नवाबी शहर...

ओंकार वर्तले
गुरुवार, 5 जुलै 2018

पर्यटन
 

‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ हे आपल्या भारत देशाला लागू असणारं अतिशय समर्पक वाक्‍य. पण या वाक्‍याची अनुभूती आपल्याला तेव्हाच कळते, जेव्हा आपण या भारतभूमीवरील स्वर्गवत अशी ठिकाणे पाहतो. भारत देशातल्या प्रत्येक राज्यात आपल्यासारख्या फिरस्त्यांसाठी काही ना काही वाढून ठेवलंय. या प्रत्येक राज्यांना स्वतःचा भूगोल तर आहेच, शिवाय इतिहासदेखील आहे. त्यामुळेच या राज्यांची सफर ही कायमच संस्मरणीय ठरते. सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातच पर्यटनाचा विचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. बरेच जण पर्यटनासाठी भारताबाहेरील ठिकाणांना पसंती देतात. यात वावगे असे काहीच नाही. अनेक पर्यटक बाहेरच्या देशातील पर्यटन स्थळावर भरभरून बोलत असतात. त्या ठिकाणांचं कौतुक करतात. पण हे सारं ऐकून मला असा प्रश्‍न नेहमीच पडतो की, आपण आपला देश पाहिला का...? जर याचं उत्तर नाही असेल तर मग आपल्याला भारत कळणारच नाही. आपण ज्या देशात राहतो तिथला भाग तर प्राधान्यानेच पाहिला पाहिजे. येथेही खूप गोष्टी चांगल्या आहेत. ज्यातून आपण शिकतो, समृद्ध आणि अनुभव संपन्न होतो. अशा या आपल्या भारतात हैदराबादचाही नंबर लागतो. कुटुंबासाठी मस्ट व्हिजिट या गटातील हैदराबादची भेट ही केवळ सहल नसून एक सुरेख डेस्टीनेशन आहे यात शंका नाही. सध्या हैदराबाद म्हटलं, की फक्त रामोजी फिल्म सिटी एवढीच माहिती अनेकांना असते. पण याच्या पलीकडे हैदराबाद आहे. ऐतिहासिक वास्तूंचे माहेरघर, अनेक राजसत्तांच्या खाणाखुणा अंगावर मिरवणारे, शोभिवंत व आखीव-रेखीव उद्याने आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवणारे हैदराबाद म्हणजे एक हॉट डेस्टिनेशनच आहे. त्यामुळे हैदराबाद फिरताना हे सगळेच मुद्दे विचारात घेणे आवश्‍यक ठरते.

ऐतिहासिक हैदराबाद
तत्कालीन आंध्रप्रदेश आणि नव्याने झालेले तेलंगणा यांची संयुक्त राजधानी असलेलं हे हैदराबाद तसं प्राचीन शहर. या हैदराबाद शहरावर कुतुबशाहीचा अंमल बराच काळ चालला अन्‌ त्यानंतर या शहराने निजामशाही अनुभवली. त्यामुळे या शहराचा फेरफटका मारताना इतिहासाच्या खाणाखुणा दिसत राहतात. यातली सर्वांत महत्त्वाची इमारत म्हणजे आपल्या पर्यटनाचं आभूषणच म्हणायला हरकत नाही. उत्तम स्थापत्यात घडवलेल्या या इमारतीवरून हैदराबाद पाहणे हा क्षण मात्र लाजवाबच. मोहम्मदकुली कुतुबशहा या राजानं १५९१ साली उभारलेला हा चारमिनार आपल्या मनाला भुरळ पाडतो. या चारमिनारला खेटूनच मक्का मशीद आणि मोत्यांसाठी प्रसिद्ध असलेला जुना बाजार आहे. ही मक्का मशीद हैदराबादमधील सर्वांत जुनी आणि देखणी आहे. ही देखील कुलीकुतुबशहाने उभारली. यानंतर महत्त्वाच्या वास्तूमध्ये गोवाळकोंड्याचा नंबर लागतो. कुतुबशाही राजवाटीचा अविभाज्य भाग असणारा हा गोवळकोंडा किल्ला हैदराबादच्या लगतच उभा आहे. किल्ल्यावरील बांधकामे आणि वास्तुस्थापत्यांची काही सुंदर उदाहरणे या किल्ल्यावर दिसतात. दक्षिण दिग्विविजय मोहिमेमध्ये छत्रपती शिवरायांनी गोवळकोंड्याला भेट दिली होती. सध्या या किल्ल्यात रात्री लेझर शो असतो. तो आवर्जून पहायला पाहिजे. हा किल्ला पहायला कमीत-कमी चार तास हवेत. या किल्ल्याजवळ कुतुबशाहीतील राजा व त्यांच्या कुटुंबांची दफनभूमी आहे. या परिसराला कुतुबशाही टॉम्ब असे म्हणतात. या इमारतीचं स्थापत्यही अचाट आहे. गोलघुमट आणि कलाकुसरीने सजलेली मशीद ही आवर्जून पाहण्यासारखी आहे.

