क्रॉकोडाईल सफारी

कविता मेहेंदळे
सोमवार, 29 एप्रिल 2019

पर्यटन
 

कोकणात भटकंती करण्याच्या इच्छेला नेहमी ‘भरती’ लागलेली असते. कधी सह्याद्रीची शिखरं खुणावतात, तर कधी प्राचीन मंदिरातला घंटानाद घुमत राहतो. सागर गाज तर अविरत साद घालीत असते. अन्‌ कितीही वेळा किनाऱ्यावर हिंडलं, तरी समाधान होत नाही. मात्र, एक नवीन ठिकाण समजलं होतं आणि तिथं जायचं आम्ही नक्की केलं होतं. चिपळूण ते गुहागर या मार्गावरील परचुरी या ठिकाणी जाऊन ‘क्रॉकोडाईल सफारी’ अनुभवायची होती. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीवर होडीतून ही सफारी होणार होती. ‘परचुरी’ मधल्या ‘आजोळ’ या ठिकाणी राहायचं होतं. कारण तिथल्या निसर्गाविषयी खूप काही ऐकलं होतं. 

आम्ही फोन करून सफारीची वेळ विचारून घेतली. कारण ‘क्रॉकोडाईल सफारी’ सागराच्या ओहोटीच्या दरम्यान होऊ शकते, असं ऐकलं होतं. गुहागरहून चिपळूणकडे जाताना १५ किलोमीटरवर ‘कारुळ’ इथं एक फाटा आहे, जो परचुरीकडे जातो. पांगारी, डाफळी वस्तीवरून आम्ही रामजाईला गेलो. तेथून रस्ता थोडाफार कच्चा आहे. हवेतला गारवा जाणवू लागला होता. १३ किलोमीटरवर परचुरी अशी पाटी दिसली. झपकन गाडी एक चढ चढली आणि ‘आजोळ’ निवास दृष्टिपथात आलं. चोहोबाजूंनी हिरवी, पोपटी झाडं दिसत होती. आंबा, नारळ, सागवानाची मोठी झाडं होतीच, परंतु आजोळगर, जास्वंदी, तुळस आणि मधल्या जेवण आणि गप्पांच्या सभागृहामागं भाजीचे वाफे दिसत होते. 

सत्यवान देर्देकर या युवकानं आणि त्याच्या कुटुंबीयांनी आमचं छान स्वागत केलं. सभागृह म्हणजे व्यवस्थित बांधलेला, टेबल खुर्च्या असलेला सुरेख ‘मंडप’ आहे. देर्देकरांच्या बंगल्याला लागूनच हा मंडप आहे. ‘आजोळ’च्या रुम्स जवळपासच आहेत. चहा, नाश्‍ता आणि थोड्याफार गप्पा झाल्यावर असं लक्षात आलं, की एम.बी.ए. झालेल्या सत्यवाननं जाणीवपूर्वक हे असं ‘कोकणदर्शन’ पर्यटन केंद्र सुरू केलं आहे. ‘समर कॅम्प’साठी येणाऱ्या मंडळींना हे परचुरी ठिकाण खूप आवडायचं. ‘मिनी महाबळेश्‍वर’ म्हणून गौरवलं जायचं. मात्र इथं राहाण्याची, जेवणाची सोय नव्हती. मग सत्यवानचे आई-वडील, पत्नी, मोठा भाऊ, ताई-भाऊजी सर्वांनी मिळून २०११ मध्ये ‘आजोळ’ हे कृषी-पर्यटन केंद्र, पर्यटकांसाठी सुरू केलं. तिथलं आदरातिथ्य खास आपुलकीचं, आस्थेचं आहे. शहरातल्या मंडळींना हे अकृत्रिम, प्रामाणिक वागणं नक्कीच भुरळ घालतं. 

