घराचे इंटिरियर करताना...

आशिष देशपांडे, इंटिरियर डिझाइनर
सोमवार, 25 मार्च 2019

प्रॉपर्टी विशेष
 

सध्या प्रत्येकजण सोशल मीडियाचा चाहता आहे, तेव्हा फेसबुक म्हणजे या सगळ्यांची जान, तसेच काहीसे आपल्या घराचे पण असते. जगात कितीही भ्रमंती केली, तरी आपले घर ते आपले नाही का! या अशा फेसबुक कनेक्‍टिव्हिटीमुळे प्रत्येकालाच एक ओढ लागली आहे, की माझे घर हे हटके हवे. त्यातील चढाओढीमुळे डिझाइनरला पण खूप अभ्यासपूर्वक काम करावे लागते. प्रत्येक चांगला रेफरन्स लक्षात ठेवून त्या ग्राहकाच्या मनात ते डिझाईन उतरवणे एक मोठे आव्हान असते. त्यामुळे फेसबुकवर जग भ्रमंती करणाऱ्या प्रत्येकालाच आपले हे ‘घराचे फेसबुक’ दाखवायला नक्कीच आवडेल!

प्रत्येकाच्या घरात फर्निचर केलेले दिसून येते. फर्निचर व इंटिरियर यात बरीच तफावत असते. पण एकदम सहजच बोलणारा व्यक्ती म्हणतो, ‘आमचे पण घराचे इंटिरियर झालेले आहे!’ खरंतर इंटिरियरबद्दल प्रत्येकाच्या मनात असंख्य प्रश्न असतात. पण याची उत्तरे नेमकी कुठे व कशी शोधायची हे लक्षात येत नाही. इंटिरियरमध्ये बऱ्याच पैलूंवर काम करावे लागते. त्यातलाच एक म्हणजे ‘मेकओव्हर’ म्हणता येईल. ज्यादिवशी आपण इंटिरियर करायचे असे ठरवतो, त्याच दिवसापासून तुमचे प्लॅनिंग सुरू होते.

फेसबुकच्या पोस्ट बघितल्या जातात. गुगल महाराजांच्या पुस्तकातून बरीच माहिती गोळा केली जाते. अर्थात सगळ्यांचा उद्देश एकच असतो, ‘माझे घर वेगळे व्हावे’. कारण तशी ही गोष्ट खूप बारकाव्यापासून व प्लॅनिंगने पुढे न्यावी लागते. बरेच जण नवीन फ्लॅट, घर किंवा कोणतीही जागा घेतली, की त्यानुसार शॉपिंग चालू करतात. बाजारात गेले, की वस्तूंपासून पडदे, ॲक्‍सेसरीज, आर्टिकल्स सगळे घेऊन मोकळे होतात. पण जी गोष्ट इंटिरियरमध्ये सगळ्यात शेवटी करायची ती आपण आधीच करून मोकळे होतो. मग या गोष्टी त्रासदायक होतात. त्यामुळे इंटिरियर करताना योग्य प्लॅनिंग करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. प्लॅनिंग करताना सगळ्यात पहिली गरज असते, ती फर्निचर प्लॅनिंगची. फर्निचरची मांडणी योग्य पद्धतीने झाल्यास कोणतीही जागा सुटसुटीत व मोकळी वाटू शकते. त्यानंतर रंगसंगतीलादेखील बरोबरीचे महत्त्व असते. रंगसंगतीवरच त्या घराचे खरे रूप असते. एकदा का या दोन्हीची सांगड नीट बसली, की मग वेळ येते ती ‘ब्यूटीफिकेशन्स’ची. म्हणजेच ज्याला आपण ‘मेकओव्हर’ म्हणतो. पण हा बदल कसा यावा, यासाठी इंटिरियरची रचना करतानाच विचार करावा. कारण प्रत्येकाला बदल हवाहवासा वाटतो. कोणताही बदल हा त्या राहण्याऱ्याला एक नवीन चैतन्य देत असतो. त्यामुळे इंटिरियरदेखील वर्षानुवर्षे तसेच असावे असे नाही, तर त्यातदेखील काही गोष्टी बदलता येतील या पद्धतीने त्यात मांडणी करावी. ‘ब्यूटीफिकेशन’मध्ये खरी गरज असते ती विविध माध्यमांची. कारण त्यात छोट्या-छोट्या वाटणाऱ्या गोष्टी या शेवटी ते इंटिरियर पूर्णत्वाला नेतात. जसे, की वॉलपेपर, थिमॅटिक फ्लॉवरपॉट्‌स, पडदे, कार्पेट या सारख्या भरपूर गोष्टींनी इंटिरियरला उठाव आणता येतो. 

