कॅनडाचे पश्चिम रंग

डॉ. संजीव मोतीलाल भंडारी, सोलापूर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

पर्यटन

पूर्व कॅनडाची आठ दिवसाची सफर संपवून पुढील दिवशी भल्या पहाटे आम्ही पाचजणांनी ओटावा विमानतळावरून पश्‍चिम कॅनडाकडे प्रयाण केले. चार तासाच्या विमानप्रवासानंतर रॉकी पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या कॅलगरी शहरात पोचलो. कॅनडाचा पश्चिम भाग रॉकी पर्वतरांगांमुळे अतिशय निसर्गरम्य झालेला आहे. 

कॅलगरी विमानतळावरून आम्ही टॅक्सीने थेट बाम्फ या गावाकडे निघालो. गावाच्या मध्यातून जाणारा एक मुख्य बाजार रस्ता, चहूबाजूने उंचच उंच हिरवेगार जंगल असलेले पर्वत, त्यामध्ये असलेले प्रचंड मोठे मिन्नेवांका लेक आणि गावाजवळून वळणावळणाने वाहणारी बो नदी - सर्वकाही स्वप्नवत होते.

बाजारपेठेच्या रस्त्यावरच असलेल्या आम्ही उतरलेल्या ‘टार्मिगन इन’ या सुंदर हॉटेलच्या बाहेर व पूर्ण बाम्फ गावातच जिकडेतिकडे रंगीबेरंगी टवटवीत फुलांचे असंख्य ताटवे गावाच्या सौंदर्यात भर टाकत होते. टार्मिगन हा त्या भागात आढळणारा एक दुर्मीळ पक्षी असल्याने त्यांच्यावरच हॉटेलचे नाव ठेवलेले होते. बाम्फ गावातच नाही तर जवळपासच्या सर्व प्रेक्षणीय स्थळांना जाण्यासाठी मोफत शटल बस सेवा उपलब्ध होती. त्या बसमधून आम्ही संध्याकाळी गावाबाहेर असलेल्या जॉन्स्टन कॅन्योन या ठिकाणाला भेट दिली. दोन डोंगरांच्या मधील अत्यंत अरुंद अशा घळीतून वाहणाऱ्या झऱ्याच्या काठाकाठाने ट्रेक करीत आपण वरील बाजूस असलेल्या दोन सुंदर धबधब्यापर्यंत जाऊ शकतो. धबधबा जवळून पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी एका छोट्या गुहेतून जावे लागायचे.कौतुकाची गोष्ट म्हणजे कुठलीही गडबड व धक्काबुक्की न करता शांतपणे लोक रांगेत उभे होते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी शटल बसने आम्ही बाम्फ गोंडोलाला गेलो. समुद्रसपाटीपासून साडेसात हजार फूट उंच सल्फर डोंगरावरील ‘Rooftop Observatory’ला जाण्यासाठी ३६० अंशातून फिरत वर जाणारी केबलकार (गोंडोला) हे येथील सर्वात लोकप्रिय आकर्षण आहे. उंच खड्या अशा गोंडोलातून वर जाताना खाली पाहिल्यास थोडी भीतीच वाटते. डोंगरमाथ्यावरील ऑबझर्व्हेटरीमधून दिसणाऱ्या आजूबाजूच्या कॅनेडियन रॉकीज पर्वत शृंखला, फर्नची जंगले, डोंगरांमध्ये असलेले विस्तीर्ण तलाव, खाली  चिमुकले दिसणारे बाम्फ गाव व त्याभोवती वाहणारी बो नदी; निसर्गाने जणू दोन्ही हात भरभरून सौंदर्याची उधळणच केलेली होती. 

संध्याकाळी शटल बसमधून बाम्फ गाव व परिसराचा फेरफटका मारीत असताना आजूबाजूला अनेक कॅम्पिंग ग्राउंडवर कॅम्पर्सच्या बाहेर खुर्च्या टाकून लोक आरामशीर गप्पा मारत व पेय, पदार्थांचा आस्वाद घेत बसलेले दिसले. मनातल्या मनात ठरवून टाकले, की पुढील वेळी आपणही असेच कॅम्पर घेऊन  निवांत फिरायला हवे! तिसऱ्या दिवशी पुन्हा शटल बसने आम्ही गावापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या मिन्नेवांका लेकची टूर केली. चारही बाजूने हिरव्यागार झाडांच्या जंगलाने अच्छादलेल्या उंच उंच डोंगरांच्या मधे असलेले हे प्रचंड मोठे तळे अतिशय सुंदर होते. स्वतः चालवायच्या मोटरबोटमधून चांगली एक तासाची लांब चक्कर मारून आलो. परतीच्या मार्गावर असेच एक छोटेसे सुंदर तळे होते आणि त्यात काठाच्या जवळच सूचिपर्णी वृक्ष असलेले इवलेसे स्वप्नवत बेट होते. उथळ पाण्यातील खडकांवरून उड्या मारत त्या बेटावर जाऊन पाण्यात पाय सोडून बसल्यावर एक प्रकारे समाधीच लागली आणि वेळ कसा गेला ते कळलेच नाही. 

