फिर करें बात, बात फूलों की... 

नंदिनी आत्मसिद्ध 
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

पोटपूजा
 

लहानपणीचे दिवस म्हणजे फुलपाखरी दिवस. अशा त्या रम्य काळातले खेळही रम्य असतात आणि एकत्र खेळताना एकमेकांत वाटत खाल्लेला खाऊही! खास करून, सुटीत दिवसभर हुंदडताना वेगवेगळ्या खाऊचे शोध लागतात, तेव्हा मस्त वाटतं. बालपणी फुलपाखरांमागं धावताना आपणही त्यांच्यासारखं रंगीत फुलांना भुललो आणि कधी या फुलांमधला मधही चाखून बघितला, हे आठवताना मोठी मौज वाटते. बालपणात जर आसपास बाग असेल, घराच्या अंगणातच फुलझाडं असतील, तर असा अनुभव अनेकांनी घेतलाच असेल. अजून आठवतं, घराजवळच्या बागेला कडूशार पानं आणि गडद पिवळ्या वायरसारखे तण असलेल्या कोयनेलच्या झुडपाचं कुंपण होतं. त्याला साधारण सायलीच्या आकाराची, गडद गुलाबी मध्य असलेली पांढरी फुलं यायची. ही फुलं तोडून त्याच्या देठाकडला हिरवा झाकणासारखा भाग काढून फूल चोखलं, की फुलातला मध आतून पटकन तोंडात उतरायचा. परमसुख वाटायचं. पानं कडू आणि फुलात मात्र मध, याचं नवल करत कोयनेलची फुलं चोखण्याचा आनंदच वेगळा होता. अशाच प्रकारे सोनटक्का, गोकर्ण, घाणेरी या फुलांच्या देठातला मधही चोखण्यात मजा होती. आजही ती तशीच असेल, पण आताशा त्यांचं दर्शनही दुर्मिळ होत चाललंय... 

अशी अनेक फुलं आपल्या रूपरंगाबरोबरच चवीमुळंही स्मरणात राहिली आहेत. मोगऱ्याची फुलं उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्याच्या पाण्यात टाकली, की ते पिताना उन्हाळ्याचा त्रास कमी होत असे. झेंडूच्या आणि जास्वंदीच्या फुलाच्या तळाशी असलेलं खोबरं अनेकांनी खाल्लं असेल आणि सीताफळाची फुलंही काजूसारखी लागतात, असं म्हणून मटकावली असतील. गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद केला जातो. अगदी घरगुती स्वरूपातही गुलकंद करता येतो. दुर्गाबाई भागवत यांचं निसर्गनिरीक्षण आणि संशोधन सर्वांनाच माहीत आहे. गुलकंदाचा ‘शोध’ अस्वलानं लावला, असं त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. अस्वल रानातली फुलं गोळा करून, ती दगडावर ठेचून आणि त्यात पोळ्यांमधला मध काढून मिसळून खातं, असं निदर्शनास आलं आहे. यावरून ‘हा तर आपला गुलकंदच की’ असं दुर्गाबाई लिहितात. मध्यंतरी वाचलं, की ब्रह्मकमळापासूनही खडीसाखर घालून गुलकंद केला जातो. अर्धशिशीवर तो गुणकारक असतो. या फुलांपासून गुलाबपाणीही केलं जातं. गुलकंदाचं आइस्क्रीम वा कुल्फीही छान लागते. हा गुलकंद शब्द कसा आला माहीत आहे? तो फ़ारसी भाषेतून आलाय. गुल म्हणजे फूल आणि क़न्द हा शब्द खडीसाखर या अर्थानं वापरला जातो. इराणी मंडळी चहातून वगैरे खडीसाखरच घालतात. यापासून गुलकंद हा शब्द मराठीत रुजला. मराठी भाषेत आजही ७० टक्के शब्द फ़ारसीप्रभावित आहेत, हे वास्तव आहे. पण ते आता मराठीत पूर्ण रुळले आहेत. (उदाहरणार्थ, बदल, कमी इत्यादी आणि इतरही अनेक...) पण ते असो. 

