नैवेद्याचं ताट मांडलं... 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

पोटपूजा
 

नैवेद्य म्हणजे देवाला अर्पण करण्याची गोष्ट. नैवेद्याला प्रसाद किंवा भोग असेही शब्द आहेत. हा खाण्याचा पदार्थ असतो, पण काहीजण धूप, दीप, अशा गोष्टींनाही नैवेद्य म्हणतात. तसा नैवेद्य व प्रसाद यातही फरक मानला जातो. नैवेद्य देवाला अर्पण केला जातो आणि प्रसाद हा देवाकडून भक्ताला मिळतो. म्हणूनच मग दाखवलेल्या नैवेद्याचा काही भाग देवाचा कृपाप्रसाद म्हणून खाल्ला जातो नि इतरांना वाटला जातो. देवळांमधला नैवेद्य अनेकदा खास प्रशिक्षित पुजारी शिजवतात. पावित्र्याची आणि शुद्धतेची संकल्पना यामागं आहे. रोजचा नैवेद्य दाखवल्याशिवायही काहीजण जेवत नाहीत. लहानपणी दिवाळीतही पदार्थ दिवाळीशिवाय खायला मिळत नसत. ‘निवेदम् अर्हति इति’, असा या शब्दाचा अर्थ आहे. केतकर ज्ञानकोशानुसार यज्ञात अर्पण केल्या जाणाऱ्या आहुतींना हविष् किंवा हवि असा शब्द आहे. एरवी देवाला अर्पण केलेल्या गोष्टी नैवेद्यात मोडतात. साधं गूळखोबरं, दूध-साखर यांना लघुनैवेद्य म्हणतात आणि विशिष्ट व्रत करताना दाखवला जाणारा प्रसाद म्हणजे नैवेद्य होय. यात मग सत्यनारायण पूजेचा शिरा, लक्ष्मीपूजनाचे लाह्या-बत्तासे वगैरे मोडतात. दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचं मिळून केलं जाणारं पंचामृत हे घरोघरी एरवीही केलं जातं. तर विशेष प्रसंगी महानैवेद्यही असतो, ज्यात भक्ष्य, भोज्य, लेह्य, पेय, चुष्य असे पाच प्रकारचे वेगवेगळे पदार्थ असतात. 

विभिन्न देवतांना आवडणारे पदार्थही त्यांच्या स्वभावधर्मानुसार वेगवेगळे. जे माणसाचं, तेच त्याच्या देवाचं. गणपतीला मोदक आवडतात, तर शंकराला भांग. विष्णूला खीर वा शिरा तर कृष्णाला अर्थातच लोणी. लक्ष्मीला पांढऱ्या रंगाचा पदार्थ, म्हणून खीर. ‘पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति’, असं म्हणून भक्तीनं दिलेलं ते सर्व मी प्रेमानं स्वीकारतो, असं गीतेत श्रीकृष्णानं म्हटलंच आहे. देव खऱ्या भक्तिभावानं आणि मनापासून दिलेलं स्वीकारतो, हा समदेश देणाऱ्या एका कहाणीत, देवळातला हौद गावातलं सगळं दूध घालूनही भरत नाही, तो एका म्हातारीनं घरादाराला आणि वासरांना दूध पाजून मग आणलेलं खुलभर दूध त्यात टाकल्यावर ओसंडून वाहतो. अशा कथा देवासाठीच्या कर्मकांडांचा अतिरेक केला जाऊ नये, म्हणून सांगितल्या गेल्या खऱ्या. पण माणूस काही मनापासून त्या स्वीकारायला तयार नाही. त्याला वाटतं, देवही आपल्यासारखाच; आवडणारं न मिळाल्यास राग येणारा... गंमत म्हणजे, बहुतेक ठिकाणी देवाला शुद्ध व पवित्र अन्न अर्पण करण्याच्या तत्त्वातून, शाकाहारी नैवेद्यच दाखवला जातो. मांसाहार देवाच्या नैवेद्यात वर्ज्य मानला जातो. पण तेही पूर्ण खरं नाहीच. कारण कालिमातेला बकरं किंवा कोंबडं मारून दाखवण्याचा प्रघात बऱ्याच देवळांमधून चालत आल्याचे पुरावे आहेत. पशुबळीची परंपरा अनेक देवालयांतून आजही पाळली जाते. तशी गणपती ही शुद्ध शाकाहारी देवता मानली जाते. पण गणपतीची आई, म्हणजे गौरी मात्र मांसाहारी आहे. म्हणूनच काही समाजांमध्ये गौरीला मांसाचा नैवेद्य दाखवला जातो. पक्की मासेखाऊ मंडळी तर गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी गणेशाची मूर्ती घराबाहेर निघाली, की मागल्या दारानं मासळी घेऊन येतात. 

