निसर्गसौंदर्याने नटलेले कुर्ग

सुजाता लेले
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पर्यटन
 

कुर्गला भारताचे स्कॉटलंड असे म्हटले जाते. कोडायू म्हणजेच कुर्ग. कर्नाटकातील (south-west of India)थंड हवेचे ठिकाण. आजकाल गूगलवर सर्च केले, की आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाची भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती, परिसरातील प्रेक्षणीय स्थळे, कसा प्रवास कराल, तिथल्या हॉटेल्सची नावे याबद्दलची माहिती कळते. त्यामुळे असे काही न लिहिता आम्हाला या सहलीतून जे रिलॅक्सेशन मिळाले, ते आमच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, म्हणूनच कुर्गच्या सहलीचे वर्णन जरा वेगळ्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कुर्गला नैसर्गिक सौंदर्य आणि प्रदूषणमुक्त हवा या महत्त्वाच्या गोष्टींचे वरदान मिळाले आहे... याचा उल्लेख मात्र करायलाच हवा!

आमची मुले ज्युनिअरला असल्यापासून आमची भिशी सुरू आहे. मुले लहान होती त्यावेळी मुलांना घेऊन, मग मुले मोठी झाल्यावर आम्ही आमच्या आमच्या सहलीला जात होतोच. यंदा आमच्या भिशीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली... आणि एकीकडे आम्ही पन्नाशी ओलांडली असल्यामुळे, म्हणजे हळूहळू यंग सिनिअर्स होऊ घातल्यामुळे ट्रिप जरा हटके करू असे ठरले. आमच्या ग्रुपमधल्या आमच्या दोघी मैत्रिणींनी आजपर्यंत विमानाने प्रवास केला नव्हता. त्यामुळे ट्रिपचे ठिकाण विमानाने जाता येईल असे निवडले. विमानाची तिकिटे आणि कुर्गच्या सहलीची जबाबदारी साधना आणि तिच्या मुलीने पार पाडली. आम्ही पूर्णवेळ गृहिणी असल्यामुळे सहल जरी जानेवारीमध्ये ठरविली होती, तरी जुलैपासून आम्ही थोडी थोडी रक्कम साधनाकडे जमा करत होतो. त्यामुळे सर्व जणींना सोयीचे गेले. पुढची सहल जेव्हा केव्हा काढायची असेल तेव्हासाठी पैसे जमा करण्याचा एक अनुभव मिळून गेला. असो! दर महिन्याला भिशीच्या दिवशी रक्कम जमा करण्याच्या निमित्ताने कुर्गला काय काय धम्माल करायची याची चर्चापण व्हायची, कारण या सहलीमुळे आम्हाला रिलॅक्सेशन मिळणार होते. मुला-मुलींची लग्ने झाली होती, काहीजणी आजी झाल्या होत्या, तर काहीजणी होण्याच्या मार्गावर होत्या... यातून प्रत्येक स्त्रीला मोकळीक मिळायला हवी असते. म्हणूनच महिलांनी कोणत्यातरी निमित्ताने का होईना मधूनच असा बदल करावा... रिलॅक्सेशन महत्त्वाचे असते.

म्हणता म्हणता जानेवारी महिना सुरू झाला. प्रथमच विमानप्रवास करणाऱ्या सख्यांना खिडकीची तिकिटे दिली. जेमतेम एका तासाचा प्रवास पार पडला. नंतरचाच प्रवास पाच/सहा तासांचा होता. विमानतळावरून बाहेर पडलो त्याचवेळी प्रथमच प्रवास करणारी सुनंदा म्हणाली, ‘माझी हँडबॅग बेल्टच्या इथेच राहिली,’ असे म्हणत जिथून बाहेर पडलो तिथूनच ती जाऊ लागली. पण तसे जाता येत नाही, ज्या विमानाने प्रवास केला होता त्या कंपनीचा माणूस आल्यावर ती बॅग मिळाली. यातून दोन अनुभव शिकायला मिळाले; एक म्हणजे भान ठेवून मोबाईलवर फोटो काढायचे, कारण कधी एकदा व्हॉट्सॲपवरून पाठवतो याची घाई असते. त्या नादात अशा घटना घडतात. दुसरे म्हणजे सहलीला जाताना स्वतःच्या सामानाबरोबर सहचाऱ्यांचे सामान चेक करायचे. सुरुवातीलाच हे दोन महत्त्वाचे अनुभव मिळाले.

