साद कोकणाची 

मयूरेश पाटणकर
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर-कोकण विशेष     

ग. दि. माडगूळकरांनी ‘झुक झुक अगीनगाडी’  या गीतातून कोकण रेल्वेचे स्वप्न दाखवताना कोकणची ओळख अधोरेखित केली आहे. नव्वदच्या दशकात माडगूळकरांची अगीनगाडी कोकणातील डोंगरदऱ्यांतून धावू लागली आणि विकासाला चालना देणारा कोकणातला पर्यटन व्यवसाय बहरू लागला.

गेल्या १० वर्षांत रत्नागिरीच्या अर्थविश्वाला गतिमान करणाऱ्या घटकांमध्ये कोकण रेल्वेबरोबरच दाभोळ वीज कंपनी या बहुचर्चित कंपनीचा देखील वाटा आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा वीज प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्‍यात उभा करण्यासाठी संपूर्ण देशातूनच नव्हे, तर परदेशातून देखील अनेकजण इथे आले आणि त्यांना कोकणच्या निसर्गाने भुरळ पाडली. 
याच काळात रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाने देखील कात टाकली. केवळ घरगुती राहण्याची सोय होणाऱ्या कोकणात निवास न्याहारी ते पंचतारांकित निवासाची सुविधा उपलब्ध झाली. आज रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्‍यांत पर्यटकांना सुखसोयींनी युक्त अशी हॉटेल उपलब्ध आहेत. याशिवाय मॅंगो व्हिलेजसारखे प्रकल्प संपूर्ण घर पर्यटकांना राहायला उपलब्ध करून देत आहेत. पर्यटकांनी बंगला घ्यावा, घरी राहतो तसे राहावे, त्याच प्रकल्पाच्या परिसरातील हॉटेलमध्ये जेवावे आणि मनसोक्त हिंडावे ही संकल्पना आता कोकणात रुजू लागली आहे. त्याची पायाभरणी मॅंगो व्हिलेजने केली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवास आणि न्याहारी योजनेचे परवाने अनेक जणांनी घेऊन पर्यटन व्यवसाय सुरू केला. त्यातून रोजगार निर्मिती झाली. या सर्व सोयीसुविधांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचत असल्याने परदेशी, उच्चभ्रू पर्यटकांची पावलेदेखील कोकणाकडे वळत आहेत. 

अर्थात हे सर्व सहजतेने घडलेले नाही. राजकीय क्षेत्राचा विचार केला तर युती शासनाच्या शिवशाहीपासून कोकणाला सत्तेत वाटा मिळू लागला. त्यानंतरच्या आघाडी सरकारच्या काळातही हा प्रघात सुरू राहिला. सत्तेतील सहभागाच्या फायद्यामुळेच कोकणातील रस्ते सुधारले. इतकेच नव्हे तर अनेक नवीन मार्ग सुरू झाले. सागरी महामार्गाच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याने अनेक मोठ्या नद्यांवर पूल बांधण्यात आले. आणि त्यातूनच कोकणातील अनेक गावांपर्यंत विकास जाऊन पोचला. धुरळा उडायचा थांबल्यावर चकचकीत डांबरी रस्त्यावरून महागड्या गाड्या आवाज न करताच वेगाने जाताना आज कोकणातील खेडोपाड्यात दिसतात. 

केवळ घरगुती राहण्याची सोय करणाऱ्या कोकणात हॉटेल व्यवसाय स्थिरावला. सुरवातीला केवळ खानावळ प्रकारात मोडणाऱ्या हॉटेलमध्ये शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची रेलचेल सुरू झाली. केवळ कोकणातील उत्सवांमधून दिसणारी पुरणपोळी आणि मोदक हॉटेलमधील मेनूकार्डवर छापले जाऊ लागले. भंडारी पद्धतीचे मटण, ताज्या माशांच्या रुचकर जेवणाची चव आपण सहजपण घेऊ शकतो. आंबापोळी, फणसपोळी एवढ्यावर थांबलेली कोकणी उत्पादने करवंद लोणचे, छुंदा, नाचण्याचे पापड, कुळीथ पीठ, आवळा पेठा, कोळंबी लोणचे अशी वेगाने वाढत केली. या गृहउद्योगातून अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. 