खरं म्हणजे माणसाला स्वतःला जे आवडतं, जे रुचतं आणि खावंसं वाटतं, ते सारं नैवेद्याच्या गटात तो घालत असतो. म्हणूनच देवाला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये वैविध्य यावं, वेगळेपणही असावं, म्हणून हरतऱ्हेचे गोड-तिखट पदार्थ केले जातात. विशेषतः गणपतीच्या आरतीला आसपासचे लोक जमतात आणि त्यांना आरतीनंतर प्रसाद वाटायचा असतो. तर त्यात निराळं काही असावं, तोचतोचपणा नसावा, अशा भावनेनंही रोज वेगळा पदार्थ केला जातो. नैवेद्याचं ताटही विशिष्ट पदार्थांबरोबरच जरा निराळे पदार्थ वापरूनही सजवण्याकडं कल राहतो. सुकं खोबरं आणि साखर-वेलची यांनी केलेली ‘खिरापत’ हा साधा, रुचकर व टिकाऊ पदार्थ गणपतीच्या दिवसांत बऱ्याच घरांमध्ये करून ठेवलेला असतो. पूर्वी प्रसाद म्हणून दूध-साखर दिली जायची, त्याकारणानं ‘खिरापत’ हा शब्द ‘क्षीरपात्र’ या संस्कृत शब्दावरून आला असं मानतात. तर ‘ख़ैर आफ़ियत’ या फ़ारसी शब्दाचा अर्थ आहे, कुशल-मंगल. त्यावरूनही खिरापत शब्द तयार झाला असू शकतो. नवरात्रात पूर्वी भोंडला असायचा आणि खानदेश-विदर्भात भुलाबाई. रोजचा भोंडला संपला, की केलेला खाऊ मुलींनी ओळखायचा व तो साऱ्याजणींना वाटला जायचा. या खाऊलाही ‘खिरापत’ म्हटलं जातं. तसंच पातळ पोहे आणि गूळ-वेलची, दाणे वगैरे घालून केलेले सुके गोड पोहे आणि चणाडाळीपासून केली जाणारी, खरपूस परतून केलेली वाटली डाळ हे पदार्थ गणपतीच्या विसर्जनाच्या वेळचा प्रसाद म्हणून करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. घराघरानुसार गणपतीच्या नैवेद्याचे वेगवेगळे पदार्थ आहेत... 

उकडीचे मोदक हा तर गणपतीचा विशेष आवडता पदार्थ समजला जातो. तेही खास सुगंधी तांदळाच्या पिठीचे केले जातात. पण काही घरी कणकीचे उकडीचे मोदकही करतात, तर काही ठिकाणी कणकीचे मोदक तळून केले जातात. मोदक हा निगुतीनं आणि कौशल्यानं करण्याचा पदार्थ आहेच. शिवाय त्यात हातच्या कलागुणाचं कसबही पणाला लागतं. मोदकाच्या सुबक पाकळ्या, डौलदार आकार आणि सुविहित रूप हे सरावानंच जमू लागतं. अलीकडं मोदक कसे करायचे, याचे क्लासेसही घेतले जातात. घरात पूर्वीसारखी माहीतगार व अनुभवी महिलांची पलटण अलीकडं नसते. त्यामुळं कुणाच्या तरी हाताखाली आपोआप मुली व स्त्रिया तयार होण्याची वेळ तशी येत नाही. यामुळं हल्ली मोदक करून देण्याचा व्यवसायही वाढला आहे. तो तसा वर्षभरच चालतो, पण गणेशोत्सवाच्या काळात अधिक जोरात चालतो. मात्र मागणीला तोही पुरा पडत नाही. म्हणून मग मोदकाची कला शिकवण्याचे वर्ग सुरू झाले. मोदकाचे साचेही मिळतात, पण साच्यातून केलेले मोदक काही खास पाकळीदार व सुबक होत नाहीत. नैवेद्यासाठी पेढ्याचा मोदक हाही प्रकार सुरू झाला. तर काजू व साखर वापरून केलेला छोट्या छोट्या टिकाऊ मोदकांचा प्रकारही या काळात खूप खपतो. रवा-नारळाचे लाडू केले जातात, ते वळण्याऐवजी, मोदकाच्या साच्यातून काढून त्याचे मोदक-लाडू करण्याचा प्रयोगही माझी एक मैत्रीण करते. तर ड्रायफ्रूट्स वापरूनही तळून मोदक केले जातात. मोदकाचा आकारही मोठा आकर्षक असतो. 

