वेगे वेगे खाऊ... 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

पोटपूजा
 

‘एक घास बत्तीस वेळा चावून खावा’ असं म्हणतात. आपण जे अन्न खातो, ते नीट पचावं, यासाठी दिलेला हा एक सल्ला आहे. पण हे तत्त्व कितीसं पाळलं जातं? आजच्या घाईगर्दीच्या आणि तोंडात घास कोंबून पटपट चावून गिळण्याच्या जमान्यात तर अन्नग्रहणाची क्रिया इतकी वेगवान झाली आहे, की अनेकांच्या बाबतीत खाणं हे ‘उरकणं’ होऊन गेलं आहे. त्यात मग भरभर खाण्याचे, शिवाय कधी कधी चालता चालता, उठता बसता कामं करत खाण्याचे पारंपरिक पठडीतले पदार्थही कमीच असतात. आमटी, रसदार उसळ, भाजीचा रस्सा, भात वगैरे पदार्थ यात बसत नाहीत. त्यापेक्षा मग वडापाव, सँडविच, पराठ्यासारखे किंवा अलीकडं मिळणारे फ्रँकी-रॅपसारखे (खरंतर पोळीची गुंडाळी हा असाच प्रकार आहे) तयार पदार्थ बरे वाटतात. एकूणच बेकरीची उत्पादनं, तिखटामिठाचे शेव-फरसाणासारखे तयार पदार्थ यांना अग्रक्रम मिळतो. हे सारं ‘फास्ट फूड’ आहे. फास्ट खाता येतं आणि झटपट रीतीनं ते मिळू शकतं. विकण्यासाठी तयार केलं गेल्यानं, त्यांचं रंगरूपही आकर्षक असतं आणि तोंडाला लावलं की खाली ठेवूच नये, असं वाटण्यासाठी चवीत चटपटीतपणा आणलेला असतो. मग जादा मीठ, कॅलरीज हे सारं आलंच. पुन्हा पुन्हा उकळलेल्या तेलात तळलेले पदार्थ, उकळत ठेवलेला चहा, फारसा दर्जा नसलेल्या प्रिझर्व्हेटिव्हज आणि रंगांचा वापर आणि पदार्थ करताना स्वच्छतेची न बाळगलेली दक्षता अशा अनेक कारणांमुळं सहज उपलब्ध असणारे पदार्थ धोकादायक ठरू शकतात. तीच गत सरबतांची आणि फळांच्या डिशचीही! खरोखरच यामुळं बाहेर खाणाऱ्यांची बरेचदा पंचाईत होऊ शकते. मग वेष्टनबद्ध, पॅकेटबंद पदार्थांकडं लोक वळतात. 

पॅकेज्ड फूड स्वच्छ आणि सुरक्षित असतं, असा समज रूढ आहे. शिवाय अशा पदार्थांमध्ये पोषक घटक कसे आहेत हे दाखवण्याचा खटाटोप करून, हा मुद्दा ग्राहकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्नही केला जातो. मशीननं त्यातील तेल काढून घेतलं आहे, विविध धान्यांचा वापर केल्यामुळं अमुक पदार्थ पौष्टिक झाले आहेत, अशा जाहिराती आपण नेहमी बघतोच... पण वास्तव वेगळं असू शकतं. नव्हे, बहुतेकदा ते तसंच असतं. पण नाइलाजानं तयार पदार्थांना मागणी येत राहते आणि त्यांचा खपही वाढत जातो. मात्र कितीही चांगले वाटले, तरी ताज्या पदार्थांना पर्याय म्हणून याकडं बघता येत नाही. कारण विशिष्ट धान्यं, मसाले व जास्त मीठ यांनी हे पदार्थ अगदी परिपूर्ण असतात. तेल काढलं असलं, तरी मुळात तळलेले, कुरकुरीत आणि कोरडे असलेले हे पदार्थ भूक नीट भागवत नाहीत आणि तहान वाढवतात. वेगवेगळे वेफर्स, शेव-फरसाणासारखे प्रकार, वडे, भजी वगैरे हे भारतीय फास्ट फूडच आहे. केवळ पाव-बिस्किटं आणि बर्गर-पिझ्झा हेच फास्ट फूड आणि जंक फूड नाही. असे पदार्थ कधीतरी खायला हरकत नाही, पण ते दैनंदिन आहाराचा भाग बनले, तर नक्कीच अपायकारक ठरतील. हेच काय, अगदी घरी केलेले चकली-शेवेसारखे आणि करंज्या-लाडवांसारखे पदार्थही वारंवार खात राहिलं, तर तेही प्रकृतीला घातकच! म्हणूनच असे काही पदार्थ विशिष्ट प्रसंगी, सणासुदीला किंवा उत्सवाच्या वेळी करण्याची पद्धत आहे. त्यातली गंमत व आकर्षणही मग टिकून राहतं. 

