उपास आणि बरंच काही

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 29 जुलै 2019

पोटपूजा
 

नुकतीच आषाढी एकादशी झाली. चातुर्मास सुरू झाला. खरं तर हा शब्दही चतुर्मास असा आहे, पण लोकांच्या तोंडी चातुर्मास हाच शब्द असतो. चतुर्‌ हा संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ आहे चार. आषाढ महिन्यातली शुक्‍ल पक्षातली एकादशी ते कार्तिक महिन्यातली पौर्णिमा असा चातुर्मास पाळला जातो आणि वेगवेगळे सण, व्रतं आणि अर्थातच निरनिराळे उपास या काळात केले जातात. हिंदू, जैन, बौद्ध अशा धर्मांमध्ये चातुर्मासाची संकल्पना सांगितलेली आहे. बुद्धानं या काळात राजगीरला राहून प्रवचनं दिली होती. आजही बौद्ध भिक्‍खू या काळात वर्षावास करतात, म्हणजे एकाच जागी राहतात. हा वर्षाकाल असल्यामुळंही खरं तर ही प्रथा सोयीची आहेच, जैन धर्मीय साधूही बाहेर न फिरता, एकाच स्थानी राहतात. जैन धर्मात अहिंसेचं तत्त्व काटेकोरपणे पाळलं जात असल्यानं, पावसाळ्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या जंतूंची व किड्यांची पैदास होते, तेव्हा ते पायदळी तुडवले जाऊ नयेत, यासाठी ही काळजी घेतली जाते. चातुर्मासात उपासही जास्त केले जातात आणि पावसाळी वातावरणाला अनुकूल असा हलका आहार व कमी आहार घेण्यात यावा, यासाठी दिवसभर किंवा एकवेळ कडक उपास करणं, धान्य भाजून खाणं, उपासाचे पदार्थ खाऊन किंवा फळं खाऊन राहाणं असे नेम धरले जातात. उपासाने पुण्य मिळतं, ईश्वर प्रसन्न होतो, मनातल्या इच्छा पूर्ण होतात अशा समजुतीतून हे उपास केले जातात. उपास हा बोलचालीतला शब्द म्हणजे, उपवास या शब्दाचंच प्रचलित रूप आहे. खरं म्हणजे, देवाच्या निकट जाण्याचा (उपवास) हा काळ असावा, असं यात अपेक्षित आहे. यादृष्टीनं कितीजण उपास करतात, ते त्यांचं त्यांनाच ठाऊक.

निसर्गाला अनुकूल असा आहारविहार राहावा, अशा जीवनपद्धती आपल्याकडं आहेत, त्यातलाच हा उपास. चातुर्मासात किंवा एरवीही उपास करण्याची पद्धत ही आयुर्वेदाच्या धारणांनुसार योग्य आहे. कारण नैसर्गिक बदलांमुळं वातावरण आणि शरीरही बदलत असतं. चातुर्मासाचा काळ म्हणजे पावसाळ्याचा काळ. पोटातला अग्नी तेव्हा मंद झालेला असतो आणि सूर्यदर्शन फारसं होत नसल्यानं, वातावरणातलाही. आकाशात सूर्य असेपर्यंत पोटातलं अन्न चांगलं पचतं, असं आयुर्वेद सांगतो. म्हणूनच की काय, या चार महिन्यांत किंवा श्रावणात तरी सूर्योदयापूर्वी जेवून घेण्याचा संकेत आहे. तर काहीजण ‘नक्त’ करतात. म्हणजे रात्रीच जेवतात. नक्त या संस्कृत शब्दाचा अर्थच रात्र असा आहे. काहीजण हे चार महिने एकवेळच जेवणाचाही नेम धरतात. या काळात, निदान श्रावण महिन्यात तरी कांदा-लसूण न खाणारेही बरेच असतात. तर काही मंडळी आंबट खात नाहीत. कमी आहार घेतला, की आपोआपच पचनाच्या समस्या उद्‌भवत नाहीत. आधीच्या समस्या दूर व्हायलाही मदतच होते. एखाद्या दिवशी लंघन करणं, म्हणजे अजिबात काहीही न खाल्यामुळं शरीरातले रोगाचे जीवजंतू निष्प्रभ होतात आणि आजार लवकर बरा होतो, हे तत्त्व यामागं आहे. साधा सर्दी-खोकला झाला, तर गोळ्या घेण्यापेक्षा लंघन करणं केव्हाही श्रेयस्कर असतं. अर्थात असा उपास झेपला तरच तो करावा. 