आमचा पुढचा मुक्काम होता कॅनेडियन रॉकीजच्या अंतर्भागात असलेल्या जास्पर या गावी. सकाळी सकाळीच जतिंदर सिंग नावाचा एक उत्साही ड्रायव्हर त्याची भलीमोठी व्हॅन घेऊन आमच्या पुढच्या प्रवासाला न्यावयास हजर झाला. आमच्या स्थानिक एजंटने मुद्दामच भारतीय टॅक्सी ड्रायव्हर आम्हाला दिल्याने त्याच्याशी लगेच जवळीक झाली. पुढील तीन-चार दिवस जतिंदर आमच्याबरोबर प्रत्येक स्थळदर्शनात उत्साहाने सहभागी झाला.

बाम्फ ते जास्पर रस्त्याचा प्रवास जगातील काही मोजक्या सुंदर निसर्गरम्य प्रवासात मोडतो. कॅनेडियन रॉकीज पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या बाम्फपासून जसजसे आपण उत्तरेला जातो, तसतसे चारी बाजूला असलेले उंचच उंच बर्फाच्छादित डोंगर, अनेक लहान-मोठे तलाव व सूचिपर्णी वृक्षांची जंगले आपले मन मोहून टाकतात. रस्त्यावर ठिकठिकाणी जंगली प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पूल बांधले आहेत, ज्यायोगे रस्ता ओलांडताना त्यांच्या जिवाला धोका होऊ नये. रस्त्यामध्ये लेक मोरेन व लेक  

लुईस ही दोन स्थळे खास फोटो स्टॉप म्हणून जगप्रसिद्ध आहेत. उंच बर्फाच्छादित पर्वतांच्या कुशीत वसलेली ही दोन  तळी त्यातील मयूरपंखी निळ्या रंगाच्या पाण्याने, काठावरील टवटवीत फुलांच्या ताटव्यांनी व पार्श्वभूमीवर असलेल्या बर्फाच्छादित डोंगरांनी मन मोहून टाकतात. पुढे रस्त्यामध्ये कोलंबिया आइसफिल्ड येथील अथाबांस्का ग्लेशियरला दिलेली भेट एक चुकवू नये असा अनुभव आहे. मुख्य पर्यटक केंद्रामधून बुक केलेली तिकिटे घेऊन आधी शटल बसमधून आणि नंतर बर्फावरून चालण्यासाठी खास मोठे मोठे ट्रॅक्टरसारखे टायर बसविलेल्या ‘आइस एक्सप्लोरर’ बसमधून थेट ग्लेशियरवर पोचलो. तेथील गाइडच्या म्हणण्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा परिणाम झाला असून गेल्या दहा-पंधरा वर्षांत जवळपास हे ग्लेशियर एक-दीड मैल वितळून मागे सरकले आहे. ग्लेशियरवरील गोठलेल्या बर्फात काहीवेळ हुंदडून, एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकून आणि बरेच फोटो काढून आम्ही पुन्हा जास्परच्या रस्त्याला लागलो. 