रस्ते बदलले, हॉटेल बदलली, खाण्यापिण्याची सोय झाली आणि पर्यटन व्यवसायाने कोकणातील समुद्रकिनारे बहरू लागले. या समुद्रकिनाऱ्यावर केवळ उभं राहून लाटांशी खेळण्याचा सुरक्षित आनंद पुरेसा नाही, याची जाणीव कोकणवासीयांना झाली आणि त्यातूनच लाटांशी मस्ती करत, पाण्याला कापत समुद्रातील जलविहारासाठी वेगवान स्पीडबोटींची सुविधा समुद्रकिनाऱ्यावर होऊ लागली. समुद्रविहार करतानाच पॅराग्लायडिंगसारख्या साहसी खेळांचे प्रकार काही समुद्रकिनाऱ्यावर स्थानापन्न झाले. तारकर्ली (जि. सिंधुदुर्ग) येथे समुद्राखालील सृष्टी बघण्याची व्यवस्था निर्माण झाली. समुद्रकिनाऱ्यांचे सुशोभीकरण, प्रकाशव्यवस्था, समुद्रस्नानानंतर अंघोळीसाठी, कपडे बदलण्यासाठी सुविधा निर्माण झाल्या. 

आहार-विहाराबरोबर कोकणातील दशावतार, शक्ती तुरा, नमन आदी लोककलांचाही पर्यटन व्यवसायाने व्यासपीठ मिळवून दिले. केवळ उत्सवांशी बांधल्या गेलेल्या या लोककलांचे सादरीकरण पर्यटन महोत्सवातून, हॉटेलमधून होऊ लागले. त्यामुळे स्थानिक, ग्रामीण भागातील कलाकारांना देखील चांगले मानधन मिळू लागले. लोककलांना केवळ पर्यटकांनीच संधी दिली नाही तर, ऑडिओ, व्हिडिओ कॅसेट, सीडी काढणाऱ्या मंडळींनी देखील या लोककला महाराष्ट्रभर नेल्या. 

दहा वर्षांपूर्वी केवळ मंदिरे आणि समुद्रकिनारे पाहण्यासाठी पर्यटक कोकणात येत असत; पण आज अनेकविध पर्याय पर्यटकाला कोकणात खिळवून ठेवत आहेत.  

कासव संवर्धन हा वन खात्याचा उपक्रमही पर्यटनाचा केंद्रबिंदू बनत आहे. वाशिष्ठी नदीच्या परिसरात मगरी पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत. डॉल्फिन पाहण्यासाठी समुद्र सफर, पक्षी दर्शन, जंगलाची ओळख हे नवे आयामही पर्यटन उद्योगाला जोडले जात आहेत. मात्र, यामध्ये काळ वेळाची अनिश्‍चितता असल्याने सध्याचे स्वरूप अविकसित आहे. पर्यटन उद्योग जसा वाढू लागला, तशा या उद्योगाच्या कक्षाही हळूहळू रुंदावत आहेत. ॲग्रो टुरिझम (कृषी पर्यटन) नावाची नवीन संकल्पना कोकणात रुजू पाहात आहे. माडगूळकरांचे ‘मामाचे गाव’ कृषी पर्यटनासाठी उपलब्ध होऊ लागले आहे. गावात राहावं, शेतात - बागेत मनसोक्त हिंडावे, भाकरी-वडे यांच्या साथीने जेवणाचा आस्वाद लुटावा आणि मांडवाखाली वाऱ्याची झुळूक अनुभवत विश्रांती घ्यावी, असं या कृषी पर्यटनाचे स्वरूप आहे. भविष्यात शहरातील पर्यटक कोकणात येऊन लावणी करतील, कापणी करतील, भाजीपाल्याला पाणी शिंपतील आणि शेणाने अंगण देखील सारवतील. हे नवं वळणं पुन्हा एकदा महात्मा गांधींनी दिलेला ‘गावाकडे चला’ हा संदेश अधोरेखित करेल. 

संबंधित बातम्या