पण उपास म्हटल्यावर, ईश्वरभक्तीपेक्षा नेहमीचं जेवण वगळता, विशिष्ट असे पदार्थच तेवढे खाऊन करायचा उपास डोळ्यांसमोर येतो. कारण शेवटी ‘आधी पोटोबा, मग विठोबा’ हे बहुतेकांना मान्यच असतं. उपासाच्या या खाण्यात मग जिरं, साबुदाणा, भगर किंवा वरी, राजगिरा, शिंगाडा, शेंगदाणे, सुकामेवा हे घटक आणि दूध, दही, फळं आणि रताळं, बटाटा, काकडी, भेंडी, लाल भोपळा, अळू, राजगिरा अशा भाज्या, यांचा समावेश केला जातो. बरेचजण उपासाला अळू खात नाहीत. इतरही काही गोष्टी उपासाला चालतात. अर्थात ‘उपासाला चालणारे पदार्थ’ या गटात ठिकठिकाणी फरक पडतो. कुठे तांदूळ हे नेहमीचं अन्न, त्यामुळं तांदूळ खाल्ले नाहीत, की उपास केला असं मानलं जातं. तर कुठे दुधी चालतो. उपासाला सैंधव मीठच खाण्यावरही काही ठिकाणी कटाक्ष ठेवला जातो. बरेचसे मांसाहारी व मत्स्याहारी लोक तर शाकाहारी खाल्लं म्हणजे ‘उपास’ घडला, असंच मानतात. तर कुठे असंही असतं, की अमुक उपासाला वरी चालते, तमुक उपासाला चालत नाही असं समजतात. खरं तर साबुदाणा पचायला जड (म्हणूनच तो भाजून खावा), अवरोधक आणि फार काही खाद्यमूल्यं नसलेला. पण तो तर सगळ्यांना आवडणारा. पण साबुदाणा मात्र बऱ्याच उपासांना चालतो. आता या सगळ्यात काही पटेल असं कारण आहे का, तर ते बहुधा नाहीच. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. 

उपासामागची भूमिका बाजूला पडून, त्यात मग पायंडे पडत गेले, प्रथा तयार झाल्या. आजकाल उपासतापास फार कुणी करत नाही, पण उपासाचे पदार्थ मात्र आवडीनं खाल्ले जातात. त्यात शेंगदाण्यांचा वापरही बराच होतो आणि मग हे पदार्थ पित्तकारक होतात. मग गमतीचा भाग हा, की शेंगदाणे उपासाला चालतात, पण शेंगदाण्याचं तेल मात्र चालत नाही. काहीजण मात्र अलीकडं हे न मानता शेंगदाण्याचं तेल वापरतात. तूप वापरणं म्हणजे जास्त कोलेस्ट्रॉल. (पण उपासाचे पदार्थ तुपातच केले तर जास्त चवदार लागतात.) तसंच कोथिंबीर चालते, पण धणे चालत नाहीत. (काहीजण कोथिंबीरही खात नाहीत उपासाला.) बरं, मूळचे इथले पदार्थ उपासाला खाल्ले जातात, असंही म्हणता येत नाही. कारण साबुदाणा, बटाटा, रताळं, मिरची असे बरेच घटक हे बाहेरच्या देशांमधून इथे आलेले आहेत. मौज म्हणजे, माणसाला उपास करतानाही खाण्यात जराही कसूर चालत नाही. ‘एकादशी, दुप्पट खाशी’ असं उगाच म्हणत नाहीत. उपासाचीही मोठी खाद्ययात्रा असते. जे जे म्हणून पदार्थ एरवी खाल्ले जातात, ते सगळे उपासाला चालणारे घटक वापरून केले जातात. भागर-आमटी, बटाट्याची रस्साभाजी किंवा काचऱ्या, बटाटा, सुरण वा रताळ्याचे काप, पॅटीस, साबुदाणा वडा, बटाटाच्याचे पापड, शिंगाड्याच्या पिठाचा शिरा, राजगिऱ्याच्या लाह्यांचा लाडू वगैरे तर आहेतच. पण उपवासाची पुरणपोळी, भगरीचे पाव, शिंगाड्याच्या पिठाची शेव, उपवासाचे गोड व तिखट कटलेट, डोसा, इडली नि इतरही काय काय... शिवाय फराळी, म्हणजे उपासाची भेळ-मिसळपण असते. खाद्ययात्रा उपासातही चालूच असायला हवी ना! एकूणच, उपास म्हटलं, की पुढे हे ‘आणि बरंच काही’ आलंच!

