आयुबोवान श्रीलंका

अर्चना एकबोटे, बंगळूर
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

पर्यटन
 

‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ हे पंडित भीमसेन जोशींनी गायिलेले ‘स्वयंवर झाले सीतेचे’ या चित्रपटातील गीत लहानपणी आकाशवाणीवरून प्रसारित झालेले, ऐकलेले आठवते. त्यावेळी गाण्याचा अर्थ कळत होता असं म्हणता येणार नाही, पण पंडितजींनी म्हटलेल्या ‘लंकाऽऽऽ’ आणि ‘डंकाऽऽऽ’ या ताणांमुळे हे गाणं लक्षात राहिलं. रामायणात वर्णन केलेली सोन्याची लंका, गाण्यात वर्णन केलेली लंका आणि प्रत्यक्षात असलेली लंका यातला फरक कसा असेल हे कुतुहल कायम मनात घर करून राहिले होते. प्रत्यक्ष जेव्हा श्रीलंकेला जाण्याची शक्‍यता दिसू लागली तेव्हा या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा ठरवला. या सहलीसाठी गृहपाठ थोडा आधीच सुरू केला. हातात असलेला वेळ आणि बघण्याच्या स्थळांची यादी यांची सांगड अवघड होती, पण जमेल तेवढं बघून घेऊ अशा विचारांनी संपूर्ण सहलीचं नियोजन केलं. स्वतःच कुठल्याही प्रवास कंपनीबरोबर जायचं नव्हतं. त्याला दोन कारणं, एक - कुठलीही गोष्ट बघायची घाई करायची नव्हती, दोन - प्रवास कंपनीच्या सहलीचे दिवस कमी आणि पैसे जास्त. शेवटी स्वतःच सगळं नियोजन केलं.

जेट एअरवेजचं तिकिट काढलं. बंगलोर-कोलंबो-बंगलोर. तब्बल आठ महिने आधी. श्रीलंकन एअरवेजपेक्षा स्वस्त मिळालं. प्रवासाची एक पायरी चढलो असं म्हणताच जेटनी विमानाचं वेळापत्रकच बदलून टाकलं. म्हणजे बंगलोर-कोलंबोच्या ऐवजी बंगलोर-मुंबई-कोलंबो असा प्रवास दोन्ही बाजूंनी. दीड तासाचा प्रवास बारा तासांवर आला. म्हणजे विमान प्रवासातच थकवा. पुन्हा विचार सुरू, तोपर्यंत इंडिगोची कोलंबो विमानसेवा सुरू झाली. मग एक तिकिट रद्द करून दुसरं काढणं हा प्रकार झाला.

दीड तासाचा प्रवास करून साधारणपणे संध्याकाळी साडेसातला कोलंबोला पोचलो. काठमांडूप्रमाणे कोलंबोलाही स्वागत सुंदर पावसानी केलं. कोलंबोचं बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ तसं छोटं. स्वागताला बुद्धाची प्रसन्न मूर्ती. आयुबोवान श्रीलंका! सिंघली भाषेत ‘श्रीलंकेत आपले स्वागत असो’ असा अर्थ

विमानतळावरून बाहेर पडलो तर आमच्या नावाची पाटी घेऊन वाहनचालक उभा. बाहेर प्रचंड गर्मी. गाडीत बसताना वेगळ्या पद्धतीच्या साड्या घातलेल्या श्रीलंकन स्त्रिया दिसल्या. चौकशी केल्यावर कळलं, की त्या साड्यांना कांडियन म्हणतात आणि सरकारी ऑफिसमध्ये, शाळांमध्ये अशा पद्धतीची साडी नेसणे बंधनकारक आहे. 

कोलंबो हे श्रीलंकेच्या पश्‍चिम किनाऱ्यावर वसलेलं राजधानीचे शहर. राहण्यासाठी नेगोंबोलला गेलो. कोलंबोहून नेगोंबो हे अंतर केवळ १५-२० मिनिटांचे. जुळी शहरे असल्यासारखं. नेगोंबोला हॉटेलमध्ये सामान ठेवून जेवायला बाहेर गेलो. मेन्यू कार्ड वाचलं, पण काय खायचं कुठे कळतंय? सगळा मेन्यू वाचून झाला, पण खाता येण्यासारखं काहीच नाही. शेवटी गुगलच्या सहाय्याची श्रीलंकेला जायच्या आधी पाहून ठेवलेला एक पदार्थ - हॉपर्सचा फोटो दाखवून सांगितलं काय पाहिजे ते. भाषेची अडचण होतीच. कुट्टू पराठा आणि हॉपर्स असं जेवण झालं. कुट्टू पराठा म्हणजे भाज्यांबरोबर शिजवलेला पराठा, चमच्यांनी खाण्याचा पदार्थ.

