श्रावण महिन्याचे गीत... 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

पोटपूजा
 

‘समुद्र बिलोरी आईना, सृष्टीला पाचवा महिना’ अशा शब्दांत बोरकरांनी केलेलं श्रावणाचं वर्णन फारच सुंदर आणि चपखल आहे. हिंदू कॅलेंडरवरचा हा पाचवा महिना खरोखरच या मातीला वेगवेगळे अलंकार बहाल करून जातो. तिला अधिकच सुंदर बनवतो. आताही श्रावण महिना सुरू आहे. मात्र एरवी हिरवाईची रम्य आठवण करून देणारा आणि वेगवेगळ्या सण व उत्सवांमुळे मनाला आल्हाददायक वाटणारा श्रावण, यंदा डोळ्यांत पाणी आणतोय. याला कारण आहे ते महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधल्या गावांमधून सुरू झालेलं पावसाचं आणि पुराचं थैमान, मृत्यूचं तांडव आणि झालेलं हरतऱ्हेचं नुकसान. पानशेत पुराची आठवण नेहमी जागवली जाते. पण यावेळचा पूर पानशेतपेक्षाही जबरदस्त तडाखा देऊन जाणारा आहे. यावर्षीचा हा पावसाचा आणि पुराचा कहर पुढली अनेक वर्षं मनातून पुसला जाणार नाही... परस्परसहकार्य आणि मानवी सौहार्दाला जागून सर्वत्र मदतीचा हात पुढं होतो आहे. पण अनेकांचं झालेलं नुकसान हे भरपाईच्या पलीकडचं आहे. एक विचित्र अशी टोचणी आणि हळहळ मनात घेऊनच हे वर्ष आता ढकलावं लागणार आहे... 

महाराष्ट्रातली खाद्यपरंपरा तशी मुळात साधी आहे आणि ऋतुमानानुसार होणारे बदल ओळखून स्वतःत बदल करत जाणारीही आहे. इथला पावसाळ्याच्या काळातला आहार हा आणखीच साधा आणि तरीही वैविध्यपूर्ण! निसर्गाच्या रूपांना मनानं कृतज्ञतापूर्वक ओळखणारे आणि मानवी नात्यांचीही जाण ठेवणारे सण व उत्सव श्रावण महिन्यात येतात. दिवस बदलले असले, तरी काही परंपरा कमीअधिक प्रमाणात पाळल्या जातात किंवा मग प्रतीकात्मक रीतीनं जपल्या जातात. श्रावण महिना तसाच वाटतो. इथल्या संस्कृतीत निसर्गाचा सहवास पेरणारा आणि जीवनातला आनंद निरनिराळ्या प्रकारांनी कसा लुटायचा, त्याचं स्वागत कसं करायचं, याचं स्मरण करून देणारा श्रावण मुळातच मनभावन असाच आहे. नागपंचमी ते बैलपोळा; असा या महिन्याचा सुंदरसा आलेख, जुन्या परंपरांची आणि त्यामागच्या निसर्गपूजनाच्या तत्त्वाची आठवण करून देणारा आहे. या सणांच्या निमित्ताने केले जाणारे अनेक वेगवेगळे पदार्थही आपल्या ताटात सामावून जाणाऱ्या भाज्या व धान्यांचं महत्त्व पटवणारे असतात. अलीकडच्या वेष्टनबंद आणि निःसत्त्व खाऊपेक्षा कितीतरी चवदार, रोचक आणि शरीराला उपकारक अन् जिभेला मोहवणारे असे पदार्थ करून खाण्याची परंपरा श्रावणात पाळली जाते. 

उपासतापास, व्रतवैकल्यं आणि प्रथा-परंपरा आहेतच. त्या तशाच्या तशा नाही पाळल्या, तरी या प्रसंगी केले जाणारे पदार्थ थोड्याफार प्रमाणात श्रावणात केले जातातच. त्या त्या विशिष्ट सणाला नाही केले, तरी सुटी किंवा रविवार बघून आगेमागे ते केले जातात आणि करावेतच. कारण मग या निमित्तानं ते घरात होतात. लहानांना त्यांची माहिती होते आणि चवही कळते. नव्या पिढीपर्यंत परंपरांची झलक पोचते. धार्मिक प्रथांच्या निमित्तानं होणारे हे पदार्थ आपल्या आहारसंस्कृतीत अगदी सहजपणे सामावले गेले आहेत. अखेरीस जीवनात गोडी निर्माण करणं आणि त्याची रंगत व लज्जत वाढवणं हाही धार्मिक प्रथा व परंपरांमागचा उद्देश आहेच. खरं तर तोच खरा उद्देश आहे. 

