‘मी चर्चेला महत्त्व देत नाही’ 

पूजा सामंत 
शुक्रवार, 16 मार्च 2018

गप्पा    
कोट्यवधींचे बजेट असलेला ‘पद्मावती’ हा भव्य दिव्य चित्रपट डब्यातच पडून राहतोय की काय असा संभ्रम निर्माण झाला. पण अखेर मार्ग निघाला आणि चित्रपट प्रदर्शित झाला. या सगळ्या प्रकारावर संजय लीला भन्साली यांनी त्यांची बाजू नुकतीच मांडली..

संजय लीला भन्साली यांनी २०१६ मध्ये ‘पद्मावती’ (पुढे या चित्रपटाचे नाव पद्मावत झाले) या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचा मुहूर्त केला. शाहीद कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण अशी कलाकार मंडळी त्यात आहेत. पण चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी त्याला प्रचंड विरोध झाला, हे सर्वश्रुत आहे. हा विवाद वाढतच गेला आणि ११ डिसेंबर ही प्रदर्शनाची तारीख किमान एक वर्ष आधी ठरली असताना प्रदर्शन बेमुदत पुढे गेले. कोट्यवधींचे बजेट असलेला हा भव्य दिव्य चित्रपट डब्यातच पडून राहतोय की काय असा संभ्रम निर्माण झाला. पण अखेर मार्ग निघाला आणि चित्रपट प्रदर्शित झाला. या सगळ्या प्रकारावर संजय लीला भन्साली यांनी त्यांची बाजू नुकतीच मांडली.. 

आपला ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आपण मीडियाबरोबर बोलत आहात... 
संजय लीला भन्साली : मी फार मुलाखती देत नाही. कमी बोलतो. जे बोलतो ते माझ्या सिनेमाविषयी बोलतो. दुर्दैवाने ‘पद्मावत’चे प्रदर्शन लांबणीवर पडले. वादंग माजले. त्यांच्याशी लढा देताना नाकीनऊ आले. माझा लढा, संघर्ष वर्तमानपत्रांतून येतच होता. ११ डिसेंबरची रिलीज डेट २५ जानेवारी ठरली आणि माझी सुटका झाली. जरा मोकळीक मिळताच मी माझ्या भावना व्यक्त करायचे ठरवले... 

जेव्हा देशभर ही निदर्शने, हिंसा, वाद सुरू होते तेव्हा तुमच्या भावना काय होत्या? चित्रपट प्रदर्शितच होणार नाही असे कधी वाटले का? 
संजय लीला भन्साली : ‘पद्मावत’ हा चित्रपट महाराणी पद्मिनी आणि राजपूत संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासावर आधारित आहे. त्यात खटकण्यासारखे, वादग्रस्त असे काहीही नाही. पण कुठल्या गैरसमजुतींचे लोण पसरत गेले आणि सिनेमाची घोषणा, शूटिंग सुरु झाल्यापासून मला, माझ्या या कलाकृतीला विरोध सुरू झाला. फक्त ‘पद्मावत’च नव्हे, तर माझ्या बहुतेक सिनेमांना कमी जास्त प्रमाणात विरोध होत आला. ‘पद्मावत’चा विरोध कळस ठरला. 
हा विरोध पाहून मी कमालीचा व्यथित झालो. पण माझी टीम, माझे कलाकार यांना निराश होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे मी व्यथित आहे, निराश झालोय हे जाणवू दिले नाही. टूट तो मै भी गया था। लेकिन धीरज से काम लेना था। या पूर्वी ही माझ्या ‘बाजीराव-मस्तानी’ला विरोध झाला होता. त्यामुळे वादविवाद, विरोध याची मला कल्पना आहे. 

