प्रवासातली कवचकुंडले 

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 17 जानेवारी 2019

कव्हर स्टोरी : पर्यटन विशेष
 

पर्यटनाचे विविध प्रकार असतात. त्यामुळे त्या-त्या पर्यटनाला लागणाऱ्या वस्तूदेखील वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. मात्र सर्व प्रकारच्या पर्यटनात एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे सुरक्षितता. खरे तर पर्यटन म्हणजे तुमच्या रोजच्या कम्फर्टमधून बाहेर पडून मुक्तपणे फिरणे. हे करताना आपली सुरक्षिततादेखील तितकीच महत्त्वाची असते, तरच खरा पर्यटनाचा आनंद घेता येतो. आज आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या ट्रीपसाठी कोणती आधुनिक कवचकुंडले बाजारात आली आहेत हे बघूया.

कौटुंबिक ट्रीपसाठी
डोअर नॉब कव्हर : लहान मुले नवीन ठिकाणी बागडण्यास अतिशय उत्सुक असतात. नेहमीचे घर त्यांना एवढे नवीन नसते. हॉटेलसारख्या नव्या ठिकाणी गेल्यावर हॉटेलमधील रूमचे आणि बाथरूमची दरवाजे येथे हे डोअर नॉब लावणे मुलांसाठी अतिशय सोयीचे सुरक्षेच्या दृष्टीने चांगले आहेत. 

वायरलेस बेबी मॉनिटर : तुम्ही जेव्हा एखाद्या हॉटेल किंवा भाडेतत्त्वावर एखादी अपार्टमेंट घेतली असेल, तर हे गॅजेट्‌स अतिशय उपयुक्त ठरेल. जेव्हा तुम्ही सर्व कुटुंबीय स्वीमिंग पूलमध्ये किंवा समोरच्या समुद्र किनाऱ्यावर आनंद लुटत असता, तेव्हा या मॉनिटरद्वारे तुम्ही बाळाकडे लक्ष ठेवू शकता. यावर खोलीतील तापमान दिसते. याशिवाय यावरील रिमोटमुळे झूम करून बाळाकडे बघू शकता. यांच्या रिमोटची रेंज ३०० मीटर पर्यंत असते. त्यामुळे तुम्ही हॉटेलच्या आसपास सहज फिरू शकता. 

टॉयलेट सॅनिटायजर स्प्रे आणि अँटीबॅक्‍टेरिया वाईप्स : नव्या ठिकाणी गेल्यावर लहान मुलांना संसर्गजन्य आजारांपासून सॅनिटेशन अत्यंत गरजेचे असते. याशिवाय महिलांना देखील इन्फेक्‍शन होण्याची शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी टॉयलेट सॅनिटायजर स्प्रे आणि अँटीबॅक्‍टेरिया वाईप्स यांचा वापर करावा. टॉयलेट सीटवर, विमानात सॅनिटायजरचा देखील उपयोग होतो.

रोड ट्रिप
कार सेफ्टी टिप्स : तुमचे रोड ट्रीपचे प्लॅन आपत्कालीन रोड कीटशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. वाटेत एखाद्या गोष्टीची अडचण आली तरी हे इमर्जन्सी कार कीट तुम्हाला नक्की मदत करेल. यामुळे कार ब्रेक डाऊन झाल्यास, आग लागल्यास, अपघात झाल्यास अशा आपत्कालीन परिस्थितीतीतून तुम्ही सुरक्षित राहू शकता.  
  या सर्व प्रकारच्या गॅझेट्‌स आणि ॲक्‍सेसरीज घेऊन प्रवासाला गेलात तर तुमची ट्रिप नक्कीच सुखकारक आणि सुरक्षित होईल.

सोलो ट्रॅव्हलर
ट्रॅव्हल लॉक : जेव्हा तुम्ही एकट्याने प्रवास करता त्यावेळी तुमच्याबरोबर दुसरे कोणीही सामानावर लक्ष ठेवायला नसते, तसेच एकट्याने बसने प्रवास करताना, हॉटेलमध्ये गेल्यावरही बाथरूमला जाताना बाहेर कोणी नसते. अशा वेळी ही लॉक दिसायला अतिशय छोटी परंतु अत्यावश्‍यक वस्तू ठरते. शक्‍यतो केबल लॉक असल्यास तुम्ही तुमची सर्व बॅग्ज एकत्र ठेवू शकता. यामुळे ट्रेनने प्रवास करतानादेखील सर्व सामान सुरक्षित राहते. 

