इजिप्तची अतिप्राचीन संस्कृती

प्रमिला महाजनी
सोमवार, 1 एप्रिल 2019

पर्यटन
 

इजिप्त, अतिप्राचीन संस्कृती असणारा देश. तेथील पिरॅमिड्‌स जगातील सात आश्‍चर्यांमध्ये मोडणारी. खूप दिवस इजिप्तला जायचे स्वप्न पाहिले होते. मनात भीतीही होती. वाटायचे, सुरक्षित असेल का तिथे जाणे? शेवटी इजिप्त एअरची तिकिटे बुक केली. कैरोला पोचलो आणि भीतीची जागा कुतूहलाने घेतली. खासगी बसने हॉटेलकडे निघालो होतो. रस्त्याच्या दुतर्फा जुनाट, रंग उडालेल्या इमारती, रस्त्यावर सामान्य मॉडेलच्या, पत्रे गंजलेल्या मोटारी आणि पदपथावर प्लॅस्टिकचा कचरा पाहून वाटले, की हे दृश्‍य पाहायला आपण एवढा खर्च करून आलोय का? इजिप्त हा वाळवंटी प्रदेश आहे, हे माहीत असूनही इतस्ततः कुठेही हिरवा ठिपकाही नाही, हे पाहून मन खट्टू झाले. हे इजिप्तचे पहिले दर्शन!

संध्याकाळी गिझा पिरॅमिड पाहायला गेलो. तिथे लाइट ॲण्ड म्युझिक शो होता. मोकळ्या मैदानात खुर्च्या मांडल्या होत्या. समोर तीन पिरॅमिड्‌स आणि स्फिंक्‍स. आमच्या मनात अनेक प्रश्‍न होते. कार्यक्रम सुरू झाला. धीरगंभीर आवाजात स्फिंक्‍स बोलू लागला. हजारो वर्षांपूर्वीचा इजिप्तचा इतिहास जणू जिवंत झाला. प्राचीन जगातील अनेक रहस्ये उघड झाली. सगळे प्रेक्षक त्या काळात जाऊन पोचले. हा खेळ जवळजवळ तासभर चालला. वातावरण गूढ रम्य बनत गेले. इथले महान राजे आणि त्यांची कारकीर्द साकार झाली. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी गेलो. कालचे ते गूढ वातावरण सूर्यप्रकाशात वितळून गेले होते. समोरचे तीन भव्य पिरॅमिड्‌स स्पष्ट दिसत होते. हे पिरॅमिड्‌स खुफू (khufa), खफ्रे (khafre) आणि मॅन्कुरे (monkaure) यांचे आहेत. त्या पिरॅमिड्‌समोर चौथऱ्यावर स्फिंक्‍स मोठ्या दिमाखात उभा होता. यापैकी मधला पिरॅमिड हा ‘ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा’ या नावाने ओळखला जातो. इ.स. पूर्वी २५५० ते २४९० या काळात हे पिरॅमिड बांधले गेले. तेव्हा इजिप्त हे सामर्थ्यवान आणि वैभवशाली राष्ट्र होते. हे पिरॅमिड्‌स राजे आणि राजघराण्यातील व्यक्तींचे मृतदेह जपून ठेवण्यासाठी बांधण्यात आले. मृतदेहाबरोबर इथे हिरे, माणके, सोने इत्यादी जवाहीर ठेवण्यात येत असे. इजिप्तच्या राजांना ‘फेरो’ म्हणत. ग्रेट पिरॅमिड हे खुफू राजाचे थडगे आहे. हे त्याचे अनंतापर्यंतचे घर आहे. सर्व पिरॅमिड्‌स नाईल नदीच्या पश्‍चिमेला बांधली आहेत. याचे कारण म्हणजे सूर्य पश्‍चिमेला मावळतो; अंत पावतो. इजिप्तची संस्कृती सूर्यदेवतेवर श्रद्धा ठेवणारी होती. पिरॅमिडच्या चार बाजू म्हणजे चार दिशा अशी कल्पना होती. दूरदूरच्या खाणीतून दगड आणून पिरॅमिडचे बांधकाम खालून वर करण्यात आले. शेवटी खास सोन्याचे शिखर बांधले. (हे आता अस्तित्वात नाही.)

इजिप्शियन लोकांची मुख्य देवता सूर्य. सूर्य आपल्या सोनेरी किरणांनी सारा प्रदेश समृद्ध करतो, अशी त्यांची श्रद्धा होती. सूर्य पूर्वेला उगवतो. चढत चढत दुपारी आकाशाचा मध्य गाठतो आणि पश्‍चिमेला मावळतो. हा मार्ग त्रिकोणी असल्याने पिरॅमिडला विशिष्ट आकार प्राप्त झाला. इजिप्शियन लोकांचा मृत्युपश्‍चात जीवनावर दृढ विश्‍वास होता. मेल्यावर मृदेहाला व्यवस्थित वस्तू व अन्न, पाणी ठेवले जायचे. 

