ज्याचं त्याचं ‘कम्फर्ट फूड’
पोटपूजा
जिभेला रुचणारं आपण नेहमीच आवडीनं खातो. काहीजण तर कायम फक्त जिभेला रुचेल, असंच खातात. ‘खाईन तुपाशी, नाहीतर राहीन उपाशी’ असाच जणू त्यांचा बाणा असतो. तर दुसरीकडं, पोटात भूक कडाडली की समोर येईल ते काहीही खायला माणूस तयार असतो, असंही म्हणतात. शिवाय वैयक्तिक आवडीनिवडीही असतातच. पण तरीही ‘कम्फर्ट फूड’ हे या साऱ्याच्या पलीकडं आहे. ते नुसतीच भूक शमवत नाही आणि जिभेला तृप्त करत नाही; तर खाताना ते एक आंतरिक समाधान, जिवाला बरं वाटेल, असा दिलासा मिळवून देतं. म्हणजे तसे आपल्याला खाण्याचे बरेच पदार्थ आवडत असतात. काही खूप जास्त आवडतात, तर काही जरा कमी, तर काही बिलकूल आवडत नाहीत. काही पदार्थ असेही असतात, जे आपल्याला केव्हाही खायला आवडतात किंवा विशिष्ट परिस्थितीत किंवा ऋतुमानात ते असोशीनं खावेसे वाटतात. ते आपल्यासाठी ‘कम्फर्ट फूड’ असतं. त्याची एक अशी व्याख्या नाही. पण सर्वसाधारणतः जी पाककृती किंवा पदार्थ मनात स्मरणरंजन जागवतो, ज्याच्याशी आपलं भावनिक नातं जुळलेलं असतं, ते आपलं ‘कम्फर्ट फूड’ असतं, असं म्हणता येईल. हे कधी भरपूर कॅलरीयुक्त अन् खूप चमचमीत असू शकतं, तर कधी अगदी साधं, अगदी दैनंदिन खाण्यात सहभाग असलेलं. काही पदार्थ उन्हाळ्यात जीव गार करतात, तर काही थंडी-पावसाळ्यात हवी ती ऊब पुरवतात. आपल्या गरजेनुसार, अवतीभवतीच्या हवामानानुसार, मनात दडलेल्या सांस्कृतिक सादा-प्रतिसादांनुसार, बाळपणीच्या आठवणींचा माग काढत आणि कधी आपल्या मूडला अनुसरून किंवा मनात ताणतणाव असेल, तर विशिष्ट काही खावंसं वाटतं नि जीव शांतवावासा वाटतो, ते तेव्हा आपलं ‘कम्फर्ट फूड’ असतं...
खरोखरच, अमुक एक गोष्ट म्हणजे ‘कम्फर्ट फूड’ आहे, असं म्हणूनच ठामपणे म्हणता येत नाही. कारण प्रत्येकाचं ‘कम्फर्ट फूड’ वेगळं असू शकतं. ते तसं असतंच. देश-प्रदेशानुसारही ‘कम्फर्ट फूड’ बदलू शकतं. विशिष्ट प्रकारची फोडणी देऊन केलेलं वरण किंवा कढी हे साधे पदार्थ एखाद्याचं ‘कम्फर्ट फूड’ होऊ शकतं, तर दुसऱ्या कुणासाठी साग्रसंगीत वाटणाघाटणाचा पदार्थच जीव शांतवणारा असतो. पूर्वी टीव्हीवर एक जाहिरात असायची, ज्यात कामानिमित्त देशोदेशी फिरणारी तरुणी घरी आल्यावर आपल्याला पहिल्यांदा काय खावंसं वाटतं, तर ‘वरणभात’, असं मराठीत सांगायची. हीच जाहिरात हिंदीत असे, तेव्हा तिच्या तोंडी शब्द असत, ‘दालचावल.’ इतर भाषांमधली ही जाहिरात कधी पहिली नव्हती, पण मनात यायचं, पंजाबीत ती सांगत असेल, ‘राजमाचावल’ आणि तमिळमध्ये ‘सांबारभात’.. कारण त्या त्या प्रांताचं ‘कम्फर्ट फूड’ वेगळंच असणार.
