साततालचा पाऊस

धनंजय उपासनी
सोमवार, 20 डिसेंबर 2021

पर्यटन

आकाशातून जमिनीवर पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब आठवणींचा सुगंध देणारा असतो. कधी हा सुगंध गोड आठवणी जाग्या करतो, तर कधी कठीण परीक्षा घेणारे क्षण ठेवून जातो. २९ मे २०१८ रोजी कुमाऊँ भागातील साततालजवळ भटकंती करत असताना असाच कठीण परीक्षा घेणारा पाऊस पडला... 

मे महिन्यात सुट्यांमुळे वाहनांना असणारी गर्दी, उन्हामुळे वाढलेला उकाडा अशा रूक्ष वातावरणात प्रवास करण्यासाठी मन आणि शरीर तयार नसते. पण निसर्गात भटकंती केली तर कदाचित बरे वाटेल असेही मनात येते. मग आम्हीही नियोजनाला निर्धाराची जोड देऊन प्रवासाचा दिवस नक्की ठरवला आणि प्रवास सुरू केला. चंद्रहास आणि मिलिंद हे दोघेही प्रवासाची तयारी करण्यात तरबेज असल्याने पुणे ते दिल्ली विमान आणि दिल्ली ते काठगोदामपर्यंत रेल्वेने असा मार्ग ठरला. दिल्ली विमानतळापासून मेट्रोने दिल्ली स्टेशनला गेलो. पुढे साडेपाच तास काठगोदामपर्यंत शताब्दीने केलेला प्रवास फारच आरामदायी होता. काठगोदामपासून कारने भीमतालमार्गाने साततालच्या दिशेने निघालो. या मार्गाने जाताना लहान मोठे तलाव नजरेस पडतात. नल-दमयंती, पन्ना झील, सुका झील, गरुड झील, राम-लक्ष्मण-सीता अशी तलावांची नावे असलेला माहिती फलक दिसला.

एक वाजता आम्ही साततालला पोहचलो. आमचा गाइड याच ठिकाणी येणार असल्याने आम्ही वाट बघत होतो. परिसर बघत असताना तलावाकडे लक्ष गेले. काठावरील झाडाखाली नौकापण विसावलेल्या होत्या. ऊन होते, पण हवेत गारवा होता. वारा हळुवार वाहत होता. वाऱ्यामुळे त्या नावा डोलत होत्या. काठाच्या दिशेने येणारे पाणी नावेच्या तळाला स्पर्श करत होते. त्या स्पर्शातून होणारा डुबुक डुबुक असा आवाज निसर्गाच्या अस्तित्वाची हळुवार स्पंदने निर्माण करत होता. हा मधुर नाद कानात साठवत असतानाच आमच्या गाइडने आवाज दिला, ‘चलो सरजी, उसपार जाना है।’ त्याच्या आवाजामुळे मी त्या निसर्गाच्या साखळीतून बाहेर आलो. पैलतीरावर जाण्यासाठी आम्ही नावेत बसलो. पायडल बोटीने जलप्रवास सुरू झाला. गाइड आम्हाला पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगत होता. रात्रभर प्रवास करून शरीर थकलेले होते. दुपार असल्यामुळे तलावाच्या परिसरात शांतता पसरली होती. गाइडचा बोलण्याचा आणि पायडल मारताना होणारा आवाज असे दोनच आवाज येत होते. तलावाच्या भोवती असलेली वृक्षसंपदा आणि शांत जलाशय हे दृश्य बघत असताना चंद्रहास आणि मिलिंद या पक्षी अभ्यासकांचे लक्ष एका झाडावर बसलेल्या गरुडाकडे गेले. साततालच्या भागातील पक्षीवैभव संपन्न असल्याचे माहिती होते. ते वैभव अनुभवण्याची सुरुवात गरुडाच्या दर्शनाने झाली. उन्हाच्या वातावरणामुळे गरुडसुद्धा शांत बसून विश्रांती घेत होता. गरुड दिसल्यामुळे थोडी ऊर्जा मिळाली. बोटसुद्धा हळूहळू पैलतीरावर येऊन थांबली. या तीरापासून आमचे मुक्कामाचे ठिकाण छोटी टेकडी पार केल्यानंतर साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर होते. दुपारचे ऊन, भुकेची जाणीव, रात्रभर प्रवास या सगळ्या गोष्टीचा विचार केला, तर शरीर विरोध करत होते कारण कोणतीच बाब टेकडी चढाईसाठी समाधानकारक नव्हती. पण चालायला सुरुवात केली... 

