मायामी आणि तरंगती मायानगरी 

डॉ. संजीव भंडारी, सोलापूर
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

पर्यटन

तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑक्टोबर महिन्यामध्ये अमेरिकेला जाण्याचा योग आला. मधील काळात दोन-तीन वेळा पश्चिमेकडील कॅलिफोर्निया व लास वेगास या भागाला भेट दिली होती, म्हणून या वेळी नियोजन करताना पूर्व किनाऱ्यावरील दक्षिणेच्या फ्लोरिडापासून थेट उत्तरेकडील नायगारा धबधब्यापर्यंत कुटुंबीयांसमवेत भेट देण्याचे ठरविले. अर्थात ऑक्टोबर महिन्यातील फॉल कलर्स हे तर मुख्य आकर्षण होतेच, पण त्याचबरोबर बहामा क्रूझ करण्याचे बरेच दिवस मनात होते, तोही योग आला. यावेळी नियोजनात माझ्या दोन्ही मुलांनी व सुनांनी खूपच हातभार लावला. त्या सर्वांनी मिळून एक सुंदर सेल्फ ड्राईव्ह टूर प्लॅन केली व न्यूयॉर्क येथे राहणाऱ्या माझ्या धाकट्या मुलाने तेथील सर्व लोकल बुकिंग करून टाकले.

जवळपास २४ तासांचा प्रवास करून मुंबईहून इस्तंबूलमार्गे फ्लोरिडा राज्यातील मायामीला पोचलो. अर्थात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने प्रवास असल्यामुळे व मायामी जवळजवळ साडेनऊ तास मुंबईच्या वेळेच्या मागे असल्यामुळे संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही तेथे पोचलो. वेळेच्या फरकामुळे जेट लॅग स्वाभाविकच येतो, म्हणून Air BnB मधून बुक केलेल्या अपार्टमेंटमध्ये पोचल्याबरोबर गुपचूप लगेच झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी मायामी शहराची व जवळच असलेल्या एव्हरग्लेड्स (Everglades) नॅशनल पार्कची टूर बुक केलेली होती. सकाळी आधी एव्हरग्लेड्स नॅशनल पार्कमध्ये असलेल्या एअरबोट टूरसाठी बसमधून जवळपास तास-दीड तास प्रवास करून जावे लागले. पाण्याच्या काही सेंटिमीटरवरून जाणारी एअरबोट टूर हा एक वेगळा आणि मजेशीर अनुभव होता. दलदलीतील (swamp) पाण्यावरून आणि त्यामध्ये वाढलेल्या गवतावरून अतिशय वेगामध्ये त्या बोटीमधून जाताना काही ठिकाणी बोट थांबवून उंचावर बसलेल्या ऑपरेटरने पाण्यातील सुसरी आणि विविध पक्षी दाखवले. तास-दीड तासाच्या त्या एअरबोट टूरनंतर काठावरील छोट्या झूमध्ये वेगळेच कधी न बघितलेले वन्य प्राणी दाखवून टूरबस आम्हाला पुन्हा मायामी शहरात घेऊन आली. दुपारी दुसऱ्या एका बसमधून मायामी शहराची व तेथील समुद्र किनाऱ्याची सफर करून आणल्यानंतर संध्याकाळच्या वेळी Biscayne Bay मध्ये एक बोटीची सफरदेखील त्या टूरमध्ये समाविष्ट होती. किनाऱ्यावरील मायामी शहर व किनाऱ्याला समांतर असलेल्या मायामी बीच या बेटांच्या शृंखला; या दोन्हीच्या मधे असलेल्या Biscayne Bay मधून सायंप्रकाशात ती क्रूझ मोठा फेरफटका मारून आली. वेगवेगळ्या बेटांवर व किनाऱ्यावर असलेल्या प्रसिद्ध सिनेकलावंत आणि अतिश्रीमंत व्यक्तींच्या रिसॉर्टसारख्या बंगल्यांच्या जवळून जाताना गाइड जेव्हा ते रसभरीत वर्णन करत होती, तेव्हा तरुण वर्गाचे चित्कार आणि त्यांच्या मोबाइलच्या कॅमेरातून सतत घेतले जाणारे फोटो बघून तरुण पिढीला या सेलिब्रिटीजची किती क्रेझ आहे हे जाणवले. मधेच पावसाचा एक शिडकावा येऊन गेल्यानंतर समुद्रावर तयार झालेले सुंदर इंद्रधनुष्य व किनाऱ्यावरील उत्तुंग इमारती हे सारे दृश्य खरोखर अवर्णनीय होते. 

दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या सर्वात दक्षिण टोकाला असलेल्या की वेस्ट या मेक्सिकन गल्फमधील बेटावर जाऊन येण्याचे ठरविले होते. सकाळीच मायामीमधील कार रेंटल ऑफिसमधून एक मोठी एसयूव्ही घेऊन आम्ही निघालो. अमेरिकेत राहणारा मुलगा त्यादिवशी बरोबर नसल्यामुळे आपल्यापेक्षा विरुद्ध रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवण्यास जेव्हा मोठ्या मुलाने गाडी हातात घेतली, तेव्हा मनात थोडी धाकधूक होती. पण सतर्कपणे एकदा शहराच्या बाहेर पडल्यानंतर पुढील ड्राईव्हमध्ये खूप मजा आली. छोट्या छोट्या बेटांच्या शृंखलेला समुद्रामधील अनेक पुलांनी जोडणारा हा अंदाजे अडीचशे ते तीनशे किलोमीटर लांबीचा ड्राईव्ह खूपच प्रसिद्ध आहे. मायामी पासून शंभर किलोमीटर आल्यानंतर एकदा भूभाग सोडला, की पुढे जवळजवळ दीड-दोनशे किलोमीटर सतत एक बेट ते दुसरे बेट यांना जोडणाऱ्या या समुद्राच्या पुलांवरून आपण प्रवास करतो आणि अशी अनेक बेटे पार केल्यानंतर शेवटी की वेस्ट बेटावर पोचतो. मधे अनेक ठिकाणी स्नॉर्केलिंग व स्कुबा डायव्हिंगचीपण सोय आहे. की वेस्टमध्ये पर्यटकांची बरीच वर्दळ होती. तेथील Southernmost point - Continental U.S.A. येथे फोटो काढून व गावात एक-दोन तास भटकून आम्ही सूर्यास्त बघण्यासाठी तेथील प्रसिद्ध समुद्रकिनारी पोचलो. मावळणाऱ्या सूर्याच्या प्रकाशात दिसणाऱ्या बोटी आणि शेवटी समुद्रात बुडून अंतर्धान पावलेला सूर्य बघून तृप्त मनाने रात्री उशिरा मायामीला आलो.

मायामीहून अनेक कंपन्यांच्या प्रसिद्ध बहामा क्रूझ निघतात. इंटरनेटवर बरीच शोधाशोध केल्यावर रॉयल कॅरेबियन कंपनीची बहामा क्रूझ सर्वात चांगली असल्याचे समजले. अर्थात जवळ जवळ चार महिने आधीच त्याचे बुकिंग आम्ही करून ठेवले होते. शेवटच्या दिवशी सकाळी रेंटल गाडी परत करण्याच्या आधी प्रसिद्ध मायामी बीच या भागातून मोठा फेरफटका मारला व बीचवर समुद्राकाठी फिरून दुपारी बाराच्या सुमाराला आम्ही रॉयल कॅरेबियन कंपनीच्या डॉकवर पोचलो. विमानतळाप्रमाणे सामान त्यांच्या ताब्यात देऊन व चेक-इन करून आम्ही रॉयल कॅरेबियनच्या ‘नॅव्हिगेटर ऑफ द सीज’ (Navigator of The Seas) या तेरा मजली अजस्र सेव्हन स्टार बोटीवर प्रवेश केला. पुढील तीन दिवस आम्ही स्वप्नवत अशा या तरंगत्या मायानगरीत राहणार होतो. सुबक व सर्व सुखसोयींनी युक्त अशा केबिनमध्ये जाऊन सामान लावून लगेच आम्ही तेराव्या मजल्यावर असलेल्या वॉटर पार्कवर पोचलो. काय नव्हते तिथे! दोन भल्यामोठ्या बोटींच्या कडेवरून बाहेर समुद्राच्या वरून फिरून येणाऱ्या वॉटर स्लाईड्स, वेव्ह सर्फिंग, तीन स्वीमिंग पूल, गरम पाण्याचे तीन-चार जकुझी आणि त्यात किंवा बाजूला टाकलेल्या असंख्य बीच चेअरवर बसून आरामशीर पाहता येणारा डेकवरील मोठ्या पडद्यावर चाललेला चित्रपट - ultimate luxury हा शब्दच याला योग्य होईल!

