खिचडी झिंदाबाद! 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 24 जून 2019

पोटपूजा
 

भारतीय उपखंडातला एक कॉमन पदार्थ म्हणजे खिचडी. तांदूळ आणि डाळ यापासून तयार होणारी खिचडी हा अतिशय साधा आणि घराघरांत केला जाणारा एक सोयीचा आणि चवीचाही पदार्थ आहे. त्यात वेगवेगळी धान्यं व भाज्या वापरून बदल करायला खूप वाव असल्यानं, खिचडीची विशिष्ट अशी पाककृती नाही. आबालवृद्धांचं ते खाणं आहे आणि आजारी माणसापासून धट्ट्याकट्ट्या लोकांपर्यंत सर्वजण खिचडी खातात. लहान मुलं खायला लागल्यावर त्यांनाही मिश्र धान्यांची सैल व मऊसर खिचडी दिली जाते. सर्वसाधारणपणे बहुतेकांना ती आवडते आणि गृहिणींना करायला तर फारच सोयीची आहे. फार भूक नसली, वेळ नसला, तर रात्रीच्या जेवणात खिचडी, लोणचं आणि पापड असला की झालं... जोडीला कढी असली, तर फारच छान! 

आपल्याकडं देशभर सगळ्या प्रांतांमधून खिचडी केली जाते. खिचडी, खिच्डी, छिचुड़ी, खिसिरी, खिचेरी असे या शब्दाचे बरेच पाठभेद आहेत. बंगाली भाषेत मेस किंवा खानावळ अशा अर्थी ‘जोगा खिचुड़ी’ असा शब्दच तयार झाला आहे. भारत, नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान सगळीकडं खिचडी या ना त्या स्वरूपात केली जाते. काळा मसाला, गरम मसाला, धणे-जिरे पावडर इत्यादी वेगवेगळे घटक घालून खिचडी केली जाते. महाराष्ट्रात किनारपट्टीलगतच्या भागात कोळंबी घालूनही खिचडी केली जाते. शिवाय आपल्याकडं संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला तीळ घालून खिचडी करतात. कर्नाटकातला बिसी बेळे भात हा खिचडीचाच एक प्रकार होय. तर तमिळनाडूतला पोंगलही खिचडीला जवळचा! शक्रे पोंगल हा गोड भाताचा प्रकार आणखी वेगळा. शिवाय खिचड़ा हाही हिचाच वेगळा अवतार. मुस्लिम समाजात हलीम करतात, तसाच जवळपास खिचड़ा असतो. मांस घालून तो केला जातो. लखनौत मांस व तांदूळ, तसंच विविध डाळी एकत्र शिजवून खिचड़ा प्रथम एका नवाबानं इमामबाड़ा बांधणाऱ्या मजुरांसाठी दिला होता. ते दिवसही दुष्काळाचे होते, त्यावेळी एका पोषक पदार्थाच्या स्वरूपात, दुष्काळावरचा पर्याय होऊन खिचड़ा समोर आला. खिचड़ा लोकप्रिय झाला आणि लखनौतून तो इतरत्र गेला. मग त्याचे स्थानिक खिचडी अवतार तयार झाले. खिचड़ा हा मांसाहारी पदार्थांचा, तर खिचडी साधारणतः डाळी व भाज्या वगैरे घालून केलेली असते. तांदूळ आणि कडधान्यं किंवा द्विदल धान्यं (डाळी) यापासून केला जाणारा खिच्चा हा पदार्थ आयुर्वेदात सांगितला गेला आहे. सुश्रुतसंहिता आणि चरकसंहितेतही हा उल्लेख येतो. यापासूनच खिचडी या शब्दाचा उगम झाला. इब्ने बतूता या मोरोक्कोच्या प्रसिद्ध प्रवाशानं खिचडीचा उल्लेख ‘किशरी’ असा केलेला आढळतो. मुघल काळातही खिचडी खूप प्रसिद्ध होती. आईन-ए-अकबरी मध्येही खिचडीची पाककृती सात वेगळ्या प्रकारांत दिली आहे. बिरबलाच्या खिचडीची गोष्टही प्रसिद्धच आहे. २०१७ मध्ये ‘ग्लोबल फूड एक्‍स्पो’तर्फे आयोजित भारतीय खाद्यपदार्थांच्या प्रदर्शनात खिचडीला भारताचं सुपर फूड म्हणून घोषित करण्यात आलं होतं. अर्थात गेली कित्येक शतकं ते इथलं सुपर फूड आहेच... 