म्युझियमचं शहर
हैदराबाद हे आणखी एका कारणाने प्रसिद्ध आहे, ते म्हणजे संग्राहलयांसाठी. एक संपूर्ण दिवससुद्धा अपुरा पडेल एवढं मोठं संग्रहालय ‘सालारजंग’ या नावानं ओळखलं जातं. निजामाच्या कारकिर्दीत वापरलेल्या वस्तू, शस्त्रास्त्रे, फोटो, कापडी कलाकुसर, घड्याळे, फर्निचर इ.इ. साठी हे संग्रहालय पाहणे म्हणजे इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणीच म्हटली पाहिजे. हे संग्रहालय पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येत असतात. या सारखंच दुसरं पाहण्यासारखं ठिकाण म्हणजे चौमहाला पॅलेस. निजामाच्या राज्यरोहणाचं म्हणून हे ठिकाण ओळखलं जातं. खरंतर म्युझियम नाही, पण येथे निजाम राजवटीच्या वस्तू संरक्षित केल्या आहेत. ऐषोआरामी निजामशाहीचं हे वास्तुवैभव पाहून डोळे दिपून जातात. या चौमहालामधलं जुन्या चार चाकी (विटेजकार) चं कलेक्‍शन मात्र जबरदस्तच! हे ठिकाण पाहण्यासाठी तीन-चार तास तरी हवेच. या व्यतिरिक्त तेलंगणा राज्य पुरातत्त्व विभागाचं संग्रहालय, सुधा कार म्युझियम, बिर्ला सायन्स म्युझियमही आपल्या ज्ञानात निश्‍चितच भर घालतात.

गार्डन आणि झू-पार्क
हैदराबादमध्ये सहकुटुंब आलो की, बच्चे कंपनीसाठी भरपूर पाहण्यासारखं आहे. अतिशय उत्तम स्थितीत आणि व्यवस्थितच देखभालीत असलेली गार्डन्स ही हैदराबादची आणखी एक आकर्षण! पब्लिक गार्डन म्हणजेच आम-ए-बाग, एनटीआर आणि साडेसात एकरावर असलेलं लुंबिनी ही गार्डन तर विशेषकरून पाहण्यासारखी. लुंबिनी या गार्डनशेजारीच असलेल्या हुसेन सागर तलावाच्या मधोमध उभा असलेला भगवान बुद्धांचा पुतळाही आवर्जून पहाच. भारतामधील मोजक्‍याच पुतळ्यांमध्ये या पुतळ्याची गणना होते. येथे जाण्यासाठी बोटी उपलब्ध आहेत. हैदराबादचं आणखी एक जबरदस्त आकर्षण म्हणजे नेहरू प्राणिसंग्रहालय. जवळपास ३८० एकरावर पसरलेलं हे प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी एक संपूर्ण दिवसच हाताशी हवाच. एक हजारपेक्षा अधिक प्राणी असलेलं हे झू-पार्क पाहण्यासाठी सायकली आणि इको-फ्रेंडली गाड्यांची व्यवस्था असल्यामुळे आपल्या या भटकंतीला वेगळीच मजा येते. गर्द झाडांनी वेढलेले हे ठिकाण अजिबात चुकवू नये. या साऱ्या पर्यायांबरोबरच ‘स्नो-वर्ल्ड’ हा लोकप्रिय प्रकारसुद्धा बच्चे कंपनीसाठी उपलब्ध आहे.