जहाजाच्या आतील भागांमध्ये शॉपिंग मॉल असलेला प्रोमोनेड, २४ तास खाण्यापिण्याची रेलचेल असलेली तीन ते चार छोटी रेस्टॉरंट्स, सकाळचा नाश्ता व जेवणासाठी दोन प्रचंड मोठी रेस्टॉरंट्स, दिवसभर विविध कार्यक्रम सुरू असलेली दोन ते तीन नाट्यगृहे आणि एक मोठे सिनेमा थिएटर, कॅसिनो, म्युझियम सर्व काही होते. शिवाय प्रत्येक मजल्यावर अनेक बार व कॉफी शॉप्स होती. सर्व ठिकाणी माणसांची भरपूर गर्दी होती. खरोखर या भूलभुलैयामध्ये काय पाहावे आणि काय करावे हेच समजत नव्हते. क्रूझ निघण्याची वेळ दुपारी चार होती. साडेतीन वाजता सर्वांना एका ठिकाणी जमण्यास सांगून सर्व सुरक्षा नियम समजावून सांगण्यात आले आणि नंतर ‘गो अँड एन्जॉय’ असे घोषित करून जहाज बहामा सफरीसाठी निघाले. जहाजाच्या वरील डेकवर उभे राहून हळूहळू लहान होत चाललेल्या मायामी शहराची स्कायलाइन पाहत आणि वॉटर पार्कची मजा घेत दुपार कशी संपली ते समजलेच नाही. 

अंधार पडल्यावर जहाजातील सर्व सोयी सुविधा एक्सप्लोर करून नंतर आम्ही आइस स्केटिंगचा एक सुंदर शो बघण्यास गेलो. अकराव्या मजल्यावरील क्रूझच्या पुढील भागात पूर्ण काचेच्या खिडक्या असलेल्या प्रचंड मोठ्या रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणाची सोय केलेली होती. मजा म्हणजे त्या रेस्टॉरंटमधील अनेक शेफ व वेटर भारतीय असल्यामुळे त्यांनी जवळ येऊन आमची बरीच विचारपूस केली आणि खास भारतीय पदार्थांची आमच्यासाठी सोय केली. अर्थात शेकडो पदार्थांची रेलचेल असल्यामुळे काय खाऊ आणि काय नको असे झाले होते. शेवटी डेझर्टच्या अनेकविध प्रकारांवर ताव मारून शतपावली करण्यासाठी सर्वात वरच्या डेकवर गेलो. मागील बाजूस असलेल्या मिनी गोल्फ कोर्सवर चक्कर मारून उशिरा रूमवर जाऊन झोपलो. 

