ज्युएल ऑफ द पॅसिफिक

जयप्रकाश प्रधान
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पर्यटन
 

दक्षिण अमेरिकेतील चिलीची राजधानी सॅंटियागोला नुकतेच दोन वेळा जाणे झाले. पहिला मुक्काम केवळ एका दिवसाचा व दुसरा मुक्काम मात्र चार-पाच दिवसांसाठी होता. एका दिवसाच्या वास्तव्यात तेथील शेटेरटन हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. योगायोग असा, की आठ-नऊ वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेच्या सहलीतही आमचा मुक्काम याच शेरेटन हॉटेलमध्ये होता. तेथून अँडिज पर्वतराजी मस्त दिसते. पहिल्या वेळी गेलेलो तेव्हा हॉटेलच्या जवळपास फिरत असताना एक आश्‍चर्याचा धक्काच बसला. तेथील एका सुंदर बगिच्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व रवींद्रनाथ टागोर यांचे पांढरे शुभ्र संगमरवरी पुतळे दिसले. एवढ्या दूरवर ते कोणी बसवले वगैरेची काहीच माहिती मिळू शकली नाही. पण तो बगीचा व पुतळ्यांची व्यवस्था अप्रतिमच म्हणावी लागेल. दुसऱ्या मुक्कामाच्या वेळी आम्हाला ते पुतळे तिथेच आहेत का व असेलच तर त्यांची अवस्था काय, याबद्दल कमालीचे औत्सुक्‍य वाटत होते. म्हणून मुद्दाम तेथे गेलो. विशेष म्हणजे आजही (आठ-नऊ वर्षांनंतर) ते पुतळे जसेच्या तसे, पांढरे शुभ्र असून, बगिच्यातील कारंजी लक्ष वेधून घेतात. आपल्या देशात आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तींच्या पुतळ्यांचीही चार-पाच वर्षांत दुरवस्था होते. पण ज्या देशात गांधी, नेहरू, टागोर कोण हे अनेकांना ठाऊकही नसतील, पण त्यांचे पुतळे उत्तम अवस्थेत राहावेत हे विशेष वाटले. 

व्हॅलपरायसो (Valparaiso) व व्हिना देल मार (Vaina del mar) या सॅंटियागोपासून सुमारे १२० किलोमीटर अंतरावर मध्य चिलीत वसलेल्या दोन अगदी आगळ्या-वेगळ्या गावांना यावेळी भेट देण्याचे ठरविले. सॅंटियागोपासूनचा हा प्रवास दऱ्यांमधून होता. तो प्रदेश सुपीक व हिरवागार. त्यामुळे वाइन, फळे व चीज यांच्यासाठी प्रसिद्ध व्हॅलपरायसो शहराची रचना अगदी निराळी आहे. स्थापत्य शास्त्राचे प्राचीन नमुने येथे पाहावयास मिळतात. त्यामुळे युनेस्कोने २००३ मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून ती घोषित केली. 

‘द ज्युएल ऑफ द पॅसिफिक’ या टोपण नावानेच हे शहर ओळखले जाते. व्हॅलपरायसो बंदराने १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात फार महत्त्वाची कामगिरी बजावली. अटलांटिक व पॅसिफिक महासागरांच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी थांबण्याचे हे महत्त्वाचे बंदर होते. गोल्डन एजच्या काळात युरोपियन व्यापारी येथे फार मोठ्या प्रमाणात आकर्षित होत. ‘लिटल सॅनफ्रान्सिस्को’ असेच त्याचे नाव पडले. लॅटिन अमेरिकेतील सर्वांत जुने स्टॉक एक्‍स्चेंज, चिलीतील पहिले सार्वजनिक वाचनालय व स्पॅनिश भाषेतील सर्वांत जुने वृत्तपत्र येथे सुरू झाले. पण पनामा कालव्याच्या निर्मितीनंतर मात्र व्हॅलपरायसो बंदरावरील जहाजांची वाहतूक थंडावली. त्याचा परिणाम तेथील अर्थव्यवस्थेवर झाला. पण गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून या शहराची गाडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 

