सहल उत्तरपूर्वेच्या तीन भगिनींची

प्रा. विश्‍वास पाराशर
सोमवार, 15 जुलै 2019

पर्यटन
 

वैमानिकांचा संप, अनेक उड्डाणे रद्द अशा बातम्या येत असताना एकदाचे विमानात आसनस्थ झालो. विमान वेळेवर गुवाहाटी विमानतळावर पोचले. काही महिन्यांपासून उत्तरपूर्वेच्या दौऱ्याची आखणी केली होती, त्याची सुरुवात झाली. 

पहिला पडाव, मेघालयाच्या राजधानीत शिलाँग येथे होता. गुवाहाटी ते शिलाँग प्रवासात चालकाने दिलेल्या माहितीमुळे काही किलोमीटर हा रस्ता हीच या दोन राज्यांतील सीमारेषा होती हे समजले. त्यामुळे एका बाजूस आसाम तर विरुद्ध बाजूस मेघालय. मध्यप्रदेश व पूर्वीच्या उत्तरप्रदेश मधील चित्रकूट गावांची आठवण झाली. दुसऱ्या दिवशी शालेय जीवनात घोकंपट्टी केलेल्या चेरापुंजीचे दर्शन झाले. दुर्दैवाने गेल्या वर्षी फारसा पाऊस न झाल्याने तेथील वातावरण तसे कोरडेच होते. ‘स्वप्नांचा भ्रमनिरास’ तो हाच असावा. जलप्रपात सुकलेले होते. गाव तसा साधाच, पण अतिवृष्टीचे ठिकाण म्हणून पर्यटकांची वर्दळ बऱ्यापैकी. तेथेच माव्‌स्माई (Mawsmai) गुंफा बघितली. तेथे छतापासून खाली अधांतरी स्तंभ व तळापासून उभे स्तंभ (stalactite, stalagmite) विभिन्न आकारांचे, पण प्रेक्षणीय होते. त्यातून वाट काढताना धडपडणे आलेच. गुहेतून बाहेर पडण्याचा मार्ग अतिशय अरुंद होता. 

यानंतर भेट दिली ती आशिया खंडातील सर्वांत स्वच्छ खेडे ‘मावलीनाँग’ला. गावात प्रवेशासाठी शुल्क होते. सिमेंटचे चकाचक रस्ते, योग्य ठिकाणी स्वच्छतागृहे, वाहनतळ अशी व्यवस्था पाहून छान वाटले. तेथून बांगलादेश दिसावा म्हणून एका उंच झाडावर शेंड्याजवळ बांबूनी बांधलेला निरीक्षण मनोरा होता. तिथपर्यंत पोचण्याचा उताराचा व वळणांचा मार्ग फारच सुरेख होता व प्रवाशांना त्या उंचीवरून खुणावत होता. एकूणच मेघालयात स्थानिक बांबूचा वापर फार मोठ्या प्रमाणात आढळला. त्यापासूनच बसण्याची आसने, सोफे, पलंग, घरांचे छप्पर, भिंती अथवा अंगणातील मांडव करतात. बांबूंच्या विणकामाने तयार केलेल्या कलाकृती फारच मोहक होत्या. कोवळ्या बांबूंचे लोणचेही करतात. प्रत्येक घरासमोर बांबूपासून तयार केलेल्या व अन्य स्मरण वस्तूंचे दुकान हमखास होतेच. त्यामुळे गावाला व्यापारी स्वरूप आलेले आहे. 

यानंतर ‘डावकी’ गावाजवळील नदी बघितली. ही नदी म्हणजे बांगलादेश व भारत यांच्यातील सीमारेखा. त्यामुळे, दोन्ही तीरांवर नागरिकांची गर्दी. या नदीचे पाणी काचेप्रमाणे स्वच्छ व पारदर्शी. तळातील दगडगोटे नुसतेच मोजू शकत नव्हतो, तर त्यांची भूशास्त्रीय ओळखही शक्‍य होती. तेथून जवळच असलेला नदीवरील नैसर्गिक पूल बघितला. झाडांच्या मुळ्या, पारंब्या यांची गुंफण करीत हा पूल केला होता. याला अनेक वर्षांचा कालावधी लागतो. असेच पण एकावर एक दुमजली पूलही अन्यत्र असल्याचे समजले. याचबरोबर, शिलाँगमधील सर्वोच्च ठिकाण (peak), एलिफंट फॉल्स, इको पार्क, रामकृष्ण आश्रम इत्यादी स्थळांनाही भेटी दिल्या. 

खूप पूर्वीपासून उत्सुकता असलेल्या आसाममधील काझिरंगा अभयारण्यातील दोन दिवसांचा निवास फारच आल्हाददायी होता. एकतर रिसॉर्ट सुंदर होते, निसर्गरम्यही होते. तेथील वास्तव्यात हत्तीवरून घडलेली सफर व जीप सफर फलदायी ठरली. प्रत्येक वेळी पुरेसे ऱ्हायनो (गेंडे) दर्शन झाले. अन्य प्राणी व हिमालयातील पक्ष्यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. यानंतरचा मुक्काम जगातील नदीमधील सर्वांत मोठ्या बेटावर म्हणजे ‘माजुली आयलंड’ येथे होता. येथील रिसॉर्ट तर प्रत्येकाला मोहवून गेले. शोधायला त्रास झाला, परंतु त्याच्या नुसत्या दर्शनाने सगळे मोहित झाले. अगदी वेगळ्याच ठिकाणी, पण निसर्गाच्या सान्निध्यात आल्याची जाणीव होत होती. तेथेच रात्री, आमच्या समूहासाठी खास शेकोटी व आसामचे प्रसिद्ध बिहू नृत्य सादर करण्यात आले. हा कार्यक्रम या बेटावरील युवतींनीच सादर करून सगळ्यांचे मनोरंजन केले. येथे आसाम मधील भिन्न पंथ अथवा समुदायांचे मठ व प्रार्थना मंदिरे (आकाराने प्रशस्त) आहेत. त्यांना ‘सत्र’ असे संबोधतात. आसाममध्ये अर्थातच अनेक चहाचे मळे दिसले. बहुसंख्य मळे साधारण सपाटीवरच होते. (केरळप्रमाणे उतारांवर नव्हते.)

