काश्मीर : एक अस्वस्थ सौंदर्य! 

रूपा देवधर
सोमवार, 9 मार्च 2020

भ्रमंती
 

काश्मीरला पर्यटक म्हणून जायचं ठरवलं, तेव्हा २०१८ चा एप्रिल महिना होता. अनेक मित्रमंडळींनी काश्मीर? असं म्हणून भुवया उंचावल्या होत्या. प्रवासी कंपन्यांना फोन केले, तर त्यांच्या टूर्स निघत होत्या. आम्ही दोघी मैत्रिणींनी ठरवलं - जायचं. काय होईल ते बघू. कर्फ्यू लागला आणि हॉटेलमध्येच बसावं लागलं, तर तो ही एक अनुभव, असा विचार केला. मनात एक निवांतपणा होता. अमुकच बघायला मिळालं पाहिजे असा अट्टहास नव्हता. डोळ्यांसमोर पस्तीस वर्षांपूर्वी पाहिलेल्या काश्मीरची क्षणचित्रं होती.

प्रत्यक्षात काश्मीरला गेल्यावर प्रश्न पडला की हेच ते काश्मीर आहे का - ज्याला अशांत, धुमसतं, अस्वस्थ अशी विशेषणं लागतात? आम्ही पाहिलेलं काश्मीर इतकं नॉर्मल होतं, की माणसं, बायका, मुलं-बाळं आरामात रस्त्यावरून इकडं तिकडं जात होती. बाजारात फिरत होती. बागांमध्ये सहकुटुंब पिकनिकला आलेली होती. ही साधी, हसतमुख, अगत्यशील माणसं अगदी लक्षात राहिली. मुख्य म्हणजे ती स्वतःहून संवाद साधत होती. 

मात्र तीच एकीकडं हेही सांगत होती, ‘यहाँ कभीभी, कुछभी हो सकता है!’ काश्मीरची राजकीय परिस्थिती बदलण्यापूर्वीची - दीड वर्षापूर्वीची ही काही स्मृतिचित्रं! दुपारी दीडच्या सुमारास श्रीनगर एअरपोर्टला उतरलो, तेव्हा वातावरण ढगाळ होतं. नुकताच पाऊस पडून गेला होता. थंड हवा छान वाटत होती. हाऊसबोटीकडं गाडी जात असताना अतीव उत्सुकतेनं श्रीनगर न्याहाळत होते. मध्यम गर्दीचे रस्ते, बाजूनं काही टुमदार बंगले, थोडी वस्ती, बाजार, रस्त्यावरून जाणारे स्त्री-पुरुष. भारताच्या कोणत्याही शहरात दिसणारं वातावरण. पेहराव थोडे वेगळे. पुरुषांचे बरेचदा पठाणी कुर्ते. स्त्रियांची हमखास डोक्यावरून ओढणी... आणि मधेच दिसणारे, भर रस्त्यात गस्तीला उभे राहिलेले शस्त्रधारी सैनिक!

श्रीनगरमधला पहिला मुक्काम हाऊसबोटीत असल्यामुळं छान वाटत होतं. आमची हाऊसबोट दाललेकच्या अगदी मागच्या, शांत भागात होती. संध्याकाळी हाऊसबोटीच्या पोर्चमध्ये शालीत गुरफटून बसले होते. भरपूर थंडी होती, पण आवडत होती. थंडगार वारे, डावीकडं दिसणारे पहाड, समोरच्या पाण्यातून निघालेल्या शांत वाटा. मधूनच डुबुकडुबुक आवाज करत लहानशी नाव यायची. एखादा म्हातारा वल्हवत असायचा. एखादी आई नावेतून आपल्या लेकराला घेऊन कुठंतरी चाललेली दिसायची. थोडं उंच गवत. पक्ष्यांची किलबिल. बदकं. इतर कोणतेही आवाज नाहीत. आपण स्वस्थ बसलेलो. काहवा पीत. अजून काय पाहिजे? हे श्रीनगर इतकं रमणीय होतं, की अजून दुसरं काही करावंसंच वाटत नव्हतं.

