तिळा, तिळा, दार उघड! 

नंदिनी आत्मसिद्ध 
मंगळवार, 29 जानेवारी 2019

पोटपूजा
 

संक्रांत आली की तिळाला विशेष असं महत्त्व येतं. तीळ आणि गुळाचे पाकातले कुरकुरीत लाडू (जे बरेचदा टणक होतात) आणि तीळ व दाणकुटाचे साधे मऊसर लाडू; तसंच खुटखुटीत वड्या, तीळ-साखरेच्या रेवड्या, उत्तरेकडं मिळणारा गजक, तीळ-साखरेचा पांढराशुभ्र आणि कधी रंगीबेरंगीही असा हलवा, तीळ घालून केलेली गुळाची पोळी, तीळ लावून केलेली भाकरी, तीळ-शेंगदाण्याची चटणी, भोगीला केली जाणारी विशेष मिश्र भाजी, फोडणीत तीळ घालून केलेल्या भाज्या, आमट्या, तिखट वा गोड थालिपीठं आणि खिचडी या तऱ्हेच्या, तीळ वापरून केलेल्या अनेक पदार्थांची लज्जत या हवेत चाखावीशी वाटते. तिळानं सजलेले हे पदार्थ दिसतातही मोठे आकर्षक आणि छान. शिवाय या दिवसांत तिळाचं तेल अभ्यंगासाठी आणि खाण्यासाठीही आवर्जून वापरलं जातं. देवाच्या निरंजनासाठी म्हणून (तिळाचं तेल, कापसाची वात) अलीकडं वेगळं तिळाचं तेल मिळतं. मुख्य म्हणजे, ते खाण्यायोग्य नाही, असं त्या बाटलीवर लिहिलेलं असतं. खाण्यासाठी आणताना, तेवढं भान राखूनच तेल विकत घ्यावं किंवा घाणीवरून तिळाचं तेल आणावं. घाणीच्या तिळाच्या तेलाचं पॅकेज्ड उत्पादनही अलीकडं बाजारात उपलब्ध असतं. 
तीळ म्हणजे स्निग्धता. शरीराला थंडीच्या काळात ती आवश्‍यक असते. शरीराला आतबाहेरून तीळ मऊ आणि तुकतुकीत बनवतात. संक्रांतीच्या काळातच लहान मुलांचं बोर नहाण करण्याची प्रथा आहे. त्यांना गोडाबरोबरच आंबट-तुरट चवींची ओळख करून दिली जाते. ‘बोर नहाण’ हे नाव असलं, तरी बोरांबरोबर या हंगामात येणाऱ्या उसाचे करवे, ओला हरभरा, तसंच तिळाचा हलवा, साखरफुटाणे अशा इतरही अनेक गोष्टींनी मुलाला न्हाऊ घातलं जातं. हल्ली तर मुलांना आवडणारी चॉकलेट अन्‌ इतर खाऊही त्यात असतो. ज्याचं बोर नहाण आहे, त्या मुलाबरोबर जमलेली इतर मुलंही या खाऊचा आनंद लुटतात. बालपणाचा हा उत्सव वडीलधारी मंडळी नजरेत (कॅमेऱ्यात आणि चित्रफितीतही) साठवून ठेवतात. 
हलव्याचे दागिने ल्यालेल्या लाजऱ्या नववधूची काळी चंद्रकळा खुलते, तीही याच दिवसांत. रसरंगपूर्ण असा हा सण आहे. या सणाला पदार्थांबरोबरच तिळाचा हलवा वापरून कलाकुसरीच्या सजावटीच्या वस्तू व दागिने बनवून त्यांचा वापर नवीन नवरीला सजवण्यासाठी, बोर नहाणीच्या छोट्यासाठी केला जातो. सुगरणींच्या हातच्या चवीला आणि कौशल्य-कसबाला चालना देणारे उपक्रम संक्रांतीनं विकसित केले आहेत. यामुळं कलाकौशल्यात तरबेज असलेल्या महिलांना घरबसल्या उद्योगही मिळू शकतो. तिळाचे फायदे असे अनेकविध आहेत. 
आपल्याला अलिबाबा आणि चाळीस चोरांची गोष्ट बालपणापासून माहीत असते. त्यातल्या अलिबाबाला चाळीस चोरांच्या लपण्याची गुप्त जागा सापडते आणि ती गुहा उघडण्याचा मंत्रही समजतो, तो असतो - ‘तिळा, तिळा, दार उघड.’ गंमत आहे सारी. कुठं तो एवढासा तीळ आणि कुठं ती चाळीस चोरांना आणि त्यांच्या प्रचंड लुटीला सामावून घेणारी गुहा. पण दोनदा तिळाचं नाव घेतलं, की ती ‘आ’ वासून समोरच्याला आत येण्याची वाट देते आणि आतली मग सारी संपत्तीही त्याला मिळते. (मला आपलं लहानपणी वाटायचं, की ते ‘तिळा’ नसेल, ‘शिळा’च असेल आणि छापण्यात काहीतरी चूक झाली असणार. म्हणून सांगणारेही गोष्ट चुकीचा शब्द वापरून सांगताहेत. हा मंत्र म्हटला, की गुहेवरची शिळा आपोआप दूर होते असं असल्यामुळं. मला स्वतःच्या या भाषिक शोधाविषयी चक्क खात्रीच झाली होती, म्हणा ना. पण हे मी उघडपणं ‘पोटपूजा’मध्ये प्रथमच बोलून दाखवतेय बरं का.) हातात ‘जादूची कांडी’ आणि मुखात ‘तिळा, तिळा, दार उघड’ हा मंत्र असला, की साऱ्या गोष्टी मनासारख्या होणारच, अशी बालसुलभ समजूत असणारी, चमत्कारांवर विश्‍वास ठेवणारी लहान मुलं असतात का हल्ली? कोण जाणे! 
तिळाच्या रोपट्याकडं पाहिलं आणि त्याला येणाऱ्या तिळांचा शोध घेतला, तर मात्र या ‘तिळा, तिळा, दार उघड’चं रहस्य लक्षात येतं. तिळाच्या इवल्या इवल्या बिया एका बोंडात लपलेल्या असतात आणि ते तयार झालं की उकलून येतं आणि त्या उमललेल्या बोंडातले तीळ दिसतात. यावरूनच बहुधा तिळा तिळा दार उघड, हा मंत्र अलिबाबाच्या कहाणीकाराला सुचला असावा... या तिळाला मोड आणले, तर फार सुंदर आणि लोभस दिसतं. छोटे छोटे पिवळे अंकुर आलेले तीळ - पालकाची कोशिंबीर करून त्यात टाकले, तर हिरवं-पिवळं सॅलड अगदी साजरं दिसतं. शिवाय पांढरे आणि काळे असे दोन्ही रंगांचे तीळ वापरले, तर मग या पदार्थाचं सौंदर्य आणखीनच खुलतं. 
‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’, ‘खायला कहार आणि भुईला भार’, ‘खाई त्याला खवखवे’, ‘दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे’, ‘आपलेच 
दात आणि आपलेच चणे’, ‘आडजीभ खाय आणि पडजीभ वाट पाहाय’, ‘चणे खावे लोखंडाचे’, ‘खाऊ की गिळू’, ‘खा खा सुटणं’, ‘खाण्याचा भस्म्या रोग’, ‘खात्यापित्या घरचं असणं’, ‘महाभारतातल्या खादाड बकासुराची गोष्ट’... अशा अनेक तऱ्हांनी आपण भाषेत खाण्याचे संदर्भ वापरत असतो. इतर पदार्थांबरोबरच तिळावरूनही आपल्या मराठीत वाक्‍प्रचार तयार झाले आहेतच. ‘तिळातिळानं वाढणं’, ‘एक तीळ सातजणांनी वाटून खावा’... इत्यादी अनेक म्हणी आणि वाक्‍संप्रदाय मराठीत नेहमीच्याच वापरातले. एकूणच, तीळ म्हणजे आपला ‘स्नेही’च; याबाबत अगदी तिळमात्रही शंका नको.