लहानपणी आई-आजीच्या हातचे खाल्लेले, गावाची किंवा विशिष्ट सणासुदीची आठवण करून देणारे किंवा आजच्या धकाधकीच्या जीवनात केले न जाणारे पदार्थही कधी खायला मिळाले, तर ते आपलं मन शांतवणारं ‘कम्फर्ट फूड’ होऊन जातं. घरापासून लांब राहिल्यावर, घरचा एक कप चहाही केव्हा एकदा घेतो, असं वाटायला लागतं. ती चव मनात सतत डोकं वर काढत राहते. या दिवसात आमरस सोबतीला असतोच. तर पावसाळ्यात गरमागरम सूप, कांदा-बटाटा भजी हे पदार्थ ओल्या वातावरणाचा रंग खुलवतात. ताप आला, की औषध आपलं काम करतच असतं, पण गुरगुट्या भात आणि मेतकूट खाल्लं की बरं वाटतं. उन्हाळ्यात कालवलेला दहीभात किंवा त्याला फोडणी वगैरे देऊन केलेली दहीबुत्ती उष्णतेच्या त्रासावरचा दिलासा देणारं ‘कम्फर्ट फूड’ होते. थंडीत गरमागरम थालिपीठ, सूप, चिकन-मटण असे पदार्थ खावेसे वाटतात. मसालेदार किंवा तिखट जेवण झाल्यानंतर बऱ्याचजणांना दही-ताक घ्यावंसं वाटतं. तर काहीजणांना मात्र तो हुळहुळणारा तिखटपणा जिभेवर रेंगाळलेलाच आवडतो. कधी चहा-पोळी, चहा-पाव असे साधे आणि फार आवर्जून न सांगण्यासारखे पदार्थही एखाद्याच्या मनाला खुणावणारे असू शकतात. मनाची ओढ पूर्ण करण्यासाठी कधीतरी तेही खावेसे वाटतात. एरवीही कुणाला चिकन सूप, कुणाला सुकी मासळी, कुणाला गाजर हलवा, तर कुणाला पुरणपोळी; शिवाय डाळतांदळाची खिचडी, शेंगोळ्या असे साधे घरगुती पदार्थ आहेतच. ही यादी खरं तर न संपणारी आहे. शिवाय देशोदेशीचं जे स्टेपल फूड आहे, त्यातलेच पदार्थ त्या त्या ठिकाणच्या ‘कम्फर्ट फूड’च्या यादीत जाणं हे स्वाभाविकच. ‘कम्फर्ट फूड’ची व्याख्याही तशी बदलती आहे. अलीकडं फास्ट फूड हेच अनेकांचं ‘कम्फर्ट फूड’ आणि स्टेपल फूड होत चाललं आहे. ही बाब चिंतेचीच म्हटली पाहिजे. अर्थात, जास्त कॅलरीयुक्त, स्निग्धता जास्त असलेले तेलकट-तुपकट पदार्थ किंवा साखरेचा वापर असलेल्या गोड गोष्टी, तसंच आइस्क्रीम, चॉकलेट असे जिभेला आकर्षून घेणारे पदार्थ खाल्ले, तर त्यामुळं मेंदूला एक तरतरी येते, एकतऱ्हेचा आनंद मिळतो आणि त्यांच्या सेवनामुळं मिळणाऱ्या भावनिक तृप्तीमुळं एकप्रकारचं समाधानही मनाला लाभतं. विशिष्ट मानसिक स्थितीत या तऱ्हेचे पदार्थ खावेसे वाटतात आणि ते खाल्लेही जातात, हे आता मनोविज्ञानानंही मान्य केलं आहे. नकारात्मक किंवा निराशात्मक भावनांमुळं या प्रकारचे खरं तर अनारोग्यकारी पदार्थ खावेसे वाटतात, कारण त्यांच्या सेवनामुळं तत्काळ आनंद मिळतो. ‘कम्फर्ट फूड’ आणि अपराधभावना यांचाही परस्परसंबंध असतो, हेही अभ्यासांती स्पष्ट झालं आहे. याचा प्रत्यय आपण अनुभवातून किंवा अवतीभवतीच्या निरीक्षणातून घेतच असतो. मानसिक ताणतणावामुळं या तऱ्हेचं ‘कम्फर्ट फूड’चं सेवन वाढतं आणि त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होताना दिसतात.
‘कम्फर्ट फूड’ म्हटल्यावर असे अनेक प्रकार समोर येतात. स्मृतिरंजन करणारे, सुखावणारे, सोईचे असणारे आणि शरीराला आनंद देणारे असे चार गटातले पदार्थ हे ‘कम्फर्ट फूड’ ठरतात. यावर संशोधनही झालं आहे. ‘कम्फर्ट फूड’ नेमकं कोणतं हे ठरवायचं झालं, तर अनेकदा विक्षिप्त सवयीही त्यात सापडू शकतात. अमेरिकेतल्या पुरुषांना गरम आणि जेवणाशी संबंधित पदार्थ अधिक रुचतात, तर स्त्रियांना स्नॅकच्या गटात मोडणारे चॉकलेट आणि आइस्क्रीमसारखे पदार्थ हवेसे वाटतात. तसंच तरुणवर्गाचा कलही स्नॅक पद्धतीच्या पदार्थांकडं जास्त असतो, असं त्यात दिसून आलं होतं. आपल्याकडं असा धांडोळा घेतला, तर कदाचित अशीच किंवा याच्याच आसपासची उत्तरं मिळतील. आपल्या देशात बायका स्वयंपाक आणि त्याचं नियोजन करण्यात इतक्या अडकलेल्या असतात, की त्यांना जेव्हा आयतं ताट हातात मिळतं, तेव्हा तेच त्यांचं ‘कम्फर्ट फूड’ होतं. मग पदार्थ फार आवडते नसले, तरी काहीच बिघडत नाही. अशी वेगवेगळी रूपं घेऊन ‘कम्फर्ट फूड’ प्रत्येकाच्या आयुष्यात विसावलेलं असतं. मात्र ते दरवेळी जीव शांतवणारं असलं, तरी शरीराला अपायकारक ठरणारंही असू शकतं. तरुण व लहान मुलांमधील वाढता जाडेपणा आता आपल्याकडंही दिसायला लागला आहे. म्हणूनच जिभेला किंवा मनाला वाटलं, म्हणून करा त्यांना कम्फर्टेबल, असं सैल असून चालत नाही. कम्फर्टच्या मागं विचारही ठेवला, तर ते खाणं नक्कीच आपल्याला हितकारक ठरेल. ते खऱ्या अर्थानं आपलं ‘कम्फर्ट फूड’ ठरेल...