बोटीवरची सेवक मंडळीही अत्यंत साधी, सालस, विनम्र. मेहेमाननवाजी अंगात मुरलेली. शतकानुशतकं ‘सेवक’ असण्याचा परिणाम जाणवत होता. जेवण आणून देणारा निसार खूप गप्पिष्ट आणि आनंदी तरुण होता. एक प्रसंग त्यानं अगदी सहज सांगितला, ‘जेव्हा बुरहान वणीची हत्या झाली, तेव्हा हाऊसबोटीवर दिल्लीचे एक अमीर मेहमान होते. बातमी कळली, तेव्हा त्यांचं जेवण चाललं होतं. त्यांनी जेवण तसंच टाकलं. लगेच दिल्लीला जायचा निर्णय घेतला. आम्ही आणि मालकांनी त्यांना सुखरूप श्रीनगर एअरपोर्टला पोचवलं. कारण हे दगडफेक करणारे तरुण केव्हा कुठे येतील हे सांगता येत नाही ना!’ हा निसारही तरुण होता. श्रीनगरचा रहिवासी होता. पण तो ‘ते दगडफेक करणारे तरुण’ असं म्हणून कोणत्यातरी दुसऱ्याच समूहाबद्दल बोलत होता. मग कोण आहेत हे तरुण? त्यांचं आणि या नॉर्मल दिसणाऱ्या काश्मिरी नागरिकांचं काय नातं आहे? त्यांचे संबंध कसे आहेत? हे प्रश्न काही सुटले नाहीत. पण एक कळलं, ते म्हणजे जो साधा काश्मिरी माणूस आहे, त्याला हवी आहे शांतता! ज्याला दुसरा कुठलाच पर्याय नाही. 

चष्मेशाही, निशात, शालीमार 
मुघल सम्राटांनी आपल्या बेगमांकरता निर्माण केलेल्या या बागा म्हणजे काश्मीरचं मोठंच वैशिष्ट्य आहे. उत्तम स्थितीत, सतत निगराणीत आहेत. तिथं ४०० वर्षं जुने महाकाय चिनार वृक्ष आहेत, तसंच ऋतूंनुसार फुलणारी नाजूक रंगीबेरंगी फुलंही आहेत. 
चष्मेशाही, निशात, शालीमार या शाही बागांची रचना साधारण एकसारखी आहे. जमिनीच्या नैसर्गिक उताराचा उपयोग केलेली, ३-४ पातळ्यांवरची रचना. मध्यभागातून खळाळत उतरणारा पाण्याचा प्रवाह. बाजूला फुलांचे ताटवे, हिरवळ आणि नवे-जुने वृक्ष. दूरवर दिसणारे पहाड. त्यावर बर्फ. या रम्य वातावरणात स्थानिक काश्मिरी माणसं सहकुटुंब डबे घेऊन येतात आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली सतरंजी पसरून आराम करतात. आपल्याकडं मैत्रिणी मैत्रिणी कॅफेमध्ये भेटतात, तशा त्या तिथं बागांमध्ये आलेल्या दिसतात. सगळे इतके मजेत असतात, की हाच का तो दहशतवादानं पोळलेला प्रदेश असा प्रश्न पडतो. 

मात्र सगळ्यांचं एक सांगणं असतं, ‘यहाँ कभीभी, कुछभी हो सकता हैं!’

काश्मीरमध्ये गेल्यापासून वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटत गेली. निशात बागेतले खांब रंगवणारे तरुण, हाऊसबोटीचा मालक, हजरतबलजवळचा टॅक्सीचालक असे अनेकजण. या लोकांना स्वतःहून खूप बोलायचं होतं. मुख्य म्हणजे सांगायचं होतं, की सगळे काश्मिरी वाईट नसतात आणि ‘ये सब पॉलिटिक्स है और मीडिया बहोत ज्यादा हाईप करती है।’ भेटलेल्या लोकांमध्ये काही स्त्रिया लक्षात राहिल्या. जामी मस्जिदमधल्या आमच्या ग्रुप फोटोत स्वतःहून येणारी एक मुलगी. तिच्या चेहऱ्यावर बुरखा होता तरी तिला फोटोत यायचं होतं! तिथंच भेटलेली एक भक्कम अंगयष्टीची आजी. बरोबर दोन नातू होते. ओळख झाल्या झाल्या चहा प्यायला पलीकडच्या गल्लीतल्या घरी यायचा त्यांचा आग्रह कसाबसा परतवला. शालिमार बागेतल्या आई आणि तीन मुली. बरोबरची फळं लगेच प्रेमानं खाऊ घालणाऱ्या. सुशिक्षित वाटत होत्या, तरी पुण्याचं नाव माहीत नव्हतं. मुंबई कुठंतरी दिल्लीच्या पलीकडं आहे हे ऐकून होत्या. 

या माणसांबरोबरच काही प्रसंगही लक्षात राहिले. वैशिष्ट्यपूर्ण. न बोलता भाष्य करणारे! 

