खाए चला जा...

नंदिनी आत्मसिद्ध 
गुरुवार, 10 जानेवारी 2019

पोटपूजा
आयुष्य नेहमी चवीनं जगावं, असं म्हणतात. त्यासाठी भरपेट खाण्याची गरज नसते. तर ज्यांच्या नुसत्या बनण्यामुळे, रंगरूप नि चवीमुळे, पोटातला वन्ही जागा होतो, अशा पदार्थांची गरज असते. अशा चवदार पदार्थांच्या रोचक गोष्टी अन्‌ कृती...

मानवी संस्कृतीतला मुख्य घटक म्हणजे माणसाचं खाणं. कच्च्या भाज्या, कंदमुळं आणि फळं हा माणसाचा पहिला आहार. अग्नीचा शोध लागल्यावर माणूस आपलं अन्न शिजवून खायला लागला. आज अग्नी प्रज्वलित करण्याचेही कैक प्रकार आपण बघतो आणि थेट अग्नी न पेटवता, विजेच्या वा सौर चुलीच्या साह्यानंही अन्न शिजवलं जातं. शिवाय, निसर्गतः अन्न जसं मिळतं, तशाच स्वरूपात ते सेवन करण्याचा आग्रह धरून, कच्च्या स्वरूपात व कोणतीही प्रक्रिया न केलेलं अन्न खाण्याची पद्धतही काहीजण जोपासताना दिसतात. अन्न शिजवण्याच्या आणि वेगवेगळे पदार्थ बनवण्याच्या तऱ्हाही किती बहुविध! आंबवून केलेले पदार्थ, धान्य जाडं-बारीक दळून केलेले पदार्थ, चिरण्याच्या व कापण्याच्या विधीही अनेक आणि त्यासाठी लागणारी उपकरणंही तितकीच विभिन्न. दगडी पाट्या-वरवंट्यापासून आणि जात्यापासून ते मिक्‍सर-ग्राइंडर आणि घरघंटीपर्यंतचा प्रवास इथल्या गृहिणीनं केला आहे. 

खाण्याच्या वेगवेगळ्या वेळा, मुलांना व मोठ्यांना डब्यात न्यावे लागणारे पदार्थ, स्वयंपाक करायला मिळणारा वेळ आणि त्याची तयारी व नियोजन यासाठी लागणारा अवधी याचा विचारही महत्त्वाचा ठरतो. आपल्याकडं मुख्यत्वेकरून घरात बाई हीच हे काम सांभाळत असते, त्यामुळं जबाबदारी हाताळताना तिची होणारी तारांबळ व कसरतही खरीच. शिवाय रोज रोज खायला काय वेगळं करायचं? सगळ्या घरांमधला हा प्रश्‍न. त्यात प्रत्येकाच्या आवडी-निवडी आणि नावडी. ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हा संदेश देणारी इथली मूळ शिकवण. पण तरीही, जिभेचे लाड आणि रसपूर्ण खाण्याची इच्छा पुरवल्याशिवाय काही खरं नसतंच. जीवन रसरसून जगण्याची आस सर्वांनाच असायला हवीही. मात्र त्यासोबत आपणच आपल्या पोटावर आणि प्रकृतीवर अत्याचारही करता काम नये. घरात असलेल्या अन्नघटकांचा उपयोग करूनही निरनिराळे पदार्थ करता येतात. स्वतःची चव बदलायलाही शिकलं पाहिजे. पण बरेचदा परंपरेनं चालत आलेल्या पद्धतीनंच पदार्थ करण्याकडं कल ठेवला जातो. जरा इकडं-तिकडं करणं, म्हणजे काहीतरी चूकच, असं मानलं जातं. एखाद्या पदार्थात घालण्याचे घटक आणि तो करण्याची रीत यात किंचित बदल करूनही चवबदल साधता येतो. प्रयोगशीलता ही स्वयंपाकघरातही खूप उपयोगी पडतेच. 