नेगेंबो एक टुमदार गाव. अतिशय स्वच्छ समुद्रकिनारा. तिथेच पहिल्यांदा हिंद महासागर पाहिला. सुंदर फेसाळलेला. नेगोंबोला एक डच किल्ल्याचे अवशेष आहेत. सध्या तिथे एक तुरुंग आहे. फीश मार्केट आहे. महाबोधी बिगारा नावाच्या बुद्ध विहारामध्ये गौतम बुद्धाच्या जीवनातल्या घटना दाखवणाऱ्या मूर्ती वेगवेगळ्या कक्षांमध्ये आहेत. नेगोंबोहून आम्ही श्रीलंकेची पूर्वीची राजधानी अनुराधापुराला पोचलो. अनुराधापुराला बरीच स्तूप आहेत. आकारानी खूप मोठी. तिथे एक जुलूस पाहिला. शाळेतली मुलं सुद्धा त्यात शामील होती. अगदी वेगळ्या गुलाबी रंगाची कमळ घेऊन ‘साधू साधुसा’ म्हणत स्तुपाला प्रदक्षिणा घालत होती. स्तूपाच्या खालच्या भागाला एक कपडा गुंडाळण्याचे काम चालू होते. कपडा स्तूपाच्या गोल भागावर कसा धरून राहत होता हे काही कळलं नाही. या स्तूपांचं बांधकाम तत्कालीन राजानी चोला राज्यांवरच्या विजयाचं प्रतीक म्हणून बांधलं होतं.

रुवानावेली माया साया या स्तूपाच्या परिसरातल्या एका खोलीत रीडिंग बुद्धांची सुंदर मूर्ती आहे. अनुराधापुरात गौतम बुद्धाला ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं, त्या झाडाच्या एका भागापासून निर्माण झालेला एक बोधी वृक्ष आहे. हे स्थान अतिशय पवित्र मानलं जातं. श्रीलंकेत कुठल्याही मंदिरात जाताना पोशाखाच्या बाबतीत नियम पाळावे लागतात. पुरुष असो वा स्त्री, गुडघ्याच्या खाली कपडे पाहिजेत. शॉर्ट चालत नाहीत.

अनुराधापुराहून आमचा प्रवास थेट पूर्व किनाऱ्यावरच्या त्रिकीमलीकडे, त्रिंकोमलीपासून १५-२० मिनिटांच्या मोटर बोटीच्या प्रवासाच्या अंतरावर पिगेओन लॅंड आहे. पोहता येत नसतानासुद्धा  स्नॉर्कलिंगचा आनंद घेता आला.  पिगेऑन लॅंडला जाताना समुद्र अगदी शांत नव्हता. सतत तोंडावर खारं पाणी आणि खाऱ्या वाऱ्याचा मारा. स्नॉर्कलिंगचा करताना सुंदर कोरल दिसले. कोरलस आणता येत नाहीत. परतीच्या प्रवासात किनाऱ्यावर बोट लॅडींग अनुभवलं. त्रिंकोमलीत पुरातन काळापासून असलेल्या गरम पाण्याच्या विहिरी पण आहेत. आजही तिथे अंघोळ करायला लोक येतात. त्रिंकोमलीमध्ये एका डोंगरवजा टेकडीवर कोनेश्‍वरम्‌ हे भलं मोठं शंकराचं मंदिर आहे. रावण शिवभक्त. मंदिराच्या बाहेर रावणाची हात जोडलेली मूर्ती आहे. बाहेर काळ्या दगडाच्या डोंगराला एक मोठी चीर गेलेली जागा आहे. ‘रावण कट’ असं त्या चीरेचं नाव. आख्यायिका अशी आहे, की तपश्‍चर्या करून सुद्धा शंकराचं दर्शन होत नाही म्हटल्यावर रावणानी रागारागानी हात मारून डोंगर चिरला. रावणकटहून समुद्राचं अथांग दर्शन होतंच.