या सगळ्या गोष्टी इंटिरियरला उठाव आणण्याचे काम करत असतात. यात तसा मोठा वाटा असतो तो फर्निशिंगचा. जसे इंटिरियर करताना बाकी गोष्टींना बजेटिंग लागते, तसेच फर्निशिंगही बजेटचीच गोष्ट झाली आहे. कारण एकंदर आपण याआधी बराच पैसा खर्च करतो. पण घराला घराचे रूप आले, की पुढचे पैसे खर्च करताना थोडा कंटाळा येतो, सर्वसाधारणपणे आपण म्हणतो, ‘आवश्‍यक ते झाले.’ पण १०% किंवा २०% टक्‍क्‍यांसाठी केलेली काटकसर नंतर इंटिरियर बघताना 
जाणवते. त्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंग व बजेटिंग करणे फार महत्त्वाचे असते. कारण यात शेवटच्याच गोष्टींमुळे उठाव येणार असतो. उदा. एखादी कलाकृती करताना कलाकार त्यात सगळे रंग भरतो; पण एक काळी रेष त्या चित्राचे रूप बदलून टाकते. तसेच या मेकओव्हरच्या बाबतीत असते. या सगळ्याबरोबरच महत्त्वाची गोष्ट लागते, ती प्रकाश योजनेची. इंटिरियर करताना आपण ते ठरवतो. लाईट, झुंबर, पेडस्टल या सर्वच बाबतीत लाइटिंगचा वापर इंटिरियरमध्ये खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय मेकअप पूर्ण होऊच शकत नाही. पूर्ण इंटिरियर बघताना जशी त्या डिझाईनची ग्रेस वाढते, तशीच ती कायम ठेवण्यासाठी या सर्व माध्यमांचा वापर काटेकोरपणे करणे महत्त्वाचे असते. जसे, जेवणात मीठ जास्त झाले तरी चव बिघडते, तशीच मीठ कमी झाले तरी चव िबघडते. अगदी तसेच महत्त्व इंटिरियर मेकओव्हरलादेखील असते. त्यामुळे एखादी कलाकृती घडवायची असेल, तर डिझाईनमध्ये दाखवलेल्या प्रत्येक बारकाव्याचा नीट विचार करावा व जास्तीत जास्त प्लॅनिंग व बजेट ठरवून इंटिरियरचा मेकओव्हर करावा. 

आज बरेच सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, ज्यात तुम्ही मेकओव्हर झाल्यावर कसे दिसू शकाल, याचा अंदाज येऊ शकता. तसेच काही प्रकार यातदेखील उपलब्ध आहेत. बरेच डिझाइनर आज या सॉफ्टवेअरचा उपयोग करून घेऊन ग्राहकांना घर कसे दिसू शकेल याचे बऱ्यापैकी चित्र दाखवू शकतात. त्यामुळे आपण कुठल्या डिझाइनरकडे काम देतो आणि तो आपल्या सर्व गरजा पूर्ण करू शकतो का हेही पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सर्व मेकओव्हरकडे डोळे उघडे ठेवून पाहणे जास्त गरजेचे आहे. 

संबंधित बातम्या