वारंवार फास्ट फूड खाल्ल्यामुळं होणारी हानी, ही समस्या आता तरुणांपुरती उरलेली नाही. ती सर्व वयोगटांतून दिसते. विशेषतः लहान मुलांना पॅकेटबंद पदार्थांची चटक लवकर लागते आणि अशी मुलं आपण अवतीभवती बघतच असतो. पॅकेटबंद कुरकुरीत पदार्थ मुलांना आवडतात, शिवाय ते स्वस्तही (पाच ते दहा रुपये प्रति पॅकेट) असतात असा समज आहे. त्यामुळं त्यांचा खप फार असतो. पण विचार केला, तर लक्षात येईल की हे पदार्थ उत्पादनखर्च पाहता तसे महागच असतात. अशा तऱ्हेच्या फास्ट फूडच्या-जंक फूडच्या सेवनामुळं प्रिझर्व्हेटिव्हज, अतिरिक्त मीठ, आकर्षक कृत्रिम रंग, मैद्यासारखा पोटाकरिता विषवत असणारा घटक यांचं सेवन मोठ्या प्रमाणात होत राहिलं, तर खरोखरच ती चिंतेची बाब ठरते. मैदा हा तर शरीराला नक्कीच हानिकारक असतो. कारण गव्हातली प्रथिनं, तंतुमय घटक हे मैदा करण्याच्या प्रक्रियेत पूर्णपणे काढून टाकले जातात. पण पदार्थ कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो, म्हणून मैदा वापरला जातोच. पण निदान तो ऊठसूठ तरी वापरू नये. (बरेचदा धिरडी चांगली निघतात, तव्याला चिकटत नाहीत, म्हणून फक्त मैद्याचा वापर करून धिरडी केली जातात) जोडीला अनेकदा ‘रेडी टू कुक’ आणि ‘इन्स्टंट फूड’ गटातले पदार्थही खाल्ले जातात, ज्यात हे सारे घटक असतातच असतात. टू मिनिट्स नूडल्स व पास्ता, तुरंत तैयार डाळी, भाज्या, चिकन, पोळ्या वगैरे गोष्टीही नेहमी खाणं हे शरीराला घातकच. 

खरंतर गरज म्हणून फास्ट फूडचा उदय झाला. वाढतं औद्योगीकरण, कामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांमध्ये महिलांचं वाढलेलं प्रमाण, घर ते कामाचं ठिकाण यातलं जास्त अंतर व या प्रवासासाठी लागणारा वेळ, अशा बऱ्याच गोष्टींवर फास्ट फूडचं वाढतं सेवन अवलंबून आहे. साधारणपणे तळलेल्या, तसेच गोड पदार्थांचा समावेश यात होतो. मीठ व साखर दोन्हींचा वापर सढळ हातानं केलेला दिसतो. पोषक घटक तळण्यामुळं नष्ट होतात आणि निःसत्त्व असं खाणं आवडीनं खाल्लं जातं. यात चोथा, म्हणजे फायबर तसंच प्रोटिन्स कमी आणि कॅलरीज व ट्रान्स-फॅट मात्र नको तितकं असतं. रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार, सांधेदुखी हे त्रास या तऱ्हेच्या फास्ट फूडच्या अतिरेकामुळं मागं लागतात.  प्रत्येकवेळी फास्ट फूड हे जंक फूड असेलच असं नाही. चणेदाणे, गुळाची शेंगदाणा किंवा मिश्र चिक्की हे फास्ट फूड गटातले पदार्थ म्हणजे जंक फूड नव्हे. जंक फूड हे पूर्णपणेच अनारोग्यकारी आणि साखर, मीठ, चरबी यांनी युक्त असतं. त्यात चोथा, जीवनसत्त्वं, खनिजं अशा पौष्टिक घटकांचा अभाव असतो. 

पाश्चात्त्य देशांमधून रेडी टू कुक पद्धतीचे बरेच खाद्यपदार्थ वाढत्या शहरीकरणाबरोबर आणि उद्योगांच्या प्रसाराबरोबर रुजले. दुसऱ्या महायुद्धानंतर जास्त पैसा हाती खुळखुळू लागल्याने अमेरिकेतले लोक अधिक सढळपणे खर्च करू लागले आणि त्यातून ग्राहकवाद वाढत गेला. स्त्रियाही घराबाहेर काम करू लागल्यामुळे, बाहेर खाण्याचं प्रमाण वाढलं. हळूहळू ही केवळ चैन उरली नाही, ती गरजही झाली. याचाच एक परिणाम म्हणून, रेडी टू कुक – तुरंत तैयार पद्धतीचे अन्नपदार्थ घरोघरी वापरात येऊ लागले. या व्यवसायाला चालना मिळाली. फास्ट फूड या बिरुदाखाली अनेक खाद्यप्रकारांचे ब्रँड्स जन्माला आले. हॅम्बर्गरची साखळी दुकानं तिथं पहिल्या महायुद्धानंतरच सुरू झाली. अलीकडच्या काळात उदयाला आलेले सबवे, मॅकडोनाल्ड, केएफसी फ्रिटोज असे जंक फूडचे ब्रँड्स सत्तरच्या दशकानंतर विशेष लोकप्रिय होत गेले. आता तर ते भारतासह जगातल्या अनेक देशांमधून पोचले आहेत. ब्रिटनमध्येही थोड्याफार फरकानं असंच घडलं. इंग्लंडमध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिलं फिश आणि चिप शॉप सुरू झालं. वेगवेगळ्या भागांमध्ये विविध तऱ्हेचं फास्ट फूड मिळू लागलं. पुढं दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात इतर ठिकाणचे पदार्थही यात समाविष्ट होऊ लागले. पिझ्झा, कबाब असे पदार्थ तिथं मिळू लागले. 

