शिखरसम्राज्ञी कळसूबाई

प्र. के. घाणेकर
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

शैल कळसूबाई म्हणजे महाराष्ट्राचे माऊंट एव्हरेस्ट ! महाराष्ट्र सह्याद्रीचं हे सर्वोच्च शिखर. त्याची समुद्रसपाटीपासून उंची भरते १६४६ मीटर्स म्हणजे ५४३१ फूट. तळवटीतल्या बारी या गावापासून तब्बल ८०० मीटरची डोंगरचढाई केली की या शिखरमाथ्यावर पोहोचता येतं.

महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसूबाई हे सह्याद्रीचे मानबिंदू आहे. हिमालयातील शिखरांवर चढाई करणारे गिर्यारोहक या शिखराला आवर्जून भेट देतात. सह्याद्रीचा हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित झाल्यामुळे या भागातील जैवविविधता आणि पर्यावरण याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

शैल कळसूबाई म्हणजे महाराष्ट्राचे माऊंट एव्हरेस्ट ! महाराष्ट्र सह्याद्रीचं हे सर्वोच्च शिखर. त्याची समुद्रसपाटीपासून उंची भरते १६४६ मीटर्स म्हणजे ५४३१ फूट. तळवटीतल्या बारी या गावापासून तब्बल ८०० मीटरची डोंगरचढाई केली की या शिखरमाथ्यावर पोहोचता येतं. 

१८६० साली आर्चडीकन गेल या इंग्लिश माणसाने रात्री डोंगरचढाई करून कळसूबाई शिखरावर पाय ठेवला, तेव्हा पहाट झाली होती. महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर त्यानं सूर्योदय पाहिला. त्या अद्‌भुत दृश्‍याने तो चांगलाच प्रभावित झाला. आपल्या लिखाणात त्यानं कळसूबाई शिखराला ‘दि किंग ऑफ द डेक्कन हिल्स’ असं संबोधले आहे. जगभरातील असंख्य शिखरावर पदन्यास करणारे प्रख्यात गिर्यारोहक इयान मॅकनॉट डेव्हिस यांनी २००३ मध्ये कळसूबाई शिखरावरही आरोहण केले. इंटरनॅशनल माऊंटेनियरिंग अँन्ड क्‍लाइंबिंग फेडरेशनचे ते अध्यक्ष. हिमालयन क्‍लब या प्रख्यात क्‍लबने सर्वांत जुन्या गिर्यारोहण संस्थेच्या पंचाहत्तरी सोहळ्याला उपस्थिती लावणासाठी ते मुंबईला आले होते. त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी लोरॅटो, ब्रिटिश गिर्यारोहक बॉब पेट्टी ग्रु, जपानी गिर्यारोहक तोमात्सु नाकामुरा व हिरोशी साकाई आदी नामवंत गिर्यारोहक होते. त्यांच्या सोबत हिमालय अक्षरशः पायी तुडवणारे गिर्यारोहक हरीश कपाडिया, जगदीश नानावटी, डॉ. एम.एस. गिल असे दिग्गज भारतीय गिर्यारोहकही शिखरावर आले होते. जणू काही जगातील नामवंत गिर्यारोहकांच हे ‘लघु आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक संमेलन’च तिथं त्या दिवशी भरलं होतं.

अलीकडेच हरिश्‍चंद्रगड-कळसूबाई परिसर अभयारण्य म्हणून घोषित झाला आहे. इथलं जैववैविध्य अनेकांना आकर्षित करत आहे. पण संगमनेरच्या बी.एस.टी. महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापक असणाऱ्या डॉ. मोहन वामन यांनी ‘इकॉलॉजिकल स्टडीज ऑफ कळसूबाई-हरिश्‍चंद्रगड-रतनगड फॉरेस्ट’ असे अभ्यासपूर्ण संशोधन करून पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती म्हणजे पीएचडी ही पदवी मिळवली आहे. इथे औषधी वनस्पतींच्या शोधात येणारे वैदू, असंख्य पर्यटक, नवरात्रात येणारे भाविक, अतोनात होणारी कारवी या वनस्पतीची बेकायदा तोड आणि इतरही अनेक कारणांनी इथल्या जैवविविधतेवर संकट कोसळले आहे. अनेक दुर्मिळ वनस्पतींचे येथील अस्तित्वही धोक्‍यात आलं आहे. असं या संशोधनात आढळलं आहे.

