संस्मरणीय अन्नपूर्णा, पूनहिल

मंदार व्यास
सोमवार, 8 जुलै 2019

पर्यटन
 

भटकंतीची आवड असल्यामुळे बरेच दिवस डोक्‍यामध्ये विचार सुरू होता, की आपण एक तरी ट्रेक करावा. मग माहिती गोळा केली व जुलै २०१७ मध्ये पहिला ट्रेक एका खासगी संस्थेमार्फत केला. तो म्हणजे हिमाचल कुलू व्हॅलीमधील हम्पता-पास आणि चंद्रताल लेक! निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांना अनुभवत, त्याचा आनंद घेत हा ट्रेक झाला होता. तो अनुभव विलक्षण आणि चित्त थरारक होता. पण सोबत गाइड असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण झाला.

त्यानंतरदेखील डोक्‍यामधे सतत एक चक्र चालू होते, की आपण एकदा तरी हिमालयातील ट्रेक करावा! सिंहगडावर ट्रेकिंग करणारा आमचा नेहमीचा एक ग्रुप आहे. याच ग्रुपमधले गोखले एकदा मला म्हणाले, ‘आपण नेपाळमधील अन्नपूर्णा ट्रेक करायचा का?’ तेव्हा मी त्यांना लगेचच होकार देऊन टाकला. त्या क्षणी मला असे वाटले, की मनामध्ये एखादी तीव्र इच्छा असेल, तर ती कशीही आणि कधीही पूर्ण होऊ शकते.

जायचे ठरले, की मी लगेच पुढच्या तयारीला लागलो. आम्हाला तर ट्रेक कमी खर्चात करायचा होता त्यामुळे आम्ही कोणत्याही खासगी संस्थेमार्फत जाणार नव्हतो. आम्ही तिघांचा ग्रुप तयार केला. मी स्वतः, गोखले आणि कानडे. आमच्यामध्ये कानडे आणि गोखले वयांनी ज्येष्ठ आणि दोघांनाही नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅंप ट्रेकचा अनुभव पाठीशी होता. मग काय पहिली मीटिंग घेतली. संपूर्ण ट्रेकची माहिती गोळा केली. त्याचा नकाशा काढला आणि पूनहिल, अन्नपूर्णा असा ट्रेक करायचे ठरले.  

पुणे-गोरखपूर ट्रेनने ११ नोव्हेंबर रोजी आम्ही रात्री १२ वाजता गोरखपूरला पोचलो. गाडी तब्बल चार तास लेट झाली होती. त्यामुळे आम्ही तिथला मुक्काम रद्द केला आणि डायरेक्‍ट सुनाली नेपाळ बॉर्डरला टॅक्‍सी केली. पहाटेच्या चार वाजता आम्ही सुनालीला पोचलो. तिथून लगेच पोखरासाठी निघालो. पोखरला आम्ही १२ तारखेला साधारण दुपारी दोन वाजता पोचलो असू. एवढ्या प्रवासाने भरपूर थकलो होतो. 

आमच्याकडे नेपाळी चलन नव्हते. त्यासाठी आम्हाला तेथील बॅंकेत जावे लागले. आम्ही जेव्हा बॅंकेत पाचशे आणि दोन हजारच्या नोटा दिल्या तेव्हा मॅनेजर म्हणाला नोटा स्वीकारत नाही. ते ऐकून धक्काच बसला! आता काय करायचे? कुठे जायचे? तेवढ्यात आमचे सहकारी कानडे यांनी त्यांच्याकडे किती पैसे आहेत ते पाहिले. त्यांच्याकडे १०० नोटा होत्या. म्हणजे १० हजार आणि गोखले यांच्याकडे १५० अमेरिकी डॉलर होते. ते आम्ही बॅंकेत देऊन ३७ हजार नेपाळी चलन घेतले. पण सदर पैसे हे तसे अपुरेच होते. म्हणून आम्ही असे ठरविले, की आपले जास्तीचे सामान हॉटेलमध्ये ठेवून आणि गाइड न घेता आपणच ट्रेक करायचा. ठरल्याप्रमाणे आम्ही गाइड न घेता १३ तारखेला सकाळी सात वाजता पोखरा ते नया पूल प्रयाण केले. सकाळी दहा वाजता नया पूल येथे पोचलो. खऱ्या अर्थाने तिथून आमचा ट्रेक सुरू झाला. वाटेतील पाण्याचे असंख्य झरे, दाट झाडे, दुर्मिळ वनस्पती असा स्वर्गसमान निसर्ग सोबतीला होता. आम्ही एकूण १५ किलोमीटर अंतर कापून उल्हेरी या पहिल्या बेस कॅंपवर संध्याकाळी पाच वाजता पोचलो. 