फुलांचे पदार्थ करणं हे विचित्र वाटलं, तरी तसं ते नाही. अगस्तीच्या, म्हणजेच हादग्याच्या फुलांची कढी करतात. केळफुलाची भाजी तर बऱ्याच जणांना माहीत असेल. कधी मुंबईच्या बाजारातही लाल भोपळ्याची फुलं विकायला येतात. त्यांची भाजी, कोशिंबीर, थालिपीठ वा कढी करता येते. केळफुलाची भाजी, कबाब असे पदार्थ होऊ शकतात. शिवाय ते उपवासाचेही होऊ शकतात. शेवग्याची कोवळी पानं भाजी वा पिठल्यासाठी वापरतात, तशी त्याची फुलंही घालून हे पदार्थ केले जातात. आदिवासी पट्ट्यात मोहाच्या फुलापासून मद्य केलं जातं, हे सर्वांना माहीत असतं. तसंच त्यांचं लोणचंही करतात. मुंबईत महालक्ष्मी सरससारखं प्रदर्शन भरतं, तेव्हा त्यात ते मिळतं. अंबाडीच्या फुलांचीही भाजी करतात. दुधी भोपळ्याची फुलंही भाजीसाठी छान असतात. वसईच्या भाजीवाल्यांकडं ती पावसाळ्यात मिळतात. त्यांचे रवा लावून कापही किंवा भजीही करतात. जास्वंद, झेंडू यांचा चहाही करतात. गोकर्णीच्या फुलांचाही चहा करतात. त्यात गवती चहा वगैरेही घातला जातो. याला इंग्रजीत ‘बटरफ्लाय पी फ्लॉवर टी’ म्हणतात. निळ्या रंगाचा हा चहा दिसतोही मोठा छान! गोकर्णीची पांढरी फुलंही असतात. ती अधिक औषधी समजली जातात. मलेशियासारख्या काही देशांमध्ये गोकर्णीच्या फुलांचा वापर स्वयंपाकात केला जातो. ही वनस्पती आयुर्वेदानं औषधी म्हणून सांगितली आहे. सापाच्या विषावर गोकर्णीचा उपयोग होतो. गाईच्या कानासारखा आकार असलेली फुलं म्हणून त्यांना गोकर्णी म्हणतात. अपराजिता आणि विष्णुकांता अशीही नावं याला आहेत. 

याशिवाय सॅलड सजवण्यासाठी काही फुलांच्या पाकळ्या आपण वापरू शकतो. कोथिंबिरीची फुलं पदार्थात ताजी वापरावीत. आल्याची फुलं जरा उग्र असतात, त्यांचा रस अरोमाथेरपीच्या तेलात वापरतात. ती कच्ची वा शिजवून खाताही येतात. बडीशेपेची फुलं औषधात वापरतात. बडीशेप ही पचनासाठी चांगली असते आणि त्यापासून सरबतही होतं, जे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतं. फुलांच्या पाकळ्या सॅलडमध्ये वापरून, फुलांचं ‘फूल-सॅलड’ करता येईल... 

सदाफुली, चिंच, डाळिंब अशी अनेक फुलं ‘खाद्य’ आहेत. एकदा एका मैत्रिणीनं तगर व अनंताच्या फुलांची भजी केली होती. ‘छान लागली,’ म्हणाली. जास्वंदीच्या फुलांपासून सरबतही होतं आणि कमळाच्या फुलांची भाजी. कमळाचं किंवा कुमुदिनीचं बी म्हणजे मखाणा. वॉटर लिली या नावानंही मखाणा ओळखला जातो. पंजाबी-सिंधी लोक हे बी भाजून आवर्जून खातात. मखाणात प्रथिनं असतात. त्यांची भाजीही होते. अलीकडं मखाणा खारवलेला किंवा साधाही बाजारात उपलब्ध असतो. फुलांच्या या भाज्या तशा साध्याच पद्धतीनं केल्या, तरी चालतं. फोडणी आणि तिखट-मीठ त्यांना पुरेसं असतं. वाटल्यास थोडं पीठ पेरावं. सफरचंद, संत्रं यांची फुलंही आहारात वापरली जातात. सूर्यफुलाच्या बियांपासून तेल काढतातच, पण हे फूलही कच्चं किंवा शिजवून खाता येतं. सूर्यफुलात ई जीवनसत्त्व मुबलक असतं. लव्हेंडरच्या फुलांचा अर्क पदार्थांना सुवासिक बनवतो आणि आइस्क्रीममध्ये लव्हेंडरचा वापर होतो. हा खूप लोकप्रिय असा फ्लेवर आहे. लव्हेंडर अँटिसेप्टिकही आहे. 

फूल ही काही खाण्याची गोष्ट नाही, असंच आपल्याला वाटत असतं. पण तरीही आपण अनेक फुलं व त्यांचे परागकण या ना त्या स्वरूपात खातच असतो. फुलं खाताना, ती सेवनीय आहेत ना, याची माहिती असणं मात्र आवश्‍यक आहे. फुलांच्या पाकळ्याच शक्‍यतो खाव्यात, देठ व झाडाचा इतर भाग नीट माहिती असल्याशिवाय खाऊ नये. पण फूल खायचं म्हटल्यावर, त्यात क्रौर्य वगैरे आहे, असं समजण्याचंही कारण नाही. शोध घेतला, तर लक्षात येईल, की आपण वेगवेगळ्या फुलांचे घटक आहारात सेवन करतच असतो. केशर आपण नेहमी पदार्थाला रंग आणि स्वाद देण्यासाठी वापरतो. केशर म्हणजे फुलांचे परागच असतात. दगडफूल या शब्दात फूल असलं, तरी ते एका तऱ्हेचं शेवाळ असतं. मसाल्यात वापरलं जाणारं चांदणीसारखं दिसणारं चक्रफूल, तसंच लवंग हे घटक म्हणजे फुलंच तर आहेत. एकूणच, आपला आहार हा तसा ‘फूल’प्रूफ आहे... 