विरोध होतो, तर मग ऐतिहासिक विषयांवर चित्रपट का काढता? 
संजय लीला भन्साली : विरोध हा गैरसमजुतींमुळे होतो. ‘पद्मावत’मध्ये काहीही आक्षेपार्ह नाही, असा निवाडा समितीने चित्रपट पाहून केला. भारतीय आणि राजपुतांचा सन्मान वाढवणारा हा चित्रपट आहे. पण कसे कुठून गैरसमजुती निर्माण झाल्या आणि सर्वदूर पसरत गेल्या. यातही एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, पद्मावती महाराणीबद्दल, त्या काळातील इतिहासाबद्दल फारसे संदर्भ उपलब्ध नाहीत. जी काही पुस्तके आहेत त्यावर आणि ‘पद्मावत’ या काव्यावर हा चित्रपट आहे. ऐतिहासिक किंवा मी ‘पिरियड फिल्म्स’ म्हणेन, कॉश्‍च्युम ड्रामा म्हणेन याचे मला अनिवार वेड लहानपणापासूनच आहे. आम्ही दक्षिण मुंबईत राहात होतो. माझे वडीलही (नवीनभाई भन्साली) फिल्ममेकर होते. आमच्या घराजवळच्या अलंकार थिएटरमध्ये मी वडिलांबरोबर १८ वेळा ‘मोगल ए आझम’ पाहिला. के. असिफ यांनी माझ्यावर मोहिनी घातल्यास नवल नव्हते. भव्य दिव्य सेट्‌स, भरजरी पोशाख, राजवाडा, कलात्मकतेची - अभिनयाची श्रीमंती दाखवणाऱ्या या सिनेमाने माझ्यावर गारुड केले. पुढे मी कमाल अमरोही यांचा ‘पाकिझा’ पाहिला. व्ही. शांताराम, राज कपूर, मेहबूब खान, गुरुदत्त यांचे सिनेमे पाहिले; पण तरीही ‘मोगल ए आझम’चे गारुड कायम राहिले. मोठा झालो पण घरची परिस्थिती हलाखीची असल्याने नोकरी करावी लागली. पुढे विधू विनोद चोप्रांचा सहायक झालो. नंतर माझी स्वतःची कंपनी सुरू केली. माझा प्रवास हा असा आहे. माझा पहिला मोठा चित्रपट म्हणजे ‘देवदास.’ यात ग्रॅंजर होते. ‘देवदास’ने मला आत्मविश्‍वास आणि व्हिजन दिले. मी कॉश्‍च्युम पिरियड फिल्म करू शकतो हे मला ‘देवदास’च्या यशाने दाखवून दिले. 
पुढे ‘रामलीला’, ‘बाजीराव-मस्तानी’ हे ही यशस्वी ठरले. ‘पद्मावत’ने आतापावेतो २६० कोटींचा गल्ला जमवला आहे. 

‘पद्मावत’च्या वादातून तुम्ही काय धडा घेतलात? ऐतिहासिक - पिरियड फिल्म्स करणार हाच पूर्णविराम असेल? 
संजय लीला भन्साली : मी टीकेला, टीकाकारांना घाबरत नाही. आईवडील जेव्हा आपल्या मुलांना वाढवतात, त्यांना अनेक अडचणी येतात; पण म्हणून पुढची पिढी पालकत्व नाकारत नाही. के. असिफ असोत, गुरुदत्त किंवा राज कपूर असोत; अनेक दिग्गज मेकर्सना त्यांच्या सिनेमा निर्मिती वेळी अडचणी येत गेल्या पण म्हणून ते काही खचले नाहीत. 
पुढचा चित्रपट ऐतिहासिक असेलच असे नाही आणि नसेलच असेही नाही.. फिल्म मेकिंग इज माय पॅशन.. पिरियड फिल्म्स मेकिंग इज माय लव्ह. त्यापासून दूर होणे मला जमणार नाही. 

सेन्सॉर बोर्डाशीदेखील तुम्हाला लढा द्यावा लागला. चित्रपटाचे शीर्षक बदलून ‘पद्मावत’ करावे लागले.. 
संजय लीला भन्साली : बॉलिवूडच्या अनेक ज्येष्ठ दिग्दर्शकांना सेन्सॉर बोर्डाशी लढा द्यावा लागला. फिल्म मेकिंग हाच एक लढा आहे. मला माझा चित्रपट रिलीज करायचा होता त्यामुळे ‘पद्मावती’चे ‘पद्मावत’ केले तरी त्याबद्दल मी फार खंत बाळगली नाही. माझ्यासाठी सिनेमा रिलीज होणे महत्त्वाचे होते. ‘पद्मावत’ या काव्यावर आधारित ‘पद्मावती’ असल्याने त्यात दुःख करण्यासारखे काहीच नव्हते. सेन्सॉर बोर्डाचे प्रसून जोशी यांचे उत्तम सहकार्य लाभले. अर्थात काही कट्‌ससह सिनेमा रिलीज झाला. पण इन्फर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री, मीडिया सगळ्यांचे सहकार्य लाभले. मी त्यांचा ऋणी आहे. 