मंडपाच्या पलीकडं फलकांवर लिहिलं होतं, ‘देखो ‘मगर’ प्यारसे!’ फलक दोन-दोनदा वाचून त्यातली ‘प्यारसे मगर’ पाहण्यातली खोच लक्षात घेऊन ओठावर नकळत हसू आलं. ही मगर सफारी करायला तर आम्ही इतक्‍या दूरवर आलो होतो. तीन-चार मिनिटांच्या अंतरावर खाडीच्या एका थांब्यापाशी (धक्‍क्‍यावर) आम्ही गाड्या लावल्या. दृष्टी जात होती तिथपर्यंत पाणी वाहताना दिसत होतं. वाशिष्ठी नदी, दाभोळपाशी अरबी सागराला मिळते. दाभोळ हे मोठ्ठं, वाहतुकीचं बंदर पूर्वापार प्रसिद्ध आहे. गुहागर, आजगोली, शृंगारतळी, मार्गताम्हाने सारख्या खेडेगावात जेव्हा एसटी पोचली नव्हती, तेव्हा दाभोळ बंदरातून समुद्रमार्गे मुंबईला जा-ये चालायची. विशेष म्हणजे ही दाभोळ खाडी ४० ते ५० किलोमीटर इतकी मोठी आहे. लांबवर म्हणजे गोवळकोट-मालदोलीपर्यंत खाडीत मासेमारीही चालते. 

पाच-सहा पायऱ्या उतरून आम्ही मोटर बसवलेल्या मोठ्या होडीत जाऊन बसलो. लाइफ जॅकेट्‌स चढवली. दुतर्फा झाडी, त्यामागं सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या दिसत होत्या. परचुरीपाशी खाडीनं झोकदार वळण घेतलेलं दिसत होतं. सत्यवान सांगत होता, ‘सागर भरतीच्या वेळी मासे मुबलक प्रमाणात खाडीत येतात. हावरटाप्रमाणे मगरी ते मासे खातात. मग सुस्तावतात. ओहोटी दरम्यान कडेच्या दलदलीत पडून राहतात. हीच ती मगरी पाहण्याची संधी! महत्त्वाची गोष्ट अशी, की खाडीत भरमसाट मगरी असल्या तरी त्या पर्यावरणाला कोणताही धोका पोचवीत नाहीत.’

आम्ही ऐकत होतो. होडी पळत होती. पाणी कापीत होती. लाटा फेसाळत होत्या. चुळबुळत होत्या. पाणी निळसर हिरवं दिसत होतं. दूरवर झाडांच्या सावल्याही पाण्यात पडलेल्या दिसत होत्या. मधूनच एखादा ‘खंड्या’ वा ‘घार’ आकाशातून उडताना दिसत होती. वारं वाहात होतं अन्‌ त्यामुळं हवेतला उष्मा त्रास देत नव्हता. होडी सागराच्या दिशेनं नांगरली जात होती. सत्यवाननं होडी चालकाला खूण केली आणि मोटरची घरघर थांबली. एका झाडाच्या बुंध्याजवळ मगर पहुडली असल्याचा निर्देश सत्यवान करीत होता. आम्ही त्या दिशेला डोळे फाडून बघत होतो. आता होडी वल्हवून ‘त्या’ तीराकडे निघाली होती. जवळ गेल्यावर मगरीचे डोळे चमकलेले दिसले आणि मग ते पाच-साडेपाच फुटांचं मगरीचं ‘धूड’ स्पष्ट दिसलं. होडीत शांतता. होडी मगरीच्या आणखी जवळ जवळ जात होती. थोडी हुरहूर, थोडी भीती मनात दाटली होती. अचानक त्या मगरीला आमची चाहूल लागली. ‘सर्‌ सरऽऽ सरऽऽ सर्’ कडेला येऊन तिनं धपकन पाण्यात उडी घेतली. मगर दिसेनाशी झाली. आमचे डोळे विस्फारलेले होते. काही कॅमेऱ्यांमध्ये मगर बंदिस्त झाली होती. 