इथल्या भाषांमधूनही खिचडी रुजली. ‘बिरबलाची खिचडी, शिजणार तरी कधी’ हा वाक्‍प्रचार प्रसिद्ध आहेच. मराठीतही, वेगवेगळ्या गोष्टी एकत्र झाल्या, की ‘अगदी खिचडी झाली आहे,’ असं म्हणतात.. पोषणमूल्यं असलेली, जास्त खिटखिट न करता येणारी आणि प्रत्येकाच्या चवीनुसार व आवडीनुसार होऊ शकणारी खिचडी, हे भारताचं राष्ट्रीय अन्नच आहे. उरलेल्या शिळ्या खिचडीत दही वा ताक घालून आणि सरसरीत करून, तिला खमंग फोडणी देऊन तयार केलेला नाश्‍ता अनेकांना आवडतो. फोडणीचा भात करण्यासाठी तो मुद्दाम जास्त करून उरवला जातो. तसा खिचडीचा दहीवाला नाश्‍ता करण्यासाठी बरेचदा खिचडी रात्री जरा जास्तच केली जाते. खिचडीला भारताचा राष्ट्रीय पदार्थ म्हणून दर्जा देण्याचा विचार मध्यंतरी सरकारतर्फे पुढं आला, तेव्हा त्याची टिंगलही झाली. ‘खिचडीला राष्ट्रीय पदार्थ केल्यावर, मग ती खाताना काय उभं राहून मानवंदना द्यायची का?’ ‘चित्रपटापूर्वी ती खाण्याची सक्ती होणार का?’ असे प्रश्‍न विचारून जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी खिल्ली उडवली होती, हे आठवतं. काही वर्षांपूर्वी ‘खिचड़ी द मूव्ही’ हा हिंदी चित्रपटही आला होता. 

काहीही असलं, तरी खिचडीशी प्रत्येकाच्या आठवणी निगडित असतात. कधी थंडी वा पावसाळ्यात खाल्लेली गरमागरम खिचडी आठवते, तर कधी आयत्यावेळी पाहुणे आल्यावर केलेली आणि मस्त जमलेली खिचडी. मला स्वतःला खिचडीबद्दलच्या दोन आठवणी नेहमी स्मरतात. एक खाल्ली होती, केदारनाथ देवळापाशीच्या एका छोटेखानी दुकानमालकाच्या घरी. तीसेक वर्षं झाली असतील. आम्ही मैत्रिणी केदारनाथच्या ट्रेकला गेलो असताना, पाऊस पडत होता. संध्याकाळच्या सुमाराला देवळापाशी पोचलो, तरी ढगांमुळं काही दिसत नव्हतं. साऱ्याजणी भिजलोही होतो. काही पावलांवरचं देऊळही दिसत नव्हतं. देवळात जाऊन आलो. प्रचंड थकलो असल्यानं आणि भूकही लागल्यानं त्याला विचारलं, ‘इथं कुठं हॉटेल आहे का?’ तर तो म्हणाला आता पावसामुळं काही मिळणार नाही. फारशी हॉटेलं त्या काळात नसायचीही. मग त्यालाच विचारलं, ‘तू काही देशील का करून?’ तर ‘हो’ म्हणाला. गरमागरम खिचडी देतो, म्हणाला. ‘शुद्ध घी में बनी हुई खिचड़ी मिलेगी।’ हे त्याचं वाक्‍य सगळ्यांना सुखावून गेलं आणि ती खिचडीही मस्त लागली... 

दुसरी खिचडी हिमाचल प्रदेशातल्या ट्रेकच्या वेळची! चंद्रखणीला ट्रेक काढला होता. पण तिथंही पावसामुळं आणि गारांच्या वर्षावामुळं हाल झाले. अंधार झाल्यावर रानात रात्र काढावी लागली. मलाना या गावाच्या अलीकडं, गुरांना बांधायच्या एका खोपटाचा आश्रय घेतला. सुदैवानं त्या ठिकाणची मंडळी मुख्य गावात काही उत्सवासाठी गेली होती. मलाना गावचे लोक स्वतःला खास समजतात आणि आपला खासगीपणा जपतात, ते कुणाला जवळ येऊ देत नाहीत वगैरे ऐकलं होतं. सिकंदराच्या सैन्यातल्यांचे ते वंशज आहेत. त्यामुळं आम्हाला जरा भीतीच वाटत होती, कारण आम्ही त्यांच्या जनावरांच्या का होईना, पण घरात प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही लवकर उठलो आणि मलानाच्या दिशेनं निघालो. गावात गेल्यावर सरपंचाला भेटलो आणि त्यालाही सांगितलं. पण ते लोक रागावले नाहीत, उलट आम्हाला त्रास झाल्याबद्दल त्यांना वाईट वाटलं. मग त्या सरपंचाच्या घरीच आम्हाला छानशी गरमागरम खिचडी मिळाली. आग्रहानं तो ती स्वतःही वाढत होता. त्या खिचडीची चव अजूनही आठवते... 