भोपळा घालून फोडणीची भगर 
साहित्य : भगर किंवा वरी, लाल भोपळ्याचा कीस, तूप, मीठ, चिमूटभर साखर, तिखटाची पूड, थोडं शेंगदाण्याचं कूट, पाणी. 
कृती : भगर भाजून घ्यावं. कढईत तूप-जिऱ्याची फोडणी करून भगर फोडणीला घालावं. जरा परतून त्यातच भोपळ्याचा कीस घालावा. नीट हलवावं आणि वरीच्या दुप्पट गरम पाणी घालावं. खळखळून उकळलं की शेंगदाणा कूट घालावा व शिजू द्यावं. नंतर मीठ, तिखट, चिमूटभर साखर घालावी. झाकण ठेवून शिजवावं. मधूनच हलवावं. हवं तितकं सैल वा कोरडं-घट्ट करावं. बरोबर दाण्याची आमटी किंवा अळूची पातळ भाजी खाणार असलात, तर त्यानुसार भगरीतील मिठाचं प्रमाण ठेवावं. 
पर्यायी सूचना : काहीजण अशी भगर दाणकूट व फोडणी न घालताही करतात. यात काकडीचा कीस वा चिरलेली काकडी, बटाटे इत्यादीही टाकता येईल. नुसतीही भातासारखी भगर करतात, पण त्यापेक्षा त्यात काही भाजी घालावी, म्हणजे तिचं पोषणमूल्य वाढतं आणि चवही. शिवाय भगर व राजगिरा एकत्र मिसळूनही हा पदार्थ करता येतो.

अळूची उपासाची भाजी 
साहित्य : भाजीच्या अळूची पानं, राजगिऱ्याचं पीठ, भाजलेले शेंगदाणे, लाल सुकी मिरची, चिंच, चवीनुसार मीठ, गूळ, फोडणीसाठी जिरं, तूप. 
कृती : चिंचेचा कोळ करून घ्यावा. अळू चिरून व शिजवून घ्यावा. शिजल्यावर पाणी बाजूला काढून घोटून घ्यावा. (अळू खाजरा असेल, तर चिरल्यावर चिंचेच्या पाण्यात थोडावेळ ठेवून कुस्करावा व पाणी काढून टाकून मग शिजवावा.) त्यात राजगिऱ्याचं पीठ घालून पुन्हा नीट घोटून घ्यावं व बाजूला काढलेलं पाणी त्यात मिसळावं. भाजी जशी हवी तितकी घट्ट-पातळ करावी. पातेल्यात तूप गरम करून जिरं व मिरची घालून फोडणी करावी. त्यात भाजी घालावी व चिंचेचा कोळ, गूळ तसंच भाजलेले शेंगदाणे मिसळून उकळावी. वरीबरोबर दाण्याची आमटी करण्याऐवजी अशी अळूची भाजीही चांगली लागते. शिवाय ती पोटाला जडही पडत नाही.  
पर्यायी सूचना : या भाजीसाठी शिंगाड्याचं पीठही वापरता येईल. चिंचेऐवजी अमसुलं वापरता येतील. अळूप्रमाणं राजगिऱ्याच्या पानांची भाजीही उपासाला चालते. तीही या पद्धतीनं करता येईल.

रताळ्याचा कीस  
साहित्य : रताळी, शेगदाण्याचं कूट, तूप, मीठ, तिखटाची पूड, किंचित साखर, तूप, जिरं. 
कृती :  रताळी स्वच्छ धुऊन किसून घ्यावीत. कढईत वा पातेल्यात तूप तापवून त्यात जिऱ्याची खमंग फोडणी करावी. कीस फोडणीला घालावा आणि वरखाली नीट परतावा. झाकण ठेवून कीस शिजू द्यावा व अधूनमधून खालपासून चांगलं हलवून घेत राहावं. लवकरच कीस नरम होईल, त्यात मीठ, तिखट, किंचित साखर व दाण्याचं कूट घालावा. नीट मिसळावा आणि पुन्हा झाकण ठेवून शिजवावा व वारंवार हलवावा. खाली लागू देऊ नये. 
पर्यायी सूचना : असाच बटाटा, सुरण व बटाटा एकत्रितपणे तसंच बीट यांचाही कीस करता येईल. आवडीनुसार यात हिरवी मिरचीही वापरू शकता. वरून कोथिंबीर व नारळाचा चवही घालता येईल.

लाल भोपळ्याची खीर  
साहित्य : लाल भोपळा, दूध, साखर, चमचाभर तूप, वेलची पूड.
कृती : भोपळा किसून घ्यावा. पातेल्यात किंचित तुपावर तो खरपूस परतावा. जरा मऊ झाल्यावर त्यात दूध घालून शिजू द्यावा. आळत आलं की साखर घालावी व आच बारीक करून ठेवावी. थोड्या वेळानं वेलचीची पूड घालावी व एकदा नीट हलवून झाकून ठेवावं. नंतर त्यात आवडीनुसार किंचित तुपावर परतलेले काजूचे वा बदामाचे तुकडे घालावेत. खीर तयार आहे. 
पर्यायी सूचना : बिटाचीही खीर या प्रकारे करता येईल.

संबंधित बातम्या