दुसऱ्या दिवशी पहाटे डॉल्फिन आणि व्हेल्स बघण्यासाठी गेलो. वेल्स दिसण्याची शक्‍यता पन्नस टक्केच होती. अर्ध्या तासाच्या बोटीच्या प्रवासानंतर बेबी डॉल्फीन दिसले. छोटे छोटे जथ्थे. अतिशय सुंदर. परत येताना रावण कट दिसतो. डोंगरात भली मोठी चीर आहे. त्रिंकोमलीत ठिकठिकाणी त्सुनामीच्या धोक्‍याची सूचना देणारे बोर्ड आहेत. तिथे श्रीबालाजी नावाचे शाकाहारी रेस्टोराँट आहे. अगदी चांगल्या पद्धतीने केलेले पदार्थ खायला मिळाले.   

त्रिंकोमलीकडून सिगिरियाकडे जाताना हाबराना इथलं कोटुल्ला नॅशनल पार्क पाहिलं. कांदुल्ला नॅशनल पार्क एक अभयारण्य. तिथे वेगवेगळे पक्षी .सीब्स, पेलिकन आणि खूप हत्ती, शिवाय इतर प्राणीसुद्धा. या अभयारण्यात उघड्या जीपने प्रवास करता येतो. साधारणपणे या अभयराण्यात शंभर ते दोनशे हत्ती आहेत.   श्रीलंकेत ठिकठिकाणी  कृषी विभागाने सुरू केलेले खाण्याचे स्टॉल आहेत. अतिशय स्वच्छ आणि स्वस्त. प्रत्येक गोष्ट ताजी, शाकाहारी पदार्थ, चवदार. सगळे स्टॉल बायका चालवतात.

ठरवल्यापेक्षा एक दिवस आधीच सिगिरियाला पोचलो. ट्री हाऊसमध्ये राहण्याची इच्छा लहानपणी वाचलेल्या कॉमिक्‍स पासूनच होती. रोजच्या काँक्रिटच्या घरापेक्षा एक वेगळा अनुभव घ्यायचा होता. संपूर्णपणे लाकडी फळ्यांनी बांधलेलं हाऊसचा अनुभव छान होता. एक बेडरूम आणि एक बाथरूम असं ट्री हाउस. बेडरूमचं दार उघडल्याबरोबर समोर सिगिरिया रॉक. सिगिरिया रॉक चढून उतरायला अडीच ते तीन तास लागतात. इतर देशांच्या तुलनेत सार्क देशांच्या नागरिकांना अर्धे तिकिट. सिगिरियाच्या इतिहासाबद्दल सांगण्यात येते, की  कश्‍यप राजानी अनुराधापुराहून सिगिरियाला राजधानी हलवली. त्यामुळे सिगिरियाचं महत्त्व वाढलं. पूर्वी रॉकचा आकार सिंहासारखा होता. आता फक्त पाय उरलेत. पायऱ्या असूनही चढायला अवघड. तिकिटाचे तीन भाग असतात. ठराविक अंतरावर एकेक भाग काढून द्वारपालांना द्यावा लागतो. अगदी वरती चढून गेल्यावर जुने भग्नावशेष अजूनही दिसतात. वरून दिसणारा नजारा शब्दातीत आहे. चढण्याचा आणि उतरण्याचा असे वेगळे मार्ग आहेत. परदेशी प्रवाशांसाठी वेगळे पार्किंग आहे. मग रस्त्यात खरेदीची दुकाने हे ओघाने आलंच.

संध्याकाळी डंबुला लेण्या पाहण्यासाठी गेलो. तिथे अजिंठ्याच्या लेण्यांसारखे भित्तिचित्र आहेत. फरक एवढाच, की अजिंठ्याला केवळ भित्तिचित्र आहेत, तर डंबुल लेण्यांमध्ये बुद्धाच्या मूर्ती पण आहेत. एकाच गुहेत बुद्धाच्या खूप साऱ्या मूर्ती दिसतात. सगळीकडे अतिशय स्वच्छ. कुठेही कसल्याही प्रकारचा कचरा नाही. फोटो काढता येतात. लेण्यांच्या गुफेच्या बाहेरचा भाग नव्यानी बांधलेला दिसतो.  कॅंडीहून एलियाकडे जाताना रस्त्यात खूप चहाचे मळे दिसतात. श्रीलंकन चहा जगभर प्रसिद्ध. चांगल्या प्रकारचा चहा संपूर्णपणे निर्यात केला जातो. स्थानिक लोकांना तो बघायलाही मिळत नाही.ग्लेनलोच टी ही इस्टेटलाला भेट दिली. प्रचंड मोठी टी इस्टेट. चहावर प्रक्रिया करणाऱ्या मशिन्स कलकत्त्यात तयार झालेल्या. शंभर वर्षांपूर्वी निर्मित एक मशीन तिथे ठेवलेली आहे. सध्या ती वापरात नाही. चहाची पाने तोडण्यापासूनची प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी गाईड आहेत. व्हाइट टी, ग्रीन टी, वेक टी, प्लेव्हर टी असे अनेक प्रकार विकण्यासाठी एक खास दुकान  तेथे होते. मात्र या चहाच्या किंमती खूपच होत्या. जवळच एक भलं मोठं हनुमानाचं मंदिर आहे. शेजारी चिन्मय मिशनची शाळा. शिवाय  श्रीलंकेत अभावानेच दिसणारे शाकाहारी जेवण्याचे ठिकाण होते. तेथून नुवारा एलियाकडे जाणारे रस्ते अतिशय चढाव असलेले. कधी कधी ढगातून प्रवास होतो.

