माणूस आणि जीवसृष्टीचं मैत्र... 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 18 मार्च 2019

पोटपूजा
 

निसर्ग आपल्याला जगवतो आणि त्याबद्दल आपण कृतज्ञ असायला हवं. तसा तर माणूस हाही निसर्गाचाच एक घटक आहे. म्हणूनच तर निसर्गाचं सान्निध्य माणसाला सुखावून जातं. झाडं, फुलं, फळं आणि पाखरं त्याचे मित्र होतात. पाळीव प्राणी आणि पक्षीसुद्धा माणसाच्या सहवासात रमतात. माणसाळतात. निसर्गातल्या या घटकांशी असलेलं नातं दृढ करणारे सण आणि दिवस परंपरेनं इथल्या मातीत रुजले आहेत. जे पशुपक्षी आपल्याला या ना त्या मार्गानं उपयोगी पडतात, त्यांचाही आपल्यावर हक्क असतोच ना! पशुपक्ष्यांनाही आपल्या संस्कृतीत आणि भावविश्‍वात सामावून घेतलं जातं. त्यांची काळजी घेतली जाते. गाईंना चारा घालणं, कुत्र्यांना खायला घालणं या तर नेहमीच्याच गोष्टी. पण अगदी सापासारख्या विषारी व धोकादायक वाटणाऱ्या प्राण्यालाही श्रावणात नागपंचमीच्या दिवशी पूजलं जातं. त्याला दूध पाजलं जातं. अर्थात या गोष्टींचाही अतिरेक होतोच. खरं तर तसा तो होऊ नये. तसाच दरवर्षी शेतकऱ्याचा मित्र असलेल्या बैलाचा सण, म्हणजे पोळा श्रावणी अमावस्येला साजरा केला जातो. बैलाला पुरणपोळीसारखे पदार्थ व चांगलंचुंगलं खायला घालणं, त्याला नवी झूल व माळा घालून सजवणं, त्याची पूजा करणं अशा पद्धतीनं पोळा साजरा होतो. शेतकऱ्याचं घरही बैलाचा हा दिवस गोडधोड खाऊन साजरा करतं. आज भले ट्रॅक्‍टरचा वापर वाढला आहे, पण तरी बैलालाही महत्त्व आहेच. शहरांमधल्या बिगर शेतकरी घरांमधूनही पोळ्याचा सण साजरा केला जातो. तशीच दिवाळीच्या सुरुवातीला द्वादशीला येणारी वसुबारस. गाय आणि वासराची पूजा, त्यांना सजवणं, प्रेमानं खाऊ घालणं, हे सारं या दिवशी आनंदानं केलं जातं. 

आजकाल विशेषतः शहरांमधून झाडं कमी होत आहेत, त्यामुळं पक्ष्यांना घरटी बांधायला जागा मिळत नाही. म्हणून तर पक्ष्यांसाठी कृत्रिम घरं लावली जातात, दाणा-पाणी ठेवलं जातं. रोजच्या रोज कावळ्यासाठी घास ठेवणारी घरंही बघायला मिळतात. मध्यंतरी डॉ. राणी बंग यांची मुलाखत टीव्हीवर बघितली. त्यात त्यांनी उल्लेख केला होता, की लग्नात अक्षतांच्या रूपात तांदूळ वाया जातो, म्हणून अलीकडं फुलांच्या पाकळ्या वापरतात, हेही काही वाईट नाही. पण पूर्वी त्यांना याबद्दल विनोबा भावे म्हणाले होते, ‘अक्षता काही वाया जात नाहीत, त्या पक्ष्यांसाठी असतात.’ पूर्वी लग्नं घरासमोरच्या वा गावातल्या एखाद्या मोकळ्या जागेत मांडव घालून केली जात. अनेक परिवार या प्रसंगी आनंद साजरा करतात. अशावेळी वधूवरांवर टाकलेल्या अक्षता आसपासचे पक्षीही आनंदानं टिपतात... 