ऐश्वर्या बच्चननंतर दीपिका -रणवीर सिंगला तुम्ही रिपीट केलेत.. त्यांचे कोणते गुणविशेष वाटतात? 
संजय लीला भन्साली : दीपिका - रणवीर सिंग नव्या पिढीचे सगळ्यांचे लाडके कलावंत आहेत. मला यांचे कौतुक आहे ते दोघेही कुठल्याही साच्यात बसतात.. रणवीर बाजीराव म्हणून शोभला आणि खिलजी म्हणूनही! दीपिकाही मस्तानी भासली आणि आता पद्मावती म्हणूनही छान दिसली. आमच्यात दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून एक भावबंध निर्माण झाला आहे. 

रणवीर सिंग आजचा आघाडीचा हिरो आहे. त्याला क्रूर खिलजी म्हणून साकारणे तुम्हाला कितपत अवघड गेले? 
संजय लीला भन्साली : रणवीर सिंग बहुत उमदा स्टार ॲक्‍टर है। मी त्याला खिलजीची भूमिका दिला तेव्हा तो आनंदला. पण लवकरच त्याचे कान फुंकण्यात आले. इंडस्ट्रीमधल्या काहींनी त्याला खिलजीची भूमिका करू नकोस असा सल्ला दिला. रणवीर द्विधा मनःस्थितीत माझ्याकडे आला.. मुझे आप पर विश्वास है। मैं खिलजी जरूर करूँगा। असे आश्‍वासन त्याने मला दिले. माझ्यावरचा त्याने दाखवलेला विश्वास सार्थ झाला. त्याच्या हिरो म्हणून असलेल्या कारकिर्दीवर कसलाही नकारात्मक प्रभाव पडणार नाही हे त्याला कळून चुकले. 
शाहीद कपूरचे तसेच काहीसे झाले. दीपिका-रणवीर माझ्यासोबत रिपीट झाले. आमचा दोस्ताना असेल आणि त्यामुळे शाहिदला सापत्न वागणूक मिळेल अशी शंका त्याला होती. पण त्याला आदराची, प्रेमाची वागणूक आम्ही दिली. शाहिदने राजा रतन सिंग अंडर प्ले करून राजाच्या व्यक्तिमत्त्वाला आदरयुक्त स्थान निर्माण करून दिले. 

तुमच्या तऱ्हेवाईक - विक्षिप्त स्वभावाबद्दल बोलले जाते .. तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? 
संजय लीला भन्साली : स्टार्स आपल्या भूमिका करून जातात. पण दिग्दर्शकाला फ्रेम सजवणे, अभिनय, ज्युनिअर आर्टिस्ट्‌स अशा अनेक व्यापांना तोंड द्यावे लागते.. माझ्या पिरियड फिल्म्स असतात. सेटवर एका वेळी किमान  अडीचशे - तीनशे माणसांचा स्टाफ असतो. एकाच वेळी इतक्‍या माणसांना हॅंडल करणे सोपे नाही. एका व्यक्तीची एक बारीकशी चूक सर्व शॉटचा सत्यानाश करू शकते. मी सेटवर प्रत्यक्ष १६ - १८ तास काम करतो. परफेक्‍शनिस्ट आहे मी! कधी तरी माझी चिड चिड होते. त्याला नाइलाज आहे. मी विक्षिप्त आहे हे लेबल लावण्याअगोदर माझ्या कामाची गुणवत्ता पाहावी. अर्थात माझा स्वभाव बदलणे शक्‍य नाही. मी कामाला महत्त्व देतो, माझ्याविषयी होणाऱ्या चर्चेला नाही! 

तुमच्या वर्कोहोलिक स्वभावाबद्दल नेहमीच चर्चा होते. कामातून विरंगुळा कसा मिळवता? डिस्ट्रेस कसे होता? 
संजय लीला भन्साली : मी ज्या दिवशी सेटवर नसतो तेव्हा मी थकलेला - स्ट्रेस्ड असतो. कामाने थकत नाही. काम - अर्थात फिल्म मेकिंग हाच माझ्यासाठी डिस्ट्रेस होण्याचा एकमेव मार्ग आहे...
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या