खाद्यसंस्कृतीचा परिणाम हा एकूणच मानवी संस्कृतीवर होत आला आहे. खाणं आणि खिलवणं हा तर संस्कृतीचा अविभाज्य घटकच असतो. पाटावर बसून जेवण करण्याची आपली घरोघरची पद्धत आता सरसकट दिसत नाही. अलीकडं तर डायनिंग टेबलभोवती बसून गप्पा मारत एकत्र जेवण्याचं प्रमाणही कमी होत चाललं आहे. त्याऐवजी हातात ताट घेऊन, टीव्हीसमोर बसून प्रत्येकजण आपलं जेवणखाण करताना दिसतो. तेही प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार व सोयीनं करत असतो. लग्नकार्यांमधून दिसणारी आपल्याकडची पंगतीची पद्धतही आता कमी होत गेली आहे. पंगतीची जागा आता बुफे प्रकारानं काबीज केली आहे. हातात स्वतःचं ताट घेऊन आपल्याला हवं ते, हवं तितकं वाढून घ्यायचं आणि मांडलेल्या टेबलखुर्चीवर जागा मिळाली नाही, तर ते तसंच हातात ठेवून उभ्यानंच जेवायचं, हा प्रकार आपल्याला नवीन नाही. तर, मधोमध दस्तरख़्वान अंथरून त्याभोवती बसून, गप्पा मारत, मेजवानीचा आनंद घेण्याची इस्लामी देशामधली पद्धत आणखीच वेगळी. ईदसारख्या विशेष प्रसंगी याच पद्धतीनं मुस्लिम घरांमधून भोजनसमारंभ होतात. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘दावत-ए-इश्‍क़’ या हिंदी चित्रपटात या ‘दस्तरख़्वान’ शब्दाची योजना शीर्षकगीतात गीतकार कौसर मुनीर यांनी केली होती, हे आठवतं - ‘दिल ने दस्तरख़्वान बिछाया, दावत-ए-इश्‍क़ है। है क़बूल तो आ जाना, दावत-ए-इश्‍क़ है’ वाह्‌! क्‍या ख़ूब! एरवी असा खास शब्द बॉलिवूडमध्ये सापडणं जरा मुश्‍कीलच. तर, खाणंपिणं हे आपल्या दैनंदिन जीवनात, त्याच्या विविध रसरंगांनी रुजलेलं असतं. सजलेलं असतं. 

खाण्यापिण्यावरून आणि अन्नघटकांवरून त्या त्या भाषेत रुजणाऱ्या शब्दांची आणि क्रियापदांची संख्या तर बघायलाच नको. ज्या गोष्टीचा रोजच्या जगण्याशी जवळचा संबंध, तिचा माणसाच्या भाषांवर परिणाम न घडला, तरच नवल. मराठी भाषेचाही याला अपवाद नाही. मध्यंतरी मॅक्‍सिन बर्नसन यांचं मराठी भाषेच्या विशिष्ट वळणावर आणि शब्दप्रयोगांवर भाष्य करणारं भाष्य सोशल मीडियावर फिरत होतं. मराठी भाषेच्या प्रेमात पडून, त्या अमेरिका सोडून इथं, फलटणमध्ये स्थायिक झाल्या. त्याआधी हैदराबादेत राहिल्या, त्या सातवळेकर कुटुंबात. त्यामुळं मराठी भाषा आणि तिचा ठसका त्यांना अगदी परिचयाचा झाला. मराठीत माणसं किती सहजपणं कठोरपणा व्यक्त करतात, असं त्यांना वाटतं, नि ते बरोबरच आहे. शिवाय मराठी लोक किती तरी गोष्टी ‘खात’ असतात, हेही त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ते लोकांच्या नजरेसही आणून दिलं. मराठीत माणसं बोलणी खातात, डोकं खातात, वेळ खातात, पैसे खातात, अक्षरं खातात, पड खातात, हार खातात, कधी तर ती शेणही खातात...अशा प्रकारची टिप्पणी मॅक्‍सिनमावशींनी (याच नावानं त्या प्रसिद्ध आहेत) केली आहे. खरंच आहे की, खाणं माणसाची भाषाही घडवत असतं. शोधलं, तर असे वाक्‍प्रचार इतरही भाषांमधून सापडतीलच. इंग्रजीतही आपण एखादी गोष्ट चुकल्याचं कबूल करण्याला किंवा आपलं म्हणणं मागं घेण्याला म्हणतोच, ‘इटिंग वर्डस.’ एखाद्याला जर आपल्या चुका कबूल करणं भाग पडलं, तर ‘इटिंग हंबल पाय’ असा वाक्‍प्रचारही वापरला जातो. उर्दू-हिंदीत शपथ घेण्याला ‘क़सम खाना’, ‘सौगंध खाना’ असं म्हणतात. हे ‘सौगंध खाणं’ आलंय मात्र फ़ारसी भाषेतून! फ़ारसीत ‘सौगन्द ख़ूर्दन’ याचा अर्थ शपथ घेणं. त्या भाषेतही खाण्यावरून कैक वाक्‍प्रचार व क्रियापदं बनली आहेत. उदाहरणार्थ, खाली पडणं - ‘ज़मीन ख़ूर्दन’, पराभव होणे - ‘शिकस्त ख़ूर्दन’, कंप पावणं - ‘तेकान ख़ूर्दन’, दुःखी होणं - ‘ग़म ख़ूर्दन’ इत्यादी हिंदी-उर्दूत ‘आँसू पीना’ असं क्रियापद वापरलं जातं. तर बंगाली भाषेत ‘खाणं’ हेच क्रियापद ‘पिणं’ या अर्थानंही वापरलं जातं. ‘चाय खाबेन?’ असं विचारलं, तरी ‘चहा पिणार का?’ असाच त्याचा अर्थ असतो. 