संध्याकाळी जास्परला पोचल्यावर फेअरमॉण्ट या सप्ततारांकित हॉटेलच्या सुंदर तळ्याकाठी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेण्यासाठी गेलो. तेथील एकूणच वातावरण व सृष्टीसौंदर्य खरोखर मंत्रमुग्ध करणारे होते. नंतर रात्रीच्या मुक्कामासाठी आम्ही जवळच असलेल्या हिंडन या गावातील रमादा प्लाझा हॉटेलवर पोचलो. जास्पर येथील चुकवू नये असे ठिकाण म्हणजे मलिन लेक. अनेक वर्षांपासून ज्या सुंदर तळ्याचे व त्यातील बेटाचे चित्र मनात होते ते प्रत्यक्षात बघून धन्य होण्याचा प्रसंग दुसऱ्या दिवशी मलिन लेकच्या भेटीमध्ये आला. किनाऱ्यावरून एक तास मोटरबोटीने दोन डोंगरांच्या मधून प्रवास केल्यावर आपण स्वप्नवत भासणाऱ्‍या ‘स्पिरिट आयलंड’ या बेटाजवळ पोचतो. हा सर्व बोटप्रवास अतिशय सुंदर होता व त्या सुंदरतेचा कळस म्हणजे दोन बर्फाच्छादित पर्वतरांगांच्या त्रिकोणात वसलेले स्पिरिट आयलंड! दिलेल्या अर्ध्या तासात डोळे भरून ते सौंदर्य पाहण्यात व फोटो काढण्यात वेळ कसा संपला ते कळलेच नाही.

नंतर ‘मलिन कॅन्योन’ याठिकाणी गेलो. येथे ही नदी अत्यंत अरुंद व खोल अशा घळीतून वेगाने वाहत जाते व बाजूबाजूने केलेल्या जंगलातील सुंदर ट्रेकने जाताना ऐकू येणारा खळखळाट व खाली खोल दिसणारे धबधबे पाहून दिवसभराचा थकवा दूर झाला. तेथून संध्याकाळी साडेपाच वाजता गावाजवळ असलेल्या ‘जास्पर स्काय ट्रॅम’ला पोचलो. या ठिकाणी एक केबल कार आहे, ज्याने आपण अत्यंत उंच व खड्या डोंगर माथ्यावर जातो. तेथून जास्पर गाव एकदम चिमुकले दिसत होते व आजूबाजूच्या खूप लांबच्या रॉकी पर्वत रांगा आणि त्यातून धावणारी जवळजवळ तीन ते चार किलोमीटर लांबलचक मालगाडी हे सर्व बघून खूपच मजा वाटली. येथील रूफटॉप रेस्टॉरंट तर अगदी कड्यावर बांधले आहे व संपूर्ण काचेच्या खिडकी शेजारच्या टेबलावर बसून खालच्या दरीतील नजारा  बघताना अगदी ‘सेवन्थ हेवन’मध्ये असल्यासारखे वाटले.

जगातील काही निवडक नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध रेल्वे प्रवासामध्ये कॅनेडियन रॉकी पर्वतरांगांमधून जाणारा रेल्वे प्रवास खूप वर्षांपासून वरील स्थानावर आहे. त्यासाठी ‘रॉकी माऊंटेनियर’ ही प्रसिद्ध लक्झरी ट्रेन आहे. अर्थात तिचे प्रवासभाडेदेखील कमीतकमी प्रति व्यक्ती एक लाखाच्या पुढेच असल्याने Viewing Dome असलेली पण बरीच स्वस्त असलेली ‘कॅनेडियन वन’ ही रेल्वेगाडी निवडली. ही पूर्व कॅनडातील टोरांटो शहरापासून निघून चार दिवसाचा प्रवास करून पश्चिमेकडील पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या व्हॅनकुव्हर या गावापर्यंत जाते. अर्थात त्यातील जास्पर ते व्हॅनकुव्हर हा रॉकी पर्वतरांगांमधून जाणारा जवळपास चोवीस तासांचा प्रवास हा सर्वात निसर्गरम्य आहे. जास्पर मुक्कामातील शेवटच्या दिवशी संध्याकाळी तेथील रेल्वे स्टेशनवर ही ‘कॅनेडियन वन’ ट्रेन आम्ही पकडली. 

