हवाई आयलंड

प्रमिला महाजनी 
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

पर्यटन
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.
 

हवाई बेट... लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात हे नाव ऐकलेलं. पुढे जेम्स बाँडच्या सिनेमातून या बेटांची झलक पहायला मिळाली. हवाई बेटांवर कधी आपण जाऊ असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. जीवन हे कधी कधी स्वप्नांपेक्षांही अद्‌भूत असतं हेच खरं.

हवाई बेटे ही जागृत ज्वालामुखी असलेली बेटे आहेत. पृथ्वी सतत बदलतेय... अंतर्यामी धुमसतेय याचा पुरावा देणारे ज्वालामुखीचे स्फोट इथं होतात. मानवाच्या नियंत्रणात नसलेली भौगोलिक परिस्थिती इथे पहायला मिळते. मानवानं त्याच्या सोयीसाठी पृथ्वीचं स्वरुप बदललं. पण निसर्गावर पूर्णतः काबू करणं त्याला अजूनही जमलेलं नाही. लाव्हारसाने हवाई बेटांची ही साखळी निर्माण केली. किंबहुना अजूनही करतायत. किलाऊआ आणि लोआ हे जगातील सर्वात मोठे जागृत ज्वालामुखी आजही हवाई बेटांचा विस्तार वाढवतायत. १९ हजार घन मैल आकारमान असलेला पृथ्वीवरील सर्वात जाड पर्वत म्हणजे मोना लोआ याची समुद्रतळापासूनची उंची ५६ हजार फुट म्हणजे हा पर्वत माऊंट एव्हरेस्टपेक्षाही २७ हजार फुटांहून उंच आहे. मग आपण माऊंट एव्हरेस्टला सर्वात उंच पर्वत का मानतो? कारण आपण पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून मोजतो. 

किलाऊआ आणि मोना लोआ मधून लाव्हारसाचे पाट वाहतात. त्याचे थरावर थर साठून इथली जमीन तयार झालेली आहे. अग्निजन्य खडकाळ जमीन, नंतर पाणी, वारा आणि पक्षी यांनी तऱ्हेतऱ्हेच्या वनस्पतींच्या बिया वाहून आणल्या. त्यातल्या काही रुजल्या. काहींनी या परिस्थितीशी जुळवून घेतले. अशा तऱ्हेने इथे वनस्पती सृष्टीचा प्रारंभ झाला. नंतर आले ते मानव. दूरदूरच्या देशातून. शिडाच्या जहाजामधून. त्या प्राचीन काळी होकायंत्राचा शोध लागलेला नव्हता. हे खलाशी/दर्यावर्दी आकाशातील तारे, चंद्र, सूर्य, लाटांची आणि वाऱ्याची दिशा, पक्ष्यांचे विहरणे यावरुन मार्ग शोधत आले. हेच मग या बेटांचे मूळ रहिवाशी झाले. हे निसर्गालाच देव मानणारे होते. पूजणारे होते. त्यांच्या परंपरा त्यांनी जपल्या. जीवनाशी संबंधित असणारे नियम तयार केले. त्यांच्या देवतांना जपले. (pele chonaumea) ही ज्वालामुखीला काबूत ठेवणारी देवता. आजही इथे याच देवतेचे पूजन केले जाते. 

हवाई ही आठ बेटांची जवळजवळ १५०० मैलांची साखळी आहे. यातील आम्ही आयलंड या बेटावर गेलो होतो. चहूबाजूंनी पॅसिफिक महासागराने वेढलेले हे सुंदर बेट. जमीन काळीभोर, लाव्हारसापासून बनलेली. दुतर्फा सळसळणाऱ्या गवताची किनार. येथील व्होल्कॅनिक नॅशनल पार्क अत्यंत प्रसिद्ध आहे. पृथ्वीचं भूकवच इथं अत्यंत पातळ आहे. त्यामुळे भूगर्भातील उष्णता ठिकठिकाणी जमिनीला भेगा पाडून बाहेर पडते. या ठिकाणी प्रचंड मोठे विविर आहे. त्यातून सतत लाव्हारस उसळत असतो. रात्रीच्या काळोखातून याची भीषणता अधिकच जाणवते. यापूर्वी यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये धुमसती पृथ्वी पाहिली होती. पण प्रत्यक्ष लाव्हा उसळाताना इथेच पाहायला मिळतो. हा अत्यंत रोमांचकारी अनुभव होता. भूगर्भातील प्रचंड उष्णतेने खडक वितळतात. हा लाव्हा कठीण कवचातील भेगामधून वाट काढत भूपृष्ठाकडे येतो. आणि पृथ्वीच्या अंतर्भागातील दाबामुळे भूकवच भेदून पृथ्वीवर येतो. या बेटावर कुठेही ही शक्‍यता आहे. एका प्रवाशाने गाईडला विचारले इथं ज्वालामुखी कुठे आहे? तो मार्गदर्शक म्हणाला, अरे बाबा! तू त्याच्यावरच उभा आहेस!