अन्न शिजवण्याच्या किंवा भाज्या, फळे इत्यादी चिरण्याच्या वगैरे क्रिया असतात, त्यावरूनही भाषेत वाक्‍प्रचार वा वाक्‌संप्रदाय बनतात. एखाद्याला दम देऊन सक्त कारवाईचा इशारा देताना म्हणतात, ‘तुझा खिमा करीन’, ‘तुझी खांडोळी करीन’ इत्यादी खांडोळी हा विदर्भातला झणझणीत असा एक पदार्थ आहे, जो मसालेदार सारण भरून विशिष्ट प्रकारे केला जातो. त्यावरून ‘खांडोळी करणं’ हा वाक्‍प्रचार आला. ‘डोक्‍यावर मिऱ्या वाटणं’, ‘नाकाला मिरच्या झोंबणं’, ‘एखाद्याला कूट कूट कुटणं’, ‘तिखटमीठ लावून सांगणं’, ‘मनात मांडे खाणं’, ‘मार खाणं’, ‘थप्पड खाणं’, ‘खार खाणं’, ‘अपमान गिळणं’, ‘मूग गिळून गप्प बसणं’... अशी आणि अजूनही कितीतरी क्रियापदं मराठीत रुजली आहेत. ‘खाए चला जा’ हा आपला मराठी बाणा आहे, असं म्हणायला हरकत नाही. एकूण काय, तर मराठी भाषेनं खाण्यातले कैक शब्द अक्षरशः ‘पचवले’ आहेत...

टोमॅटोच्या सारातले गोळे 
साहित्य : चार-पाच पिकलेले दळदार टोमॅटो, दीड वाटी चण्याची डाळ, आवडीनुसार तिखट, तेल, मीठ, गूळ, जिरं व इतर फोडणीचं साहित्य. 