पहाटे उठलो होतो त्यामुळे झोप येत होती. त्यात चिकार थंडी, सर्वत्र धुके अनुभवत प्रवास सुरू झाला. पण गप्पा, गाणी, बैठे खेळ सुरू केले त्यामुळे झोप उडाली. कुर्गला जाताना गोल्डन बुद्ध टेम्पल बघितले. बुद्धाच्या विविध मुद्रा असलेल्या मूर्ती बघितल्या, टेम्पलमधली शांतता अनुभवली. आपल्या देवळांमध्ये बरेच जण स्तोत्र, जप इ. मोठ्याने म्हणतात किंवा काही जण प्रदक्षिणा घालताना टाळ्या वाजवतात. अर्थात प्रत्येक धर्माच्या परंपरा, रूढी वेगवेगळ्या असतात... असो! त्या टेम्पलमध्ये स्वच्छता इतकी, की सर्व मूर्त्यांचे प्रतिबिंब फरश्यांवर पडले होते. पण असे वाटत होते, की फरशी नसून आरसे आहेत. इतक्या फरश्या स्वच्छ होत्या. तर, टेम्पलच्या बाहेर विविध वृक्ष-वल्लरींनी बहरलेली बाग बघितली. तिथे असंख्य चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळाला. त्याचबरोबर पाण्याच्या कुंडात काही कावळे पाणी पीत होते, तर काही कावळे पाण्यात डुबक्या मारत होते. खूप कावळे-चिमण्या एकाच ठिकाणी बघायला मिळाल्यावर त्यांचा फोटो आणि व्हिडिओ घ्यायचा मोह आवरता येणे शक्यच नव्हते. जे ठिकाण बघतो तेवढेच बघायचे आणि पुढे जायचे असे न करता आजूबाजूचा परिसरपण अनुभवायचा, म्हणजे काहीतरी हटके बघायला मिळते.

पहाटेपासून सुरू झालेला प्रवास संध्याकाळ होत आली तरी संपला नव्हता. खरे सांगायचे तर कंटाळलो होतो, पण बघता बघता मातीच्या पायवाटेवर आमची मिनिबस कधी आली ते कळालेच नाही. दोन्ही बाजूला दाट झाडी, काही झुडुपांवर रंगीबेरंगी फुलांची रंगपंचमी बघावयास मिळत होती. दूरवरून कॉफीचा वास येत होता. अशा दाट झाडी असलेल्या मातीच्या रस्त्यावरून खूप आत गेलो. शेवटी तीन दिवस राहणार होतो त्या निसर्गरम्य ठिकाणी पोचलो आणि तिथले निसर्ग सौंदर्य पाहून तर प्रवासाचा उरलेला शीणसुद्धा केव्हाच निघून गेला. त्यादिवशी पौर्णिमा होती. प्रदूषणमुक्त हवा असल्यामुळे आकाश निरभ्र दिसत होते. त्यामुळे पूर्ण चंद्र पाहून ती चांदणी रात्र जागून काढावीशी वाटली. पहाटेच उठलो होतो. कंटाळलो होतो. पण विविध गुणदर्शनाचा मोह आवरता आला नाही. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी कुठे जायचे नसल्यामुळे लवकर उठायचे नाही असे आम्ही ठरवले होते. चार दिवस सगळे काही ‘आयते’ मिळणार होते. त्यामुळे आम्ही ‘रिलॅक्स’ होतो.

