स्वप्नवत लेक कोमो

मृणाल तुळपुळे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पर्यटन
 

स्वित्झर्लंड आणि इटलीच्या सीमेवर असलेले एक सुंदर गाव म्हणजे ‘कोमो’ आणि हे गाव ज्या तळ्याकाठी वसले आहे ते तळे म्हणजे ‘लेक कोमो’. सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी लेक कोमोचे नाव आहे, ते तिथे पार पडलेल्या दीपिका पदुकोण व रणवीर यांच्या शाही विवाह सोहळ्यामुळे.

लेक कोमोची जगातील काही अप्रतिम तळ्यांमध्ये गणना केली जाते. आल्पसच्या पायथ्याशी असलेले हे तळे एका बाजूने आल्प्समधील ग्लेशियर्स वितळून आलेले पाणी आणि दुसरीकडून आल्पसमध्ये उगम पावलेल्या अडा नदीचे पाणी असे एकत्र येऊन तयार झाले आहे. यामुळे या तळ्याला ‘वाय’ अक्षरासारखा आकार प्राप्त झाला आहे. असा आगळावेगळा आकार हेच लेक कोमोचे वैशिष्ट्य आहे. हे तळे लारिओ  या नावानेदेखील ओळखले जाते.

सेहेचाळीस किलोमीटर लांब व चव्वेचाळीस मीटर खोल अशा या लेक कोमोच्या काठावरच्या हिरव्यागार टेकड्यांवर अनेक लहान मोठी गावे वसली आहेत. त्यापैकी तळ्याच्या दक्षिण टोकाला असलेले कोमो हे  सर्वांत महत्त्वाचे गाव मानले जाते. हे गाव रेल्वेने मिलानपासून फक्त अर्ध्या तासावर आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कोमोमध्ये आजही रोमन काळातील अनेक इमारती व चर्चेस बघायला मिळतात. पूर्वी गावाच्या बाजूनी सुरक्षिततेसाठी भिंती  बांधल्या होत्या. मात्र आता या भिंतीचे काही भागच  शिल्लक राहिले असून, त्याला लागून बाजार भरवला जातो. हा बाजार म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. तिथे अक्षरशः:  पास्तापासून लेदरच्या वस्तू, कपडे, भांडीकुंडी, अशी तुम्ही म्हणाल ती वस्तू मिळते. कोमो गावचा तळ्याकाठचा परिसर कायम माणसांनी फुलून गेलेला असतो. तिथला पियाजा कॅवोर हा प्रसिद्ध चौक जेट्टीच्या अगदी जवळ असून  तो सोव्हिनियरची व कपड्याची दुकाने, कॉफी शॉप्स व खाण्याच्या ठिकाणांनी भरून गेला आहे. या ठिकाणी इटलीमधल्या वेगवेगळ्या भागातील खास पदार्थांचा आस्वाद घेता येतो.

कोमो गावाजवळ तळ्याकाठी इटलीतील अनेक सेलेब्रिटींज व  श्रीमंत लोकांचे आलिशान व्हीलाज आहेत. त्यांच्या मालकीच्या अशाच आलिशान यॉटस तळ्याकाठी नांगरून ठेवलेल्या दिसतात. यांपैकी अनेक व्हिलांचे आता हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. ‘व्हिला दे बाल्बियानेलो’ , जिथे दीपिका व रणवीर यांचा विवाह सोहळा पार पडला.  हा त्यापैकीच एक व्हिला आहे. अठराव्या शतकात बांधलेला हा व्हिला अप्रतिम आर्किटेक्‍चरचा नमुना असून; आज लेक कोमोमधील सर्वांत महागडी जागा समजली जाते. तिथे शाही सजावट केलेली अनेक दालने असून तो फक्त लग्न किंवा इतर समारंभासाठी भाड्याने दिला जातो. या व्हीलामध्ये एखादा समारंभ करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असल्यामुळे जगभरातील अनेक श्रीमंत लोक आपले समारंभ या व्हीलामध्ये करतात. दीपिका व रणवीरच्या लग्न समारंभाच्या आधी भारतातील दोन उद्योगपतींच्या मुलांचा , इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा साखरपुडा याच व्हिलामध्ये झाला होता.