कृती : सुरुवातीला चणाडाळ पाण्यात चार-पाच तास भिजत घालावी. भिजलेली चणाडाळ उपसून ठेवावी व अर्ध्या तासानंतर चमचाभर जिऱ्याबरोबर मिक्‍सरमधून वाटून घ्यावी. पाणी घालू नये. वाटलेल्या डाळीत थोडंसं मीठ व तिखट घालून मळून ठेवावे. टोमॅटो पाण्यात उकडून घ्यावे. गार झाल्यावर सालं काढून मिक्‍सरमधून काढावे व हे मिश्रण गाळून घ्यावे. आधी डाळ वाटून घेऊन, त्याच मिक्‍सरच्या भांड्यात टोमॅटो फिरवून घ्यावे, म्हणजे भांड्यात राहिलेला डाळीचा अंश त्यात उतरेल. कढईत वा पातेल्यात तेल तापवायला ठेवावे आणि मोहरी, जिरं, हिंग घालून फोडणी करून त्यात टोमॅटोचं मिश्रण घालावं. चवीनुसार मीठ, तिखट, गूळ घालावा. (मीठ व तिखट डाळीत घातलेलं असल्यामुळं पाहिजे त्या प्रमाणात ते यात घालावं.) उकळी येऊ द्यावी. चांगलं खळाळलं, की त्यात वाटलेल्या डाळीच्या मिश्रणाचे गोळे करून सोडावे. गॅस बारीक करून उकळू द्यावं. गोळे शिजू द्यावेत, हलवू नये, म्हणजे ते फुटणार-तुटणार नाहीत. उकळत्या सारात शिजतील. मागं उरलं असलं, तर वाटणात थोडं पाणी घालून या सारात घालावं. त्यामुळं जरा दाटपणा येईल. सारातले गोळे तयार. वरून कोथिंबिरीनं सजवावं आणि भाताबरोबर वा भाकरी-पोळीबरोबर खायला घ्यावं. आवडत असल्यास पानातल्या गोळ्यावर वरून लसूण-सुकी मिरची घालून केलेली चरचरीत अशी फोडणी घालून घ्यावी. 

पर्यायी सूचना : हे गोळे कढीतही करता येतात. खरं तर ते मूळचे कढीगोळेच आहेत. पण अनेकांना ताकाची कढी आवडत नाही. हे गोळे टोमॅटोच्या सारातही छानच लागतात. चणाडाळ व मूगडाळ किंवा नुसतीच मूगडाळही वापरून ते करता येतील. आवडत असेल, तर सारात लहान चमचाभर काळा मसालाही घातला तरी चांगली चव येते. 

लाल भोपळ्याची दशमी 
साहित्य : तीन वाट्या लाल भोपळ्याचा कीस, (कीस कच्चाच घ्यायचा आहे. भोपळ्याचा रंग जितका गडद, तितकं उत्तम), पाऊण वाटी गूळ किसून वा लहान तुकडे करून, चवीनुसार मीठ, तिखट, हिंग, हळद, किंचित ओवा, गव्हाची कणीक, थोडं चणाडाळीचं पीठ, तेल, थोडे तीळ. 

कृती : लाल भोपळ्याचा कीस घेऊन त्यात किंचित तेल, ओवा, चमचाभर तीळ व तेल आणि मीठ व गूळ मिसळून घालून बाजूला ठेवावं. अर्ध्या तासात त्याला पाणी सुटेल, गूळ मऊ होईल. हे मिश्रण कालवून घेऊन त्यात बसेल इतकी गव्हाची कणीक घालावी. जोडीला थोडं चणाडाळीचं पीठही घातलं तरी चालेल. हे पीठ जरा घट्ट मळून घ्यावं, फार सैल नको. छोटे छोटे गोळे करून फुलक्‍याच्या आकारात लाटून घ्यावे आणि तव्यावर तेल सोडून भाजून घ्यावे. काकवी वापरत असाल, तर गुळाऐवजी तीही घालू शकता. 

पर्यायी सूचना : यात वेगवेगळी पिठंही वापरता येतील. भोपळा कच्चाच वापरा. गूळ आवडीनुसार वापरा, पण याला गोडसर आणि तिखट चव असली, तर स्वाद फारच छान येतो. तेल अजिबात न टाकताही पोळीसारखं भाजून दशमी करता येते. वाटल्यास वरून तूप घेऊन खाता येईल. या दशमीबरोबर कैरीचं वा लिंबाचं लोणचं खावं. तशीच नुसतीही खाल्ली तरी चव अप्रतिमच लागते.