नामकरण
या शिखरसम्राज्ञीच नाव ‘कळसूबाई’ कसं पडलं? याबद्दल एक लोककथा या रहाळात सांगितली जाते. फार पूर्वीच्या काळी कळसू नावाची एक कोळ्याची (डोंगर कोळी किंवा महादेव कोळी) पोर याच परिसरात राहात होती. उपजीविकेसाठी इंदरो नावाच्या गावातील एका प्रतिष्ठितांच्या घरी तिनं नोकरी सुरू केली. पण त्याचवेळी केरवारे करणं आणि भांडी घासणे, ही कामं मी करणार नाही, असं तिनं निक्षून सांगितलं होतं. परंतु एके दिवशी तिला ही कामं मनाविरुद्ध जाऊन करावीच लागली. जिथे तिने भांडी घासली ती जागा ’थाळेमेळ’ आणि केर काढायला लागला ती जागा ’काळदरा’ या नावाने ओळखली जाऊ लागली. मनाविरुद्ध करावं लागल्यानं, नोकरी सोडून लहानगी कळसू शेजारच्या उंच डोंगराच्या शिखरावर गेली. संन्यस्त वृत्तीनं ती तिथे राहिली. ईश्‍वराच्या नामस्मरणात ती दंग झाली. शेवटी तिने तिथेच देहत्याग केला. तिचं नित्य स्मरण व्हावं म्हणून त्या शिखराला तिचंच नाव दिलं गेलं. ‘कळसूबाई’ या नावाने त्याची ओळख पटू लागली. पुढे या शिखरमाथ्यावर देवीचं एक लहानसं मंदिरही उभारलं गेलं. तीन मीटर लांबी, रुंदी, उंचीचं हे छोटं मंदिर आहे. त्यावर घमेलं उपट ठेवावं असं अर्धगोलाकार शिखर आहे. आता या देवीलाही कळसूबाई नावानंच ओळखलं जाते. अलीकडेच या पूर्ण मंदिराला शेंदरी रंगाचा तैलरंग दिला गेला आहे. मंदिरासमोर दीपमाळेसारखा एक दगडी स्तंभही आहे. या शिखरावर बारमाही वर्दळ असते. पण सर्वांत उत्तम कालावधी म्हणजे ऑक्‍टोबर ते डिसेंबर. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यात कळसूबाई पर्वत शिखराचा समावेश होतो. संगमनेर-इगतपुरी रस्त्यावर भंडारदरा धरण परिसरातील डोंगराळ प्रदेशात बारी नावाचे एक छोटे गाव आहे. हा कळसूबाई डोंगराचा पायथा. तिथून कळसूबाईच्या दिशेने जाणाऱ्या वाटेने चालायला लागलं की एक ओढा लागतो. तो ओढा ओलांडला की डोंगरचढण सुरू होते. अर्ध्या पाऊण तासात आपण एका घरासारख्या बांधणीच्या देवळाशी येतो. याला कळसूबाईचं खालचं मंदिर म्हणतात. समोरच एक ऐसपैस पार आहे. इथून पुढच्या चढणीवर अनेक रानवाटा लागतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, मुख्य मळलेली पाऊलवाट सोडायची नाही. या वाटेवरच जरा अवघड जागांवर आता शासनाने लोखंडी पायऱ्यांच्या शिड्या तीन-चार ठिकाणी लावल्या आहेत. या वाटेच्या उजवीकडे इंदोरे घळ किंवा गोटीची वाट लागते, तर डावीकडे आहे करंडाखिंड किंवा पांझराखिंड. उडदावणे या गावातून कळसूबाई डोंगर चढाई करण्यासाठी या कारंडा खिंडीतून जावे लागते. याशिवाय इंदोरे या गावातूनही उत्तरेकडील वाटेने कळसूबाई शिखरावर पोहोचता येते. नवरात्रात इकडे आलं तर या साऱ्याच वाटांवर राहाळातील ग्रामस्थांची रीघ लागलेली असते. बारी गावातून दोन अडीच तासांची डोंगरचढाई केली की, कळसूबाई शिखराच्या शेवटच्या चढणीआधी एक बांधीव विहीर लागते. त्यातील पाणी पिण्याजोगे आहे. या पुढच्या वाटचालीत अनेक रानफुलं आणि झुडुपांचं दर्शन होते. आजूबाजूचे दगड धोंडेनी कातळ खरखरीत कडा असलेले दिसतात. 