आषाढ अमावस्येला दीपपूजन करून, कणीक किंवा बाजरीच्या पिठाचे गूळ घालून केलेले दिवे श्रावणातल्या पदार्थांची ओढ वाढवतात. नागपंचमीला केली जाणारी पुरणाची दिंडं किंवा गोव्याकडं केलं जाणारं मनगणं (चणाडाळ, थोडा साबुदाणा आणि गूळ, नारळाचं दूध इत्यादी घालून केलेली खीर) हे श्रावणातले खास पदार्थ. मुली नागपंचमीला हात मेंदीनं रंगवून नागपंचमीचा आनंद लुटतात. रंगीबेरंगी सृष्टीला आपल्या हातावर जणू सजवतात. या दिवशी नागासारख्या विषारी प्राण्यालाही, तो शेतकऱ्यांचा मित्र आहे म्हणून पुजलं जातं.  तर गोकुळाष्टमीला गोपाळकाला किंवा दहिकाला केला जातो. यात साळीच्या व ज्वारीच्या लाह्या, चणाडाळ, पेरू, केळं, मिरच्या, कोथिंबीर इत्यादी दह्यात कालवून आणि फोडणी घालून कालवलं जातं. खरं तर आणखीही इतर विविध घटक सामावून घेणारा हा पदार्थ एरवीही करून खायला हरकत नसते. नारळीपौर्णिमेला समुद्रानं शांत व्हावं म्हणून नारळ वाहिला जातो आणि घरोघरी नारळी भात, ओल्या नारळाच्या करंज्या असे पदार्थ केले जातात. श्रावणातल्या बहुतेक पदार्थांमध्ये साखरेपेक्षा गुळाचा वापर जास्त होतो. तसा तर गूळ हाच आपला मूळचा गोड साथीदार आहे. साखर मागाहून आली. गोड हा शब्दच मुळी ‘गुड’वरून आला. तर काहीजण साखर व गूळ दोन्ही वापरतात. नवा गूळ अजून काही महिन्यांनी येणार असतो. साठवणीतला जुना गूळ श्रावणात बऱ्यापैकी वापरला जातो. पुरण हे तर महाराष्ट्रातलं आद्य पक्वान्नच आहे. श्रावणात दर शुक्रवारी पुरण केलं जातं. निदान आरतीपुरतं तरी पुरण घातलं जातं. पोळ्यांचा वा कडबूंचा घाट सोईनं घातला जातो. आजच्या बदललेल्या आणि स्त्री घराबाहेरही कामांमध्ये व्यग्र असण्याच्या काळातसुद्धा, घरात निदान एकदा तरी पुरण शिजवलं जातंच. 

त्याशिवाय मंगळागौर याच महिन्यात असते. इतरही व्रतं असतात आणि त्यासाठी पूर्वापार सांगितलेली फुलं-पानं लागतात. शमी, दुर्वा, अगरडा (बरेचजण याला अघाडा किंवा आघाडा असंही म्हणतात) अशा बऱ्याच वनस्पती ‘पत्री’मध्ये मोडतात. पूर्वी या वनस्पती घराच्या आसपास उगवत आणि मुलींना त्या शाळेत येता-जाता गोळा करता येत. आताच्या दिवसांत हे सगळीकडं शक्य होत नाही. मुळात या साऱ्या वनस्पती आरोग्याला चांगल्या व औषधी. धार्मिक कार्याच्या निमित्तानं तरी त्यांचं जतन व्हावं, या उद्देशानं त्यांचा समावेश पूजेत केला गेला. निसर्गाभिमुख अशी आपली संस्कृती आहे आणि त्यास पूरक अशा इथल्या अनेक परंपरा आहेत. पण आता काळ बदलला आहे आणि धार्मिक प्रथांकडं बघण्याची व त्या पाळण्याची दृष्टीही स्वाभाविकपणे बदलली आहे. मुख्यतः साऱ्याच प्रथा व परंपरा सांभाळण्याचं काम स्त्रीवर्गावर! इथल्या स्त्रीच्या भावविश्वात जोवर या गोष्टींना महत्त्व होतं, तोवर व तितक्या प्रमाणात या परंपरा आनंदानं पाळल्या गेल्या व जातीलही. मात्र काळाच्या ओघात त्यात बदलही झाले व आणखीही बदल होतील. काही प्रथा नामशेषही होतील. तेही स्वाभाविकच. कारण शेवटी आपल्या जगण्याशीच तर या साऱ्या गोष्टींचा संबंध पोचतो.