यानंतर, अरुणाचल राज्याचा प्रवास सुरू झाला. त्यासाठीचे परवाने आधीच घेतले होते. पहिला मुक्काम तेजपूरला होता. तेथून पुढे (बारटांग नंतर) रस्ता दिवसभरात अधूनमधून सुरू-बंद असतो. त्याची माहिती उशिरा मिळाल्याने दिरांगचा प्रवास बराच लांबला. पोचायला अंधार झाला, थंडी प्रचंड होती, तापमान एक ते दोन अंश सेल्सिअस होते. सर्वजण थंडीने बेजार झालो होतो. आपापल्या कक्षांत जाऊन, ताजेतवाने होऊन व अंगावर चार-पाच थर संरक्षक कपडे परिधान करूनच जेवायला आलो. सकाळी उठल्यानंतरच सर्वांना आपण एका उत्तम व सुंदर जागी असलेल्या हॉटेलमध्ये आहोत याचे भान आले. आसपासचा नजारा अप्रतिम होता. दूरवर बर्फाच्छादित शिखरे, काही ठिकाणी दाट ढग दिसत होते. डोंगरामधून वाहणारी नदी आणि किनाऱ्याने व डोंगर उतारावर सुंदर घरे दिसत होती. लहानपणी सोपे वाटणारे व मनाला भुरळ पाडणारे चित्र प्रत्यक्षात उभे होते.

दिरांगहून पुढे मुख्य आकर्षण तवांगचे होते. मनात धास्ती होती. आधी येऊन गेलेल्या परिचित प्रवाशांना दिरांगहूनच परतावे लागले होते आणि तेही एप्रिल महिन्यात आणि आज पाच मार्च होता. वाटेत ४,१७० मीटर उंचीवर असलेली ‘से ला’ (से खिंड) ओलांडावी लागते. रस्त्यात भूस्सखलनाच्या खुणा दिसत होत्या. परंतु, आपल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अथक प्रयत्नांतून रस्ता लगेचच मोकळा करण्यात येत होता. प्रत्यक्ष खिंडीचा परिसर पूर्णतः बर्फाच्छादित होता. केवळ रस्ता तेवढा मोकळा आढळला. (आमचे भाग्य!) दृश्‍य अप्रतिम होते. सर्वत्र बर्फ, थोडे ढग, ऊन अजिबात नव्हते, परंतु पाऊसही नव्हता. त्यामुळे तेथे थांबून सर्वांनी मुबलक प्रमाणात नयन सुख अनुभवले. प्रवाशांचे सरासरी वय ७० वर्षे होते. त्यामुळे खेळणे दूरच; सुखरूप प्रवास व्हावा एवढीच माफक अपेक्षा. वाटेत मेजर जसवंत सिंह स्मारकाला भेट दिली. तेथे असलेल्या जवानांना भेटलो, संवाद साधला व बरोबर नेलेले ड्रायफ्रुट्‌स त्यांना दिले. आम्हाला सर्वांनाच त्याचा फार आनंद झाला होता. या कार्यात आरती गडकरी यांचा पुढाकार होता. आजही त्या स्वतः या जवानांच्या संपर्कात असतात. 

तवांगला साधारण दुपारी चार वाजता पोचलो व एक निराशाजनक वार्ता समजली, बर्फवृष्टीमुळे पुढील मार्ग बंद होता. त्यामुळे चीनची सरहद, नुरागांग वॉटरफॉल व तेथील तलाव (सध्या त्याला माधुरी लेक म्हणतात) न बघताच परतावे लागले. तवांग मधील स्थानीय गोष्टी म्हणजे मोनेस्ट्री (जी फारच मोठी आहे), तवांग वॉर मेमोरिअल व तेथे दाखविण्यात येणारी चित्रफीत, एका टेकडीवरील बुद्धाचा मोठा पुतळा बघून परतीचा प्रवास सुरू झाला. परतीच्या वाटेवर पुन्हा ‘से ला’ (खिंड) येथे पोचलो. आधीपेक्षाही सुंदर दृश्‍य, स्वच्छ सूर्यप्रकाश, निळेशार आकाश, झळाळणारे बर्फाचे डोंगर, बर्फाच्छादित तळे, डोंगर उतारावर बर्फातून डोकावणाऱ्या उंच उंच व काळसर चिनार वृक्षांच्या रांगा, सारेच मनोहारी! तेथे तासभर थांबलो, गेल्या १२-१३ दिवसांच्या प्रवासाचा शीण गेल्यासारखे वाटले. मन ताजेतवाने झाले. मला तर स्वित्झर्लंड मधील माऊंट टिटलीसची आठवण झाली. 

वाटेत बोमडीलाची मोनेस्ट्री बघून जवळच्या टेंगा गावी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी गुवाहाटीत पोचलो. तेथे कामाख्या मंदिर, कलाक्षेत्र (सांस्कृतिक वारसा दर्शन), शासकीय संग्रहालय इत्यादी बघून ब्रह्मपुत्रा नदीत क्रूझचा आनंद घेत ती संध्याकाळ घालवली. ब्रह्मपुत्रेचे पात्र अति विशाल आहे. क्रूझमधून दिसणारा सूर्यास्तही स्मरणात राहील!     

संबंधित बातम्या