आमचा आजवरचा सर्वात अविस्मरणीय रेल्वे प्रवास म्हणजे हा कॅनेडियन वन मधून केलेला प्रवास! या रेल्वेला पूर्ण काचेचा डोम असलेली पॅनोरमा कार, एक मजला उंचावर डबल डेकरप्रमाणे असलेल्या तीन स्कायलाइन कार, मोठ्या काचेच्या खिडक्या असलेली आकर्षकरीत्या सजवलेली डायनिंग कार आणि गुबगुबीत सोफ्यावर  गप्पाटप्पा मारत कॉफी घेण्यासाठी असलेली लॉबी कार अशा अनेक सुविधा होत्या. गेल्या गेल्या आमचे स्वागत शॅम्पेन देऊन करण्यात आले व एका गाइडने आम्हाला हसतमुखाने या सर्व सोयीसुविधा दाखवल्या.बिछान्यावर पडल्या पडल्या मोठ्या काचेच्या खिडकीतून चंद्रप्रकाशात दिसणाऱ्या उंच उंच रॉकी पर्वतरांगा बघता बघता कधी डोळा लागला समजलेच नाही. पहाटे लवकर उठून आधी स्कायलाइन व पॅनोरमा कारमधून लांबच लांब पसरलेल्या डोंगररांगा, सूचिपर्णी वृक्षांची जंगले, वाटेत लागणारे छोटे मोठे धबधबे आणि पाण्याने तुडुंब भरलेल्या तलाव व नद्यांच्या काठावरून पळणारी रेल्वे भान हरपून पाहत राहिलो. पश्चिम कॅनडाच्या सफरीमध्ये प्रत्येकाने हा रेल्वे प्रवास न चुकता करावा असे म्हटल्यास वावगे ठरू नये! 

संध्याकाळी कॅनडाच्या पश्चिमेकडील पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरील व्हॅनकुव्हर गावी आम्ही पोचलो. जगातील एक सुंदर शहर म्हणून व्हॅनकुव्हरची ख्याती आहे. मावळतीच्या सुमाराला तेथीलच एका उंच डोंगरावरून या शहराचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी आमच्यातीलच एक सहप्रवासी डॉक्टर कोठाडिया यांचे मित्र आम्हाला घेऊन गेले. नंतर आवर्जून त्यांनी त्यांच्या घरी आम्हाला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले  व शेवटी रात्री त्यांच्या गाडीने आमच्या हॉटेलवर आणून सोडले.

व्हॅनकुव्हरलगतच पॅसिफिक महासागरामध्ये किनारपट्टीला समांतर व्हॅनकुव्हर नावाचे जवळपास साडेचारशे किलोमीटर लांबीचे एक मोठे बेट पसरले आहे. या बेटाच्या दक्षिण टोकावर असलेले व्हिक्टोरिया हे सुंदर शहर  व्हॅनकुव्हरपेक्षा लहान असूनसुद्धा ब्रिटिश कोलंबिया या राज्याची राजधानी आहे. दुसऱ्या दिवशी या व्हिक्टोरिया शहराला भेट देण्यासाठी आम्ही एक लोकल टूर घेतली. जवळपास तीनशे ते पाचशे मोठ्या बसेस व ट्रक खालच्या दोन तीन मजल्यावर मावतील अशा प्रचंड बोटीतून आपण व्हॅनकुव्हर बेटावरती पोचतो. सर्वप्रथम जगप्रसिद्ध ‘बूटचार्ट  गार्डन’ पाहण्यासाठी गेलो. बूटचार्ट नावाच्या एका दाम्पत्याने निवृत्तीनंतर त्यांच्या पडीक खाणीच्या जागेमध्ये या सुंदर बागेची निर्मिती केलेली आहे. अनेकविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या या बागेमध्ये जपानी गार्डन, रोज गार्डन, इटालियन गार्डन, मेडिटरेनियन गार्डन, संकन गार्डन असे विविध विभाग असून सुंदर कारंजी आणि छोटी तळी आहेत. नंतर व्हिक्टोरिया शहराला भेट देण्यासाठी आम्हाला नेले. रस्त्यांच्या दुतर्फा व चौकामध्ये असलेले रंगीबेरंगी फुलांचे ताटवे आपले मन आकर्षित करून घेतात. पूर्वीच्या ब्रिटिश साम्राज्याचा इतिहास सांगणाऱ्या इमारती, पार्लमेंट बिल्डिंग आणि सुंदर सागरकिनाऱ्यावरील लक्झरी याट्स पाहत एका घोड्याच्या बग्गीमधून शहराचा फेरफटका मारला. 

