स्फोटक आणि जिद्दी 

अमित डोंगरे
सोमवार, 24 जून 2019

व्यक्तिचित्र
 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक फलंदाजांनी आपल्या खेळाने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. या फलंदाजांमध्ये महान कोण हे ठरविणे कठीण आहे, मात्र त्यात अग्रक्रमाने नाव घ्यावे असा फलंदाज म्हणजेच युवराज सिंग होय. 

देदीप्यमान कारकीर्द आणि कॅन्सरसारख्या आजारावर केलेली मात यांमुळे युवराज अन्य फलंदाजांपेक्षा काहीसा वेगळाच ठरतो. अत्यंत जिद्दी आणि स्फोटक फलंदाजीने जागतिक स्तरावरील प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर राज्य करणारा फलंदाज अशी युवीची ओळख चाहत्यांच्या मनात कायमच राहील. 

भारतीय संघात २००० मध्ये दाखल झालेला युवी अगदी यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीग स्पर्धेतही त्याच आत्मविश्‍वासाने खेळला. खरेतर २०११ ची विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर आणि भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिल्यानंतरच तो निवृत्ती जाहीर करेल असे वाटले होते. मात्र त्याला आणखी काही काळ खेळायचे होते. कॅन्सरच्या आजारातून बरा झाल्यानंतर तो संघात परतला, पण पूर्वीचा युवराज कधीच दिसला नाही. त्याची कामगिरी खूपच खालावली. त्याचवेळी निवृत्तीची वेळ जवळ आल्याचे त्याच्या लक्षात आले आणि अखेर त्याने निवृत्ती जाहीर केली. जागतिक क्रिकेटवर राज्य करणारा युवराज विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा सुरू असतानाच निवृत्त झाला. कारण त्याला या स्पर्धेत खेळायचे होते, मात्र फारशी चांगली कामगिरी नसल्याने त्याचा संघनिवडीत विचार झाला नाही. त्यामुळे त्याने इथेच थांबायचे ठरविले. 

पदार्पण केले तेव्हापासून त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर संघाला अनेक अशक्‍यप्राय विजय मिळवून दिले. मग ती नॅटवेस्ट स्पर्धा असो किंवा २०११ ची विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा असो. त्याची सगळ्यात सरस कामगिरी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध व्हायची. त्याने कॅन्सरचा आजार सगळ्यांपासून लपविला व विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळला, तो सचिनला विश्‍वविजयाची भेट देण्यासाठी. खरेच या संपूर्ण स्पर्धेत त्याने लाजवाब खेळ करत ‘स्पर्धेचा मानकरी’ हा मान मिळविला व सचिनला अनोखी भेट दिली. यानंतर तो उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाला व पूर्ण बरा होऊन मायदेशी परतला. अर्थात त्याने संघात पुन्हा स्थान मिळविले असले, तरी तो पूर्वीचा युवी कधीच दिसला नाही. त्याचाही आत्मविश्‍वास कमी झाला. अखेर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. येत्या काळात तो इंडियन प्रिमिअर लीगमध्येच नाही, तर जगभरात होणाऱ्या टी-२० क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी हाेत राहणार आहे. याचबरोबर त्याने ‘युवीकॅन’ नावाची संस्था सुरू केली असून या माध्यमातून तो आपल्यासारख्याच रुग्णांना उपचार मिळावे यासाठी काम करत राहणार आहे. युवराजची निवृत्ती अपेक्षितच होती, मात्र भारतीय क्रिकेट मंडळाने मैदानावर निवृत्ती जाहीर करण्याची संधी त्याला द्यायला हवी होती.

