फर्निचरमधले ट्रेंड्स

इरावती बारसोडे
सोमवार, 23 मार्च 2020

प्रॉपर्टी स्पेशल
फर्निचर म्हटले, की त्यामध्ये अनेक प्रकार येतात. यामध्ये कपाटापासून शूरॅकपर्यंत आणि पलंगापासून देवघरापर्यंत, खूप काही येते. पण प्रत्येक घरासाठी अनिवार्य फर्निचर म्हणजे बसण्यासाठी खुर्ची/सोफा, झोपण्यासाठी पलंग आणि सामान ठेवण्यासाठी कपाट!

सध्या तयार फर्निचर घेण्यापेक्षा कस्टमाइज्ड फर्निचर घेण्याकडे लोकांचा वाढता कल दिसून येत आहे. त्यामुळे विक्रेतेही ग्राहकांच्या गरज आणि मागणीनुसार सेवा पुरवताना दिसतात. हल्ली फ्लॅट असो वा बंगला, जागेचा अधिकाधिक वापर करण्याच्या उद्देशाने फर्निचरच्या ट्रेंडमध्ये बदल होत आहेत. कमीत कमी जागेत नेमके, गरजेपुरते फर्निचर करून घेण्यात येते. स्लायडिंग वॉडरोब, हायड्रॉलिक बेड, वॉल फिटिंग डायनिंग टेबल यांसारखे नवीन ट्रेंड्स लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. प्लाय म्हणजेच वूडन किंवा लाकडी फर्निचर आणि मेटल फर्निचर हे प्रामुख्याने पाहायला मिळते.

खुर्च्या/सोफा सेट
खुर्च्या, सोफा सेट्स यांमध्ये खूप व्हरायटी बघायला मिळत आहे. साधी प्लॅस्टिकची पण चांगल्या क्वालिटीची खुर्ची ६०० ते ६५० रुपयांपासून १,८०० ते २,००० रुपयांपर्यंतही मिळते. यामध्ये फोल्डिंग, साध्या, आरामखुर्च्या, रॉकिंग चेअर्स या प्रकारांनुसार प्रत्येक खुर्चीची किंमत बदलत जाते. कुशन असलेल्या लाकडी खुर्च्या ४,५०० रुपयांपासून ६ ते ७ हजार रुपयांपर्यंत मिळतात. लाकडाच्या प्रकारानुसार किंमत कमी-जास्त होते. मेटल बेस असलेल्या खुर्च्या २ ते ३ हजारांपासून मिळतात. सिंगल सिटर रिक्लायनर चेअर्स म्हणजेच आराम खुर्च्या ५ ते ६ हजार रुपयांपासून ४० हजार रुपयांपर्यंतही उपलब्ध आहेत. लेदरेट रिक्लायनर खुर्च्यांच्या किमती जास्त असतात.

दोन किंवा तीन आसनी सोफा घ्यायचा झाला, तर ८ ते १० हजार रुपये किमान मोजावे लागतात. त्याच्याबरोबर खुर्च्या असतील, तर किंमत वाढते. कुशन सोफा सेट १५-२० हजार रुपयांपासून ४०-५० हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो. यामध्ये मटेरियल, कुशन्स, फॅब्रिक यानुसार किमतींमध्ये बदल होतो. रिक्लायनर सोफा सेटच्या किमती ३० हजार रुपयांच्या पुढेच आहेत. रेडीमेड घेण्याऐवजी सोफा सेट तयार करून घेण्याकडे जास्त कल आहे.

टेबल
डायनिंग टेबलच्या किमतींमध्ये आकारानुसार बदल होत जातो. चार माणसे बसू शकतील असे टेबल आणि खुर्च्या असा लाकडी डायनिंग टेबल सेट ५० हजार रुपयांच्या पुढे मिळतो. नुसते टेबल घ्यायचे असेल तर ३० हजार रुपयांपासून मिळते. डायनिंग टेबलमध्येही काचेचे किंवा लाकूड आणि मध्यभागी काच असलेले टेबल अशा व्हरायटीज पाहायला मिळतात. लिव्हिंग रूममध्ये ठेवण्यासाठी सेंटर टेबल साधारण २ हजार रुपयांच्या पुढे मिळतात, तर स्टडी टेबल १,५०० ते २,००० रुपयांपासून अगदी १० हजारांपेक्षा जास्त किमतीतही मिळू शकतात.

पलंग
पूर्वी ट्रॉली बेड असायचे आणि आता हायड्रॉलिक बेड्सचा ट्रेंड वाढतो आहे. हायड्रॉलिक बेड गादी/मॅट्रेससह सहज कोणालाही वर उचलता येतो आणि त्यामध्ये स्टोअरेजही मुबलक असते. त्यामुळेच याला पसंती मिळत आहे. सिंगल बेड, डबल बेड, क्वीन साईज बेड या सगळ्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. लाकडी सिंगल किंवा हॉस्टेल बेडची किंमत १,५००-१,८०० रुपयांपासून सुरू होते. डबल बेड ९-१० हजार रुपयांपासून २५-३० हजार रुपयांपर्यंत मिळतो. क्वीन साइज बेडची गाद्यांसहित किंमत २५-३० हजार रुपयांपासून सुरू होते. सोफा कम बेडलाही ग्राहकांची पसंती आहे, कारण याचा बैठकीसाठी आणि झोपण्यासाठी असा दोन्ही उपयोग होतो. यामध्येही लाकडी आणि मेटल असे दोन्ही पर्याय आहेत. याची किंमत साधारण ११-१२ हजार रुपयांपासून सुरू होते.

