दोन दुर्गांची सफर...

ओंकार वर्तले
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पर्यटन
 

नाशिकला जाण्याची ही माझी पहिलीच वेळ नव्हती. तरीही या प्रवासात काहीतरी वेगळे वाटत होते. काचा बंद केलेल्या चारचाकीच्या गाडीमध्ये आमचा उत्साह भरगच्च भरलेला होता. तसा तो प्रत्येक सफरीतच वाटतो. नाशिकचा प्रत्येक प्रवास कायमच संस्मरणीय ठरत असतो यात कुठलीही शंका नाही. माझ्यासारखेच मत बहुधा साऱ्याच दुर्गभटक्‍यांचे असेल याबद्दल माझी शंभर टक्के खात्री आहे. नाशिकमधील दुर्गभेटीचा सोहळा हा आमच्यासारख्या फिरस्त्यांसाठी जणू काही सणासारखाच. इतरांना तो कळायचाही नाही. त्यामुळे नाशिकला जायचे म्हटले, की कोण उत्साह अंगात संचारतो हेही शब्दात मांडण कठीणच आहे. ऑफिसचे टार्गेट घरगुती कामांना आपोआपच पूर्णविराम मिळतो. प्लॅन ठरतो. सुट्या टाकल्या जातात. मित्रांची जमवाजमव सुरू होते. कमीत कमी दोन रात्रींचा मुक्काम हा ठरलेलाच. या दोन रात्री आणि दोन दिवसातला भरगच्च आनंद आपल्या भटकंतीच्या पोतडीत बांधून घेण्यासाठीची आमची केविलवाणी धडपड पाहून बहुधा सह्याद्रीचे डोंगरही गहिवरत असतील. तसे पाहिले तर नाशिक हे आमच्यासाठी सुट्टीतले दुसरे घरच म्हणायला हरकत नाही. इतका ऋणानुबंध नाशिक दुर्ग सफारीमुळे जोडला गेला आहे. याच जिल्ह्यातील सातमाळ-सेबारी-डोलबारी-अजंठा अशा अजस्र दुर्गांचे राकट सौंदर्य हे शतकानुशतके तमाम दुर्गभटक्‍यांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवीत आले आहेत. शरीराचा कस पाहणारे, डोळ्यांच्या कक्षा रुंदावणारे हे अजस्र डोंगर नुसते पाहिले, की छाती धडधडू लागते. मग कधी एकदा या डोंगरांच्या कुशीत शिरून परमोच्च आनंदाला आपलेसे करतो असे होते. असे हे नाशिकच्या सह्यरांगेचे गारुड ! याचे रसभरती वर्णन संपता संपणार नाही. म्हणून आपण तरी मागे का हटायचे असे मनोमन ठरवून याच रांगेवरच्या किल्ल्यांची निवड करून मोहीम आखायची. 

यावेळची आमची निवड होती. धोडप आणि कांजनाची. अर्थात सातमाळेच्या मध्यबिंदूची. अर्थात त्याला कारणच तसे होते. मागील वेळी नाशिकहून धुळ्याला जाताना चांदवडच्या दरम्यान डाव्या बाजूस दिसलेली ती सातमाळ रांग अजूनपर्यंत तरी डोळ्यासमोरून गेली नव्हती. शिवलिंगासारखा धोडप आणि त्याच्यापासून काही अंतरावरच असलेला धिप्पाड असा कांचना पाहून गाडी दहा मिनिटे रस्त्यावरच थांबवली होती. या जोडगोळीच्या सौंदर्याने घायाळ झालेल्या मनाने यांची तेव्हाच निवड करून टाकली होती. त्यामुळेच आम्हा चार जणांची चौकडी चारचाकीने नाशिकच्या दिशेने झेपावली होती. 

शुक्रवारी रात्री आठ वाजता नाशिक धुळे महामार्गावरील वडाळा भोईवरुन आम्ही धोडंबेमार्गे हट्टी गाव गाठले. खरेतर धोडपच्या मर्दानी सौंदर्यापुढे आम्ही दुसऱ्या दिवशी झुकणार होतोच. पण त्याआधीच हट्टी गावाने आमची मने जिंकली. एखाद्या गडपायथ्याच्या गावाने पर्यटनासाठी किती कात टाकावी याचं रोडमॉडेल म्हणजे हे हट्टी गाव. आम्ही जेव्हा रात्री या गावात आलो. तेव्हा गावात विचारले की राहण्याची सोय कुठे आहे? तेव्हा एका गृहस्थाने आम्हाला तडक निवासाकडेच आणले. काही एकरामध्ये उभे असलेले आणि विजेच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले हे पर्यटक निवास बघून आम्ही अक्षरशः अवाक झालो. धोडपच्या माहितीचे केंद्र, कॅंटीन, शेततळे, साहसी खेळासाठी कृत्रिम भिंत आणि सुसज्ज खोल्यांनी सजलेलं विश्रामगृह पाहून आम्ही सर्दच व्हायचो बाकी होतो. आमच्याबरोबर आलेल्या गृहस्थाने दुसऱ्या दिवशी धोडपला जाण्यासाठी वाटाड्या व जेवणाची सोय लावून ते परत गेलेदेखील. गडपायथ्यांच्या गावात ट्रेकर्सचा होणारा पाहुणचार हा तसा कुतूहलाचाच विषय. येथल्या साध्या भोळ्या माणसांचे मन हे आपल्या शहरी मनापेक्षा लई मोठ्ठे. अनोळखी माणसाला आपण  रस्तासुद्धा दाखवत नाही. इथे तर ही मंडळी पथारीसाठी घरात बोलावतात असो. खरेतर अशा सुसज्ज आणि झगमगाटात कधी गडपायथ्याला राहिलो नाही. पण या हट्टी गावाने मात्र हा सुखद धक्का दिला होता. त्यामुळे रात्री सोयीसुविधांची चर्चा करून कधी झोपी गेलो ते कळलेच नाही.

