ख्रिस्तोफर कोलंबसचे सेव्हिले

दिलीप आमडेकर, डोंबिवली
सोमवार, 29 मार्च 2021

पर्यटन

पंधराव्या शतकातले सेव्हिले हे कोलंबसचे गाव म्हणून ओळखले जाते. ते गाव आणि त्याच्या आसपासच्या ठिकाणांना दिलेली भेट केवळ अविस्मरणीय!

पंधराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगाल व स्पेन ही युरोपमधील बलाढ्य राष्ट्र होती. दोन्ही राष्ट्रांतील धाडसी दर्यावर्दींमध्ये माहीत नसलेले लांब लांबचे देश शोधून तेथे वसाहती स्थापन करून, व्यापार वाढवून, संपत्ती मिळवून सधन होण्याची चुरस लागली होती. वास्को द गामाने आफ्रिकेला वळसा घालून भारतात यायचा मार्ग शोधून काढला, तर स्पेनमधून निघालेल्या ख्रिस्तोफर कोलंबसने पश्चिमेकडून आशिया खंडाचा शोध घेण्याची मोहीम आखली. 

युरोपमध्ये काही व्यावसायिक कामासाठी गेलो असताना स्पेनमध्ये ख्रिस्तोफर कोलंबसशी संबंधित ऐतिहासिक जागा बघण्यासाठी सेव्हिले या गावात गेलो. तेथून ट्रेनने कोर्दोबा या पुरातन, पण नितांत सुंदर गावात पोहोचलो. स्पेनमध्ये इ.स. ७११ पासून १४९२ पर्यंत मुसलमानांचे राज्य होते. इ.स. १४९२ मध्ये ख्रिश्चनांनी मुसलमान शासकांचा पराभव करून ख्रिस्ती राजांची सत्ता आणली. ग्रॅनाडा या शेवटच्या मुस्लिम ठाण्याचा पराभव करण्यासाठी स्पेनचा राजा फर्निनांड व राणी इझाबेल कोर्दोबाच्या अल्काझार म्हणजे राजवाड्यात मुक्काम करून होते. येथे कोलंबसने राजा-राणीला आपली समुद्र साहसाची योजना सादर केली. राजा फर्निनांड ग्रॅनाडाच्या लढाईत गुंतल्यामुळे त्याने दुर्लक्ष केले. पण राणी इझाबेलने मात्र ही मोहीम यशस्वी झाल्यास होणारा फायदा लक्षात घेऊन कोलंबसला मदत करण्याचे आश्वासन दिले. 

हा अल्काझार १२व्या व १३व्या शतकात मुस्लिमांंनी किल्ल्यासारखा बांधला होता. इ.स. १३२८ मध्ये ख्रिश्चन राज्यकर्त्यांनी त्याच्या पुनर्बांधणीस सुरुवात केली. याच वास्तूचा नेपोलियन बोनापार्टने इ.स. १८१०मध्ये त्याच्या सैन्याच्या मुक्कामासाठी वापर केला होता. राजवाड्याच्या प्रांगणात काश्मीरमधील बागांची आठवण व्हावी इतकी सुंदर बाग आहे. मध्यंतरी काही काळ इथे तुरुंगही होता. मूळ इमारत ७०० वर्षे जुनी असूनही देखणी वाटते. 

तेथून जवळच असलेले मोझेक्टिटा म्हणजे कोर्दोबाची मशीद. पूर्वी या जागी लहानसे चर्च होते. मुसलमानांच्या आक्रमणानंतर इ. स. ७८४मध्ये अब्द अल रेहमानने तेथे चर्च पाडून टोलेजंग मशीद बांधण्याचा हुकूम दिला. खर्च वसूल करण्यासाठी स्थानिक रहिवाशांवर कर लावण्यात आला. जगातील सर्वांत मोठ्या मशिदींपैकी एक अशी ही मशीद. इ.स. १२३६ मध्ये ख्रिश्चन राजांनी परिसर जिंकल्यावर त्याचे कॅथेड्रलमध्ये रूपांतर केले. आज या जागी येशू ख्रिस्त व त्या काळातील अनेक घटना दर्शविणारे पुतळे व भव्य चित्रे आहेत. सर्व परिसर जरी ख्रिश्चनांच्या ताब्यात असला, तरी आत अनेक कॉलमवर अरबी भाषेतील मजकूर व मुसलमानी पद्धतीची कलाकुसर स्पष्ट दिसते. 

मॉझेक्युटा बघण्यास प्रवाशांचे तांडेच्या तांडे येत होते. भराभर फोटो काढून, अर्ध्या तासात बाहेर पडत होते. हल्ली खरे म्हणजे कोणत्याही प्रेक्षणीय स्थळी प्रवासी निवांतपणे त्या स्थळाचा आस्वाद घेण्यापेक्षा फक्त फोटो काढावयास येतात असे वाटते. फोटो किंवा त्या स्थळाची फिल्म यूट्युबवरही पाहता येते. 