केनियाविरुद्ध युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये २००० मध्ये पदार्पण केले. त्याला २००३ मध्ये कसोटी क्रिकेटसाठी पहिल्यांदा निवडण्यात आले. त्याच्याकडे अफाट गुणवत्ता होती, तरीही कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी फारशी सरस झाली नाही. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये मात्र तो यशस्वीपणे खेळला. ३०४ एकदिवसीय सामन्यांत युवराजने १४ शतके आणि ५२ अर्धशतके यांच्या मदतीने आठ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या. ५८ टी-२० सामने खेळताना त्याने ८ अर्धशतकांच्या मदतीने अकराशेपेक्षा जास्त धावा केल्या. प्रथम दर्जाच्या १३९ सामन्यांत त्याने २६ शतके आणि ३६ अर्धशतकांच्या मदतीने आठ हजारांपेक्षाही जास्त धावा कुटल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने शंभरपेक्षाही जास्त बळी मिळविले आहेत. युवराजने एक खेळाडू म्हणून देशाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठवली. त्याचे थक्क करणारे क्षेत्ररक्षण प्रतिस्पर्धी संघांसाठी आव्हान ठरत होते. भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ ची विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा देशाला जिंकून दिली. त्या संपूर्ण स्पर्धेत युवराज कर्करोगासारखा आजार झालेला असतानाही सहभागी झाला आणि आपले दैवत असलेल्या सचिनसाठी त्याने प्रत्येक सामन्यात लाजवाब खेळी करत संघाला १९८३ नंतर जवळपास २८ वर्षांनी विश्‍वकरंडक जिंकून दिला. या स्पर्धेत सहभागी होताना आपण एका खास व्यक्तीला विश्‍वकरंडक विजयाची भेट देण्यासाठी खेळणार आहोत, असे त्याने सांगितले. ही व्यक्ती सचिनच होती, हे त्याने विश्‍वकरंडक उंचावताना सांगितले. 

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आपल्याला संधी मिळेल असे त्याला वाटले होते. मात्र, आपले नाव निवड झालेल्या खेळाडूंच्या यादीत नाही हे लक्षात आल्यावर त्याच्या मनात निवृत्तीचे विचार डोकावू लागले व त्याने त्याबाबतची अधिकृत घोषणा केली. इथून पुढे इंडियन प्रिमिअर लीग व त्यासारख्या जागतिक स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत आणखी काही वर्षे सहभागी होणार असल्याचेही त्याने सांगितले. एका जागतिक स्तरावरच्या इतक्‍या मोठ्या खेळाडूला आपली निवृत्ती एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जाहीर करण्याची वेळ येते तेव्हा खरोखर वाईट वाटते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर देशात होणाऱ्या कोणत्यातरी मालिकेत संघात निवड करून मैदानावर निवृत्ती जाहीर करण्याची संधी द्यायला हवी होती, जेणे करून देशासाठी इतके मोठे योगदान देणाऱ्या खेळाडूचा तो योग्य सन्मान ठरला असता. मात्र, मंडळाने त्याकडे सपशेल पाठ फिरविली याचीच खंत वाटत राहणार आहे. वीरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, राहुल द्रविड यांच्याबाबतीत मंडळाने जे केले, तेच युवराजबाबत केले याचे शल्य क्रिकेटचाहत्यांना कायम वाटत राहील यात शंका नाही. 

युवराज एक डावखुरा फलंदाज, अफाट गुणवत्ता असलेला फिरकी गोलंदाज तर होताच; पण अफलातून क्षेत्ररक्षकही होता. टी-२० क्रिकेटच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत २००७ मध्ये त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याच्या एका षटकात सलग सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याची किमया केली होती. ती त्याची खेळी क्रिकेटरसिकांच्या कायमच स्मरणात राहील. क्रिकेटपटू होण्यापूर्वी त्याने टेनिस व रोलर स्केटिंगमध्येही बक्षिसे मिळविली होती. मात्र, शालेय स्तरानंतर त्याने क्रिकेटकडे खरे लक्ष दिले व रणजी करंडकातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळविले. डीएव्ही शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्याने याच महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवीदेखील मिळविली. त्याने बालकलाकार म्हणून ‘मेहंदी सांगा दी’ आणि ‘सरदारा’ या लघुपटांतून अभिनयदेखील केला होता. तीन वर्षांपूर्वी त्याने बिग बॉस फेम अभिनेत्री व मॉडेल हेजल क्रिच हिच्याशी विवाह केला. जोवर क्रिकेट आहे तोवर जागतिक क्रिकेटच्या या राजपुत्राची ओळख कायम राहणार आहे. नॅटवेस्ट मालिकेतील त्याची कामगिरी, २०११ च्या विश्‍वकरंडकातील कामगिरी अशा त्याने केलेल्या अनेक खेळ्या क्रिकेटशौकिनांच्या कायम स्मरणात राहतील. एक खेळाडू, एक अत्यंत चांगली व्यक्ती आणि समाजासाठी काम करण्याची कळकळ वाटणारा माणूस म्हणून त्याची ओळख क्रिकेटचाहते कधीच विसरणार नाहीत.

संबंधित बातम्या