हवाई बेटांवरील मंदिरे
या ठिकाणी हवाई बेटांवरील आदिवासींची मंदिरे आहेत. इथे समुद्रमार्गे आलेल्या खलाशांनी वस्ती केली. ते इथले खरे आदिवासी. मात्र पुढे हवाईवर अनेक आक्रमणे झाली आणि शेवटी ही बेटे अमेरिकेने ताब्यात घेतली. ही मंदिर बांधण्यात ‘कमेहामेहा’ या राजाचा मुख्य वाटा आहे. १७९०-९१ मध्ये त्याने मोई लुनाई, मोलोकाई ही सर्व बेटे जिंकली. त्याचा चुलतभाऊ केऊ कवाहुला हा त्याचा कट्टर शत्रू होता. कमेहामेहाच्या ज्योतिषाने त्याला कुलदेवतेचे मंदिर बांधायला सांगितले. त्याचे ऐकून कमेहामेहाने युद्धदेवता आणि कुलदेवता यांची मंदिरे बांधायला सुरवात केली. या देवतांनी प्रसन्न व्हावे अशी या मंदिराची रचना केली. या देवतांनी प्रसन्न व्हावे अशी या मंदिराची रचना असणे आवश्‍यक होते. हे प्रचंड मंदिर लाव्हा खडकावरच बांधले जावे अशी अट होती. या ठिकाणी असे खडक नव्हतेच. जवळच पोलाेयू नावाची अग्निजन्य खडकांची दरी होती. तेथून हे दगड आणायचे होते. मग कामगारांची २० मैल लांबीची मानवी साखळी करुन खडकाळ दगड आणले गेले. यात कमेहामेहानेही हातभार लावला. कष्ट केले. तो स्वतः आणि त्याचे सैनिक या कामात अडकले होते. ही बातमी त्या क्वाहा कवहुलाला कळली. त्याने ठरविले की आत्ताच स्वारी करायची. निदान त्यामुळे देवळाच्या बांधकामात व्यत्यय येईल. युद्धदेवता कोपेल. कमेहामेहा पराभूत होईल. त्याने मोई, लनाई मोलोकोई या बेटांच्या राजांना आपल्यात सामील करुन घेतले. कमेहामेहाचं वर्चस्व कोणालाच नको होते. मात्र कमेहामेहा हा इतका शूर होता की त्याने त्यांच्यावर प्रतिहल्ला करुन त्यांना पळवून लावले. 

या मंदिराचे बांधकाम १७९१ मध्ये पूर्ण झाले. त्याच्या उद्‌घाटनासाठी कमेहामेहाने त्या चुलत भावाला म्हणजे कनुआला निमंत्रण पाठवले. कनुआला माहिती होते, की हे मृत्युचेच निमंत्रण आहे. पण गेलो नाही तर देवतेचा कोप होईल या भीतीने तो गेला. तिथे त्याचा आणि त्याच्याबरोबर आलेल्या सर्वांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांची मस्तके देवतेच्या चरणी नैवेद्य म्हणून चढवली गेली. कनुआच्या मृत्यनंतर कमेहामेहा हा सर्व बेटांचा एकछत्री राजा झाला. भविष्य खरे झाले. या देवळांचा हा असा इतिहास! काळाचे सामर्थ्य मानवापेक्षा फार मोठे! इथे आज या मंदिरांचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. २२४ फुट लांब आणि १०० फुट रुंद अशा चौथऱ्यावर हे मंदिर बांधले असून याची उंची १६ ते २० फुट आहे. मंदिराभोवती उंच भिंतीचा तट आहे. मंदिर मोडकळीस आलेले असले तरी आजही इथले लोक त्याचे पावित्र्य जपतात. पर्यटकांना आत जाण्यास मनाई आहे. मंदिरामध्ये त्यांच्या देवांची म्हणजे ku (कू) ची लाकडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. 

प्रवेशद्वारजवळच हवाईयन आदिवासींची आणि कमेहामेहाच्या काळातील भाले, खंजीर व इतर शस्त्रे ठेवली होती. त्यातील एक भाला तर १६ फुट लांब होता. या शस्रावरुन जाणवले की त्या वेळचे लोक अतिशय शक्तीशाली असावेत. काही शस्त्रे शार्क माशांच्या दातांपासून बनवली होती. 