बाजरीची खिचडी 
साहित्य : चार वाट्या बाजरी, पाऊण वाटी तांदूळ, पाऊण वाटी तूरडाळ, पाणी, चवीनुसार मीठ, तिखट, फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद, सुकी लाल मिरची, तेल... 
कृती : बाजरी रात्रभर किंवा सात तास तरी पाण्यात भिजत घालावी. नंतर निथळून घ्यावी व कापडावर पसरून ठेवावी. पाणी टिपलं गेलं, की मिक्‍सरवर अगदी हलके फिरवावी. जाडसर भरडच राहिली पाहिजे किंवा खलात घालून हलक्‍या हातांनी कांडावी. मुसळ असेल, तर उत्तमच, नाहीतर घरात खल असला की बत्ता असतोच. मग थोडं पाखडून अगदी सालपटं निघाली असतील, ती काढू टाकावी. तांदूळ व तूरडाळही धुऊन ठेवावी. वेगळ्या पातेलीत आठ वाट्या पाणी उकळत ठेवावं. जाड बुडाच्या पातेल्यात वा कढईत फोडणी करावी. तेल कमी घेऊ नये, नेहमीपेक्षा जरा जास्तच घ्यावं. तेलात मोहरी, हिंग घालावं आणि बाजरी, तांदूळ व डाळ त्यात घालून किंचित परतावं. उकळलेलं पाणी हळूहळू यात घालावं आणि ढवळावं. बारीक ज्योत करून शिजायला ठेवावं आणि मधून मधून खाली-वर असं चांगलं हलवत राहावं. पातेलीवर झाकण ठेवावं आणि मंदाग्नीवर खिचडी शिजू द्यावी. शिजत आलं, की त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालावं. बाजरीची खिचडी शिजली, की ताटात वाढून घ्यावी आणि खाताना वरून तेल-मोहरी व सुक्‍या मिरच्यांची फोडणी घालून घ्यावी किंवा मग नुसतं तूप घालूनही खाता येईल. 
पर्यायी सूचना : बाजरीची खिचडी कुकरमध्येही करता येते. बाजरीला मोड आणूनही ती केली जाते किंवा बाजरीची भरड काढून ठेवून तीही वापरता येते. यात तांदूळ नको असतील तर नाही घातले तरी चालतं. डाळीही मूग, हरभरा, मसूर अशा विविध प्रकारच्या वापरता येतात. तसंच ताजे हिरवे वाटाणे, हरभरे वा मक्‍याचे ताजे दाणेही घालता येतील. अर्थात बाजरीचं प्रमाण हे जास्त हवं. सोबत गाजर, फ्लॉवर, बटाटाही घालू शकता. लसूण घालूनही ही खिचडी करतात.

बटाट्याची हटके भाजी 
साहित्य : चार मोठे बटाटे, पाणी, अर्धा वाटी डाळीचं पीठ, थोडं दही, मीठ, तिखट, फोडणीसाठी हिंग, मोहरी, जिरं, तेल. 
कृती : एका पातेल्यात पाण्यात बटाटे घालून उकडावं. फार मऊ होऊ देऊ नये. जरा शिजले तरी पुरे. नंतर हे बटाटे सोलून घ्यावेत आणि मोठ्या जाडसर फोडी कराव्यात. कढईत वा पातेलीत तेल घालून जिरं-मोहरी-हळद-हिंगाची फोडणी करावी. त्यात बटाटे घालून वर तिखट भुरभुरावं. झाकण ठेवून शिजू द्यावं. शिजलं की मीठ घालावं आणि एका वाटीत थोडं दही घेऊन त्यात डाळीचं पीठ घालून ते गुठळ्या न करता मिसळून घ्यावं. शिजत आलेल्या भाजीत हे मिश्रण हळूहळू ओतावं. वाटलं तर थोडं पाणी घालावं. जरा आणखी शिजू द्यावं आणि झाल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर घालावी. 
पर्यायी सूचना : आवडत असेल, तर भाजीला वरून सुक्‍या लाल मिरचीची फोडणीही घालता येते. अशावेळी, वाटल्यास भाजी टाकताना कमी तेलाची फोडणी करावी. फ्लॉवरची भाजीही याप्रकारे करता येईल.

संबंधित बातम्या