मध्यरात्रीचा सूर्य...

डॉ. विराग गोखले, भांडूप-पूर्व, मुंबई
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पर्यटन
 

पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे, पृथ्वीच्या विशिष्ट भागात, चोवीस तास व त्याहून अधिक काळ सूर्य न उगवणे अथवा न मावळणे हा चमत्कार दिसून येतो. पृथ्वीवरील ज्या काल्पनिक रेषेवर एक वर्षातून कमीतकमी एक दिवस असा येतो, की ज्यादिवशी सूर्य मावळतच नाही आणि एक रात्र अशी येते, की चोवीस तासात सूर्य उगवतच नाही त्याला आर्क्‍टिक सर्कल (Artic Circle) किंवा उत्तर ध्रुव वृत्त असे म्हणतात. या रेषेच्या उत्तरेला आपण जसे सरकतो, तसे उन्हाळ्यात सूर्य न मावळणाऱ्या व हिवाळ्यात सूर्य न उगवणाऱ्या दिवसांची संख्या वाढत जाते.

हा चमत्कार अनुभवण्याच्या दृष्टीने आम्ही आमच्या स्कॅन्डीनेव्हीयाच्या प्रवासात, ५ दिवस नॉर्वेतील लोफोटेन बेटावर राहण्याचा कार्यक्रम आखला होता. स्टॉकहोम या स्वीडनच्या राजधानीपासून स्वीडनच्या उत्तरेकडील ‘किरुना’ या गावी आम्ही विमानाने पोचलो. विमानतळ अगदी लहान एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतो तसा होता. ‘किरुना’ हे गाव आर्क्‍टिक सर्कलच्या ७० किमी उत्तरेला वसलेले लहानसेच गाव आहे. एक महिन्यापूर्वी, हे गाव खचत असल्याने, सर्व गाव दुसरीकडे हलविणार असल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचण्यात आली. या ठिकाणाहून बसने आम्ही पूर्वेकडे प्रवास करून नॉर्वेमध्ये प्रवेश करणार होतो.

नॉर्वेमध्ये शिरल्यावर, ‘E 10’ हा युनेस्कोचा जागतिक वारसा लाभलेल्या हायवेनी आमचा प्रवास होता. किरुनापासून लोफोटेन बेटांवरील स्वोल्वेर या गावापर्यंतचा पूर्ण प्रवास आर्क्‍टिक सर्कलच्या उत्तरेकडील भागातच होता. लोकसंख्या फारच तुरळक, एवढी की लोफोटेन बेटांपैकी, मुख्य पाच बेटांची एकूण लोकसंख्या पंचवीस हजारच्या आसपास आहे. रस्त्याचा दुतर्फा, छोटे मोठे डोंगर, घनदाट जंगले, मुक्तपणे वाहणाऱ्या नद्या, असंख्य तळी, अधेमध्ये विखुरलेले बर्फ, मध्येच पिवळ्या व गुलाबी फुलांचे ताटवे -हे मनोहारी दृश्‍य नजर खिळवून ठेवत होते. फार तुरळक वाहतूक, बऱ्याच अंतरानंतर एखादे लहानसे मच्छीमारांचे खेडे. ना कारखाने, ना इमारती, ना हॉटेले. फक्त शुद्ध निसर्ग, मानवी स्पर्शाने बाधित न झालेला निसर्ग! उर्वरित युरोपप्रमाणे २-२ तासाच्या अंतरावर गॅस स्टेशन व रेस्टॉरंटची सोय मात्र आहे. नितळ रस्ते पाहून प्रश्न पडला, हे कुठले क्रीम वापरत असतील या रस्त्यांच्या कॉम्प्लेक्‍शन साठी? धूळ हा प्रकारच नव्हता. जणू काही प्रत्येक धुलीकणापासून एक गवताचे पाते उगवले असावे! ऋतू उन्हाळ्याचा होता, त्यामुळे हवेतील आनंददायी गारवा - मंत्र मुग्ध करणारा होता.

नॉर्वेमधील आणखीन एक सृष्टीचमत्कार म्हणजे येथील ‘फिऑर्डस’. बर्फाच्या नद्या समुद्राकडे जाता जाता, जमीन कापली जाऊन एक खोल दरी तयार होते. या दऱ्यांमध्ये समुद्राचे पाणी वाहत येते. E-10  हायवेवरील या प्रवासात आपल्याला नॉर्वेचे उत्तरी ‘फिऑर्डस’ पाहता येतात.

