गोष्ट लाडक्या लाडोबाची 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

पोटपूजा
 

नुकतीच दिवाळी पार पडली. फराळ अनेक घरांमधून केला गेला आणि फस्तही झाला. फराळाचे पदार्थ सगळीकडं नेहमी नेहमी केले जात नाहीत, त्यामुळं दिवाळीत ते आवर्जून केले जातात. पण यातला एक पदार्थ या ना त्या स्वरूपात घरोघरी अधूनमधून होताना दिसतो. तो म्हणजे लाडू. अर्थात गोड आवडत आणि चालत असेल तरच लाडू नियमित केले जातात. करायला सोपा असा हा पदार्थ आहे. वेगवेगळ्या धान्यांच्या आणि त्यांच्या मिश्रणांच्या पिठापासून हरतऱ्हेचे लाडू करता येतात. गोडीसाठी त्यात साखर व गूळ वापरला जातो. इतकंच काय, पण मध, खजूर असे पदार्थही वापरले जातात. तूप हा एक अविभाज्य घटकच आहे लाडूतला! त्याचं प्रमाण तसं कमीजास्त ठेवता येतं. दिवाळीप्रमाणंच सणावारी, श्राद्धपक्षाला, लग्नसमारंभासाठी (यात जोडीला चिवडाही आलाच) असे निरनिराळ्या प्रसंगी लाडू घरोघरी केले जातात. अलीकडं इतर पदार्थांप्रमाणं लाडूही बाजारात हुकमी उपलब्ध असतात. साजूक तुपातले, वनस्पती तुपातले असे दोन्ही प्रकारांतले लाडू मिळू शकतात. आनंद साजरा करताना हल्ली पेढे आणि कधी चॉकलेटंही वाटली जातात. पण लाडू वाटून आनंद साजरा करण्यातली मजा काही वेगळीच... 

‘लाडू’ या शब्दातच एक लडिवाळपणा आहे. बालपणाशी नातं जुळलेला हा पदार्थ तसा मुलांना फार आवडणारा. पण अलीकडं मुलं लाडू जरा कमीच खातात की काय, असं वाटतं. कारण लाडू हवा का? असं विचारल्यावर त्यांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर आनंद दिसेलच, याची बरेचदा खात्री नसते. भारतात सगळीकडं लाडू केले जातात आणि वेगवेगळ्या घटकांपासून लाडू केले जातात. हा एक प्राचीन पदार्थ आहे. त्याचा आकारही सहजपणे बनणारा, वाटोळा असा. हातानं लाडू वळायचा आणि हातानंच तो खायचा. सांडू नये, म्हणून खाली वाटी असली, तर बरं. पण खाताना लाडवासाठी काही वाटी-भांडं पाहिजेच, असं नसतं. ग्रहगोलांशी नातं सांगणारा त्याचा गोलाकार. वाटतं, माणसानं बहुधा गोड पदार्थ करताना पहिल्यांदा लाडूच केला असावा. 

लाडवाला ‘लड्डू’ असा शब्द इतर अनेक भाषांमध्ये आहे. संस्कृतात ‘लड्डुक’ असा शब्द आहे. ‘लाडू’ त्यावरूनच आला. तसंच ‘मोदक’ हा शब्दही पूर्वी लाडूसाठीच वापरला जात असे. गणपतीच्या हिंदी आरतीतही ‘गुड़लड्डू’ असाच शब्द येतो. शरीराचं उत्तम पोषण करणारा पदार्थ म्हणून लाडवाची शिफारस आयुर्वेदही करतो. किंबहुना, लाडवाची सुरुवात पौष्टिक औषध-टॉनिक म्हणूनच झाली. मेथी, डिंक, उडीद यापासून केले जाणारे लाडू पौष्टिक आणि बलवर्धक असतात. त्यात बदाम, काजू, पिस्ते, चारोळी असे घटक घातले जातात आणि त्यांची पौष्टिकता आणखीच वाढते. असे लाडू पचवणं हे ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही. पण अतिपौष्टिकता व जडपणा टाळूनही चविष्ट लाडू करता येतात. लाडवाला तसं काहीही, म्हणजे कोणतंही पीठ वर्ज्य नाही. गहू, तांदूळ, चणाडाळ, मूगडाळ, उडीदडाळ किंवा अख्खे मूग, उडीद, रवा वगैरेंपासूनही लाडू केले जातात. त्याशिवाय साबुदाण्याच्या पिठाचे लाडूही छान होतात. संक्रांतीला केले जाणारे तिळगुळाचे लाडू तर साऱ्यांनाच आवडतात. शेंगदाणे आणि गूळ हे मिश्रण करून केलेले लाडू म्हणजे फारच चविष्ट. पिठीसाखर घालून केले, तर शुभ्र दिसतात आणि त्यांची चव अप्रतिमच लागते. इतकंच काय, पोहे, राजगिरा, साळीच्या लाह्या, अशा वेगवेगळ्या लाह्या आणि कुरमुऱ्याचेही लाडू छान लागतात. हिवाळ्यात मेथी-डिंकाचे आणि अळिवाचे लाडू, गूळ घालून आवर्जून केले जातात. तसे उन्हाळ्यात अळिवाप्रमाणं सब्जा किंवा तुळशीचं बी व नारळाचा चव यांचे लाडू साखर घालून करावेत, म्हणजे उष्ण पडत नाहीत. अळिवाच्या लाडवांप्रमाणं हेही लाडू छान लागतात. साखरेऐवजी गूळ वापरूनही लाडू केले जातात. यात गूळपापडीचे लाडू बहुतेकांना आवडणारे. साखर व गूळ दोन्ही टाळायचं झालं, तर मध, खजूर, खारकेची पूड, दूध वा साय वापरूनही लाडू करता येतात. घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून करता येणारे. लाडू कल्पनाशक्तीला चालना देतात. कशाकशापासून लाडू करता येत नाहीत, याचीच यादी करणं तुलनेनं अधिक सोपं जाईल... 