तांदळाच्या शेवयांचा उपमा 
साहित्य : दोन मोठ्या वाट्या भरून तांदळाच्या शेवया, ४ वाट्या पाणी, ७-८ कढीलिंबाची पानं, पाव वाटी शेंगदाणे, पाव वाटी चणाडाळ, ८-१० काजू, चवीनुसार मीठ, किंचित साखर, फोडणीसाठी मोहरी, मेथीदाणे, जिरे, हिंग, तेल. 
कृती : पाणी गरम करून, तांदळाच्या शेवया बुडतील अशा पद्धतीनं त्यात दहा मिनिटं ठेवावं. नंतर रोवळीत ओतून अर्धा तास तरी निथळत ठेवावं. कढईत तेलाची फोडणी करावी आणि त्यात मोहरी, मेथीदाणे, जिरे, हिंग, कढीलिंबाची पानं, शेंगदाणे, चणाडाळ व काजू घालून खमंग परतावं. छान वास आला, की त्यात रोवळीतल्या मोकळ्या झालेल्या शेवया घालाव्यात आणि अलगद वर-खाली हलवावं. वाटल्यास कढई उचलून शेवया टॉस कराव्यात. चवीनुसार मीठ व किंचित साखर घालावी आणि नीट मिसळावी. शेवया मोडणार नाहीत, अशा रीतीनं सर्व छान मिसळावं. आवडीनुसार कोथिंबीर, नारळाचा चव घालावा आणि बशीत खायला घ्यावा. 
पर्यायी सूचना : या उपम्यात हळद घातली तरी चालेल, पण दक्षिणी चव येण्यासाठी तो पांढराच खायला बरा वाटतो. गाजर, वाटाणे इत्यादीही घालता येईल. खिरीसाठी ज्या शेवया वापरल्या जातात, त्यांचाही असा उपमा चांगला होतो. त्याशिवाय हा उपमा आणखी वेगळ्या पद्धतीनं करता येईल. त्यात टोमॅटो आणि कांदा तेलावर परतून घ्यावा आणि त्यात लसूणही घालावा. खमंग भाजलेले अर्धी वाटी तीळ आणि तिखट घालून थंड झाल्यावर मिक्‍सरमधून बारीक वाटून त्याची चटणी करावी. वरील पद्धतीनं गरम पाण्यातून काढून, शेवया तयार कराव्यात. कढईत फोडणी करून त्यात शेवया घालाव्यात. एकदा हलवून, त्यात तयार केलेली टोमॅटोची चटणी व मीठ, साखर इत्यादी घालावी. शेवटी कोथिंबीर-नारळाचा चव घालून सजवावं आणि खायला घ्यावं. या पद्धतीनं केलेला शेवयांचा उपमा चवीला खमंग भेळेसारखा लागतो.

डाळ-तांदळाची खिचडी 
साहित्य : दीड वाटी तूरडाळ, ३ वाट्या तांदूळ, पाणी, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग इत्यादी, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, चमचाभर काळा मसाला. 
कृती : खिचडी वेगवेगळ्या प्रकारे करतात. ही खिचडी तूरडाळ व तांदूळ एकत्र कुकरमध्ये शिजवून केली आहे. खिचडीसाठी तूरडाळ व तांदूळ एकत्र धुऊन घ्यावे. दोन बोटं पाणी वर राहील अशा बेतानं पाणी घालून कुकरमधून शिजवून घ्यावे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. कढईत तेल तापत ठेवून, मोहरी-जिरे-हळद-हिंगाची फोडणी करावी. यात टोमॅटोही चिरून घालावा व परतावा. आवडीनुसार लसूणही घालता येईल. एकदा परतून घ्यावं आणि चवीनुसार मीठ घालावं. शिजलेले डाळ-तांदूळ यात घालून मिसळावे, काळा मसाला घालावा आणि छान परतावं. वर चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी आणि वाढताना चमचाभर तुपाची धारही सोडावी. खिचडी तयार आहे. 
पर्यायी सूचना : खिचडी हा अगदी साधा आणि नेहमीचा पदार्थ. खिचडीत आवडीनुसार वाटाणे, फ्लॉवर वा गाजराचे तुकडे, मेथी वा पालकाची पानं, असं बरंच काही घालता येतं. तांदळासोबत किंवा ऐवजी गव्हाची अथवा जवाची भरड, तूरडाळीऐवजी मूगडाळ, (पिवळी वा हिरव्या सालीची) मसूर डाळ असे यातील घटक बदलता येतात. आमसूल/चिंच/आंबोशी आणि थोडा गूळ, घालूनही जरा आंबट-गोड चवीची खिचडी केली जाते. खिचडी हे एक उत्तम ‘वन डिश मील’ ठरू शकतं. बाजरी किंवा ज्वारीची भरड वापरूनही खिचडी केली जाते. उपवासाला साबुदाण्याची खिचडी करतात, ती वेगळीच...

संबंधित बातम्या