भारतात स्थानिक ब्रँड्सही रुजू लागले आहेत आणि त्यात देशी पदार्थही मिळताना दिसतात. फास्ट फूड आणि जंक फूड परस्परांत मिसळून गेले आहेत. वडापाव, मिसळपाव, खमण, सामोसे वगैरे बरेच पदार्थ या प्रकारातलेच. त्याशिवाय रेडी टू कुक धर्तीचे पनीर मसाला, चिकनपासून होणारे, पटकन करता येणारे वेगवेगळे पदार्थ, खिचडी, पोहे, उपमा वगैरे दोन ते पाच मिनिटांत तयार होऊ शकणारे पदार्थ असे अनेक प्रकार यात मोडतात. त्याशिवाय इडली, डोसा मिक्स, गुलाबजाम मिक्स अशाही बऱ्याच पाककृतींचे तुरंत तैयार अवतार बघायला मिळतात. दिवाळीच्या पदार्थांचेही मिक्सेस मिळतात. ते फक्त घरी आणून तयार करायचे. घरी फराळ केल्याचं समाधान. असे बरेच भारतीय पदार्थ बाजारात आले आहेत. संपूर्ण जेवणापासून नाश्त्यापर्यंतचे विविध पदार्थ पुरवणाऱ्या स्थानिक स्टॉल्सची तर कमतरताच नाही. त्याशिवाय पाश्चात्त्य फूड चेन्सही इथं तितक्याच चालतात. आपल्याकडं हातगाडीवरच्या पदार्थांमध्ये वापरलं जाणारं तेल, या तेलाचा वारंवार तळण्यासाठी होणारा वापर, स्वच्छतेचा अभाव हे सारे फास्ट फूडभोवतीचे तोटे दुर्लक्षितच होताना दिसतात. अगदी ब्रँड झाले, तरी तिथं अन्नविषयक नियम पाळले जातात का, याचं नियंत्रण व्हायला हवं. या संदर्भात अधूनमधून तपासणी होणं गरजेचं आहे. रस्त्यावर मिळणाऱ्या पदार्थांबाबत तर खास खबरदारीच बाळगली पाहिजे. नाहीतर फास्ट फूडचं स्लो पॉयझन व्हायला वेळ लागणार नाही...

नाचणीचा हलवा 
साहित्य : एक वाटी नाचणीचं पीठ, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, पाऊण वाटी तूप, अर्धी ते पाऊण वाटी साखर, वाटीभर पाणी, स्वादासाठी वेलची पूड. 
कृती : कढईत तूप वितळवून घेऊन, त्यात नाचणीचं पीठ घालत ढवळून घ्यावं आणि नीट भाजावं. थोडं भाजल्यावर खोबऱ्याचा कीसही त्यात घालावा. खरपूस भाजलं गेल्यावर ताटलीत काढून घ्यावं. कढईत वाटीभर पाणी उकळत ठेवावं आणि त्यात अर्धी ते पाऊण वाटी साखर घालावी. साखर विरघळू द्यावी आणि नीट विरघळल्यावर जरा उकळत ठेवावं. पाचेक मिनिटांनी त्यात भाजलेलं नाचणीचं पीठ घालावं आणि हलवून घ्यावं. वरून थोडी वेलची पूडही घालावी. नीट हलवत राहावं. थोड्या वेळानं झाकण ठेवावं आणि गॅस बंद करावा. नाचणीचा हलवा तयार आहे. 
पर्यायी सूचना : नाचणी जरा भाजून मिक्सरवर दळूनही असा हलवा करता येईल. ते जरा भरडच निघाल्यामुळं हलव्याचा पोतही छान येईल. तुपाचं प्रमाण कमी असलं तरी चालेल, पण जरा जास्त तुपातला हलवा छान लागतो. आवडीनुसार यात बदाम, काजू वगैरेही तुकडे करून घालता येतील. रंग अर्थातच काळा येतो. पण पौष्टिकतेत एकदम अव्वल. 
 

संबंधित बातम्या