क्रूझवरील दुसरा दिवस फार स्पेशल होता. रॉयल कॅरेबियन कंपनीच्या बहामा क्रूझचे वैशिष्ट्य असे होते, की एक दिवस ते त्यांनी स्वतः विकसित केलेल्या बहामाच्या एका छोट्या आयलंडवर घेऊन जातात, ज्याचे नाव Perfect Day at Coco Cay असे होते. सकाळी नाश्त्याला गेल्यावर तेथील मोठ्या काचेतून त्या बेटाचे सुंदर चित्र दिसत होते. पटकन तयार होऊन आम्ही त्या बेटावर दिवस घालवण्यासाठी उतरलो. काय नव्हते तिथे; समुद्राची संलग्न असलेला मोठा वेव्ह पूल, त्याच्या पलीकडे प्रचंड मोठा स्विमिंग पूल आणि त्यात बार व डिस्कोच्या तालावर नाचणारा क्रूझवरील ग्रुप आणि जवळच अमेरिकेतील सर्वात उंच वॉटर स्लाइड असलेला वॉटर पार्क होता. एका बाजूला सुंदर उथळ पाण्याचा बीच आणि पाण्यातच निवांत बसण्यासाठी अनेक बीच चेअर टाकल्या होत्या. शेजारीच काही मंडळी स्नॉर्केलिंग करत होती. मनसोक्त पोहून झाल्यानंतर भूक लागल्यावर तेथीलच रेस्टॉरंटमध्ये जेवण घेतले व एका इलेक्ट्रिक कारमधून संपूर्ण आयलंडला चक्कर मारून आलो. कंटाळा आल्यावर चालतच पुन्हा बोटीवर जाऊन रूममध्ये विश्रांती घेतली. संध्याकाळी अंधार पडल्यावर नवीनच सुरू केलेल्या अप्रतिम फायर वर्क व लेझर शोसाठी परत कोको केच्या वेव्ह पुलापाशी येऊन बसलो. रात्री दहा वाजता बोटीने तेथून बहामातील सर्वात मोठ्या न्यू प्रॉव्हिडन्स बेटावरील Nassau या बहामा देशाच्या राजधानीकडे कूच केले. रात्री बोटीवरील मोठ्या नाट्यगृहामध्ये एक विनोदी शो पाहून रूमवर परतलो.

तिसऱ्या दिवशी Nassau च्या बंदरावर पोचल्यावर एका स्पीड बोटने आम्ही लांब स्नॉर्केलिंगसाठी गेलो. पाण्यातील सुंदर प्रवाळ आणि रंगीबेरंगी माशांचे थवे दीड तास पाहिल्यानंतर पुन्हा बोटीकडे परतलो. त्या दिवशी आमच्या रॉयल कॅरेबियन क्रूझ शिपच्या शेजारीच अजून तीन कंपन्यांची क्रूझ शिप डॉक झालेली होती, पण आमच्या ‘नॅव्हिगेटर ऑफ सीज’समोर ती फारच लहान वाटत होती! दुपारी बंदराशेजारीच असलेल्या Nassau शहरात एक फेरफटका मारून काही खरेदी केली आणि संध्याकाळी सहाच्या सुमाराला बोटीने तेथून परतीच्या प्रवासाला प्रयाण केले. आमच्या नशिबाने त्या दिवशी रात्री कोजागिरी पौर्णिमा होती. डेकवरचे सर्व वातावरणच मंतरलेले होते. शरद ऋतूच्या शुभ्र चांदण्यामध्ये डेकवरील गरम पाण्याच्या जकुझीमध्ये बसून ‘अल्लाऊद्दीन’ हा चित्रपट पाहत दिवसभराचा शीण घालवला. रात्री स्पेशल कॅप्टन्स डिनरचा मनसोक्त आस्वाद घेतला. प्रोमोनेडमध्ये Last Minute Sale ची खरेदी करून आणि कॅसिनोत मौजमजा करून क्रूझमधील शेवटचा दिवस असल्याने जड अंतःकरणाने झोपण्यास गेलो.

शेवटच्या दिवशी सकाळीच शिप मायामीच्या रॉयल कॅरेबियनच्या डॉकवर पोचले. पण सकाळचा नाश्‍ता आरामात उरकून मगच आम्हाला खाली उतरण्यास सांगण्यात आले. आजवरच्या आयुष्यातील एक अतिशय सुंदर अनुभव या रॉयल कॅरेबियनच्या बहामा क्रूझमध्ये आम्हाला मिळाला. तृप्त मनाने आम्ही अमेरिकेतील धाकट्या मुलाने आणलेल्या मोठ्या एसयूव्ही गाडीमधून मायामीहून पुढे ऑरलँडोकडे जाण्यास निघालो.

संबंधित बातम्या