बटाट्याचे काप
साहित्य : बटाटे, बारीक रवा, मीठ, आवडीनुसार तिखट किंवा मिरपूड, मीठ, तेल.
कृती : बटाटे सोलून घ्यावेत आणि त्याचे गोल आकाराचे पातळ काप करून त्यांना थोडं मीठ लावून पंधरा मिनिटं बाजूला ठेवावेत. तवा तापवत ठेवावा आणि त्यावर तेल घालावं. एका थाळीत बारीक रवा घेऊन, त्यात घोळवलेले बटाट्याचे काप तव्यावरील तेलात पसरून त्यावर झाकण ठेवावं. किंचित वाफ आली, की बाजू उलटावी. बाजूनं थोडं तेल पुन्हा सोडावं. खमंग लालसर रंग येऊ द्यावा. डिशमध्ये ठेवून आवडीनुसार वर चवीनुसार मीठ, तिखट वा मिरपूड भुरभुरावी. तेलाचा वापर आपापल्या पद्धतीनं कमी-जास्त करावा.
पर्यायी सूचना : या कापांना लसूण वाटून लावल्यासही ते छान लागतील. याच पद्धतीनं वांग्याचे, सुरणाचे, कच्च्या केळ्याचे वा लाल भोपळ्याचेही काप करता येतात. सुरण आधी उकडून घेऊनही त्याचे काप केले जातात. सुरण अनेकदा खाजरा असतो, त्यामुळं त्याचे काप करताना चिंचेचाही वापर केला जातो. कच्च्या केळाचे काप लांबट आकारात करून त्याला लसूण वाटून लावलं, तर ते खमंग काप चक्क दिसतात अगदी माशाच्या तुकड्यासारखे... फसायलाच होतं!
आंब्याचा शिरा
साहित्य : एक वाटी जाड रवा, पाऊण वाटी साजूक तूप, पाऊण ते एक वाटी साखर, रव्याइतकाच आंब्याचा रस, दीड वाटी दूध, आवडीनुसार बदाम, काजू इत्यादींचे काप.
कृती : निम्मं तूप कढईत घालून, त्यावर रवा खमंग भाजावा. छान वास सुटला, की त्यात दीड वाटी दूध गरम करून घालावं आणि रवा चांगला परतावा. तो फुलून येईल. झाकण ठेवून एक-दोन वाफा आणाव्यात. त्यानंतर त्यात साखर मिसळून नीटपणे हलवून घ्यावं. साखर विरघळेलच. मग त्यात आंब्याचा रस घालावा. राहिलेलं तूप टाकून एकत्र हलवावं. दोन-तीन मिनिटं बारीक आचेवर झाकण ठेवून वाफ आणावी. वरून बदाम-काजूचे काप घालून एकदा हलवावं. आंब्याचा सुंदर चवीचा देखणा शिरा तयार आहे.
पर्यायी सूचना : या शिऱ्यात तूप सढळ हातानं वापरावं, तरच शिरा छान मोकळा होतो. शिऱ्यात आंब्याचा रस रव्याच्या दुप्पट घातला, तरी उत्तमच. रंगही अधिक गडद येईल. साध्या रव्याप्रमाणं सुगंधी तांदुळाचा रवा किंवा वरी वापरूनही असा शिरा करता येईल किंवा गव्हाचा बारीक दलियाही वापरता येईल. त्याचाही रंग छानसा, पण जरा वेगळा येईल. केळं घालून प्रसादाचा शिरा नेहमीच केला जातो. तसंच आंब्याच्या शिऱ्याप्रमाणं सफरचंद घालूनही शिरा चांगला होतो. तो सालं काढून करावा. कधी अननस घालूनही करता येईल. दुसरं म्हणजे या शिऱ्याला फक्त आंब्याचा स्वाद येऊ द्यावा. त्यात वेलची, केशर वगैरे घालण्याची गरज नाही. तो तसाच छान लागतो.