णदुर्गच्या किल्लेदाराची फितुरी उघडकीस आणून कान्होजीने स्वतः किल्ल्याची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर मात्र कान्होजींची घोडदौड चालूच राहिली व पुढे ’सरखेल’हा किताब मिळवून आंग्रे घराण्याने आपले असे वेगळे स्थान इतिहासात निर्माण केले.

लंडनचा सेव्हर्नद्रुग कॅसल (Severndroog castle) 
सुवर्णदुर्ग हे नाव इंग्रज कागदपत्रांमध्ये सेव्हर्नद्रुग(Severndroog castle) असे येत असे.हा किल्ला तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात असताना इंग्रज अधिकारी जेम्स विलीयम्स या अधिकाऱ्याने १७५५ या वर्षी किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी किल्ल्यावर सुमारे ५० तोफा होत्या. किल्ल्यावरून कडवा प्रतिकार होऊ लागला,पण काही काळानंतर इंग्रज तोफेचा एक गोळा किल्ल्यात गेला आणि स्फोट झाला. सुवर्णदुर्ग इंग्रजांच्या ताब्यात आला. त्याचसोबत बाजूचे गोवा कनकदुर्ग फत्तेदुर्ग पण इंग्रजांनी काबीज केले. एकही सैनिक न गमावता जेम्स विलीयम्स ने हा किल्ला जिंकला.

पुढे सर जेम्स विल्यम्सच्या मृत्यूनंतर १७८४ मध्ये त्याच्या पत्नीने त्याच्या स्मरणार्थ उत्तर लंडन भागात एक castle बांधला आणि त्याला नाव दिले Severndroog Castle!

सुवर्णदुर्गाचे हे एक आगळे वेगळे वैशिष्ट्यच मानले पाहिजे. दुर्ग अवशेषांसोबतच इतिहासप्रसिद्ध कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या घराण्याशी या किल्ल्याचा जवळून संबंध येतो त्यामुळे सुवर्णदुर्गाची ही भेट वेगळी ठरते हे नक्की. हर्णे गावची ही दुर्गचौकडी पाहायची असेल तर हर्णे किंवा मुरुड गावात मुक्काम करणे सोयीचे ठरते.गावात मुक्कामाची घरगुती सोय होते. हर्णे गावामधे छान मुक्काम करून या दुर्गयात्रेला जोडून आंजर्लेचा गणपती आणि मुरुडचे दुर्गादेवी मंदिर आवर्जून पाहता येईल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या