येथे सर्वत्र टेकड्यांचे साम्राज्य आहे. एका पाठोपाठ एक अशा काहीशा उंच ४५ टेकड्या असून त्यावर सुमारे चार लाखाची लोकवस्ती आहे. पण या टेकड्यांची रचना अशी आहे, की एक टेकडी कोठे संपते व दुसरी कोठे सुरू होते तेच समजत नाही. आम्ही येथील काही टेकड्यांवर टुरगाइड समवेत फिरलो. घरांची रचना, रंगसंगती, त्यावर लिहिलेला गमतीशीर मजकूर आकर्षक वाटतो. पण आपण किती टेकड्यांवर गेलो हे काही सांगता येत नाही. तसेच स्थानिक व्यक्ती बरोबर असेल तर ठीक, नाहीतर टेकड्यांच्या चढ-उताराच्या भुलभुलैय्यात आपण पुरते अडकले जातो. या टेकड्यांचे चढउतार अतिशय तीव्र (स्टीप) आहेत. ठिकठिकाणी चांगले रस्ते, पायऱ्या दिसतात. त्यावरून अतिशय काळजीपूर्वक चालावे लागते. त्यातल्या त्यात मोठ्या रस्त्यांवरून मोटारींची वाहतूक सुरू असते. त्यामुळेच व्हॅलपरायसो येथील अभूतपूर्व ‘फ्यिनिक्‍युलर लिफ्ट सिस्टिम’ (अत्यंत सरळ असा चढायचा मार्ग) हा जगातील सर्वांत कठीण अशा १०० मार्गांपैकी एक असल्याचे, वर्ल्ड मॉन्युमेंट संघटनेने १९९६ मध्ये जाहीर केले. टेकड्यांवरील रंगीबेरंगी घरांची स्थापत्यशास्त्र विषयक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक घर रस्त्याच्या एका बाजूला चार मजली, तर त्याला लागून असलेले तेवढ्याच उंचीचे दुसरे घर, शेजारच्या रस्त्यावर दोन मजली झाले आहे. घरांना निरनिराळे रंग देण्यामागेही इतिहास आहे. पूर्वी जहाजांतून व्यापारासाठी आलेले व्यापारी या टेकड्यांवर घरे बांधून राहत असत. ते आपल्या बोटीचा जो रंग असेल तोच घरांना देत. म्हणजे समुद्रातून येताना, लांबून ते आपले घर बरोबर ओळखत. आता स्थानिक लोकांनीही तिच परंपरा कायम ठेवली आहे. रस्त्यांवरील तसेच घरांच्या भिंतींवर अत्यंत आकर्षक अशी रंगीबेरंगी चित्रे व मजकूर लिहिलेला आढळतो. पर्यटकांचे ते एक मोठे आकर्षण ठरते. हा सर्व भाग भूकंपासाठी प्रसिद्ध आहे. १८ ऑगस्ट १९०६ मध्ये येथे भूकंपाचा फार मोठा तडाखा बसला. त्यात हजारो माणसे मरण पावली व कित्येक कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले. अगदी आत्ता म्हणजे २०१०-१५ मध्येही भूकंपाने आपला प्रताप दाखविला होता. त्यामुळे येथील घरे बांधताना विशिष्ट प्रकारच्या बांधकाम साहित्याचा वापर केला जातो. 

व्हिला देल मरा येथे सुरुवातीच्या काळात वाइनचे मळे होते. आता ते चिलीमधील समुद्रकाठचे अतिशय सुंदर ठिकाण मानण्यात येते. अनेक श्रीमंत व्यक्तींचे बंगले येथे आहेत. व्हिला देल मार येथे पर्यटकांच्या स्वागतासाठी फुलांचे भव्य घड्याळ तयार करण्यात आले आहे. व्हॅलपरायसो व व्हिला देलमार येथील भटकंतीत अगदी निराळ्या शहरांचा परिचय झाला. सॅंटियागोला जाणारे भारतीय पर्यटक येथे जात नाहीत. पण त्यांनी येथे जाऊन सरळ टेकड्यांचे हे मायाजाल जरूर पाहिले पाहिजे.

संबंधित बातम्या