ज्वारीची उकड 
साहित्य : दोन वाट्या ज्वारीचं पीठ, चमचाभर तांदळाचं पीठ, दीड वाटी ताक, भाजलेले शेंगदाणे (कच्चेही चालतील), ४-५ लसणाच्या पाकळ्या, बोटभर आल्याचे तुकडे, सुक्या खोबऱ्याचे पाव वाटी तुकडे, आवडत असल्यास नारळाचा थोडा चव, १ हिरवी मिरची, १ सुकी लाल मिरची, पाव चमचा तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर, तेल, मोहरी, जिरं, हिंग इत्यादी. 
कृती : ज्वारीचं पीठ ताकात मिसळून घ्यावं. त्यातच शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे तुकडे, आल्याचे काप व ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालाव्यात. चवीनुसार मीठ, साखर घालावी व हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडं तिखट, चमचाभर तेल हे सारं या पिठातच घालून कालवावं. धिरड्यासाठी करतो, तसं सरसरीत पीठ झालं पाहिजे. पातेल्यात वा कढईत तेलाची, मोहरी-हिंग-जिरं घालून फोडणी करून त्यात लाल मिरची घालावी आणि थोडं पाणी घालावं. ते उकळलं, की त्यात तयार केलेलं पिठाचं मिश्रण घालावं. घालताना चांगलं हलवत राहावं व गुठळी होऊ देऊ नये. मिश्रण आळायला लागलं, की वर झाकण ठेवावं. अधून मधून उघडून खालपासून हलवावं. खाली बुडाला लागू देऊ नये. अशा दोन-तीनदा वाफा आणाव्यात. पीठ जरा चकचकीत दिसू लागलं, की झालं आहे असं समजावं. डिशमध्ये घेऊन वर कोथिंबीर व नारळाचा चव घालून खायला घ्यावं. 
पर्यायी सूचना : काही ठिकाणी उकड करण्याआधी ज्वारीचं पीठ जरा भाजून घेतात. पावसाळ्यात असं हलकं पीठ खायला बरं असतं. ज्वारीचं पीठ व नाचणीचं पीठ एकत्र करूनही अशी उकड करतात. आवडत असेल, तर उकडीच्या फोडणीत हळद घालायला हरकत नाही. तसंच लसूण घातलाच पाहिजे, असं नाही. ताकाच्या आंबटपणावर आणि उकड कितपत घट्ट वा पातळ हवी, यावर ताक व पाण्याचं प्रमाण ठेवावं. वर थोडी शेव घालूनही उकड खायला छान वाटते. नाश्ता म्हणून व संध्याकाळचं जेवण म्हणूनही हा पदार्थ, विशेषतः पावसाळ्यात चांगला वाटतो.

गिलक्याची भाजी 
साहित्य : चार-पाच गिलकी किंवा घोसाळी, शेंगदाण्याचं कूट, थोडा नारळाचा चव, कोथिंबीर, चमचाभर काळा मसाला, आवडीनुसार गूळ, चवीनुसार मीठ, तेल, फोडणीसाठी मोहरी, जिरं, हिंग, हळद इत्यादी. 
कृती :गिलकी हलके सोलून घ्यावीत. त्यांचे मोठे तुकडे करावेत. तशीच गोल कापली तरी चालेल किंवा उभा छेद देऊनही चिरू शकता. फोडी मात्र मोठ्याच ठेवाव्यात. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. पातेल्यात मोहरी, जिरं, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्यावी व त्यात गिलक्याचे तुकडे घालावेत. नीट हलवून घ्यावं. वर झाकण ठेवावं. झाकणात थोडं पाणी घालावं. भाजीत मात्र अजिबात पाणी घालू नये. कारण या भाजीला अंगचंच पाणी फार सुटतं. दोन-चारदा झाकण काढून भाजी वरखाली हलवून घ्यावी. पाणी सुटलेलं दिसेल. शिजत आली, की काळा मसाला, शेंगदाण्याचं कूट, मीठ व गूळ घालावा. वरून कोथिंबीर व नारळाचा चव घालावा. नीट हलवावं व झाकण ठेवून एक वाफ आणावी. भाजी तयार आहे. 
पर्यायी सूचना : या भाजीत गरम मसालाही घालू शकता. आवडत असेल तर लसूणही ठेचून घालावा. तसंच तिच्या लहान फोडी चिरून, कांदा फोडणीला टाकून वर गिलक्याच्या फोडी घालून परतलेली भाजीही केली जाते. तर कधी तुरीची किंवा चण्याची डाळ तासभर भिजवून, गिलकी फोडणीला घालून त्यात डाळ घालतात. भाजीच्याच पाण्यात डाळ शिजते. या भाजीत तिखट-मीठ-गूळ घालतात. तसंच चण्याच्या पिठाचे गटके किंवा मुटके बनवून ते वाफवून-तळून या भाजीत घातले जातात. गिलकी ही एक पथ्यकारक भाजी आहे. त्यात लोहही असतं. या दिवसांत ती अवश्य खावी. सोललेल्या गिलक्यांच्या चकत्या कापून त्याची भजीही केली जातात.

संबंधित बातम्या