बुंदी किंवा मोतीचूर पाडून त्याचे लाडू करतात, तसेच साधी शेव पाडून त्याचेही लाडू केले जातात. चवीला ते बुंदीसारखेच लागतात. साधा शिळ्या पोळीचा गूळतूप घालून केलेला लाडूही किती मस्त लागतो. दक्षिणेकडं लाडवात किंवा इतरही काही गोड पदार्थांमध्ये कापूर घातला जातो. तिरुपतीच्या बालाजीचा बुंदी लाडवांचा प्रसाद कापरानं युक्त असतो. अलीकडं बऱ्याच देवस्थानांमधून लाडवांचा प्रसाद मिळतो. लाडवांचे प्रकारही अगणित. बेसन लाडू, रवा-नारळ लाडू, नुसत्या नारळाचे लाडू, खवा वापरून केलेले लाडू, अलीकडच्या डाएटच्या जमान्यात तर ओट्सचेही लाडू केले जातात. थेट पिठीसाखर किंवा गूळ वापरून जसे लाडू करतात, तसेच साखर किंवा गुळाचा पाक करूनही लाडू केले जातात. तिळगुळाच्या लाडवाही पाकातले जरा कडक-कुरकुरीत, तर पाक न करता केलेले ठिसूळ लाडू असे दोन प्रकारे केले जातात. पाक म्हटला, की एकतारी, दोनतारी वगैरे कसरत असते. लाडू बिघडण्याची भीती असते. त्यापेक्षा पिठीसाखर किंवा गूळ किसून वा वितळवून लाडू केले, तर मामला सोपा होतो. नव्यानं करणाऱ्यांना हा मध्यममार्ग बरा वाटतो. लाडवाऐवजी, तयार केलेलं पाकातलं मिश्रण थाळीत थापून त्याच्या वड्याही पाडल्या जातात. वडी ही लाडवाची बहीणच. 

लाडू हा पदार्थ तसा खूप टिकणारा आहे. प्रवासात लाडू खूप उपयोगी पडतात. म्हणूनच बहुधा आपल्याकडं प्रवासी शिदोरीला ‘तहानलाडू, भूकलाडू’ म्हटलं जातं. आपल्याकडं लाडवाला एक सांस्कृतिक महत्त्वही आहेच. सणावारी केले जाणारे लाडू लग्नाच्या रुखवतातही वेगळा आकार घेऊन अवतरतात. रुखवतात बरेचदा मोठ्या आकाराचे लाडू ठेवले जातात. त्यावर कधी वधूवरांची नावंही लिहिली जातात. मोठा लाडू म्हटलं, की मला लहानपणी वाचलेलं ‘जादूचा लाडू टुण टुण टुण’ हे छोटेखानी पुस्तक आठवतं, त्याच्या मुखपृष्ठावरचा भल्यामोठ्या लाडवाच्या फोटोसकट! पदार्थाचा मोठा आकार करण्याची हौस अनेकांना असते. तसे लाडू, केक वगैरे पदार्थ कधी कधी प्रचंड मोठ्या आकारात, कैक मीटर लांबलचक डोसे असे विक्रम केले जातात. आंध्र प्रदेशातल्या तपेश्वरममध्ये मल्लिकार्जुन राव यांनी सुमारे ६५ किलो वजनाचा एक बुंदीचा लाडू २०१६ मध्ये केल्याची नोंद सापडते. त्याचं वजन २९,४६५ इतकं किलोग्रॅम होतं. आंध्र प्रदेशातच २०१२ मध्ये गणेशोत्सवात ६,३०० किलोंचा एक लाडू तयार केल्याची नोंदही आहे. 