बीटचा हलवा 
साहित्य : तीन बिटाचे कंद, साखर, साय, थोडं तूप, वेलचीची पूड, हवं असल्यास वरून सजवण्यासाठी बदामाचे काप, काजूचे तुकडे इत्यादी. 

कृती : बीट कुकरमध्ये उकडून घ्यावे. गार झाल्यावर सालं काढून किसून घ्यावे. जाड बुडाच्या पातेल्यात व कढईत थोडं तूप घालून जरा परतून घ्यावं. मग त्यात साय घालावी आणि शिजू द्यावं. जरा आळलं, की साखर घालून ढवळावं. घट्ट होत आलं, की वेलचीची पूड घालावी. बदामाचे काप, काजूचे तुकडे इत्यादी घालून सजवावं. 

पर्यायी सूचना : बीट कच्चं किसूनही हलवा करू शकता. पण सुरुवातीला जास्त परतावं लागेल. सायीऐवजी खवा घालू शकता. पण खवा घरात असतोच असं नाही, तेव्हा साय चालते. ती फार नसेल, तर जोडीला जरा दूध घालावं. खरं तर, बाजारच्या  खव्यापेक्षा घरात उपलब्ध असलेली साय घालूनच हलवा चांगला लागतो. हे दिवस खरं तर गाजराच्या हलव्याचे; पण हलव्याचे इतरही प्रकार चविष्ट बनतात. याच पद्धतीनं केलेला दुधीचा आणि चक्क लाल भोपळ्याचा हलवाही मस्त लागतो बरं का...

पौष्टिक दलिया 
साहित्य : गव्हाचा एक वाटी आणि जवाचा अर्धी वाटी दलिया (आवडीनुसार जाडसर वा बारीकही चालेल), वाटाणे, गाजराचे तुकडे मिळून पाऊण वाटी, दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, अर्ध्या लिंबाचा रस, पाव वाटी भाजलेले शेंगदाणे, एक लहान टोमॅटो, चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर, तीन ते चार वाट्या पाणी, फोडणीसाठी मोहरी, जिरं, हिंग, हळद, तेल. 

कृती : गव्हा-जवाचा रवा कोरडाच भाजून घ्यावा. कढईत तेल तापत ठेवून, मोहरी-जिरं-हिंग-कढीपत्ता-हळद तसंच हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यात गाजर, टोमॅटो व वाटाणे घालावे. किंचित शिजू द्यावं. त्यानंतर त्यात दोन वाट्या पाणी घालावं. उकळी आल्यावर दलिया व शेंगदाणे घालावे आणि ढवळून घ्यावे. झाकण ठेवून शिजू द्यावं. दोन वाफा आल्यावर मीठ, लिंबाचा रस, साखर इत्यादी घालावं. पुन्हा झाकण ठेवून वाफ आणावी. गरज लागेल तसं उरलेलं पाणी त्यात घालावं. कोथिंबीर टाकून एकदा हलवून डिशमध्ये घालून खायला घ्यावं. वर चमचाभर तूप, तिळाची वा दाण्याची कोरडी चटणी घातली, तर छान चव येते. हा दलिया जरा सैलसर केला, तर थंडीच्या दिवसात गरमागरम खाताना अधिकच मस्त लागतो. 

पर्यायी सूचना : दलिया आधी न भाजता, फोडणी करून त्यात भाजून घेऊ शकता. त्यानंतर त्यात भाज्या घालाव्यात व परतून घ्यावं आणि मग गरम पाणी घालावं. भाज्या आवडीनुसार घालता येतील. लाल भोपळा किसून यात घातला, तर तो न आवडणाऱ्यांना ते कळणारही नाही. या फोडणीत तीळही चांगले लागतात. आवडीनुसार लसूण, कांदा, नारळ इत्यादी वापरता येईल. हे पोटभरीचं आणि पोषक खाणं आहे. नाश्‍ता, जेवण, किंवा रात्रीचं वन डिश मीलही होऊ शकतं. 
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या