निसर्गसान्निध्याचा परिणाम खाण्याच्या पदार्थांच्या नावांवरही झालेला दिसतो. पिकलेली काळी-लालसर करवंदं विकताना विकणारा हमखास ‘डोंगरची काळी मैनाऽ’ असा आवाज देत फिरत असतो. काळी मैना म्हणजे करवंदं, हे आता रूढ झालं आहे. केळफुलाची भाजी करताना केळफूल उकलून निवडून घ्यावं लागतं. अगदी कोवळा भाग पूर्ण घ्यायचा असतो. तर केळफुलाची सालं काढली, की आत फण्यासारख्या कळ्यांच्या रूपातली फुलं असतात. त्यातला काळ्या टोकाचा एक भाग आणि त्यालगतचा चामट पापुद्रा टाकायचा असतो नि बाकीची फुलं भाजीसाठी घ्यायची असतात. टाकण्याच्या भागाला ‘कावळा’ आणि भाजीच्या भागाला ‘चिमणी’ अशी नावं आहेत. ‘कावळा’ टाकून द्यायचा असतो आणि ‘चिमणी’ भाजीसाठी ठेवायची असते. बिच्चारा कावळा! इथंही केळफुलाच्या टाकलेल्या घटकालाच त्याचं नाव दिलं गेलं... पण एरवी कावळ्याच्या तीक्ष्ण दृष्टीची आणि तल्लख बुद्धीची स्तुतीही केली जातेच. उंच रांजणात दगड टाकून त्यातलं पाणी पिण्यात यशस्वी झालेला जुन्या गोष्टीतला कावळा आठवत असेलच... 

पोपट आणि मैना ही जोडी आणि तिच्या अनेक गोष्टी आहेत. त्यातली एक आठवते, त्या कथेतला गोडबोल्या पोपट, मैनेला सतत फसवून आपला मतलब साधत असतो. मैना भोळी. ती दरवेळी त्याच्यावर विश्‍वास ठेवते. एकदा पोपट टरफलासकट असलेला बदाम आणतो, नि मैनेला विचारतो, ‘तुला वरचा भाग पाहिजे, की आतला भाग?’ मैनेला वाटतं, वरचा भाग छान गुळगुळीत आहे, तर तोच मागूया. ती तोच मागते. तर तिला वरचं टणक टरफल मिळतं आणि पोपट मस्तपैकी आतला बदाम खाऊन झाडाच्या डहाळीवर झुलत बसतो. पुढच्या वेळी पोपट आणतो खारीक. मैनेला विचारतो, ‘तुला बाहेरचा भाग पाहिजे, की आतला?’ मैना विचार करते, की गेल्यावेळी बाहेरचा भाग मागितला, तो छान गुळगुळीत होता, तर टणक सालं मिळाली. ही खारीक तर किती खडबडीत दिसते, आतलाच भाग मागावा. म्हणते, ‘आतलाच दे मला.’ पोपट मग बाहेरची गोड खारीक खातो नि मैनेला आतली टणक बी देतो. मैनेला पुन्हा एकदा खाताच येत नाही. नंतर एकदा पोपट जर्दाळू घेऊन येतो, नि विचारतो, ‘तुला आतला भाग पाहिजे, मधला भाग, की बाहेरचा भाग?’ आधीच्या अनुभवामुळं मैना ठरवते, आपण यावेळी मधलाच भाग मागू. पोपट मग जर्दाळूच्या बाहेरचं गोड आवरण खातो, आतल्या छोट्या बदामाचं कवच फोडून बी खातो आणि मैनेला पुन्हा टरफलच मिळतं. बिचारी मैना. पोपटावर रागावते, पण तिनं निवडलेलंच मिळाल्यानं, तिला फार बोलताही येत नाही. 

पक्ष्या-प्राण्यांना मानवी गुण चिकटवून अशा गोष्टी तयार झाल्या आहेत. पाळीव पशुपक्षी माणसाला लळा लावतात, हे खरंच. पण त्यांना नैसर्गिक वातावरणात जगणं अधिक आवडेल. त्यांचं स्वाभाविक खाणं त्यांना अधिक तृप्ती देईल. तळलेले तुपकट आणि तेलकट पदार्थ, हे काही त्यांचं स्वाभाविक खाणं नव्हे. पण माकडांना वेफर्स घाल, पक्ष्यांना फरसाण घाल, असे प्रकार केले जातात. हे प्रकार माणसाच्या अंगलट येतात, हे विशेषतः मुंबईतल्या कबूतरखान्यांवरून दिसतं. धर्मकृत्य म्हणून त्यांना दाणे टाकले जातात. हीच कबूतरं मग घराच्या बाल्कनीत, गच्चीत, खिडक्‍यांत येऊन घाण करतात. त्यांच्या विष्ठेतून प्रदूषण होतं आणि दमा वा हृदयरोगासारख्या आजारांना चालना मिळते. ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. पण तथाकथित धर्मपरायणतेच्या नावाखाली हा प्रकार चालूच असतो... 

