सिंगापूरचे भव्य बुद्ध मंदिर 

राजेंद्र यादव
गुरुवार, 23 जानेवारी 2020

भारतातून तसेच जगभरातून लाखो लोक दरवर्षी सिंगापूरला पर्यटनासाठी भेट देतात. परंतु, बुद्धाचा दात असलेले भव्य बुद्ध मंदिर मात्र अपवादानेच पाहिले जाते. बहुसंख्य भारतीय पर्यटकांना असे एक मंदिर येथे आहे याची फारशी माहिती नाही. 

सिंगापूरच्या चायना टाऊन परिसरात बुद्धा टुथ रेलिक हे अति भव्य मंदिर आहे. मंदिर पाच मजली असून पूर्णपणे लाकडी आहे. हे मंदिर म्हणजे चिनी स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानला जातो. मंदिर उभारणीसाठी लाकडी इंटरलॉकिंग ब्लॉक्‍सचे तंत्रज्ञान वापरले असून हे तंत्रज्ञान म्हणजे चीनने जगाला दिलेली देणगी समजली जाते. 

भारतातून तसेच जगभरातून लाखो लोक दरवर्षी सिंगापूरला पर्यटनासाठी भेट देतात. परंतु, बुद्धाचा दात असलेले भव्य बुद्ध मंदिर मात्र अपवादानेच पाहिले जाते. बहुसंख्य भारतीय पर्यटकांना असे एक मंदिर येथे आहे याची फारशी माहिती नाही. 

सिंगापूरच्या चायना टाऊन परिसरात बुद्धा टुथ रेलिक हे अति भव्य मंदिर आहे. मंदिर पाच मजली असून पूर्णपणे लाकडी आहे. हे मंदिर म्हणजे चिनी स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानला जातो. मंदिर उभारणीसाठी लाकडी इंटरलॉकिंग ब्लॉक्‍सचे तंत्रज्ञान वापरले असून हे तंत्रज्ञान म्हणजे चीनने जगाला दिलेली देणगी समजली जाते. 

आपल्याकडील मंदिरात जसे रक्षक किंवा द्वारपाल असतात, तसेच दोन द्वारपाल याही मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आहेत. या दोन्ही द्वारपालांचे चेहरे उग्र असून कोणत्याही शक्तीशी लढाईस तयार असल्यासारखे ते वाटतात. प्रवेशद्वारात श्रीलंकेहून आणणेली नागपुष्पाची चार झाडे आहेत. नागपुष्पाच्या झाडाखालीच बुद्ध मैत्रेय यांना ज्ञान प्राप्त होणार अशी आख्यायिका आहे, त्यामुळे या झाडाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. 

पहिल्या मजल्यावरील दालनात बुद्ध मैत्रेय यांची १५ फुटी अखंड पाषाणात घडविलेली सुबक मूर्ती आहे. या पूर्ण दालनाची रचना तांग राजवंशीय आहे. बुद्ध मैत्रेय म्हणजे बौद्ध परंपरेनुसार भविष्य बुद्ध. मैत्रेय बुद्धांचा भविष्यात जन्म होणार असून त्यांना गौतम बुद्धाचे वंशज मानले गेले आहे. ही मूर्ती भद्रासनात असून तिचे पाय कमळावर आहेत. अभय मुद्रेतील उजवा हात आणि डाव्या हातात सुवर्ण अमृत कुंभ आहे. या दालनाला शंभर नाग दालन (हंड्रेड ड्रॅगन) असे म्हटले जाते. या दालनाच्या दोन्ही बाजूला बुद्धांच्या विविध मुद्रा असलेल्या १०० अतिशय सुबक मूर्त्या आहेत. सर्व मूर्त्या पद्मासनात असून कमळावर बसलेल्या आहेत. या मूर्त्या लाकडात घडविलेल्या आहेत. याच दालनात भाविक बुद्धांची आराधना करतात. 