निसर्गाच्या कुशीत शिरायला सुरुवात केली तर निसर्गच मदतीचा हात पुढे करून चैतन्य निर्माण करतो, असा आजपर्यंत केलेल्या भटकंतीचा असा अनुभव आहे. सभोवताली हिरवी झाडे, फांदीतून डोकावणारे एखादे नाजूक फूल, समोर दिसणारी पाऊलवाट. काही ठिकाणी पाऊलवाटेवर झाडांची सावली विसावलेली होती. सावली आणि पायवाट यामुळे चालणे फारसे खडतर नव्हते. चालताना सुरक्षितही वाटत होते. सभोवताली असलेली निसर्गाची समृद्धीही फार छान होती. समृद्धी आणि सुरक्षा एकत्र असतील तर कोणतीच वाट बिकट नसते, असा विचार सुरू असताना पुढच्याच पावलावर, निसर्गाने भरभरून दान दिलेले आहे अशा सुंदर स्वर्गीय नर्तकाची (पॅराडाईज फ्लायकॅचर) जोडी उडत जाताना दिसली. अप्रतिम रंगछटा लाभलेली ही जोडी खरोखरच स्वर्गीय नर्तक हे नाव सार्थ ठरवणारी आहे. पुढील वळणावर झाडाच्या पानातून सूर्याची किरणे जमिनीला स्पर्श करत असताना पडलेला प्रकाश, नीरव शांतता, काही वेळापूर्वी पक्ष्यांची नजरेस पडलेली रंगसंगती हे सगळे जमून आलेले क्षण म्हणजे सौंदर्यसाधनाच वाटत होती. चालताना वाटेत लहानमोठे दगड असल्याने दमछाक होत होती. पण डोळ्यासमोर आता निसर्गाचे चित्र प्रदर्शन सुरू झालेले होते, त्यामुळे झालेली दमछाक फारशी जाणवत नव्हती. 

 पाऊलवाटेवरून पुढे जात असताना एका खडकाजवळ पोहचलो, तर तिकडे छोटासा पाणवठा होता. जागेवरच थांबून पाण्याकडे बघितले तेव्हा पाण्याचे थेंब उडताना दिसले व हालचालसुद्धा जाणवली. त्या पाण्यात व्हाइट थ्रोटेड लाफिंग थ्रश नावाचा पक्षी अंघोळ करताना दिसला. कमी पाण्यातसुद्धा किती छान अंघोळ करता येते, अशी शिकवणच तो देत होता असे वाटले. त्याच्या अंघोळीत व्यत्यय येणार नाही याची काळजी घेऊन पुढे गेलो. लवकरच मुक्कामाचे ठिकाण आले. भूक खूप लागलेली होती. त्यामुळे आधी जेवण केले आणि मग सामान घेऊन ज्या तंबूत आमची सोय केलेली होती तिकडे रवाना झालो. संध्याकाळ होण्याच्या मार्गावर होती. दुसऱ्या दिवशी कोणत्या भागात जायचे हे ठरवले आणि सूर्यास्त झाला.

आमचे मुक्कामाचे ठिकाण खरोखरच निसर्गाच्या कुशीत होते. चारही बाजूंनी डोंगर आणि गर्द झाडी होती. वीज पुरवठा करण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने वीज नव्हतीच. अंधाराचे साम्राज्य अधिकच जाणवत होते, पण भीतीचा लवलेश मात्र नव्हता. अंधार न्याहाळणेसुद्धा एक मोठा अनुभव असतो. एक दादा हातात कंदील घेऊन येताना दिसले. कंदील आमच्या तंबूपासून काही अंतरावर ठेवून ते निघून गेले. कंदिलामुळे आता थोडा प्रकाश पसरला होता. आमच्या आजूबाजूचे तंबू रिकामे असल्याने शांततेत भरच पडलेली होती. कंदिलाच्या प्रकाशात आजूबाजूच्या वाटा अंधूक दिसत होत्या.  बालपणी आजीआजोबांच्या गावाला जायचो तेव्हा कंदिलाचा प्रकाश आणि त्यातून निर्माण झालेल्या सावल्या आठवल्या आणि मन भूतकाळातील त्या निरागस आठवणीत झोपी गेले.

दुसरा दिवस उजाडला तो पक्ष्यांच्या मधुर आवाजाने. हवेत गारठा जास्त होता, पण आल्हाददायक होता. आहाहा!!!! फारच प्रसन्न सकाळ होती ती. पुण्याहून मे महिन्याच्या उन्हात सुरू झालेली सहल आता उबदार गारठा अनुभवत होती. सकाळी तंबूच्या आसपासचा भाग बघून नंतर जवळपास जायचे असे ठरवून बाहेर पडलो. पदभ्रमण सुरू झाले. प्रत्येक पाऊल आणि वेळ पुढे पुढे जात होते. जंगलातील संध्याकाळ फार छान असते, म्हणजे वातावरणातील होणारे बदल हळूहळू जाणवत असतात. दिवस आणि रात्र यांना जोडणारे ते क्षण अनुभवत असताना नाईट जार आणि घुबडांच्या आवाजातून आता चंद्रोदय होण्याची वेळ जवळ येत असल्याचे संकेत मिळाले. संकेताचा आदर बाळगून आम्ही तंबूत पोहचण्यासाठी चालण्याचा वेग वाढवला, आणि अचानक ढग दाटून आले. काळ्या ढगांनी आकाश व्यापायला सुरुवात केली. गाइडलाही वातारणातील अनपेक्षित बदलामुळे काळजी वाटल्याने त्याने सांगितले, ‘सरजी चलो जल्दीसे।’ आम्ही त्याच्या सूचनेनुसार चालण्याचा वेग वाढवला आणि पुन्हा गाइडने आवाज दिला,‘ सरजी आगे नही जायेंगे यही रुकते है।’ आम्ही आहे त्या ठिकाणी त्यातल्या त्यात सुरक्षित जागा बघून आसरा घेतला. 