लाडवाबाबत काही गमतीशीर गोष्टीही आहेत. लाडवात जर तूप जास्त झालं, तर तो वळून खाली ठेवल्यावर खालून चपटा होतो. याला ‘लाडू बसला’ असं म्हणतात. तर लाडवात तूप कमी झालं, तर तो नीट वळला जात नाही. वळून ठेवला, तरी जरा वेळानं तो फिसकटून जातो. फुटतो. याला ‘लाडू हसला’ म्हणतात. भाषेच्या अशा करामती लाडू करतो. पाठीत बसणारे ‘धम्मक लाडू’ही अनेकांनी खाल्ले असतील. लग्नाचेही लाडू असतात. पण लग्नालाच ‘लाडू’ असं संबोधून, हिंदीत ‘शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो न खाए वो भी पछताए’ अशी म्हण तयार झाली आहे. मध्यंतरी दोन वेगवेगळ्या नावांचे लघुपट आले होते. नीरज पांडे आणि अजय धामा यांनी एकच कथा वापरून हे लघुपट केले, व त्यावरून वादंगही झालं. या ‘लड्डू’पटांची कथा व तिचा संदेश मात्र मनोज्ञ होता. आजोबांच्या श्राद्धतिथीचे प्रसादाचे लाडू देवळातल्या पंडिताला नेऊन देण्याचं काम आई मुलावर सोपवते आणि तो जातो, तर पंडितजी नसतात. मग त्याला मशीद दिसते आणि तेही देऊळच आहे, असं समजतं. मग तो तिथल्या मुल्लाशी बोलतो आणि हे लाडू स्वीकारायला सांगतो. तो तयार होत नाही, पण मुलाची निरागसता आणि युक्तिवाद त्याला ते स्वीकारायला लावतात वगैरे... 

लाडू असा आपल्या जीवनात आणि आठवणीतही खोलवर बसलेला असतो. म्हणूनच मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या ‘सांग सांग भोलानाथ’ गाण्यातही ओळी येतात,

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय लाडू हळूच घेताना आवाज होईल काय 
घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या लहान मुलाला आई लाडू भरलेला डबा देते आणि तो रोज तिची आठवण काढत आनंदानं एक एक लाडू खातो. पण एक दिवस ते संपतातच. डब्यातला शेवटचा लाडू संपवताना त्याला फार दुःख होतं, याचं चित्रण करणारी विंदा करंदीकरांची ‘शेवटचा लाडू’ ही कविताही अशीच हृद्य आहे. ‘उजाडेल उद्या आणखी लाडू मज नाही’ ही यातली ओळ डोळ्यात पाणी उभं करते. 

रवा-बेसन लाडू 
साहित्य : दोन वाट्या बारीक रवा, १ वाटी बेसन (यात उलटंही चालू शकेल, किंवा बेसन जास्तही चालेल), अडीच ते पावणेतीन वाट्या पिठीसाखर, १ ते दीड वाटी तूप, वेलचीपूड. 
कृती : रवा थोड्या तुपात खमंग भाजून घ्यावा. नंतर तो बाजूला ठेवावा आणि अर्धा वाटी तूप वितळवून हळू हळू बेसन घालून खमंग भाजावा. लागेल तसं वरून तूप घालावं. रवा आधी भाजावा, म्हणजे त्याच कढईत बेसन भाजता येईल. आधी बेसन भाजल्यास, ते बाजूला ठेवलं, तरी थोडं चिकटतंच. मग रवा भाजताना ते जळेल. दोन्ही एकत्र करून गार करायला ठेवावं आणि बऱ्यापैकी गार होत आलं, की पिठीसाखर चाळून त्यात मिसळावी. वेलचीपूडही घालावी. वाटल्यास चारोळी, बेदाणे, बदाम-काजूचे तुकडे वगैरेही घालू शकता. हे मिश्रण नीट मळून ठेवावं. लगेच किंवा सावकाशीनं हाताला तूप लावून याचे लाडू वळावेत. 
पर्यायी सूचना : लाडू वळताना एक बेदाणा आणि चारोळी प्रत्येक लाडूत घालूनही वळता येईल. या पद्धतीनं लाडू करणं सोपं जातं. पिठीसाखरेचे असे लाडू पाकातल्या लाडवापेक्षा टिकतातही जास्त. असा लाडू केल्यावर चार दिवसांनी आणखी छान लागतो. मुगाच्या पिठाचे, उडीद-मुगाच्या डाळीचं एकत्रित पीठ घालूनही या पद्धतीचे पिठीसाखरेचे लाडू चांगले होतात. यात साखरेऐवजी नीट किसून गूळही घालता येईल किंवा गूळ जरा गरम करून वितळवून घालावा.

संबंधित बातम्या