कैरोतील म्युझियम प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या कालखंडातील जवळजवळ एक लाख शिल्पे तिथे आहेत. तुतनखामेन आणि त्याच्या जड जवाहिरांचा कक्ष प्रेक्षणीय आहे. या म्युझियममध्ये पूर्वी पिरॅमिडमध्ये असलेल्या शाही ‘ममीज्‌’चे एक दालन आहे. प्रत्येक मृतदेहाजवळ त्याचे नाव व माहिती दर्शविणारी पाटी आहे. यातील काही ममी तर इतक्‍या जिवंत वाटतात, की वाटते थोड्या वेळाने उठून बसतील. हे मृतदेह टिकवण्यासाठी त्यांनी कोणते रसायन वापरले असेल? वाटले, समजा एखादा मृतदेह सजीव झाला, तर तो काय सांगेल?

जवळच पॅपीरस म्युझियम आहे. हे ठिकाण चुकवू नये असे आहे. पॅपीरस हे झाड इथल्या कोरड्या हवामानात वाढते. याच्या खोडापासून कागद तयार करतात. त्या तलम कागदांवर चित्रे काढतात. प्राचीन काळी इजिप्शियन लोकांचा हा चरितार्थाचा व्यवसाय होता. इथल्या अनेक चित्रांमधून इजिप्तची संस्कृती व लोकजीवन डोकावत होते. 

कैरोपासून २२० मैलांवर अलेक्‍झांड्रिया हे महत्त्वाचे शहर आहे. भूमध्य समुद्रातील महत्त्वाचे बंदर. एकेकाळी इथले लाइट हाउस जगातल्या सात आश्‍चर्यांपैकी एक मानले जायचे. अलेक्‍झांडरने हे शहर वसवले. इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाटीवाटीने थाटलेली दुकाने, अगदी रस्त्यापर्यंत मांडलेला माल, रस्त्यावर तुडुंब गर्दी, त्यात हुक्का ओढणारे अनेक तरुण दिसत होते. या सगळ्या वातावरणात गरिबीचा गंध मिसळला होता. इथला pompey’s pillar हा प्रचंड उंच पाषाण स्तंभ रोमन साम्राज्याची साक्ष देत आजही उभा आहे. या स्तंभाची उंची २० मीटर आणि व्यास २.७१ मीटर आहे. इजिप्तमधील विजयानंतर पॉम्पे याने हा विजयस्तंभ बांधला. या स्तंभासमोरील एकमेव स्फिंक्‍स सुस्थितीत आहे. 

अलेक्‍झांड्रियामध्ये क्विटबे सिटॅडेल हा किल्ला आहे. त्याच्या आसपासचा भाग म्हणजे इथली चौपाटी. शंख, शिंपल्यांपासून केलेल्या वस्तूंची अनेक छोटी छोटी दुकाने इथे आहेत. समोरच भूमध्य समुद्राचे गडद निळे-हिरवे पाणी. पूर्वी याच जागी दीपगृह होते. चौदाव्या शतकात भूकंपामुळे ते नष्ट झाले. या शहरावर ग्रीक, रोमन लोकांनी राज्य केले. त्याच्या खुणा इथल्या स्थापत्य कलेतून प्रतीत होतात. 

‘रॉयल लायब्ररी ऑफ अलेक्‍झांड्रिया’ हे आवर्जून पाहण्यासारखे स्थळ आहे. टोलेमीच्या काळात या लायब्ररीला राजाश्रय मिळाला. पायथागोरस, युक्‍लिड यासारख्या अनेक विचारवंतांनी इथे अभ्यास केला. ज्युलियस सिझरने ही लायब्ररी जाळली. नंतर तिचे पुनरुज्जीवन केले गेले. या इमारतीत चार भूमिगत आणि जमिनीवरील सहा मजले आहेत. हिचा लंबवर्तुळाकार प्रवाही जीवनाचे प्रतीक आहे. या १० मजली इमारतीत सहा वाचनालये, तीन संग्रहालये, अनेक संशोधन केंद्रे, दोन कायमस्वरूपी कलादालने, अंध व अपंगांसाठी वेगवेगळे कक्ष आहेत. लायब्ररीतल्या एका प्रचंड मोठ्या भिंतीवर जगातल्या सगळ्या भाषांमधील काही अक्षरे आहेत. तिथे देवनागरी लिपीतील अक्षरे पाहिली आणि मन भरून आले. 

अबू सिंवेल हे इजिप्तमधील महत्त्वाचे मंदिर आस्वान पासून २३० किलोमीटर अंतरावर आहे. इ.स. पूर्व १३ व्या शतकात ही मंदिरे इथल्या पर्वतात कोरली. त्या काळचा सम्राट (दुसरा) रामसेसे याने त्याची प्रिय राणी नेफरेतीती हिच्या चिरंतन स्मृतीसाठी दोन देवळे बांधली. आस्वान धरण बांधले, तेव्हा ही पाण्याखाली गेली. १९६४ मध्ये मंदिराचे अवशेष पाण्यातून काढून मंदिरांची पुनर्बांधणी केली गेली. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ २० मीटर उंचीच्या राजांच्या मूर्ती आहेत. यांची भव्यता आपल्याला नतमस्तक करते.