आमच्या कॅनडा ट्रिपमधील शेवटच्या दिवशी व्हिसलर या रॉकी पर्वतातील हिलस्टेशनला दिलेली भेट म्हणजे या सर्वांगसुंदर देशाच्या प्रवासातील परमोच्च बिंदू होता. व्हॅनकुव्हरमधून निघून उत्तरेला प्रथम समुद्र पार करून स्टॅटन आयलंडला व तेथून नंतर पॅसिफिक महासागराच्या कडेकडेने दीड दोन तासाचा हा प्रवास खरोखर अवर्णनीय होता. डावीकडे साथ द्यायला समुद्रामध्ये व्हॅनकुव्हर बेट होतेच. रस्त्यामध्ये शॅनॉन फॉल्स या धबधब्याला भेट देऊन दुपारी साडेअकराच्या सुमाराला आम्ही व्हिसलरला पोचलो. चारी बाजूंनी उंच उंच डोंगरांनी वेढलेले हे एक अतिशय सुंदर  स्की रिसॉर्ट हिलस्टेशन आहे. आम्हाला चार तासाचा जो वेळ दिला होता, त्याचा पूर्ण उपयोग करण्यासाठी आम्ही पळतच जवळच असलेल्या ‘व्हिसलर व्हिलेज गोंडोला’ला पोचलो. प्रथम जवळपास पाऊण तास पहिली केबल कार आपल्याला एका उंच डोंगराच्या टोकावर नेऊन सोडते. तेथून एक किलोमीटर चालत जाऊन आम्ही दुसऱ्या एका स्की चेअरवरून उंचावरील एका ग्लेशियरच्या टोकावर पोचलो. आहाहा, काय सुंदर देखावा दिसत होता तिथून, जणू  ‘टॉप ऑफ द वर्ल्ड’! आजूबाजूचे सर्व डोंगर थिटे वाटत होते आणि खाली मुंगीएवढे व्हिसलर गाव व त्यामधील मोठे तळे दिसत होते. ‘आज मै उपर आसमा नीचे’ असेच ते दृश्य होते. शिवाय तिथे ग्लेशियरच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत स्टीलच्या केबलचा एक झुलणारा पूल बांधला होता. वाऱ्याने व त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या पावलांनी तो ‘लक्ष्मण झुला’ एवढा हलत होता, की बरेच लोक घाबरून पुन्हा उलटे जात होते. 

कॅनडा ट्रिपचे प्लॅनिंग करताना परतीच्या वाटेवर एक ‘कॅपिलानो सस्पेन्शन ब्रिज’ नावाचे चुकवू नये असे  पर्यटनस्थळ असल्याचे वाचले होते. या ठिकाणी व्हिसलरच्या डोंगरावर होता, तसाच एक साडेचारशे फूट लांबच लांब दोन डोंगरांना जोडणारा खोल घळीतील कॅपिलानो नदीवर बांधलेला झुलता पूल होता. एका वेळी १३०० माणसे किंवा ९६ हत्ती जरी त्यावर उभे केले, तरी तो तुटणार नाही याची खात्री त्यांनी दिली होती! पण तो इतका गदागदा हलत होता, की जाणारी बहुतांशी माणसे रेलींगला पकडूनच घाबरत घाबरत एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जात होती. त्या घळीच्या वर असलेल्या कड्यावर अजून एक असाच थरारक ‘क्लिफ वॉक’ मजबूत अशा स्टील केबलने बांधलेला होता. 

परत व्हॅनकुव्हरला कसे जायचे असा विचार करत असतानाच समजले, की तेथून शहराच्या मध्यापर्यंत जाण्यासाठी फ्री शटलबस होती. त्यातून व्हॅनकुव्हरला पोचल्यावर  ‘फ्लाय ओव्हर कॅनडा’  नावाचा एक अद्‍भुत 4-D शो बघायला मिळाला. गेल्या अठरा वीस दिवसांत अख्ख्या कॅनडामध्ये जे अनुभवले, ते या शोमध्ये पक्ष्याप्रमाणे उडत बघायला मिळाले आणि सर्व प्रवासाची जणू इतिश्रीच झाली! 

नायगारा फॉल्स समोरील हॉटेलमधला मुक्काम, मलिन लेकमधील सुंदर स्पिरिट आयलंडला दिलेली भेट आणि ‘कॅनेडियन वन’ या रेल्वेचा अविस्मरणीय प्रवास हे या ट्रिपचे हाय पॉइंट्स! प्रवासी कंपन्यांच्या पॅकेज टूरमध्ये हे आपण करू शकत नाही, पण स्वतः शोधून प्रवासाचे प्लॅनिंग केल्यास अशी काही स्थळे सापडू शकतात आणि आजच्या इंटरनेटच्या युगात हे सहज शक्य आहे.

दुसरी प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे या सर्व १८-१९ दिवसांच्या प्रवासात एकही डोळ्याला खुपेल अशी किंवा किळस वाटेल अशी गोष्ट आढळली नाही. ‘सारे कसे छान छान’ असे असू शकते हे आश्चर्यच आहे! 

फोटो फीचर

संबंधित बातम्या