संध्याकाळच्या ट्रेनने सेव्हिलेला परत मुक्कामाला आलो. प्रसिद्ध स्पॅनिश डान्स फ्लेमिंकोची तिकिटे काढली होती. थिएटर अगदीच लहानसे म्हणजे १००-१२५ प्रेक्षकांसाठीचे जुन्या इमारतीत होते. फ्लेमिंकोमध्ये बॅकग्राउंडच्या गिटारवर पायांच्या वेगवान हालचाली करतात. हाताच्या हालचाली मात्र भारतीय कथ्थक नृत्यासारख्या वाटतात. एकंदर शो मात्र अप्रतिम होता. जगभरातून आलेल्या प्रेक्षकांनी शो संपल्यावर केलेला टाळ्यांचा कडकडाट कितीतरी वेळ थांबतच नव्हता. 

जुन्या सेव्हिलेमधील जेमतेम आठ-दहा फूट रुंद असलेल्या गल्ल्या पाहिल्या, की जुन्या दिल्लीतील किंवा बनारसमधील अरुंद बोळ आठवतात. या बोळातून आधुनिक मोटरकार चालवणाऱ्‍या चालकांना कोपरापासून हात जोडून नमस्कार करावासा वाटतो. दोन्ही बाजूला जेमतेम ८-१० इंच जागा शिल्लक असते.  

दुसऱ्‍या दिवशी सेव्हिले पासून १०० किमी दूर असलेल्या समुद्र किनाऱ्‍यावरच्या हुस्वे या गावी पोहोचलो. कोलंबस त्याच्या मोहिमेला जाताना ज्या निना, पिंटा व सांता मरिना या बोटीतून गेला त्याची साइज टू साइज मॉडेल्स आहेत. जेमतेम १७ मीटर लांबीच्या व ५.५ मीटर रुंदीच्या शिडाच्या या लहानशा बोटीतून कोलंबसाने अटलांटिक सागर पार करून अमेरिका गाठली, हे बघून त्याच्या धाडसाची कमाल वाटते. अज्ञात प्रदेशाच्या शोधासाठी किती दिवस समुद्रात काढावे लागतील याची नक्की कल्पना नव्हती. ज्या विहिरीतून या बोटींवर पिण्यासाठी पाणी भरले, ती विहीर जवळच आहे. भारत शोधण्यासाठी निघालेल्या मोहिमेतून युरोपियनांना अमेरिकेचा शोध लागला. त्या वेळचे कॅथलिक ख्रिश्चन शुक्रवारी उपवास करत असत. शुक्रवारी मांसाहार वर्ज्य होता. बोटीवर या उपवासासाठी शाकाहारी जेवणाचीही साठवणूक होती. जवळच असलेल्या पॅलेस दा ला फ्रॉन्टेरा या किनाऱ्‍यावरून कोलंबसने समुद्र प्रवासाला सुरुवात केली. तेथील ला गाबिडा या जागी असलेल्या ख्रिश्चन मोनेस्टरीमध्ये प्रवासाआधी कोलंबसने मुक्काम करून धर्मगुरूंचे आशीर्वाद घेतले व प्रवासाला सुरुवात केली. अटलांटिक समुद्रात २९ दिवस एवढ्याशा लहान शिडाच्या जहाजातून प्रपंच करताना त्यांना समुद्र किनारा दिसला नव्हता. 

संध्याकाळी सेव्हिलेला परत आल्यावर स्पॅनिश जेवणाचा समाचार घेतला. स्पेनमध्ये कोपऱ्‍या कोपऱ्‍यावर ‘तपास’ बार, कॅफेज् आहेत. ‘तपास’ म्हणजे जवळ जवळ २५० प्रकारचे विविध चवींचे स्नॅक्स. आपल्याकडे उडपी रेस्टॉरन्टमध्ये विविध स्नॅक्सची भली मोठी यादी असते. तसाच लांबलचक मेनू ‘तपास’ बार रेस्टॉरन्टमध्ये असतो. स्पॅनिश जेवण ‘तपास’शिवाय होऊच शकत नाही. संध्याकाळी शेरीच्या ग्लासबरोबर आवडत्या तपासवर हात मारण्याचा आनंद स्पॅनिश लोक लुटतात. सेव्हिलेमधील पंधराव्या शतकातील कॅथेड्रल जगातील सगळ्यात मोठे कॅथेड्रल आहे. त्याच्या आत ख्रिस्तोफर कोलंबसची समाधी आहे. शेजारील ख्रिस्ती बेल टॉवर ३५० फूट उंच असून एकंदरच हे कॅथेड्रल व त्याच्या शेजारचा अल्काझार म्हणजे पॅलेस नीट बघायला कमीत कमी चार तास तरी पाहिजेत. स्पेनचे पर्यटन, तेथे मिळणाऱ्‍या अस्सल केशर आणि ऑलिव्ह ऑईलच्या खरेदीशिवाय पूर्ण होत नाही.

संबंधित बातम्या