कपाट/वॉडरोब 
सध्या वॉडरोबमध्ये दारांच्या कपाटापेक्षा स्लायडिंग ओपनिंग असलेल्या कपाटांना जास्त पसंती आहे. यामुळे दारे उघडायची झंझट नसते. बिजागऱ्या ढिल्या होणे, निखळणे हे प्रकारही नसतात आणि मुख्य म्हणजे जागा वाचते. म्हणूनच हा पर्याय अधिकाधिक निवडला जात आहे. सिंगल वॉडरोबची किंमत ९-१० हजार रुपयांपासून सुरू होते. संपूर्ण सेट ४०-५० हजार रुपयांपर्यंत मिळतो. ड्रेसिंग टेबल वॉडरोब सेटमध्येच समाविष्ट केलेले असते. नुसते ड्रेसिंग टेबल ७ ते ८ हजारांमध्ये मिळू शकते. त्यातील ड्रॉवर्सच्या प्रकारात आणि संख्येत ग्राहकांच्या गरजेनुसार बदल केला जातो. वॉडरोब करताना वेगवेगळ्या फिनिशिंग्जचा वापर केला जातो, जसे की व्हिनिर, लॅमिनेट इ. लॅमिनेटमध्येही ग्लॉस फिनिशिंग आणि मॅट फिनिशिंग असे प्रकार आहेत. स्लायडिंग वॉडरोबमध्ये बॅक पेंटेड ग्लासही वापरली जाते.

स्वयंपाकघरातही खास वेगळे फर्निचर करून घेतले जाते. फक्त डबे ठेवण्याच्या ट्रॉल्यांपुरते स्वयंपाकघरातील फर्निचर मर्यादित नसते. अगदी कट्ट्यापासून इलेक्‍ट्रॉनिक इक्विपमेंट्स ठेवण्यासाठी वेगळे फर्निचर तयार करून घेतले जाते. मॉड्युलर किचन करून घेण्याकडे लोकांचा जास्त कल असल्याचे फर्निचर तयार करणारे आणि इंटिरियर डिझाईनर्सही सांगतात. शूरॅक, टीव्ही युनिट, शोकेस, कपाटे, काँप्युटर टेबल, स्टडी टेबल, कॅबिनेट्स आणि अगदी देवघरसुद्धा तयार करून घेतले जाते. 

आजकाल अनेक गोष्टी ऑनलाइन मिळतात, तसेच फर्निचर आणि होम डेकॉर या फॅन्सी नावाखाली गृहसजावटीची प्रत्येक वस्तूही ऑनलाइन मिळते. एवढेच काय फक्त फर्निचर विकणारी वेगळी संकेतस्थळेही आहेत. असे असले तरीही प्रत्यक्ष जाऊन फर्निचर विकत घेण्याकडेच जास्त कल आहे. त्यातही तयार फर्निचर घेण्याऐवजी कस्टमाइज्ड फर्निचर करून घेणे केव्हाही परवडण्यासारखे आहे. आपल्या गरज आणि आवडीनुसार करून घेतलेल्या फर्निचरचे फायदे अनेक आहेत. आपल्या बजेटमध्ये आपल्याला हवे तसे फर्निचर करून घेता येते. कपाटाचा प्लाय उरला, तर तो खुर्चीसाठी वापरता येतो. पुस्तकांसाठी कप्प्या-कप्प्यांचे कपाट हवे, तर तेही तुमच्या मागणीनुसार करून घेणे सोपे जाते. असे प्रत्येक फर्निचरच्या बाबतीत करता येते. एका वन बीएचके फ्लॅटमधील सर्व इंटिरियर, फर्निचर आपल्या गरजेनुसार तयार करून घेतले, तर साधारण चार लाखात काम व्हायला हरकत नसते. ही किंमत अर्थातच मटेरियल, डिझाईन आणि इंटिरियर डिझाईनरच्या कॉस्टिंगनुसार बदलेल, हे लक्षात घ्यावे.

पूर्वी ट्रॉलीवाले पलंग चालायचे, पण आता हायड्रॉलिक बेड्सना जास्त मागणी आहे. वॉडरोबमध्ये पूर्वी ओपनेबल म्हणजे दारे असलेले वॉडरोब असायचे. आता ३०-४० टक्केच लोक असे वॉडरोब घेतात. जास्तकरून स्लायडिंग वॉडरोबरला डिमांड आहे. पूर्वी प्लायमध्ये फर्निचर केले जायचे. मग पार्टिकल नावाचे मटेरियल आले, ज्याला सनमायका लावावा लागत नाही आणि आता पुन्हा कमर्शिअल प्लाय आला असून मशीन प्रेस फर्निचर तयार केले जाते. आता संपूर्ण फ्लॅटचे फर्निचर ग्राहकाच्या मागणीनुसारच केले जाते.
प्रकाश कोठारे, सर्वज्ञ फर्निचर संकुल
 

संबंधित बातम्या