मोबाईलमधील अलार्मच्या आधीच आमच्या वाटाड्याने आम्हाला उठवले. गडी पाचलाच हजर. मग आम्हीही सगळे उरकून चहाच्या ठोक्‍याला खानवळीत चहासाठी हजर झालो. हातात चहाचा कप आणि समोर सकाळच्या तांबड्या केशरी रंगात उजळलेला धोडप पाहून अंगावर रोमांच उठले. इतका सुरेख प्रसंग जुळून आला होता सांगू... धोडपचे ते कातळी सौंदर्य न्याहाळताना मी चहाचे दोन कप कधी रिचवले हे मलादेखील कळले नाही. पण हा चहा मात्र आयुष्यभर स्मरणात राहिला. असो धोडप आता खुणावू लागला होता. पुढे वाटाड्या अन्‌ त्याच्या मागे आम्ही चौघे धोडपच्या वाटेकडे चालते झालो. वाटेत मोरांचे आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट जणू काही संगतीलाच होते. दोन तासांच्या खड्या चढाईने आम्ही गडाचा पहिला टप्पा गाठला. गवळी वस्तीवरच काही क्षण विश्रांतीसाठी थांबलो. तटबंदी, विहीर, प्रवेशद्वार आदी अवशेष पाहून आम्ही धोडपच्या दुसऱ्या टप्प्यावर आलो. आभाळात घुसलेला शिवलिंगासारखा सुळका सकाळच्या कोवळ्या उन्हात उजळला होता. पण खरे सौंदर्य धोडपच्या माचीत सामावले होते. आम्ही या सुळक्‍याच्या कडेकडेनेच माचीकडे सरकू लागलो होतो. अन्‌ तो क्षण आला जेव्हा ही धोडपची निमुळती होत गेलेली माची आमच्या एका दृष्टिक्षेपात आली. अहाहा! जबरदस्त! अतिसुंदर! अशा विशेषणांचा पाऊस समोरची ती माची अनुभवत होती. माचीच्या मध्ये असलेली खाच तर भौगोलिक चमत्कारच! दोन तासांच्या भटकतीनंतरसुद्धा या माचीवरुन आमचे पाय हालत नव्हते. पाय थकले आणि शेवटी कॅमेऱ्याच्या बॅटरीनेही कात टाकली तेव्हा कुठे आम्ही धोडप उतरण्याचा निर्णय अगदी नाइलाजानेच घेतला. धोडपचे प्रवेशद्वार, शिलालेख, पाण्याची टाकी हे सारे काही गतवैभवाच्या कहाण्या सांगून गेले. आणि आम्हीही धोडप मनापासून अनुभवला व सायंकाळी पुन्हा हट्टीत परतलो. 

खरंतर हट्टीवरुन आम्ही रात्रीच कांचन गावात जाणार होतो. पण हट्टीगाव काही आम्हाला सोडवले नाही. धोडपच्या स्पर्शाने मंतरलेली रात्र आमच्या नशिबी होती. म्हणून आणखी एक मुक्काम या हट्टी गावात पडला. हा दुसरा मुक्काम जास्तच संस्मरणीय वाटला. रात्रभर केवळ धोडपचीच चर्चा रंगली. खरेतर सह्यकुशीतल्या मुक्कामाचा हाच खरा आनंद असतो. जिवाभावाचे मित्र, रात्रभर चाललेल्या गप्पा, भटकंतीच्या गमतीजमतीचे किस्से यासारखे सुख तुम्हाला सिमेंटच्या जंगलात कधी मिळणार नाही. हे क्षण आम्ही अधाशासारखे अनुभवत होतो. ही मंतरलेली रात्र पुन्हा एकदा सरली अन्‌ आम्ही पहाटेच्या गारव्यात हट्टीगाव सोडलंदेखील. 

