व्हर्जिन हिमाचलच्या विश्‍वात!

प्रतीक जोशी, मुंबई
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

पर्यटन

कोणी या प्रदेशाला ‘व्हर्जिन हिमाचल’ म्हणतात, तर काही ‘बेस्ट ऑफ हिमाचल’ असेही म्हणतात. कल्पा-टाबो-नाको-सांगला अशी ही एकूण चार पर्यटन स्थळे आहेत, आणि इथे भेट द्यायलाच हवी...

उत्तर हिमाचल प्रदेशातील डोंगराळ वाळवंट, म्हणजे ‘स्पिती व्हॅली’, हे एक थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेला हा प्रदेश आहे. इथले स्थानिक तिबेट व लडाख या प्रदेशांप्रमाणेच वज्रयान बौद्ध धर्माचे पालन करतात. 

मुंबई-चंडीगड असा लांब पल्ल्याचा प्रवास करून आम्ही थेट कल्पा या ठिकाणी तिथले खास आकर्षण असलेल्या ‘किन्नर कैलास’कडे प्रस्थान केले. आजूबाजूची शांतता, उंच झाडे व इथले थंड हवामान मन प्रसन्न करणारे होते. किन्नर कैलास पर्वत ४८०० मीटर उंचीवर आहे. 

हॉटेलमधला एक रात्रीचा निवास कायम स्मरणात राहील असा होता. खोलीचे दार उघडावे आणि समोरच भव्य, उंच व विशाल बर्फाच्छादित पर्वत रांगा.... डोळे भरून मी हे दृश्‍य पाहत होतो आणि अर्थातच हे सर्व क्षण कॅमेऱ्यातही टिपत होतो. येथे आम्हाला काही विदेशी पर्यटकही भेटले. त्यांनी आम्हाला बरेच सुंदर अनुभव सांगितले. भोजन आणि नाश्‍ता दोन्ही अप्रतिम होते. आम्हाला येथे जिलेबी व साबुदाणा वड्याचा आस्वाद घेता आला. 

सकाळी नाको या गावाच्या दिशेने जायला सुरुवात केली. नाको काय आहे हे बऱ्याच जणांना बहुधा माहीत नसावे. कारण ते एक अतिशय कमी लोकसंख्या असलेले इंडो-चीन बॉर्डरवर असलेले छोटे गाव आहे. इथल्या बऱ्याच गोष्टी निराळ्या होत्या. नाको तलाव व प्राचीन मॉनेस्ट्री इथली मुख्य पर्यटन स्थळे आहेत. डोंगरदऱ्यांतून सात ते आठ तासांचा प्रवास करून झाला होता. मी टुरिस्ट बस मधून उतरताच समोर दिसला तो एक मोठा दगड; त्यावर तिबेटी भाषेमध्ये काहीतरी कोरून ठेवले होते. बौद्ध धर्माचे प्रार्थनेचे झेंडे आणि एक बंद मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 

त्या रात्री आम्ही छोट्या तंबूमध्ये निवास केला. सकाळी उठल्यावर हाताशी थोडा वेळ शिल्लक होता. म्हणून मी नाको गाव पायी चालून बघायचे ठरवले. नाकोची लोकसंख्या ५०० ते ७०० इतकीच आहे. येथे लोक सकाळी सहसा लवकरच उठताना दिसले. त्यांचा एक विशेष दिनक्रम होता. नाकोमध्ये खूप सुंदर देखणी छोटी छोटी घरे पाहायला मिळाली. इथे मोठ्या प्रमाणात सफरचंद आणि वाळलेले जर्दाळू यांचे उत्पादन होते. नाको तलावाला भेट देऊन मी पुन्हा आमच्या तंबूकडे वळालो, तेव्हा मला हिमाचल प्रदेशमधल्या पारंपरिक पेहरावातली एक महिला भेटली. तिने मला नाको गावाची थोडी माहिती सांगितली. मी तिचे छायाचित्र टिपू का असे प्रश्न विचारताच तिने लगेच होकार दिला. 