मोटर होडी पुन्हा चालू लागली. मगरीचं अंग झाडाच्या खोडाच्या रंगाचं होतं. चिखल-मातीत मगर रुतून बसली होती. मुख्य म्हणजे सत्यवानच्या सराईत नजरेनं मगरीला हेरलं होतं. आमच्यापैकी कोणालाच पटकन दिसली नव्हती. आता, जास्त लक्षपूर्वक पाहायचं ठरवलं आणि खाडीच्या किनाऱ्यावरची खारफुटी, कांदळ बन अधिकाधिक नजरेत यायला लागलं. कित्येक वृक्षांची लांबसडक वळलेली पाळंमुळं उघडी पडलेली दिसत होती. काहींच्या फांद्या पाण्यावर वाकल्या होत्या. दृष्य विलोभनीय होतं. मोटरचा आवाज सोडला, तर कमालीची शांतता होती. 

पुनःश्‍च सत्यवाननं खूण करून होडी किनाऱ्याजवळ नेली. पांढरट अंगाची चार फुटी मगर मान उचलून आमच्याकडं पाहात होती. पुढच्या १५-२० सेकंदात तीसुद्धा पाण्याजवळ आली अन्‌ तिने पाण्यात उडी घेतली. नव्हे नव्हे, ती पाण्यात झेपावली. आम्ही सत्यवानकडं पाहिलं. मंडळी काळजी करू नका. मगरीपासून तसा धोका नाही. एकतर त्यांना पोटभर अन्न मिळतं. दुसरं असं, की पाणी पिण्यासाठी खाडीच्या कडेला आलेल्या गुराढोरांवर मगरीने हल्ला केल्याची नोंद नाही. आता आमची खात्री पटली, की होडी जवळ गेल्यावर स्व-संरक्षणासाठी मगर पाण्यात शिरते. 

खारफुटीच्या दुतर्फा जंगलात रानडुक्कर, कोल्हा आढळतो. मोर असतो. परंतु, दलदलीमुळं बिबट्या मात्र तिकडं फिरकत नाही. कांदळ बनामुळं ऑक्‍सिजनचं प्रमाण वाढतं. कांदळवनाजवळ बांबूची लागवड करण्याचं शासनाचं धोरण आहे. स्थानिक लोकांना रोजगार मिळावा असा उद्देश आहे. चटया, करंड्या, टोपल्या विणणं इत्यादी शेतीला पूरक उद्योग सुरू व्हावेत म्हणून शासनानं ‘निधी’ उपलब्ध करून दिला आहे, ही माहिती सत्यवाननं सांगितली. पर्यटन वाढीच्या दृष्टीनंही शासन पावलं उचलीत आहे, ही नक्कीच जमेची बाजू आहे. 

आणखी एक मगर अशीच निवांत पहुडली होती. होडी जवळ गेल्यावरही ती हलण्याचं लक्षण दिसत नव्हतं. परतुं, आमचा गलका ऐकून बिचारी निमूटपणे पाण्यात शिरली आणि दिसेनाशी झाली. आता आमची होडी उजवीकडच्या दापोलीजवळच्या ‘उन्हवरे’ गरम पाण्याच्या कुंडाच्या दिशेनं वळवली. ‘उन्हवरे’च्या गरम पाण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तिथवर पोचण्यासाठी सागर भरतीच्या दरम्यान जावं लागतं, असं कळलं. होडीसाठी जी पाण्याची पातळी असावी लागते, त्यासाठीचा हा पर्याय होता. ‘फरार’ गावापर्यंत जाऊन होडी माघारी वळली. आमची सफारी पाऊण-एक तासाची होती. 

पावसाळ्यामध्ये चार महिने सफारी बंद असते. मगरी, मासे यांचा ‘विणीचा हंगाम’ असतो. सागरही उधाणलेला असतो. यावेळी मोटर घरी नेऊन ठेवावी लागते. या लाईफबोट कम्‌ होडीवर शेवाळं तयार होतं. त्यामुळं होडीही कोरडी अन्‌ झाकून ठेवावी लागते. नारळी पौर्णिमेनंतर क्रॉकोडाईल सफारी पुनःश्‍च सुरू होते. 