एखाद्या डोंगरी किल्ल्याचा बालेकिल्ला असावा अशी शेवटची टेकडी लागते. तिथवर जायला पूर्वीची साखळीची वाट, अलीकडेच लोखंडी शिडी लावलेली वाट आणि थोड प्रस्तरारोहण करीत शिखरमाथा गाठायला २-३ पाऊलवाटाही आहेत. शिखराच्या कळसूबाई मंदिरातील देवीदर्शन झालं की आजूबाजूला काही ठिकाणी लोखंडी रेलिंग लावलं आहे. तिथवर जाऊन चहूकडे नजर फिरवावी. उत्तरेचा रामशेज किल्ला, त्याच्यामागून डोकावणारे सातमाळा डोंगररांगेतील सप्तशृंग-मार्कंडा-धोडण, पूर्वेकडे औढा-पट्टा/विश्रामगड-बिनिंग/बिलतनगड, नैऋत्येच्या दिशेकडे अलंग-मदन-कुलंग ही दुर्गत्रयी, पश्‍चिमेकडे दूर अंतरावरील माहुली, माथेरान, पेब, स्वच्छ हवा असेल तर हरिश्‍चंद्रगड, कात्राबाई दिसू शकतात. भंडारदरा धरणाचा विस्तीर्ण जलाशय, रतनगड यांचंही दर्शन इथून घडतं. 

भंडारदरा धरणाजवळील महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृहात मुक्काम करून भल्या पहाटे उठून बारी गावी यावं आणि उन्हाची तल्लखी सुरू होण्यापूर्वी कळसूबाई शिखरावर पोहोचावं. बरोबर तहानलाडू, भूकलाडू असावेत. शिखर मोहीम आटोपून थोडं उशिरा दुपारच्या जेवणासाठी परत भंडारदऱ्याला यावे. अर्थात आपल वाहन असेल तरच हे सारं सुलभतेने होऊ शकतं. पुण्याहून गिरीप्रेमी संस्थेने २०१२ मध्ये जगातील सर्वोच्च शिखर चोमोलुंग्मा/सगरमाथा/माऊंट एव्हरेस्ट येथे नागरी मोहीम आयोजित केली होती. त्यांना शुभेच्छा द्यायला ५-६ नोव्हेंबर २०११ रोजी महाराष्ट्रातील असंख्य साहसी गिरीविहारी मंडळींनी कळसूबाई शिखर आरोहण मोहीम आयोजित केली होती. त्या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांनी एका कापडी फलकावर आपली स्वाक्षरी करायची आणि तो फलक एव्हरेस्टवर फडकावला जाणार होता. तेही योजिल्याप्रमाणे पार पडलं. 

या एरवी निर्मनुष्य असणाऱ्या कळसूबाई शिखर परिसरात पांझरा/पांजरे गावातील पाच लहान मुली (एकमेकींच्या बहिणी) आपल्या घरच्या शेळ्या राखण्यासाठी एका छोट्याशा गुहेत पावसाळा वगळता ७-८ महिने दिवाबत्तीशिवाय वास्तव्याला असतात. सुमारे शंभर-दीडशे शेळ्या आणि या पाच हिरकण्या इथे असतात. सुमारे एक हजार मीटर/तीन हजार फूट उंचीवर जवळच्या पाणवठ्याचं पाणी, रानभाज्या आणि भाकरी यांच्यावर गुजराण करीत सुमती, मंदा, सुमन, काळाबाई आणि विमल या उघडे आडनावाच्या मुली अवघ्या ५-१० वर्षांच्या आहेत. त्यांचा हा वनवास मात्र त्यांना शिक्षणापासून दूर ठेवतो आहे. पण त्यांचे हे धाडस अतुलनीयच मानावे लागले. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या