आजची मोहीम अर्थातच कांचनवर होती. गाडी पुन्हा धोडंबेमार्गे कांचनबारीत चालली होती. कांचनबारी हे नाव इतिहासात सोनेही अक्षरांनी लिहिलेले आहे. याच कांचनबारीत सुरतेहून लूट घेऊन परतताना महाराजांनी मुघल सरदार अल्लावर्दीखानला अक्षरशः धूळ चारली होती. महाराजांच्या नेतृत्वाखाली लढले गेलेलं आणि समोरासमोर झालेलं हे मोठे युद्ध. या युद्धातील विजयाने मराठेशाहीची पताका संपूर्ण सातमाळेच्या रांगेवर फडकली. अशा या कांचनबारी परिसरातून जाताना अंगावर रोमांच उठले. इथल्याच मातीत महाराजांनी पराक्रम गाजवला हे नुसते ऐकूनच आम्ही क्षणभर गाडीतून बाहेर पडलो. खरेतर इतिहासाचे हे पराक्रम ज्या मातीत घडले त्या मातीत उभे राहून अनुभवायचा आनंद बहुधा तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी ती मातीच हाती घ्यावी लागेल. असो. कांचनगावात पोहोचलो. नेहमीच्या सवयीने दोन पोरांना गडाची वाट दाखवता का म्हणून विचारले तर ती दोघे लगेच तयार झाली. सह्यकुशीतला हा गुणधर्म मला जास्त भावतो. मदत करण्याचा येथल्या लोकांचा गुण त्यांच्या रक्तातच उपजत असावा. आता आम्ही गड चढाईला सुरवात केली. कांचनागड तसा उपेक्षितच. हाडाचे दुर्गप्रेमी सोडले तर येथे फक्त गुराखीच फिरतात. त्यामुळे वर जाण्यासाठी मळलेली वाट तर नाहीच. म्हणूनच आमचा तर पावलागणिक संघर्ष चालू होता. घसाऱ्याची वाट व मध्येच या वाटेला छेदणाऱ्या ढोरवाटा. यामुळे तारांबळ उडत होती. सरतेशेवटी अडीच तासांनी कांचनाचा माथा गाठला. हा गड दोन टप्प्यात पाहिला. डाव्या बाजूला उंच सुळक्‍यांचा मंचन तर उजव्या बाजूला कांचन. दोन्ही ठिकाणी पाण्याच्या टाक्‍या आणि बांधकामाचे अवशेष यातला मंचन हा काहीसा देखणा. उंच सुळक्‍याच्या पोटातल्या दहा टाक्‍यांचा समूह तर डोळ्यांचे पारणेच फेडतो. हे पाहून मंचनच्या माथ्यावर आले, की पावलांना काही क्षण विश्रांती द्यायची अन्‌ निवांतपणे समोरचे दृश्‍य न्याहाळत बसायचे. समोरचा देखावा काय वर्णावा? सातमाळ रांगेचा महिमा येथून दिसतो खासच. सह्याद्रीच्या सौंदर्याचे हे अद्‌भूत खेळ आम्ही आता अनुभवत होतो. कॅमेऱ्याच्या क्‍लिकपेक्षा डोळ्यांची उघडझाप ही जास्त जोरात होत होती. कोणती फ्रेम टिपू अन्‌ किती वेळा टिपू असे झाले होते. माथ्यावरून दिसणारा सातमाळ दर्शन सोहळा संपता संपत नव्हता. एक मात्र खरे, येथे येऊन आमची सह्याद्रीकडे बघण्याची दृष्टीच बदलली होती. सौंदर्याचे मापदंड बदलले होते. डोळ्यांत हे सौंदर्य आम्ही मोजले होते. पण शब्दांत कसे मांडावे हे कोडे मला सुटत नव्हते. शब्दांनी माघार घेतली होती. सारे काही निमूटपणे पण अर्थात अधाशीपणाने सह्याद्री अनुभवत होतो. सातमाळेचा तो कॅनव्हास मी मनात मात्र जपून ठेवला आहे. 

एखाद्या भटकंतीत आपल्याला काय हवे असते. याच उत्तर हे अशा डोंगररांगामधून मिळते. काहींना ते व्यक्त करायला आवडते, तर काही ते अव्यक्त पातळीवरच ठेवतात. पण एकमात्र खरे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरची ही भटकंती आमच्यासारख्यांना आणि येथे येणाऱ्या प्रत्येकालाच समृद्ध करत असते. नवा अनुभव देत असते. आपणही हे क्षण आनंदाने वेचायचे असतात. 

धोडप आणि कांचना ही दोन दिवसांची मुशाफिरीसुद्धा यापेक्षा वेगळी नव्हती. आणि म्हणूनच या सफारीमधले अत्युच्च क्षण माझ्या भटकंतीच्या डायरीच्या पानांवर उमटले.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या