मोटरची घरघर बंद करून होडी तीराच्या दिशेनं जायला लागली त्याअर्थी तिथं मगर दिसली होती. एका लाकडाच्या ओंडक्‍यावर मगर पहुडली होती. ओंडक्‍याचा २५-३० अंशातून वळलेला आकार तिला तिच्यासाठीही मंजूर असावा. आता यावेळी मगरीच्या हालचालीचं शूटिंग करायचं ठरवून कॅमेरे रोखले गेले. डोळे, मान आणि नंतर संपूर्ण शरीर हलवून दबकतच ती मगर पाण्यात शिरली. त्याच वेळी काजूप्रमाणे दिसणाऱ्या (जाड पानांच्या) तिथल्या झाडावरून एक ‘कवड्या’ पक्षी उडाला. 

होडीबरोबरच सत्यवानची कॉमेंट्री सुरू झाली. ‘कांदळवनामुळं जमिनीची धूप थांबते. त्सुनामीचा धोका कमी होतो.’ घड्याळाकडं पाहून मी अंदाज घेत होते, की आपण या वेळेपर्यंत पाच किलोमीटरचा फेरफटका मारलाय का? तेवढा अपेक्षित असतो, परंतु पाण्यावरून जाताना अंतराचा अंदाज येत नाही... आणि दुसरं म्हणजे या रुंद खाडीच्या पाण्याचा प्रवाह आणि तीरांवरच्या सौंदर्याबाबत वेळेचं भान राहत नाही, हे सत्य होतं. पाणी किती खोल आहे याचा अंदाज येत नव्हता. किनाऱ्यालगत आणखी दोन तीन होड्या झुलताना दिसत होत्या. येता येता आणखी एक मगरीचं पिल्लू पाहून आम्ही धक्‍क्‍यापाशी आलो. सर्व प्रवासी एका कडेला गोळा झालो, तरीही ‘लाइफ बोटी’ला धोका नसतो म्हणे! पायऱ्या चढून आम्ही सपाटीवर आलो. 

कडकडून भूक लागली होती. या वेळेपर्यंत आजोळमध्ये जेवणाची पूर्ण तयारी झालेली होती. तांदळाची भाकरी, वांग्याचं भरीत, पुलाव, हळदीचं लोणचं आणि गरमागरम उकडीचे मोदक आग्रह करून पानात वाढले जात होते. त्यावर तुपाची धार होती. गाई, म्हशी गोठ्यात असल्यानं दूधदुभतं भरपूर आहे. आपुलकीनं वाढलेल्या पदार्थांमुळं दोन घास जास्तच जेवलो. सत्यवानची आई, पत्नी, काकू वगैरे घरच्याच स्त्रिया अन्न रांधतात. घरच्या परसातील केळफुल, पडवळ, माठ, भोपळा आदी ताज्या भाज्यांनी पाहुणचार होतो. पाण्याचं सुख तर खरंच आगळंवेगळं आहे. पाटाचं म्हणजे डोंगरावरच्या झऱ्याचं गार शुद्ध पाणी बारमास इथं मिळतं. वरपासून पाइप टाकून हे पाणी घरापर्यंत आणलेलं आहे. 

कोणाला थोडी वामकुक्षी हवी होती; कोणाला गप्पांचा मूड होता. सध्या इथं तीन युनिट्‌स सज्ज आहेत. आणखी तीन बांधून पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय सत्यवानचं घर मुक्तपणे वावरण्यासाठी खुलं असतंच. मनातल्या मनात महाग, खर्चिक रेस्टॉरंट्‌स आणि खाद्यपदार्थांची होणारी तुलना मी तिथल्या तिथं थांबवून टाकली. इथली आल्हाददायक हवा, वृक्षवल्लरींचा हरित सहवास, इथल्या माणसांच्या अंगी मुरलेली आस्था अन्‌ ओढ, कितीही पैसे मोजले तरी शहरात मिळणार नव्हती. परचुरीची ‘क्रॉकोडाईल सफारी’ एक वेगळाच अविस्मरणीय अनुभव देऊन गेली होती. ‘आता पुन्हा तिकडं कधी जाता येईल?’ याचा विचार परतीच्या वाटेवर सुरू होता. 

संबंधित बातम्या