सोनमर्गचा देवदूत  
सोनमर्ग, गुलमर्ग ही श्रीनगरपासून २-३ तास अंतरावरची गावं. प्रवाशांची आवडती. मुख्यतः बर्फात खेळण्यासाठी. सोनमर्गला सकाळी पोचून पुढची घोड्यावरची सफर सुरू झाली. जिथं खूप बर्फ साठलेला असतो, तिथं सर्वांना जायचं होतं. एक सपाट जागा बघून सर्व घोडे तिथं थांबवले. झाडाला बांधले. उत्साही सहपर्यटक बर्फाकडं धावले. मी तिथंच रेंगाळले. थोडे फोटो काढत. आजूबाजूला बघत. उंच सूचिपर्णी वृक्ष, जरा अंतरावर वाहणारा नदीचा प्रवाह, त्यावरचा छोटा लाकडी पूल आणि दूरवरून येणारे पर्यटकांचे हलके आवाज. एका सपाट शिळेवर बसले. डोळे मिटून. शांत वाटत होतं. आजूबाजूला थोडे घोडेवाले आपापसात गप्पा मारत होते.

थोडा वेळ गेला. त्या उंच जागेवर असल्यामुळं असेल कदाचित, पण तहान फार लागत होती. पुन्हा पुन्हा पाणी पिऊन माझ्याजवळचं संपून गेलं होतं. जवळपास दुसरं कुणीच नव्हतं. पाण्याची सोय दिसत नव्हती. 

खाली नदी खळाळत होती. पण ती छान वाटली तरी दूर आहे असं लक्षात येत होतं. आता तर तहानेनं अत्यंत अस्वस्थ, डोकं हलकं वाटू लागलं होतं. अवघडून एका घोडेवाल्याला विचारलं, ‘भाईसाब, कोई पानी ला सकता है?’ तो तत्परतेनं उत्तरला, ‘हां हां, मै लाता हूँ’ आणि माझ्यासमोर पळतपळत खाली नदीपाशी जाऊन माझी बाटली भरून वर आला. पाणी प्यायल्यावर स्वर्गीय सुख मिळालं. कृतज्ञतेनं त्याला काही पैसे देऊ केल्यावर हसतमुख चेहऱ्यानं, विनम्रतेनं नाकारत होता. परमेश्वर, काश्मिरी अदब आणि मेहेमाननवाजी माझ्यासमोर घोडेवाल्याच्या रूपात उभी होती.

संध्याकाळी श्रीनगरकडं परतत असताना हीच सिंध नदी मोठी होऊन भेटली. चहा घ्यायला एके ठिकाणी थांबलो होतो. मागून ही खळाळत होतीच. पण आता तिथं उतरता येईल इतकी जवळ होती. नदीचं थंडगार पाणी ओंजळीत घेऊन डोळे मिटून प्राशन केलं. शतकानुशतकं भारतीय संस्कृतीमधील अनेक घडामोडी जवळून, सोशीकपणे पाहिलेली सिंध नदी. त्या विशाल मनाच्या नदीसमोर नतमस्तक होऊन ओंजळीतून तिचा अंश पिऊन टाकला.

पहलगाम : एक गूढ सौंदर्य  
हायवेवरून बस चालली होती. वाटेत लहानमोठी गावं लागत होती. बाजार, गर्दी, दुकानं, माणसं, ट्रॅक्स, फळगाड्या, दवाखाने सगळं होतं. कडक ऊन आणि थोडा धुरळा. 

बस हायवेवरून पहलगामच्या रस्त्याला वळल्यावर हिरवंगार दिसू लागलं. छोटी छोटी खेडी लागली. दुकानांच्या पायऱ्यांवर स्वस्थ बसलेली माणसं, मुलाला खेळवत असलेली आई, शाळेत रमत गमत जाणाऱ्या मुलांचे घोळके, झाडाखाली म्हातारा मेंढ्यांना घेऊन बसलेला. सगळी लोभसवाणी दृश्यं. एका दरवाजाबाहेरच्या म्हातारीला मी बसमधून हात हालवला. तिनंही हसून आनंदानं हात हालवला. तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य  आणि आनंद फोटोसारखा मनात टिपला गेलाय.

बस पहलगामला हॉटेलसमोर थांबली. झाडाझुडुपांनी वेढलेलं छोटसं गाव. संध्याकाळची वेळ. समोर दिसणारे पर्वत, झाडी. झुळुझुळू वाहणारी लहानशी लिडर नदी. मधूनच मेंढ्या घेऊन परतणारे, जाडजूड अंगरखे घातलेले काश्मिरी मेंढपाळ आणि एक शांतता. नदीच्या पाण्याशिवाय कोणतेही आवाज नाहीत. रस्ता असला तरी वाहनं, माणसं नाहीत. शेळ्यामेंढ्यांचं रक्षण करणाऱ्या ऋग्वेदातल्या पूषन या सूर्यदेवतेची कल्पना याच भागात जन्माला आली असेल का? हिवाळ्यात, अंधूक प्रकाशात या शेळ्यामेंढ्या हरवल्या तर शोधणं किती कठीण!