आम्ही जणू मनाने कमेहामेहाच्या काळात गेलो होतो. साऱ्या हवाईमध्ये एकच नाव कमेहामेहा!
बिग आयलंड बेटाची उत्तरेकडची सफर दुसऱ्या दिवशी केली. वाटेत मोनालोआ पर्वत दिसला. ढगांची चादर पांघरुन बसलेला... बाकी लख्ख सूर्यप्रकाश. पण हा मात्र बुरखअयात! हवाईला ‘कॉफी कंट्री’ म्हणतात. उत्तरेला कॉफीचे मळे आहेत. जमीनीवर सगळीकडे लाव्हा, लाव्हा असला तरी त्या मस्त फुले, झुडपे झाडे उगवतात हे आश्‍चर्य. उत्तर भागात नेहमी पाऊस असतो. हा भाग कोकणासारखाच आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी आणि छोटी छोटी कौलारु घरं... इथली फळं, फुलं आपल्यासारखीच आहेत ही गंमत. इथेही आंबा, फणसांची झाडं होती. आंबे लांबट, तोतापुरी आंब्यासारखे. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आणि फणसाचं झाड फणसांनी लगडलेलं. इथले अननस अत्यंत रसाळ आणि गोड. अंगणात ज्वासंद, अनंत अशी फुले. मला हे बेट आपलंसं वाटलं. वाटेत समुद्राचं विहंगम दृश्‍य दिसलं. समोर अथांग पॅसिफिक महासागर. डार्क, निळ्या रंगाचा... पाण्यातून डोक वर काढणारे दोन मोठे खडक. शेजारील डोंगराचा उभा कडा आणि पायथ्याशी आदळणाऱ्या मोठमोठ्या लाटा. असं दृश्‍य सिनेमात पाहिलेलं. समुद्राचा गाज मनात साठवला.

जवळच अकाली फॉल आहे. डोंगरावर जाणारा निमिळता, वळणावळणाचा रस्ता.. दुतर्फा निलगिरीची झाडं.. या झाडांची खोडं विविधरंगी असतात. ४०० फुट उंचीवरुन पडणारा अकाकी धबधबा अत्यंत प्रेक्षणीय आहे. तसा स्टेटपार्कमधून तो लांबून दिसतोच. पण जवळ जाण्यासाठी २ मैल लांबीचा ट्रेल आहे. हा छानपैकी बांधलेला छोटा रस्ता असून मधून मधून पायऱ्या आहेत. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे ‘ओप्पु’ हा गोबी माशांचा खास हवाईयन प्रकार आढळतो. हे मासे धबधब्याच्या वरच्या खडकावर अंडी घालतात. अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले धबधब्यातून पॅसिपिक महासागरापर्यंत प्रवास करतात. तिथं वाढतात. पूर्ण वाढ झाल्यावर आश्‍चर्यकारक रितीने प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहत वर येतात. त्यांच्या पोटाखाली संक्शन डिश असते. त्यामुळे त्यांना हे शक्‍य होते. निसर्गाच्या या नवलाईने मन चकीत झालं. 

व्होल्कॅनिक ट्युबस - लाव्हा रस खडकातून मार्ग काढत जातो. त्याच्या प्रचंड उष्णतेने खडक वितळतात. आणि अशा तऱ्हेने भुयारे निर्माण होतात. त्यांना लाव्हा ट्युबस्‌ म्हणतात. आम्ही र्थस्टन नावाची व्होल्कॅनिक ट्यूब पाहिली. याला ट्युब म्हणत असले तरी याची लांबी आणि विस्तार मोठा होता. 

हवाई भाषेमध्ये a, e, i, o, u हे पाच स्वर आणि h, k, p, n, m, n, p. w, y  आठ व्यंजने म्हणजे एकूण १८ च अल्फाबेटस्‌ आहेत. अलोहा हा त्यांचा परावलीचा शब्द... सगळीकडे लिहिलेला आढळतो. अलोहा याचा अर्थ प्रेम, शांती, माया! एकमेकांना भेटल्यावर दोन हवाईयन्स अलोहा म्हणतात. तेव्हा त्याचा अर्थ वेलकम किंवा गुडबाय असा होतो. ‘अलोहा’ हे एक एकमेकांना दिलेलं वचन आहे. ‘प्रत्येक नवा दिवस नवीन आशा. स्वप्न घेऊन येईल. अस्ताचलाला गेलेला सूर्य पुन्हा उगवेल’ असं ते वचन आहे. दुसरा उथला शब्द लक्षात राहिला तो म्हणजे ‘महालो’. याचा अर्थ थँक यू. ओलू-ओलू याचा अर्थ प्लीज. कुठल्याही रेस्टोरेंटमध्ये आमचं स्वागत माई या शब्दाने व्हायचे. याचा अर्थ होता या आणि खा. हवाईयन भाषा अत्यंत मृदू आणि गोड वाटली. 