उंची सजावट, व्हीलाच्या परिसरातील अप्रतिम बागा व तिथून दिसणारे कोमो तळ्याचे विहंगम दृष्य यामुळे हा व्हिला सिनेमांच्या, वेगवेगळ्या टेलिव्हिजन शोजच्या तसेच जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी एक लोकप्रिय जागा झाली आहे. जेम्स बाँड्‌च्या ‘कॅसिनो रॉयल’ या सिनेमाचे तसेच स्टार वॉर्सच्या अनेक भागांचे इथे चित्रीकरण करण्यात आले होते.

अशा प्रकारच्या व्हीलाजप्रमाणेच कोमो गावाचे आणखी एक विशेष म्हणजे तेथील सिल्क उद्योग. या भागात सिल्कचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे इटली व इतर युरोपियन देशातील फॅशन हाउसेस कोमोमधील सिल्कवर अवलंबून आहेत. कोमो गावात अनेक दशके जुने असे सिल्क म्युझियम  असून; तिथे सिल्कचा धागा कसा काढला जातो, इथपासून त्याचे कापड कसे विणले जाते याचे प्रात्यक्षिक बघायला मिळते. या सिल्कपासून बनवलेल्या कपड्यांची इथे अनेक दुकाने असून इतर ठिकाणच्या तुलनेत ते खूपच स्वस्त मिळतात. इटली आणि फॅशन हे समीकरण तर ठरलेलेच आहे आणि कोमोदेखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे गावात जगप्रसिद्ध इटालियन ब्रॅंडची अनेक महागडी दुकाने दिसून येतात. 

लेक कोमोमधून फेरफटका मारणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. तळ्याकाठी असलेल्या लहान लहान गावात बोटीचा थांबा असल्यामुळे बोटीतून उतरून ते गाव बघता येते. ब्रूनेट हे लेक कोमोकाठचे असेच एक  टुमदार गाव. कोमो गावातून ब्रूनेटला जाण्यासाठी लोखंडी केबलच्या साहाय्याने चालणारी रेल्वे आहे. खूप चढ असलेल्या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेच्या या लहानशा प्रवासात व ब्रूनेट गावातून लेकचे आणि इटालियन आल्प्सचे अप्रतिम रूप बघायला मिळते. 

लेक कोमो काठच्या सुंदर सुंदर बागा, आलिशान व्हिलाज, वीन यार्डस आणि ऑलिव्हच्या राई या पार्श्‍वभूमीवर अनेक काव्य आणि कथा लिहिल्या गेल्या आहेत, तर अनेक सुंदर सुंदर चित्र चितारली गेली आहेत. लेक कोमोचे अगम्य रूप बघून कवींना कविता स्फुरतात, तर चित्रकारांना निसर्गाचे ते रूप आपल्या कॅनव्हासवर उतरवायचा मोह टाळता येत नाही.

आज कोमो हे इटली व युरोपियन देशातील श्रीमंत पर्यटकांचे गाव समजले जाते. तिथे गेल्यावर बहुतेक पर्यटक तळ्याकाठच्या एखाद्या कॅफेमध्ये नाहीतर रेस्टॉरंटमध्ये बसून एस्प्रेसो कॉफी , पारंपरिक इटालियन पदार्थ आणि आजूबाजूच्या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत वेळ घालवणे पसंत करतात.  तळ्यातील निळेशार पाणी, समोर पांढऱ्या शुभ्र बर्फ़ाने आच्छादलेली आल्प्सची शिखरे आणि बाजूच्या काठावरची गर्द हिरवी जंगले असे सगळे रंग तिथे एकमेकात अगदी बेमालूमपणे मिसळून गेले आहेत. निसर्गातील अशा विविध रंगांची उधळण बघणे हेच खरे नेत्रसुख.

फोटो फीचर

संबंधित बातम्या