धार्मिक पर्यटन
हैदराबादच्या सफरीवर आलेला पर्यटक हा ‘श्रीशैलम’ या बारा ज्योतिलिंगापैकीच एक असणाऱ्या पवित्र ठिकाणी जातोच जातो. हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र असलेलं हे श्रीशैलम देवस्थान हैदराबादपासून अंदाजे २२५ किलोमीटरवर पर्वतराजींमध्ये विराजमान आहे. या देवस्थानच्या वाटेवरच असणारा श्रीशैलम डॅमही आपल्या नजरेला सुखावतो. या श्रीशैलमचे आणखी एक वैशिष्ट्य आपल्या प्रत्येक मराठी मनाला सुखावते... नव्हे तर अभिमानाने उर भरून येतो. ते म्हणजे येथे शिवछत्रपतींचे खूप मोठे स्मारक आंध्र प्रदेशने साकारले आहे. उत्तम निगराणीत असलेलं हे स्मारक पाहताना प्रत्येक मराठी मनाचा अभिमान ओसंडून वाहत असतो. शिवछत्रपतींनी या ठिकाणी दर्शन घेतल्यामुळे या ठिकाणची वेगळीच ओळख आहे. या व्यतिरिक्त हैदराबादमधील बिर्ला मंदिरही देखणं आहे. रात्रीच्या वेळी या मंदिरापासून हैदराबादचं सौंदर्य पाहण्याची मजा वेगळीच आहे.

हैदराबादची खवय्येगिरी
खरं तर नुसती वेगवेगळी आणि प्रसिद्ध ठिकाणे पाहून हैदराबादची भटकंती पूर्ण होत नाही. जर ती पूर्ण व्हायची असेल तर हैदराबादी पदार्थांची चव घ्यायलाच हवी. हैदराबादला स्वतःची अशी वेगळी खाद्यसंस्कृती आहे. अशी ओळख जपणारं हैदराबाद शहर खवय्यांना अजिबात निराश करत नाही. मुळात येथे राज्य करीत असलेला कुतुबशहा मूळचा इराणचा! नंतर येथे निजामशाहीची राजवट आली. त्यामुळे येथील खाद्यसंस्कृतीवर या राजसत्तांचा पगडा जाणवतो. हैदराबादी बिर्याणी आणि इराणी बेकरीचे प्रॉडक्‍ट्‌स हे तर तोंडात पाणीच आणतात. येथील बिर्याणीने तर जगभरातील खवय्यांवर राज्य केले आहे. पॅराडाईज, ग्रॅंड हॉटेल, कॅफे बहार या ठिकाणी बिर्याणीसाठी रांगा लागलेल्या दिसतात. कराची बेकरीची बिस्किटेही प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त डोसा, इडली, रस्सम यासारख्या पदार्थांनीदेखील खवय्यांची मने जिंकली आहेत.

असे हे विविधांगांनी सजलेलं हैदराबाद! एखादा लाँग वीकेंड सहकुटुंब फिरण्यासाठी  घालवायलाच पाहिजे असं ठिकाण. दाक्षिणात्य संस्कृतीची सुंदर झलक आपल्याला या हैदराबादला पहायला मिळते. चला तर मग फिरायला... हैदराबादला!

फोटो फीचर

संबंधित बातम्या