भाज्यांचा कुर्मा 
साहित्य : रश्‍शासाठी ः फ्लॉवर, गाजर, वाटाणे, फरसबी, बटाटा यांच्या वाडगाभर फोडी, एक कांदा, चमचाभर तेल, अर्धा इंच आल्याचा तुकडा, कढीपत्त्याची पानं, दालचिनीचा लहान तुकडा, एक हिरवी वेलची, चमचाभर साधे पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, तेल. 
वाटणासाठी ः चमचाभर चणाडाळ, काजूचे सात-आठ तुकडे, एक चमचा खसखस, एक लवंग, एक हिरवी मिरची, जरासं तेल. 
कृती : वाटण करताना आधी चणाडाळ कोरडीच सोनेरी रंगावर भाजून घ्यावी. त्यात खसखस, एक हिरवी वेलची, लवंग, काजूचे तुकडे घालावे आणि एकत्र करावं. गॅस बंद करून गार होऊ द्यावं. गार झाल्यावर ते भरड वाटून घ्यावं आणि त्यात हिरवी मिरची व किंचित पाणी घालून त्याची पेस्ट करावी. दुसरीकडं चमचाभर तीळ जरा भाजून घ्यावे आणि मिक्‍सरवर फिरवून घ्यावे. भाज्यांचा रस्सा करताना आधी कढईत तेल गरम करावं व त्यात दालचिनीचा तुकडा टाकून जरासं परतून घ्यावं. मग कढीपत्त्याची पानं व आल्याचे बारीक तुकडे घालावे आणि ते जरा तडतडू द्यावे. यात कांदा घालून तो पारदर्शी होईपर्यंत परतावा. मग वाटणाची पेस्ट घालावी आणि चांगलं मिसळून घ्यावं. ती घट्ट होत आली, की कढईच्या पृष्ठभागी चिकटू लागेल. मग यात भाज्यांचे तुकडे व पाणी घालून पाच मिनिटं अगदी बारीक आचेवर शिजू द्यावं. एकीकडं वाडग्यात भरडलेले तीळ घेऊन त्यात पाणी घालून त्याचं जरा पातळसं मिश्रण करावं. शिजत असलेल्या भाजीत ते घालून पुन्हा त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं शिजू द्यावं. संक्रांत स्पेशल भाज्यांचा कुर्मा-रस्सा तयार. भाकरी-पोळी वा भाताबरोबर गरमागरम खायला घ्यावा. 
पर्यायी सूचना ः या वरील भाजीत फोडणी नाही, त्यामुळं कुणाला कमी खमंग वाटेल. तर तेलात मोहरी व लाल मिरची घालून चरचरीत फोडणी करून भाजीवर वरून घालावी. वाटल्यास या फोडणीत लसूणही उभा चिरून तेलात वा तुपात लालसर रंगावर तळून घालता येईल. आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबिरीनं सजवा. इतरही भाज्या आवडीनुसार यात घालू शकता.