मुक्‍या जिवांशी माणूस नातं जोडत असला, तरी काही मासे, प्राणी व पक्षी हे माणसाचं अन्नही आहेतच. जे मांसाहार करत नाहीत, त्यांना हा प्रकार क्रूर वाटतो. पण त्याला इलाज नाही. काही लोक विशिष्ट प्राणी वा पक्षी खाणं निषिद्ध मानतात. तर केवळ शाकाहार करणारे किंवा अलीकडं प्राणिजन्य काहीच न खाणारे (म्हणजे दूध, अंडीही न खाणारे) ‘व्हेगन’ लोकही या जगात आहेत. तसं तर श्‍वासातून अनेक सूक्ष्म जीवजंतू शरीरात प्रवेश करतातच. वनस्पतींनाही जीव असतो, हेही विसरता येणार नाही. माणसाचं खाद्यजीवन त्याच्या अवतीभवतीच्या नैसर्गिक घटकांनी बनत जातं. घडत जातं. आपल्या अन्नाचं संरक्षण करणं हीदेखील माणसाची एक प्रेरणा असते. मार्जोरी किनन रॉलिंग्ज याच्या ‘दि इयर्लिंग’मधल्या ज्योडी, अखेर नाही का, स्वतः पाळलेल्या लाडक्‍या हरिणशावकाला, तो घरच्या शेतातल्या पिकांचा फन्ना उडवायला लागल्यावर गोळी घालून मारतो? शिवाय जठराग्नी शमवण्यासाठी वेळ आली, तर त्या जीवनसंघर्षात माणूस काहीही खातो. चालायचंच. शेवटी, ‘जीवो जीवस्य जीवनम’ हासुद्धा निसर्गाचा नियमच आहे... 

लाल भोपळ्याचे घारगे 
साहित्य : लाल भोपळ्याच्या फोडी वा कीस, चिरलेला गूळ, गव्हाची कणीक, किंचित मीठ, पाणी, तेल, दोन वाट्या कीस असेल, तर दीड वाटी गूळ तरी लागेल. 
कृती : लाल भोपळ्याच्या फोडी वा कीस कढईत घालून वाफवावा. भोपळ्याचा रंग जितका लाल, तितका घारग्यांचा रंग छान येतो. कीस शिजत आला, की त्यात चिरलेला गूळ आणि किंचित मीठ घालावं आणि शिजवावं. चांगलं मिळून आलं, की त्यात मावेल एवढी कणीक घालावी आणि तेल घालून मळावी. गोळा फार घट्ट होऊ देऊ नये; सैलसरच ठेवावा, कारण घारगे थापून करायचे आहेत. कढईत तळण्यासाठी तेल तापायला ठेवावं आणि मग हाताला तेल लावून, केळीच्या पानावर किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवर पुरीच्या आकाराचे घारगे थापावे आणि तेलात तळून काढावे. 
पर्यायी सूचना : यात वेलची पूड, भाजलेल्या खसखशीची पूडही घालता येईल किंवा तीळ वा खसखशीवर ते थापता येतील. त्यानं एक वेगळी चव येईल. पण नुसता गूळ घालून केलेले घारगेही फार छान लागतात.

फोडणीचा खमंग राजगिरा 
साहित्य : दोन वाट्या अख्खा राजगिरा, लाल भोपळा, हिरवी मिरची वा तिखट, दाण्याचं कूट, तीन वाट्या पाणी, चवीनुसार मीठ, साखर, फोडणीसाठी तूप वा तेल, जिरं. 
कृती : लाल भोपळा किसून वा बारीक फोडी करून घ्यावा. राजगिरा कोरडाच भाजून घ्यावा किंवा तूप वा तेल आणि जिरं, हिरव्या मिरचीचे तुकडे अशी फोडणी करून, फोडणीत राजगिरा घालावा व खमंग भाजावा. नंतर त्यात लाल भोपळ्याचा कीस घालावा. मग जरा भाजून दोन वाट्या पाणी घालावं. कोरडाच भाजला असेल, तर फोडणीत लाल भोपळ्याचा कीस वा फोडी घालाव्या आणि मग दोन वाट्या पाणी घालून उकळी आल्यावर त्यात राजगिरा घालावा. झाकण ठेवून शिजू द्यावं व लागेल तसं पाणी घालावं. शिजत आलं, की त्यात मीठ, साखर, दाणकूट इत्यादी घालावं. शिजल्यावर कोथिंबीर घालावी आणि खायला घ्यावं. 
पर्यायी सूचना : वाटल्यास यात निम्मी भगर, म्हणजेच वरीही घालता येईल. उपवासाला नुसती भगर तशी नेहमीच केली जाते, पण राजगिराही या स्वरूपात केला, तर एक छानसा खमंग पदार्थ होतो. त्यात आवडीनुसार बटाटा, काकडी यांचाही वापर करता येईल. उपवासाच्या पदार्थांमध्ये राजगिरा हाच सगळ्यात पौष्टिक असून, त्यात लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम व प्रथिनं असे घटक असतात. म्हणून त्याचा वापर उपवासासाठी नेहमी करावा. राजगिऱ्याला हिंदीत ‘रामदाना’ म्हणतात.

संबंधित बातम्या