चौदा नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता उल्हेरीमधून निघालो. वाटेत बंथंती नावाचे गाव लागले. आता आमचे पुढचे टार्गेट घोरेपानी होते. इथे पूनहील हा ट्रेक घोरेपणीपासून साधारण १५०० फुटांवर आहे. या उंच डोंगरावरून आपल्याला उगवता सूर्य आणि समोर असलेल्या अतिशय सुंदर धवलगिरी, अन्नपूर्णा या पर्वत रांगा दिसतात. आम्ही सकाळी साडेचार वाजता सूर्योदयापूर्वी पूनहील या टेकडीवर निघालो. साधारण एक तासात वर पोचलोसुद्धा. थंडीत भरपूर फोटो काढायचे म्हणून आम्ही तयारीतच होतो. चहूकडे नयनरम्य नजारा होता, त्याची क्षणचित्रे तर घेतलीच; शिवाय ही दृष्ये डोळ्यांमध्येदेखील साठवून ठेवली.

त्यानंतर आम्ही साधारण साडेआठ वाजता घोरापानी सोडले. आमचा पुढचा टप्पा टाडापानी होता. हे एक छोटेसे गाव. इथे आम्ही १५ तारखेला साधारण दोन वाजता पोचलो. एक दिवस आराम करून १६ नोव्हेंबरला चोमरोंग या गावी पोचलो. हे गाव म्हणजे अन्नपूर्णासाठी जाणाऱ्या ट्रेकर्सचे जंक्‍शन आहे. इथे बरीच हॉटेल्स आणि सोयीसुविधा उपलब्ध आहेत. समोर एमबीसी व एबीसी पर्वत आहेत. ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. १७ तारखेला आम्ही हिमालय गाव या ठिकाणी पोचलो. तिथे मुक्काम केला. १८ तारखेला एमबीसी बेस कॅंपला मुक्काम केला आणि १९ तारखेला एबीसी सर केले. एमबीसीचे तापमान झिरो डिग्री आणि रात्रीचे वातावरण तर कल्पनाच करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे २० तारखेला साडेसहा वाजता आम्ही अन्नपूर्णा बेस कॅंपकडे चढाई करण्यास निघालो. त्याआधी भरपूर नाश्‍ता केला. ही चढाई तशी अवघडच होती, कारण पूर्ण बर्फातून चढाई करायची होती. पण  वातावरणाने आम्हाला साथ दिली आणि मुख्य म्हणजे कुठल्याही पायऱ्या नसल्याने तिथे पोचणे थोडे सोपे वाटू लागले.  

आम्ही सलग दोन तास बर्फातून चालत होते. त्यामुळे पुरती दमछाक झाली होती. पण आता ती वेळ आली होती. मी बेस कॅंपला पोचलो. मी तो क्षण आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. साधारण साडेआठ वाजता माझे दोन्ही ज्येष्ठ सहकारी माझ्या मागून पोचले. मग काय, ते नयनरम्य दृश्‍य डोळ्यांत साठवून आम्ही पुन्हा काही फोटो आणि व्हिडिओ शूट केले. अर्धा तास तिथे भटकंती केली आणि जास्त वेळ न थांबता परतीच्या प्रवासाला निघालो. येताना वाटेत दोवान आणि चोमरोंग या ठिकाणी मुकाम करून झिन्हुआ इथे गरम पाण्याचे झरे आहेत, तिथे अंघोळ करून पोखरा इथे परतलो. 

एकूणच पूर्ण ट्रेक एक विलक्षण अनुभव देणारा होता... आणि सोबत ज्येष्ठ मंडळी असल्याने उत्साह वाढला होता. याच जोरावर पूनहिल व अन्नपूर्णा असे दोन ट्रेक आम्ही आठ दिवसांत पूर्ण केले!

संबंधित बातम्या