इथला निसर्ग हवाईयन्सच्या कपड्यातूनही प्रतिबिंबित होतो. सगळ्याच कपड्यावर मोठमोठे फुलाफुलांचं डिझाईन असतं. पर्यटकही हौशीनं अशाच डिझाईनचे कपडे घालतात. दुसरं म्हणजे पांढऱ्या चाफ्याचं फुल हे इथलं राष्ट्रीय फुलं आहे. पांढऱ्या चाफ्याच्या माळा घालणं, डोक्‍यात पांढऱ्या चाफ्याचे गजरे माळणं हे ही इथलं प्रमुख आकर्षण आहे. 

‘पुहोनिया’ बीच 
हा बीच हवाईच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिक आहे. इथल्या राजघराण्याच्या वास्तव्याचे हे प्रमुख स्थान होते. इथं मोठ्या भिंतीने संरक्षित केलेला किल्ला होता. त्यात युद्धकैदी म्हणजे युद्धात पराभूत झालेल्या योद्‌ध्यांना आश्रय देत. एक प्रकारचा तुरुंगच होता हो. या आश्रयस्थानाचे नाव होते पुहोनिया जे प्रजानन कायद्याचे उल्लंघन करत, पवित्र नियम मोडत त्यांनाही इथेच ठेवले जायचे. १८१९ नंतर कमेहामेहाने धार्मिक प्रथा बंद केल्या आणि अशी ठिकाणे नष्ट केली. इथले राजवाडे भव्य होते. त्यात १० पेक्षा अधिक इमारती होत्या. इथल्या नारळ, पाम वृक्षांच्या साक्षीने राज्यकारभार चाले. नोकर झोपडीत जाऊन मासे वगैरे पुरवत. युद्धाचे नियोजन, तहाच्या अटी इथे चर्चिल्या जात. फावल्या वेळी ‘कनाने’ हा खेळ खेळत.

मोठ्या दगडी भिंतीने राजप्रसाद आणि पुहोनिया आश्रयस्थाने वेगळी केली होती. ही भिंत राजप्रासादाचे पावित्र्य जपण्याचे आणि संरक्षणाचे कार्य करती असे. राजांच्या अंगी दैवी शक्ती आहे अशी इथल्या लोकांची श्रद्धा होती. त्यांच्या धार्मिक चालीरितीनुसार सामान्य माणसाला राजासमोर जायची, इतकच नव्हे तर राजाकडे पहायाची परवानगी नसे. राजाच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श होता कामा नये, इतकंच काय राजावर सावलीसुद्धा पडता कामा नये असा प्रघात होता. मासेमारी, शिकार करणे, लाकूडफाटा गोळा करणे याचा कालावधी ठरवून दिला जायचा. नियम मोडणाऱ्याला मृत्युदंडाची शिक्षा होती. नियमांचे उल्लंघन केल्यास कोप होतो. मग देवता ज्वालामुखीचा स्फोट, समुद्रीवादळ किंवा भूकंप यांच्या रुपाने आपला कोप प्रकट करते अशी त्यांना भिती वाटायची. ‘पुहोनिया’ या देवताला सर्वजण मानत असतं. 

बिग आयलंडची मुख्य activity समुद्राशी संबंधित आहे. snorkelingm, scooba diving, fishing, swimming या गोष्टी केल्या नाहीत तर हवाईची मजा कळणारच नाही. इथे आम्ही हिरवी कासवं पाहिली. 

सहा एप्रिलला आम्ही हवाई बिग आयलंडला गेलो होतो. बरोबर एक महिन्यानंतर बातमी आली किलोआ लाव्हाचा स्फोट झाला. लाव्हा १५०० फुट उंच उडाला. हवाईचं हे बेट अग्रिच्या ज्वाळांनी पेटून उठलं. रस्त्याला भेगा पडल्या. सल्परडायऑक्‍साईडच्या धुराने आसमंत भरुन गेला. लाव्हाचे प्रवाह वाहू लागले. त्यामुळे खडक वितळू लागले. घरे, झाडे भस्मसात झाली. महिन्यापूर्वी आम्ही याच ठिकाणी होतो हे आठवलं, अंगावर भितीने काटा उभा राहिला. 
केवढा हा निसर्गाचा प्रकोप! खरोखरच हवाईचे नियम कुणी तोडले होते का? निसर्गावर अतिक्रमण केलं होतं का? खरोखरच पुहोनिया देवतेचा कोप झालाय का?
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या