देवदेवतांच्या नैवेद्यासाठी काही नेमनियम असतात. त्यांना साधारणपणे गोड पदार्थ अर्पण केले जातात. दूध-साखर, खडीसाखर, नारळ-साखर, नारळ-गूळ, फळं, खीर किंवा संपूर्ण वाढलेलं जेवणाचं नाट. नैवेद्यात मीठ, मिरची, तेल वापरत नाहीत. मिठाऐवजी गोड पदार्थ ठेवला जातो. प्रत्येक गोडावर तुळशीपत्र ठेवलं जातं. तुळशीपत्र ठेवणं म्हणजे ती वस्तू किंवा पदार्थ देऊन टाकणं, असा एक अर्थ आहेच. दाखवला नैवेद्य, की नैवेद्याचं ताट देवासमोरून हलवलं असं करत नाहीत. शंकराला तुळस तर गणपतीला दूर्वा आवडतात, म्हणून या गोष्टीही त्यांच्या नैवेद्यात सामील असतात. देवाच्या दक्षिण भागात नैवेद्य ठेवावा. ताटातले कच्चे पदार्थ देवाच्या उजवीकडं, तर शिजवलेले पदार्थ देवाच्या डावीकडं ठेवले जातात. पाणी व अग्नीसमोर आधी भोजन ठेवलं जातं. मग देवाला आवाहन केलं जातं व पाणी शिंपडलं जातं. काही भाग कावळ्या-कुत्र्याला घातला जातो. गाईलाही वाढलेलं जेवणाचं पान दिलं जातं. पितळी थाळीत वा केळीच्या पानावरच नैवेद्य वाढला जातो. अशा व इतरही अनेक प्रथा-परंपरा आहेत. 

पण व्यवहारात मात्र ‘आधी पोटोबा, मग विठोबा’ हे तत्त्व काही कोणी विसरत नाही. म्हणूनच तर, ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’, हे योग्य समजून, आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य माणूस स्वतःच स्वतःला रोजच्या रोज दाखवतच असतो... 


मोदकांची आमटी 
साहित्य : वाटीभर कणीक व डाळीचं पीठ, वाटीभर सुकं खोबरं, तीळ, खसखस, दाण्याचं कूट, धणेपूड, गरम मसाला व काळा मसाला चवीनुसार मीठ, कांदा, लसूण, थोडा गूळ, कोथिंबीर, तेल. 
कृती : पारीसाठी कणीक व डाळीचं पीठ एकत्र करावं आणि मीठ, तिखट इत्यादी घालून तसंच थोडं तेल घालून पाण्यानं घट्ट भिजवावं. सारण करण्यासाठी थोडं खोबरं किसून, तीळ, खसखस इत्यादी भाजून घ्यावं. तिखट-मीठ, दाण्याचं कूट, धणेपूड, गरम मसाला घालून हे कोरडं सारण तयार करावं. उरलेलं खोबरं, थोडं जिरं, तिखट-मीठ आणि कांदा-लसूणही परतून वाटून घ्यावं व त्यात थोडा काळा मसाला घालावा. भिजवलेली कणीक घेऊन तिचे पुरीसाठी करतो, तेवढे गोळे करावेत आणि त्याची पारी लाटून, त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्यावा. पातेल्यात किंवा कढईत फोडणी करावी. त्यात वाटलेला मसाल्याचा गोळा सोडावा आणि परतावं. तेल सुटू लागलं की त्यात पाणी घालावं. उकळी आली, की त्यात मोदक सोडावेत. पंधरा मिनिटं शिजू द्यावेत. वरून कोथिंबीरीनं सजवावं. मोदकाची आमटी तयार आहे. भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर ही आमटी खाता येईल. 
पर्यायी सूचना : या सारणात गाजर किसून व परतून घालता येईल. एखादा बटाटा उकडून घातला तरी चालेल. रस्सा करताना कांदा परतून घातला तरी चालेल. वाटायलाच हवा असं नाही. मोदकासाठी नुसत्या डाळीच्या पिठाची पारीही करतात. तसंच, कांदा-लसूण न वापरताही हा पदार्थ करता येईल. वाटल्यास एखादा उकडलेला बटाटा त्यात कुस्करून घालावा. रश्शासाठी ओला नारळही वापरता येईल. मोदक गोड असावेत, असं थोडंच आहे! तिखट मोदकही तेवढाच मोद देऊन जातात...


बुंदीच्या लाडवांची खीर 
साहित्य : बुंदीचे लाडू, दूध, थोडी साखर, वेलचीची पूड, आवडीनुसार बदाम, काजू इत्यादी. 
कृती : बुंदीचे लाडू कुस्करून मोकळे करून घ्यावेत. दूध जरा आटवून घेऊन त्यात साखर घालावी आणि मोकळी केलेली बुंदी घालून शिजवावं. वेलचीची पूड मिसळावी. वरून काजू व बदामाचे काप घालावेत. 
पर्यायी सूचना : काहीवेळा प्रसादासाठी म्हणून बुंदीचे लाडू आणून ठेवले जातात. पण ते उरतात. अशावेळी बुंदीचे लाडू उरले, तर करायला हा पदार्थ चांगला आहे. बुंदीचे लाडू, दूध व पावाचे तुकडे, शेवयांचा चुरा किंवा सुगंधी तांदळाची पिठी वापरून व हे मिश्रण सेट करून पुडिंगही करता येतं.

संबंधित बातम्या