त्याच संध्याकाळी नदीकाठानं फिरत होतो. पुलाच्या अलीकडं वळणावर एक कार थांबली होती. कारच्या आत एक काश्मिरी तरुणी होती. देखणी, गोरीपान, छान कपडे घातलेली आणि मोबाईलवर कोणाशी तरी बोलणारी. शेजारी एक तरुणही होता. अगदी हळू आवाजात बोलणं चाललं होतं. इतक्या आडबाजूला कार थांबवून फोनवर बोलत असल्यानं वेगळं वाटलं. पुढं बरंच फिरून आम्ही परत आलो. आता अंधारही पडायला लागला होता. त्या वळणावर आलो, तर ती कार आणि ते जोडपं अजूनही फोनवर हळूहळू बोलतच होतं. इतक्या निर्मनुष्य जागी कार आणून ते कोणाशी बोलत होते? त्यांच्या प्रेमकहाणीतल्या वडीलधाऱ्यांची मनधरणी चालू होती, की सीमेपलीकडच्या कोणाशी तरी खलबतं? अंधूक उजेडातलं ते चित्र अजून डोळ्यांसमोर तसंच आहे.

पहलगामच्या सौंदर्यात एक प्रकारची गूढता भरून राहिली होती. वाटत होतं, या रमणीय प्रदेशाला शांतता लाभली तर किती बरं होईल!

भारतीय सैन्य
भारतीय सैन्य आज काश्मीरचा अविभाज्य भाग झालं आहे. त्यांच्यामुळंच आपण आज काश्मीरला पर्यटक म्हणून जाऊ शकतो. श्रीनगरच्या रस्त्यांवर आणि राज्यरस्त्यांवर सैन्याचं अस्तित्व ठळकपणे जाणवत राहतं.

ज्यांच्यामुळं आपण निर्धास्तपणे काश्मीरला जाऊ शकतो, त्यांना हे सौंदर्य बघण्यासाठी किती शांतपणा मिळतो कोणास ठाऊक! त्यांचं विश्व त्या लोखंडी बॅरिकेडच्या आत, जाड युनिफॉर्ममध्ये बंदिस्त झालेलं. त्यांना येणारे अनुभव वेगळे. त्यांच्याबद्दलच्या स्थानिक लोकांच्या भावना काहीवेळा वेगळ्या. जुन्या श्रीनगरमधून फिरताना एका भिंतीवर त्या वेड्यावाकड्या मोठ्या अक्षरांत प्रकट झालेल्या दिसल्या. ज्या कर्तव्यभावनेनं आणि निष्ठेनं सैनिक तिथे उभे आहेत, त्याला तोड नाही. त्यांच्या या कर्तबगारीला मनापासून सलाम!

तीन तुकड्यांतला स्वर्ग
सर्व टूरिस्ट स्पॉट्सना घोळक्यानं दिसतात ते घोडेवाले, अक्रोडवाले, शालीवाले! हे लोक उंचेपुरे, नाकेले. मूळचे गोरेपान, पण रापलेले चेहेरे. जाड पायघोळ अंगरखे घातलेले हे लोक सगळ्या ठिकाणी भेटतात. किमती वाढवतात - पाडतात. त्यांचं हे पर्यटकांच्या मागे लागणं त्यांच्या शरीरयष्टीशी विसंगत वाटतं. पण चेहऱ्यावरच्या गरिबीच्या खुणा त्यामागचं कारण सांगतात.

श्रीनगरमधले अत्याधुनिक सुंदर बंगले आणि खेडोपाडी दिसणारी ही गरिबी, आर्थिक स्तराची दोन टोकं दाखवतात. काही जणांना वाटतं, की काश्मीरमध्ये पर्यटकांनी जाऊच नये. कारण त्यामुळे मिळणारा पैसा दहशतवादासाठी वापरला जातो. इतक्या सुंदर भूमीमध्ये दहशतवाद का आहे, असा प्रश्न पडतोच. पण मला तर असं वाटतं, की हा ‘आपला’ प्रदेश आहे. काश्मीरमध्ये भारतीय संस्कृती प्राचीनकाळापासून आहे. हिंदू मंदिरं, धार्मिक ग्रंथ, अभिजात साहित्य यांची निर्मिती इथे झाली आहे. बौद्ध धर्माचीही स्थानं आहेत. 

कुषाण सम्राट कनिष्कानं बौद्ध धर्माचे काही प्रश्न सोडवायला चौथी संगीती बोलावली ती इथंच, काश्मीरमध्ये. काळाच्या ओघात, आक्रमणांमुळे अनेक बदल झाले. हिंदू संस्कृतीचे अवशेष तुकड्यातुकड्यानं शिल्लक राहिले. लढाया या प्रदेशाला 
नवीन नाहीत. पण दहशतवाद नवा आहे. तो संपावा आणि पृथ्वीवरचा हा तीन तुकड्यांतला स्वर्ग पुन्हा जोडला जावा, ही मनापासूनची इच्छा!

संबंधित बातम्या