रात्री कॅम्पफायरचे आयोजन केले होते. इथल्या स्थानिक रहिवाशांचे जीवन खूप कठीण आहे. गावामध्ये कोणी आजारी असेल आणि त्याला डॉक्टरकडे न्यायची वेळ आली तर शहरी भागात जावे लागते. मी जे थोडेफार नाको गाव पाहिले, ते कायम स्मरणात ठेवावे असेच होते. नाकोपासून टाबो गाव तीन-चार तासांच्या अंतरावर आहे. हे स्पिती नदीच्या काठावर वसलेले एक छोटे गाव आहे. इथली ‘टाबो मॉनेस्ट्री’ पर्यटकांचे आकर्षण आहे आणि ते इथले सर्वात पवित्र स्थान मानले जाते. येथे मोबाईलला रेंज मिळत नाही. टाबो मॉनेस्ट्रीच्या एक बाजूला ५०० वर्षे जुनी तिबेटी ममी होती. ममी म्हणजे नैसर्गिक प्रक्रियेने सुकलेले मृत शरीर होय. ही ममी एका बौद्ध भिक्षूची आहे. ममीच्या पाठीमागे गौतम बुद्धांची भव्य मूर्ती होती. अशा खूप गोष्टी मनात भरून दुपारचे भोजन आटपून पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो. 

पुढे काही अंतर पार करून काझा गावाकडे आलो. काझा गाव दिसताच इथे प्रथम दृष्टीस पडते ते इथली बाजारपेठ आणि तिथली लोकांची गर्दी. काझा गाव ३६५० मीटर उंचीवर स्पिती नदीच्या लगत वसलेले आहे. काझा अनेक उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. येथे जानेवारीमध्ये सर्वात जास्त थंडी असते. काझामध्ये आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो त्या हॉटेलची सजावट सुंदर होती. प्रत्येक भिंतीवर चित्र व डिझाईन 

होती. प्रवेशद्वारापाशी सजावट होती. बौद्ध धर्माची धार्मिक चित्रे सर्व खोल्यांमध्ये लावली होती. इथे चिच्छम खिबर रोड वरून जाताना एक छोटे गाव दिसले. गावाजवळ ‘की’ मॉनेस्ट्रीला भेट दिली. की मॉनेस्ट्री काझापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही गेलो तेव्हा लाल वस्त्रातील लामा भिक्षूंची सभा सुरू होती. येथे शंभरहून अधिक लामा राहतात व त्यांना इथे प्रशिक्षण दिले जाते. काही छोटे भिक्षू येथे व्हॉलिबॉल खेळत होते. तर काही मुले शिकवणीला बसली होती. इथून जवळ हिकम नावाचे एक गाव होते. गावाच्या जवळ आल्यावर गौतम बुद्धांची भव्य पाठमोरी मूर्ती दृष्टीस पडते. येथे चौदा हजार फुटांवरचे जगातील सर्वांत उंचावरचे टपाल कार्यालय आहे. इथले स्थानिक हौसेने आपले फोटो काढून घेत असत. काझा गावामध्ये एक पडीक घराच्या भिंतीवर ‘हॅपी तिबेटियन नवीन वर्ष २१४५’ असे काही लिहिले होते. इथली छोटी पोरे खूप गोरीपान व गोंडस होती. काझाला पुन्हा एकदा नक्कीच यावे असे मी ठरविले. 

बसपा नदीच्या काठावर असलेले छितकूल हे एक थंड हवेचे ठिकाण पाहून मन तृप्त झाले. येथे काही ठिकाणी पाट्या दिसल्या, ‘हिंदुस्तान का आखरी गाव’ व ‘हिंदुस्तान का आखरी धाबा’. गर्द झाडी आणि वाहणाऱ्या नदीचे ते दृश्य कॅमेऱ्यात टिपायला तरुण मंडळी गर्दी करत होती. येथे सेल्फी घेण्यासाठी सुंदर बॅकड्रॉप होता. रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामध्ये भिजण्याचा आनंद घेतला. सफरचंदाची झाडे ठिकठिकाणी दिसत होती, पण सफरचंद हिरवट रंगाची व कच्ची होती. सांगला व्हॅली हे बसपा या प्रांताचे रत्नच होते. सांगला जवळ कोठेही विमानतळ नाही, पण हे कल्का रेल्वे स्थानकापासून जवळ आहे. 

या प्रदेशाला ‘व्हर्जिन हिमाचल’ म्हणतात, तर काही ‘बेस्ट ऑफ हिमाचल’ असेही म्हणतात. कल्पा-टाबो-नाको-सांगला अशी ही एकूण चार पर्यटन स्थळे आहेत, आणि इथे भेट द्यायलाच हवी! निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायलाच हवा!

संबंधित बातम्या