जवळच असलेले आस्वान धरण हे इजिप्तचे भूषण आहे. संपूर्ण इजिप्तला इथून वीजपुरवठा होतो. तसेच शेतीला पाणीपुरवठा होतो. परतीच्या प्रवासात आजूबाजूच्या रखरखीत वाळवंटात मृगजळ पाहिले. दूरवर जणू निळ्या लाटांचा समुद्रच उसळत होता. 

आस्वानपासून ३० मैलांवर असलेले कॉमऑम्ब टेंपल हा दोन देवळांचा समूह आहे. एक देऊळ हॉरीस या देवतेचे, तर दुसरे ‘सोवेक’चे आहे. हॉरीस देवतेचे तोंड ससाण्यासारखे, तर सोवेकचे मगरीसारखे आहे. या भागात नाईल नदीमध्ये अनेक मगरी होत्या. त्या लोकांना त्रास द्यायच्या. त्यांना शांत करायला ही देवळे बांधली गेली, असे म्हणतात.

इडफू टेंपल हे प्राचीन इजिप्तमधील सर्वात चांगल्या स्थितीत असलेले देऊळ आहे. याचे प्रचंड मोठे स्तंभ असलेले प्रवेशद्वार वगळता हे पूर्ण मंदिर वाळवंटात गाडले गेले होते. हे मृत्यू देवतेचे मंदिर नाईलच्या पश्‍चिमेला आहे. याठिकाणी होरॅसिस व सेथ (सैतान) यांच्यात युद्ध झाले. त्या युद्धाच्या घटना मंदिरातील स्तंभावर चित्रित केल्या गेल्या. हे मंदिर आपल्याला इजिप्तच्या वैभवशाली काळात घेऊन जाते. 

टेंपल ऑफ लक्‍झर... हे तिसऱ्या अमेनहोपच्या काळात बांधले. तुतनखामेनच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. हे भव्य शिल्प इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहे. संध्याकाळी जेव्हा हे मंदिर प्रकाशाने उजळून निघते, तेव्हा इथली वास्तू जिवंत होते आणि आपल्याला भारावून टाकते. याला खास इजिप्शिअन pylon म्हणजे प्रवेशद्वार आहे. हे मंदिर उत्तर-दक्षिण स्थित असून त्याच्या समोर ‘कार्नाक’ मंदिर आहे. दोन्ही मंदिराच्या मधील मार्गावर दोन्ही बाजूंना स्फिंक्‍सची शिल्पे आहेत. त्या मार्गाला ‘स्फिंक्‍स ॲव्हेन्यू’ म्हणतात. हे मंदिर रॉयलका, अमून आणि खोन्सू या देवतांचे आहे. हे तीन सूर्याचे अवतार मानले जातात. यांचा जन्म इथल्या भित्तीचित्रातून सजीव होतो. 

शेवटचे आकर्षण म्हणजे व्हॅली ऑफ किंग्ज्‌. खरे तर इथल्या फेरोंची ही स्मशानभूमी. फेरोंच्या अनेक पिढ्या इथे पुरल्या गेल्या आहेत. पण, ही स्मशानभूमी पाहायला पर्यटक गर्दी करतात. हा सगळा वाळवंटी प्रदेश. काही डोंगरांच्या कपारीतील ही थडगी. मृत्युपश्‍चात जीवनावर विश्‍वास असल्याने ‘ममीकरण’ करून ठेवलेली. सध्या या ममीज्‌ म्युझियममध्ये आहेत. पण इथली चित्रकला व सुशोभीकरण बघण्यासारखे आहे. इतकी वर्षे झाली, तरी या चित्रांतले रंग जसेच्या तसे आहेत. इजिप्तमध्ये पूर्वी रंगांचे रसायनशास्त्र किती प्रगत होते याचे हे उदाहरण आहे, पुरावा आहे. जवळच क्वीन हॅतशेपसूट या राणीचे मंदिर आहे. या राणीने इजिप्तवर अनेक वर्षे राज्य केले. 

नाईल नदीतील क्रूझ हा अविस्मरणीय अनुभव आहे. थोडे दिवस आम्ही इजिप्तच्या ‘फेरो’काळातच होतो. मात्र, आजचे इजिप्त पार बदललेले आहे. अफाट लोकवस्ती, अरुंद गल्ल्या आणि ठिकठिकाणी हुक्का ओढणारे स्त्री-पुरुष. एकेकाळी वैभवात असलेल्या इजिप्तचे हे रूप मनाला खिन्न करते. पण काळापुढे कोणाचे काय चालले? इजिप्तला जाताना पिरॅमिड, नाईल आणि तुतनखामेन एवढेच माहिती होते. पण, परत येताना माझ्याबरोबर इजिप्तचा वैभवशाली इतिहास होता. इथे येऊन मी काय मिळवले, हे नाही सांगता येणार. पण इजिप्तचे दर्शन उर्वरित आयुष्यात सोबत करेल हे नक्की!

संबंधित बातम्या