पण हवाच इतकी फ्रेश होती, त्यातून थंडीचे दिवस होते. राहत होतो ते ठिकाण आणि परिसर धुक्याने लपेटलेला होता. त्यामुळेच कुर्गला भारताचे स्कॉटलंड का म्हणतात, याचे उत्तर इथला निसर्गच देतो. आमचा मुक्काम होता तिथला परिसर खूप मोठा होता. कॉफीची बाग, मिरीचे वेल आणि इतर वृक्ष-वल्लरी यांनी परिसर नटला होता. लाल गालांचा बुलबूल (red whiskered bulbul), नाचरा, कोतवाल, दयाळ अशा पक्ष्यांच्या सुमधुर आवाजाने झुंजूमुंजू होत असतानाच जाग आली. मग फ्रेश होऊन मॉर्निंग-वॉक करायला निघालो. चालता-चालता पानांवरचे दवबिंदू आमच्यावर पडत होते. ते ओंजळीत घेऊन चेहऱ्यावरून फिरवले. इतके फ्रेश वाटले, की हा फ्रेशनेस कोणत्याही इतर क्रीमने किंवा पावडरीने मिळणारा नव्हता. वृक्षराजींच्या फुलांचा सुगंध साऱ्या आसमंतात दरवळत होता. त्यामुळे अगरबत्ती, धूप, अत्तर, सेंट हे अनैसर्गिक सुगंध या नैसर्गिक सुगंधांपुढे किती फिके आहेत याची जाणीव झाली... त्यांचे महत्त्व फक्त शहरांपुरतेच! इतका अप्रतिम नजारा दिसत होता. प्रदूषणमुक्त हवा आहे, याचा अनुभव मला आला. पुण्यात माझ्या डोळ्यांतून सर्व ऋतूंत पाणी येते, पण इथे मात्र एक टिपूसही पाणी आले नाही. याचाच अर्थ आपण किती प्रदूषणयुक्त हवेत राहतो... असो!

पुढचे दिवस आम्ही तळकावेरी, ओंकारेश्‍वर, राजासिटी सनसेट पाॅइंट बघितले. सनसेट बघायला खूप गर्दी होती. आपल्या इथे महाबळेश्‍वरला सनसेट बघायला त्या पॉइंटवर अशीच गर्दी होते. याच पॉइंटवर गाण्यांच्या तालावर थिरकणारे कारंजे बघितले. निसर्गधाम, मेडिकेरी बाग बघितली. दुबार एलिफंट बागेत सकाळी हत्तींना अंघोळ घालतात. नदी पार करून जावे लागते. त्यासाठी बोटींची सोय आहे, पण नदीला पाणी कमी होते त्यामुळे बोटिंग बंद होते. वाहते पाणी, अधूनमधून गुळगुळीत दगड त्यामुळे घसरायला होत होते. पण एकमेकींच्या मदतीने गेलो. तिथे पोचलो तर एका हत्तीला अंघोळ नको होती. त्यामुळे तो चीत्कार करू लागला. त्या आवाजाने सारा परिसर दणाणून गेला. मनात विचार आला, की समजा माहुताला न जुमानता हा निसटला तर? पण माहूतही हुशार असतात. त्यांना रोजची सवय असते, त्यामुळे त्या माहुताने बाकीचे हत्ती जिथे बांधले होते तिथे यालापण साखळदंडाने बांधले. हे पाहून वाईट नक्कीच वाटले. कारण पैशाच्या हव्यासापोटी आपण या पशुपक्ष्यांना आपल्या ताब्यात ठेवतो. शिवाय त्यांची जंगलेपण कमी केली आहेत. पाळीव हत्तींना अंघोळ घालताना बघण्याचा आमचा हेतू नव्हताच मुळी, नदीच्या पाण्यातून चालायचे होते. हत्तींना त्यांच्या घरात अंघोळ करताना आम्हाला पाहायचे आहे. म्हणूनच याच्या पुढची ट्रिप जंगल सफारी करायची ठरवली आहे.

बघता-बघता बंगलोरला विमानतळावर निघण्याचा दिवस उजाडला. खरे सांगायचे झाले तर आम्ही निसर्ग सौंदर्य पुरेपूर अनुभवले. बाकीची ठिकाणे बघितली. बघता बघता मनमोकळ्या गप्पा मारल्या, सुखदुःखांची देवाण-घेवाण झाली. शिवाय कोणताही विषय वर्ज्य नव्हता. तीन दिवस ‘घर’ विसरलो होतो. भिशी सुरू झाल्यापासून आम्ही संक्रांतीचे हळदी-कुंकू करतो. पण जसे वय वाढू लागले, तसे एकमेकींना वस्तू देण्याचे स्वारस्य संपले, वेगळे काहीतरी करूयात असे वाटू लागले. त्यामुळे आम्ही संक्रांतीच्या हळदी-कुंकवाच्या निमित्ताने काही रक्कम गरजू संस्थांना देऊ लागलो. यावर्षी मात्र आम्ही कुर्गला चार दिवस जिथे राहिलो होतो, तिथल्या सेवेकऱ्यांना काही रक्कम भेट म्हणून दिली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला सहल सार्थकी लागल्यासारखे वाटले. कारण आम्ही जी रक्कम गरजू संस्थांना देत होतो, त्याची पावती आम्हाला मिळते. पण कुर्गला मात्र या पावतीचा आनंद प्रत्यक्ष बघायला मिळाला.