स्वोल्वेरमध्ये आमचा (रात्रीचा नाही, कारण या काळात तेथे रात्र नसतेच) मुक्काम होता. मे ते जुलै या दरम्यान येथे सूर्य मावळतच नाही. रात्री बारा-एक वाजता, साधारण सायंकाळी ५ वाजता आपल्याकडे असतो तसा उजेड होता. पण दुर्दैवाने, सूर्य ढगाआड होता, त्याने दर्शन दिलेच नाही.

सूर्याचे मार्गात्क्रमण कसे असते हे बघणे हा या ट्रीपचा मुख्य उद्देश होता. साडेचार हजार मैलांचा प्रवास करून येथे पोचल्यावर, ही मोठीच निराशा होती. पण आमचे पुढचे मुक्कामाचे ठिकाण बोडो या ठिकाणी होते. बोडो आर्क्‍टिक सर्कलच्या ४० किमी उत्तरेला असून तेथे चार जून ते नऊ जुलै दरम्यान सूर्य मावळत नाही.

स्वोल्वेरवरून बोडोला जाताना वाटेत, हेन्निन्गस्वेर व रीने (Reine) या नावाची अप्रतिम गावे आणि ‘स्क्‍यागसांडेन’ नावाचा नितांत सुंदर बीच लागतो. मॉस्केनेस या गावातून फेरीने बोडो या उत्तर नॉर्वेच्या किनाऱ्यावरील गावात जाता येते. बोडोमध्ये सूर्य दर्शनासाठी खास पॉइंट होता. उत्तर दिशेला पाहिल्यावर छोटे छोटे सुळके असलेला एक डोंगर होता. सूर्याचे क्षितिजावर मार्गक्रमण कसे होत होते हे या सुळक्‍यांच्या आधारे एक पुरावा म्हणून कॅमेरात कैद करणे शक्‍य होते. रात्री साडेअकरा वाजता सूर्य डोंगराच्या दोन शिखरांमध्ये दिसतो व बारा वाजता, क्षितिजावरून खाली उतरायच्याऐवजी, भूमीला समांतर अशा पुढच्या दोन शिखरामध्ये दिसतो. व त्या नंतर तसाच हळूहळू वर जायला लागतो. पण साडेबाराच्या सुमारास ढग पुन्हा आडवे आले व आम्ही नाइलाजाने आमच्या हॉटेलवर परतलो.

रात्री एक ते दीड वाजता, आम्ही बोडोमधल्या धक्‍क्‍यावर फिरायला गेलो. त्यासमयी, तशा उजेडात, फिरण्याचा अनोखा अनुभव आम्हाला घ्यायचा होता. ते थ्रिल, तो रोमांच, त्याने झोपेला पार हद्दपार केले होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. गावातील नेहमीच्या रहिवाशांना अशा लख्ख उजेडात निद्राधीन व्हायची सवयच असणार. रस्त्याच्या दुतर्फा ठेवलेल्या फुलझाडांच्या कुंड्यांमध्ये फुललेली फुले त्यांच्या रूपाने मोहवीत होती, पण कुठलीच फुले सुवासिक नव्हती. सकाळी विमानाने नॉर्वेमधील बर्जेन या सुंदर शहरात पोचलो. बागा व रंगीबेरंगी घरांनी नटलेले हे शहर पूर्वी नॉर्वेचे राजधानीचे शहर होते. या शहरातील जुन्या लाकडी बांधकामाच्या इमारती असलेला भाग, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंदला गेला आहे. पण आता आम्ही आर्क्‍टिक सर्कलच्या बरेच दक्षिणेला होतो. 

निसर्गनिर्मित सौंदर्य सोडून, आता मानवनिर्मित सौंदर्याचा अनुभव घेत होतो. लवकरच सूर्य मावळला व पाच दिवसानंतर आम्ही प्रथमच रात्रीचा अनुभव घेतला. या धरणीमातेला, विविध ढगांनी सजवाणाऱ्या, विविध रंगांनी उजळवणाऱ्या त्या विधात्याला अभिवादन करून आम्ही अंगावर ब्लॅन्केट ओढले व येणाऱ्या दिवसाची रंगीबेरंगी स्वप्ने पाहात निद्रेच्या राज्यात पाऊल टाकले.

फोटो फीचर

संबंधित बातम्या