दुसऱ्या मजल्यावरील दालनास बोधिसत्व मंजुश्री दालन असे नाव आहे. चिनी बौद्ध अभ्यासकांच्या मते शक्‍यमुनी बुद्ध यांनी त्यांचे ज्ञान सर्वत्र पोचविण्यासाठी मंजुश्रीला निर्माण केले गेले आणि मंजुश्री म्हणजे बुद्धांचा अध्यात्मिक मुलगा मानला गेलेला आहे. मंजुश्रीने भारतात श्रावस्ती या नावाने पुनर्जन्म घेतला होता अशीही माहिती तेथे मिळाली. तिसऱ्या मजल्यावरील दालनास समंतभद्र बोधीसत्व कला दालन असे नाव आहे. या दालनात जगभरातील भाविकांकडून मिळालेल्या प्राचीन वस्तू आपल्याला पहावयास मिळतात. या दालनात बुद्धांची कमळावर पद्मासनात असलेली भव्य मूर्ती आहे. त्यांच्या एका हातात ज्ञानाची तलवार तर दुसऱ्या हातात कमळ आहे. 

या मंदिराचे असलेले मुख्य आकर्षण म्हणजे चौथा मजला. येथे पूर्ण सोन्यापासून तयार केलेला भव्य स्तूप आहे. पाचू आणि माणके यांचाही या स्तूपात वापर केलेला आहे. या स्तूपावर बुद्धांचा दात ठेवलेला आहे आणि तो आपण व्यवस्थितपणे पाहू शकतो. 

बुद्धांच्या दाताची कथा 
ख्रिस्तपूर्व ५४३ मध्ये बुद्धांचे महानिर्वाण झाले. त्यावेळी त्यांना कुशीनगर येथे चंदनाच्या चितेवर अग्नी देण्यात आला. अंतिम संस्कारानंतर बुद्धांच्या शिष्या आणि मगध देशाचे राजे बिंबिसार यांच्या पत्नी क्षेम यांनी डावा सुळा काढून घेतला. नंतर तो त्यांनी ब्रह्मदत्त राजाकडे त्याची पूजाअर्चा करण्यासाठी सोपविला. दंतपुरी (आताचे पुरी) शहरात ठेवलेला तो दात ब्रह्मदत्त राजाचा अमूल्य ठेवा होता. हा दात ज्याच्याकडे आहे त्यालाच तेथे राज्य करण्याचा अधिकार आहे असे त्यावेळी मानले गेले होते. त्यानंतर सुमारे ८०० वर्षांनंतर कलिंग देशाचा राजा आणि राजा पांडू यांच्यात या दातासाठी युद्ध झाले. कलिंगातील युद्धानंतर या ऐतिहासिक मौल्यवान ठेवेचे जतन व्हावे आणि हा ठेवा शत्रूच्या हाती पडू नये म्हणून राजा ब्रह्मदत्त याने राजपुत्र दंत आणि राजकन्या हेममाले यांच्या हस्ते तो श्रीलंकेत पाठविला. परकीयांच्या आक्रमणामुळे अनेक ठिकाणी हा दात हलविला गेला आणि प्रत्येक ठिकाणी त्याचे मंदिर उभारण्यात आले आणि सरतेशेवटी कॅंडी येथील स्तूपात तो ठेवला गेला. श्रीलंकेचे तत्कालीन अध्यक्ष रणसिंगे प्रेमदासा यांनी १४ मार्च १९९२ मध्ये सिंगापूरचे शी फाझो यांना तो दात अर्पण केला आणि १५ मार्च १९९२ रोजी सिंगापूरच्या चांगी विमानतळावर त्याचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. 

याच दालनात ध्यानधारणा करण्याची सोय असून अनेक लहान मुले-मुली ध्यानात बसलेली मी पाहिली. याच्या वरच्या मजल्यावर विविध फुले आणि झाडांची बाग केलेली आहे. येथे एक भव्य वैराचन बुद्ध चक्र आहे. त्यावर काही मंत्र कोरलेले आहेत. हे चक्र फिरविताना मंत्रोच्चार करून फिरवले जाते. या मंदिरात प्रवेश करताना आपले पूर्ण अंग झाकले गेले आहे याची दक्षता घ्यावी लागते. अन्यथा प्रवेश नाकारला जातो. पुरुष अथवा महिला तोकड्या कपड्यात आल्या तर तेथे शालींची व्यवस्था केलेली आहे. मंदिर परिसरात मांसाहार वर्ज्य आहे वा मांसाहार करून या मंदिरात जाऊ नये. मंदिरात फिरताना आपल्यालाही मनःशांती लाभते आणि सकारात्मक ऊर्जाही जाणवते. या मंदिरातील अनेक मूर्त्यांची नावे संस्कृतमध्ये असल्याचे लक्षात येते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या मंदिराला भेट दिल्याचे तेथे सांगण्यात आले. सिंगापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांनी हे मंदिर अगदी आवर्जून पहावे. 

संबंधित बातम्या