चौथ्या दिवशी पुन्हा बंगलोरला जाताना रंगनाथथिट्टू बर्ड सँक्चुअरीला भेट दिली. डॉ. सालीम अली इको सेंटर असे लिहिले होते. डॉ. सालीम अलींचे नाव आणि तिथे पक्षी बघायला मिळणार नाहीत हे केवळ अशक्यच! तिथे बोटीतून फिरलो. त्यावेळी राखी बगळा, पेंटेड स्टॉर्क, स्पून बगळा, स्नेक बर्ड असे विविध पक्षी बघितले. भारतात घरटी करण्यासाठी येतात. खूप पक्षी असल्यामुळे कलकलाट ऐकायला श्रवणीय वाटत होते. काही पक्ष्यांची घरटी करण्याची लगबग, काही घरट्यात अंडी उबवत होते, तर काही नर-मादी आपल्या पिल्लांना पाण्यातले छोटे मासे, लहान खेकडे, अळ्या, कीटक आणून भरवत होते. हे सर्व अनुभवत पाण्याच्या काठाजवळ बोट जाऊ लागली, तसा पक्ष्यांच्या आवाजात बदल होऊ लागला. आमची बोट जवळ आली म्हणून धोक्याची सूचना देत होते असे वाटले. पण तेवढ्यात अचानक एका मगरीने राखी बगळ्याची शिकार केली, बहुधा मगरीच्या येण्याची धोक्याची सूचना देत होते. कुर्गला निसर्ग सौंदर्य अनुभवले, तर इथे निसर्गाची वेगळीच प्रचिती आली. घरटे करण्याचा, पिल्लांना भरवण्याचा आनंद बघितला, तर दुसऱ्याच क्षणाला शिकार झालेला पक्षी बघितला. म्हणजे एकीकडे शाश्‍वत निसर्ग, तर दुसरीकडे निसर्गाचा खेळ बघितला. असे सुंदर अनुभव गोळा करत आम्ही बंगलोर विमान तळावर पोचलो.

चार दिवस आमचा दंगा सहन करणाऱ्या ड्रायव्हरदादाचे आभार मानले, त्याची ठरलेली रक्कम दिली आणि शिवाय हळदी-कुंकवाची उरलेली रक्कम त्याला भेट म्हणून दिली. त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान हीच हळदी-कुंकवाची सांगता झाली. सहलीचे पैसे उरले होते. त्या रकमेत भर घालून जंगल सफारी अनुभवायची असा बेतपण ठरला. चार दिवसांच्या रिलॅक्सेशनमुळे आमचा आनंद द्विगुणित झाला होता. गृहिणीपद असल्यामुळे असे बदल केले तर टेन्शन फ्री तर होतोच, पण प्रत्येकीला स्वतःबद्दल आत्मविश्‍वास निर्माण झाला. याच स्वतःवरच्या विश्‍वासामुळे परदेश प्रवाससुद्धा करू शकतो अशी खात्री वाटू लागली. भिशीच्या पंचविशीची सहल अविस्मरणीय ठरली. काय बघितले यापेक्षा आमच्या मैत्रीची वीण जास्त घट्ट झाली. पंचवीस वर्षे मैत्री टिकू शकते हे आम्ही दाखवून दिले... यापुढेही राहीलच! शेवटी जाता जाता हेच सांगायचे आहे, की ग्रुप जमवा. सुंदर अनुभव मिळतात. असे म्हणतात की एकटे झाड कधी लावू नये. त्याच्या साथीला दुकटे लावावे. एकटेपणा खायला उठतो. अनेक झाडे लावल्यामुळे निसर्गाचे वैभव वाढते. तसेच अनेकांशी सशक्त मैत्री केली, तर चांगला समाज तयार होतो. राष्ट्राला बळकटी येते. स्त्री विविध कलेतून व्यक्त झाली तर कुटुंब साक्षर होते.

संबंधित बातम्या