मसालेदार मिरच्या 
साहित्य : लांबट, फुगीर आकाराच्या आठ-दहा मिरच्या घ्याव्या. भरून करण्यासाठी या जरा कमी तिखट असणाऱ्या मिरच्या वापरतात. मोठा वाडगा भरून भाजलेले शेंगदाणे व भाजलेले तीळ, हळद, मीठ, जिरं, थोडी बडीशेप, सुकं खोबरं किसून, धणे, आमचूर, तेल.
कृती : मिरच्यांचे दोन तुकडे करावेत आणि तुकड्यांना उभा छेद द्यावा. भाजलेले तीळ व भाजलेले दाणे (दोन्ही निम्मं निम्मं), बडीशेप, धणे, हळद, त्यात चवीनुसार मीठ, खोबऱ्याचा कीस, बडीशेप आमचूर घालावं आणि मिक्‍सरमध्ये भरड वाटून घ्यावं. किंचित तेल घालून मिसळून घ्यावं. हे मिश्रण चीर दिलेल्या मिरच्या तुकड्यांच्या आत भरावं. दोन चमचे सारण बाजूला उरू द्यावं. यानंतर सपाट बुडाच्या पातेल्यात जरा जास्त तेल घेऊन फोडणी करावी आणि त्यात मिरच्या सोडाव्यात. जरा हलके परतावं व उरलेल्या सारणात किंचित पाणी व हिंग घालून ते यात टाकावं. वर झाकण ठेवावं. फार न टोकता मधूनच मिरच्या हलवत राहाव्यात. खमंग वास आला की गॅस बंद करावा. 
पर्यायी सूचना : गोडसर चव हवी असल्यास, थोडा गूळ बारीक चिरून सारणाच्या मसाल्यात घालावा.

हिरव्या मुगाची पौष्टिक धिरडी 
साहित्य : तीन वाट्या हिरवे मूग, कोथिंबीर, पाऊण वाटी बारीक रवा वा तांदुळाचं पीठ, चवीनुसार मीठ, जिरं, हिंग, हळद, थोडे तीळ, हिरवी मिरची, लसूण, तेल. 
कृती : मूग रात्रभर पाण्यात भिजवावेत. सकाळी उपसून ठेवावे आणि कोथिंबीर-मिरची-लसूण (लसणाची पात असली तर रंग छानच येतो) यासह मिक्‍सरमधून वाटून घ्यावं. वाटतानाच त्यात बारीक रवा वा तांदळाचं पीठ घालावं. दोन्ही थोडं थोडं घातलं तरी चालेल. मिश्रण फार मुलायम न वाटता उत्तप्प्यासाठी करतो तसं वाटून घ्यावं. मीठ, जिरं, हळद, चमचाभर तेल, थोडे तीळ इत्यादी घालून ढवळावं आणि तवा तापायला ठेवावा. तव्यावर थोडं तेल सोडून ते फिरवून घ्यावं आणि जरा जाडसर धिरडं टाकावं. बाजूनं तेल सोडावं आणि वर झाकण ठेवावं. पहिलं धिरडं काढताना जरा जास्त वेळ थांबावं आणि मगच ते उलटावं. दोन्ही बाजूंनी खरपूस करून खोबऱ्याच्या वा तिळाच्या चटणीबरोबर खायला घ्यावं. 
पर्यायी सूचना : तांदूळही वेगळे भिजवून ते मुगाबरोबर वाटून धिरडी करता येतील. धिरडी चिकटू नयेत, म्हणून चमचाभर गव्हाचं पीठ मिश्रणात घालता येईल.

संबंधित बातम्या