अत्यावश्‍यक फोन नंबरचे कार्ड : तुमच्या सामानात नेहमी एक सर्व अत्यावश्‍यक नंबर लिहिलेले कार्ड ठेवावे. हे कार्ड शक्‍यतो तुमच्या वरच्या बॅगेत ज्यात तुम्ही फोन आणि इतर महत्त्वाच्या वस्तू ठेवता त्यातच हे कार्ड ठेवावे. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. 

वॉटर प्युरिफायर : जेव्हा तुम्ही एखाद्या दुर्गम भागात किंवा जास्त दिवस पर्यटनाला जाता तेव्हा प्रत्येक ठिकाणी पिण्यायोग्य पाणी मिळेलच असे नाही. यासाठी काही गोळ्या मिळतात त्या पाण्यात टाकून कमीत कमी वेळात पाणी प्युरिफाय करता येते. याशिवाय हाताळण्याजोगे प्युरिफायर देखील मिळतात. हे शक्‍यतो जंगल सफारीला जाताना बाळगल्यास पिण्यायोग्य पाण्याच्या समस्या सुटतील.

महिला पर्यटकांसाठी
डोअरस्टेप अलार्म : महिला पर्यटकांनी प्रवासात तसेच हॉटेल रूममध्ये सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. हॉटेलमधील रूममध्ये सुरक्षतेची काळजी घेण्यासाठी डोअरस्टेप अलार्म हे अतिशय सुरक्षित गॅझेट आहे. हे गॅझेट दाराच्या इथे लावायचे अत्यावश्‍यक वेळी त्याचा आवाज प्रचंड मोठा आहे. जर समजा तुम्ही आत असताना कोणी अचानक दार उघडण्याचा प्रयत्न केला तर दार घट्ट अडकून राहते. यामुळे तुमच्या खोलीत होणारी घुसखोरी देखील थांबवता येते. 

सिक्‍युरिटी मनी बेल्ट : एकट्याने प्रवास करताना आपली क्रेडिट कार्ड, पासपोर्ट, व्हिसा, पैसे हे सर्व कायम तुमच्या बरोबरच असावे यासाठी एक सिक्‍युरिटी मनी बेल्ट बनवला आहे. हा तुमच्या कपड्यांवर सहज लावू शकता. हा बेल्ट तुमचे सर्व डॉक्‍युमेंट सुरक्षित ठेवतो. 

सुरक्षेची शिटी : हे थोडे विनोदी वाटले, तरी एक लाइफ सेव्हर म्हणून काम करते. तुमच्या हॅडबॅगेत ही एक छोटीशी शिटी ठेवावी. अचानक तुम्हाला मदतीची गरज पडेल तेव्हा मदतीसाठी ही शिटी वापरून लक्ष वेधून घेऊ शकता.

मौल्यवान वस्तूंची काळजी
टॅग लॉस्ट अँड फाऊंड टॅग्स : तुम्हाला तुमच्या सामानाच्या बॅग्ज हरविण्याची भीती बाळगण्याची गरज नाही जेव्हा तुम्ही प्रवासात लॅपटॉप किंवा यासारखी गॅजेट्‌स बाळगता तेव्हा टॅगिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो. या टॅग्जवर तुमची नोंदणी करून ठेवल्यास ते हरवल्यास शोधण्यास सोपे जाते. 

स्लॅश प्रूफ दे पॅक : हे एक पैसा वसूल ॲक्‍सेसरी आहे. कारण हा पूर्णपणे चोरांपासून सुरक्षित असा आहे. त्यामुळे बहुतेक ट्रॅव्हल लव्हर्सच्या फेवरेट लिस्टमध्ये आहे. ट्रॅव्हलिंगसाठी इतर कोणत्याही बॅकपॅकपेक्षा हे अतिशय सेफ आणि बाळगण्यास सोपे आहे. 

ॲक्वास्ट्रोमप्रूफ मिनी फोन केस : पर्यटनात तुमच्याकडील फोन सुरक्षित ठेवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. सर्व आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुमचा फोन पाण्यापासून निश्‍चितपणे सुरक्षित राहतो.जेव्हा तुम्ही एखाद्या साहसी पर्यटनाला जाता तेव्हा बहुतेक वेळा वॉटरप्रूफ गोष्टींची गरज असते.
 

संबंधित बातम्या