नुवारा एलिया श्रीलंकेतली सगळ्यात उंच ठिकाण. प्रचंड थंडी. हॉटेलमध्ये रूम हिटर्स लावल्याशिवाय राहणं शक्‍य नाही. तिथे  एक खूप मोठा तलाव आहे. त्यात बोटिंगपण करता येतं. त्यावर ढग तरंगताना दिसतात. ग्रेगरी लेक इथलं सीता अम्मान मंदिर म्हणजे रामायणात उल्लेख असलेली हनुमानानी सीतेला अंगठी दिलेली जागा. अशोक वाटिकेच्या टोकावरची जागा. अशोक वाटिका हे आजही एक घनदाट जंगल आहे. तिथे प्रवेश नाही. हनुमान सीतेला अंगठी देतानाची मूर्ती आहे. त्यासमोर भलीमोठी पायाची निशाणी. तो पाय हनुमानाचा समजला जातो. समोर वाहणारा छोटा झरा. मागे अशोक वाटिका. जवळच रावणाची गुहा. सीतेच्या अग्निपरिक्षेची जागा आहे. पण तिथे आता बौद्ध मंदिरं आहेत. कॅंडी आणि नुवारा एलिया ह्या दोन्ही जागा डोळ्यांची पारणं फेडणाऱ्या. नुवारा एलियाला तर आम्हाला स्थायिक व्हायला आवडेल.

जगातील सर्वांत सुंदर रेल्वे प्रवाशांपैकी एक नुवारा एलिया ते एल्ला. आम्ही पेमोदराला उतरलो. ६० कि.मी. अंतर ही गाडी तीन तासात पूर्ण करते. रस्त्यानी दीड तास, पण हा रेल्वेचा प्रवास आम्हाला करायचाच होता. 

कोलंबोच्या समुद्रकिनारी चीनच्या मदतीने खूप बांधकाम सुरू आहे. रिक्‍लेमड लॅंड जवळच खेतराराम क्रिकेट स्टेडियम आहे.

कोलंबो एक अतिशय सुंदर राजधानीचे शहर. मोठमोठे रस्ते, ठिकठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, पादचाऱ्यांना प्राधान्य. सिग्नल असो वा नसो झेब्रा क्रॉसिंगवर पादचारी कधीही रस्त्याच्या एका बाजूपासून दुसरीकडे जाऊ शकतात. सगळी वाहने थांबतात. मुंबईच्या लोकलसारखी गर्दी कॅंडी ते कोलंबो या ट्रेनमध्ये दिसली. रोज कॅंडी- कोलंबो-कॅंडी असा प्रवास करणारे लोक आहेत.

कोलंबो - बंगळूर असा प्रवास करताना कोलंबोपासून अर्ध्यातासाच्या अंतरावर भारताचा भू-भाग दिसायला लागतो. भारताचा नकाशा प्रत्यक्ष बघताना वेगळंच वाटतं. संपूर्ण दक्षिण भारत आणि उडिसा - बंगालपर्यंतचा आकार खूप बघण्यासारखा आहे. हा ही एक विलक्षण अनुभव आहे. 

श्रीलंका एक अतिशय देखणा देश. बघण्यासारखा. सध्याची राजनैतिक अस्थिरता सोडली तर साध्या स्वच्छ मनाच्या माणसांचा देश. आवडेल पुन्हा जायला.

फोटो फीचर

संबंधित बातम्या