पावसाच्या छोट्या थेंबाचे रूपांतर आता टपोऱ्या थेंबात व्हायला सुरुवात झालेली होती. थेंबाचा वाढता आकार पानावर पडून होणारा टपटप आवाजसुद्धा वाढत होता. आवाजाबरोबरच ढगांचा गडगडाटसुद्धा वाढला आणि त्यातच विजांचा लखलखाट सुरू झाला. सोसाट्याचा वारा जोराने सुरू झाला. झाडांमधून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे निर्माण झालेला आवाजसुद्धा वातारणातील गूढता वाढवत होता. पाऊस, वारा, विजा या सगळ्यांनी एकत्रित कार्य आरंभ केल्याने काही वेळापूर्वी शांत असणारे जंगल एकदम दणाणून गेले होते. वीज चमकल्याने समोरच्या डोंगररांगा क्षणभर प्रकाशित होत होत्या, तो क्षण वातावरणातील भयानक वास्तव दाखवणारा असायचा. त्या प्रकाशात आमचा तंबूचा परिसर नजरेच्या टप्प्यात होता हे कळत होते, पण पावसाच्या रौद्ररूपामुळे झाडाची फांदी पडून अपघात होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून आहे तिथेच थांबणे शहाणपणाचे होते. 

सगळे मित्र बरोबर होते, पण मिळेल तसा आडोसा बघून जवळपास थांबले होते. त्यामुळे एकटेपणा जाणवायला लागला होता. कधी कधी एकटेपणासुद्धा चांगल्या बाबीसाठी असतो. कारण या प्रसंगातून कोणत्या वाटेने बाहेर पडता येईल याचा शोध सुरू झालेला असतो. सुरक्षित वाट नक्कीच दिसेल ही आशा मनात ठेवली, तर हरवलेल्या वाटा माणसाला एकटेपणातच सापडतात हा विचार प्रबळ करून एकाच जागेवर थांबून निसर्गाचा तो थरार अनुभवत होतो. साधारण दोन तासानंतर वरुणराजाने आपले तांडव थांबवले. मनाची तयारी करून पावले आता तंबूकडे वळवली. सगळ्या वाटा पावसाच्या पाण्यात हरवल्या होत्या. हळूहळू तंबूजवळ पोहचलो. स्थिरस्थावर झाल्यावर तंबूतून बाहेर बघितले तेव्हा संपूर्ण दिवसात निसर्गाची अनेक आणि अचानक बदलणारी रूपे समोर येत होती. निसर्ग देवता खूप शिकवण देत असते. जीवनात होणारे काही बदल हे कायमस्वरूपी आठवणीच्या ओंजळीत राहतात, तर काही बदल क्षणभरासाठीच ओंजळीत येतात. कोणता क्षण कधी निसटून जाईल हे नियतीच ठरवते म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, असा संदेश निसर्ग आजच्या पावसातून देत होता. निसर्ग संदेश सदैव अंतरंगात अनुभव आणि अनुभूती यांचा आविष्कार निर्माण करणारे असतात.

घरी परतायचा दिवस उजाडला. पाऊस पडून गेल्यामुळे धरणीमाता जशी चिंब भिजली होती, तसेच मनसुद्धा आनंदात न्हाऊन निघाले होते. वातावरण फारच मोहक झाले होते. स्वच्छसुंदर निळे आकाश, हिरवीगार झाडी, रंगीबेरंगी पक्षी, पायवाटा, डोंगररांगा झोपडीच्या आकाराचे तंबू आणि त्याशेजारी असलेला कंदील, असे बालपणी अगदी मनापासून कागदावर काढलेले चित्र आज प्रत्यक्ष बघत होतो. कंदिलाच्या प्रकाशाने विशेष समाधान मिळाले होते. अशी सगळी सृष्टी दृष्टीत साठवून परतीच्या प्रवासाला निघालो. खूप पावसाळे अनुभवले, पण साततालचा पाऊस मात्र अविस्मरणीय असाच होता...!

संबंधित बातम्या