उपयुक्त होम अप्लायन्सेस

ज्योती बागल
सोमवार, 23 मार्च 2020

प्रॉपर्टी स्पेशल
आज मार्केटमध्ये घरात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचे असंख्य ब्रॅंड्स पाहायला मिळतात. प्रत्येक ब्रॅंड्च्या वस्तूची काहीतरी खासियत असते, जी त्या ठरावीक वस्तूला इतरांपेक्षा वेगळी व जास्त उपयुक्त, सोयीची असल्याचे सिद्ध करते. होम अप्लायन्सेसमध्ये असे जास्तीत जास्त पर्याय आज उपलब्ध दिसतात, त्यांचाच थोडक्यात घेतलेला आढावा...

होम अप्लायन्सेसमध्ये रेफ्रिजरेटर, वॉशिंगमशीन, मिक्सर, मायक्रोव्हेव, टोस्टर, ज्युसर, रोटी मेकर, एसी, कुलर, फॅन, वॉटर प्युरिफायर अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. त्यातही स्वयंपाकघरात सर्वांत जास्त महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी असतील, तर त्या आहेत मिक्सर आणि ग्राइंडर. कारण दिवसातून किमान दोन वेळा तरी स्वयंपाक होतोच आणि चविष्ट भाजी करण्यासाठी भाज्या चिरणे, कापणे, बारीक करणे इत्यादी गोष्टी आल्याच. मिक्सर आणि ग्राइंडरच्या मदतीने झटपट मसाला वाटून तयार करता येतो. हल्ली मिक्सर, ज्युसर वेगवेगळे वापरले जातात. तसेच काही टू इन वनही असतात. सध्या मिक्सर, ग्राइंडर आणि ज्युसरमध्ये ज्योती, बजाज, फिलिप्स, मॉर्फी रीचड्‌र्स, प्रीती, प्रेस्टीज इत्यादी कंपन्यांचे प्रॉडक्ट्स पाहायला मिळतात. त्यांच्या साधारण किमती १,५०० ते नऊ हजारांपर्यंत आहे. यामध्ये फिलिप्स आणि बजाजच्या प्रॉडक्टला चांगली मागणी आहे.

रेफ्रिजरेटरमध्ये व्हर्लपूल, सॅमसंग, गोदरेज, सोनी, पॅनासॉनिक, हायर, एलजी या आणि अशा अनेक लोकल कंपन्यांचे सिंगल आणि डबल डोअरचे फ्रीज सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या फ्रिजची क्षमता लिटरमध्ये असते आणि त्यानुसारच त्याची किंमत ठरत असल्याने प्रत्येक कंपनीच्या फ्रीजची किंमत वेगळी असते. या कंपन्यांचे २०० लिटरपासूनचे फ्रीज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एलजीचे फ्रीज नऊ हजारांपासून ते दीड दोन लाखांपर्यंत आहेत, तर सॅमसंगचा फ्रीज ११ हजारांपासून ते अडीच तीन लाखांपर्यंत आहे. यामध्ये सॅमसंग आणि एलजीच्या फ्रीजला चांगली मागणी आहे. गोदरेजच्या सिंगल डोअरच्या फ्रीजच्या किमती १४ हजारांपासून पुढे आहेत, तर डबल डोअरच्य फ्रीजच्या किमती साधारण २५ हजारांच्या पुढे आहेत. व्हर्लपूलचे सिंगल डोअरचे फ्रीज १० हजारांपासून पुढे उपलब्ध आहेत, तर डबल डोअरचे १५ हजारांपासून पुढे उपलब्ध आहेत. कोणत्याही फ्रीजला किती स्टार आहेत आणि त्याची स्टोरेज कपॅसिटी किती लिटरची आहे, यावरून किमती ठरतात. या सर्व कंपन्यांचे फ्रीज ब्राउन, रेड, सिल्व्हर, ब्लॅक आणि ब्ल्यू इत्यादी रंगात उपलब्ध आहेत.

इलेक्ट्रॉनिक इंडक्शनमध्ये फिलिप्स, बजाज, पिजन, प्रेस्टीज, सूर्या इत्यादी ब्रॅंडचे प्रॉडक्ट्स आहेत. या इंडक्शनची किंमत त्यासाठी वापरलेल्या मटेरिअल आणि त्यामध्ये असलेल्या फिचर्सवरून ठरते. फिलिप्सचे इंडक्शन्स तीन हजारांपासून मिळतात. फिलिप्सच्या काही इंडक्शन्समध्ये अधिक सोयीसाठी 'सेन्सर की'देखील दिलेली आहे. पिजनचे एलिगंट आणि स्मार्ट डिझाइन असलेले इंडक्शन्स अगदी १५०० हजारांपासून उपलब्ध आहेत. यांच्या इंडक्शनमध्ये ड्युअल हीट सेंसर, अॅटोमॅटिक शट ऑफ आणि एलईडी डिस्प्ले असे फिचर्स उपलब्ध आहेत. प्रेस्टीजचे इंडक्शन्स पाच हजारांपासून उपलब्ध आहेत, तर उषाचे इंडक्शन्स ३५०० पासून उपलब्ध आहेत. यामध्ये जास्त मागणी फिलिप्सच्या इंडक्शन्सना दिसते.

हल्ली तापमान सतत वाढताना दिसत आहे, त्यामुळे घरात एसी तर हवाच असतो. आज अनेक मानांकित कंपन्यांचे एसी परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत. यामध्ये गोदरेज, एलजी, पॅनासॉनिक, सॅमसंग, ब्ल्यू स्टार, हायर  इत्यादी कंपन्यांच्या एसींना चांगली मागणी दिसते. कोणत्याही एसीची किंमत तो किती टनाचा आहे यावरून ठरते. तसेच रूमच्या आकारानुसार किती टनाचा एसी लागेल ते ठरवले जाते. प्रत्येक कंपनीच्या एसीची किंमत वेगळी असते. पॅनासॉनिकच्या एक टन कपॅसिटी असलेल्या एसीची किंमत २७ हजार असून त्याला तीन स्टारचे रेटिंग आहे. गोदरेजचे एक ते १.५ टन कॅपॅसिटी असलेले एसी साधारण २५ ते ३० हजारांपासून पुढे उपलब्ध आहेत. सॅमसंगचा १.५ टन कपॅसिटीचा एसी साधारण ३५ ते ४० हजारांच्या दरम्यान येतो. यालादेखील तीन स्टारचे रेटिंग पाहायला मिळते. ब्ल्यू स्टारचे एसी २५ ते ३० हजारांच्या दरम्यान आहेत. एलजीचा पाच स्टार रेटिंग असलेला एसी ४० ते ४५ हजारांपर्यंत येतो.

मायक्रोव्हेवदेखील फिलिप्स, पिजन, प्रेस्टीज, हायर, गोदरेज, पॅनासॉनिक, एलजी, व्हर्लपूल, बजाज, एलिका इत्यादी ब्रॅंडचे पाहायला मिळतात. यांची कपॅसिटी लिटरमध्ये दिलेली असते. यांच्या साधारण किमती पाच हजारपासून ३० हजारांपर्यंत आहेत. यामध्ये ब्लॅक आणि व्हाइट हे दोनच रंग पाहायला मिळतात.

हल्ली वॉशिंगमशीन्समध्ये स्मार्ट इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह अनेक सोयी उपलब्ध असतात. फ्रंट डोअर आणि टॉप डोअर असे दोन प्रकार दिसतात. वॉशिंग मशीन्सच्या किमती त्याच्या किलोनुसार ठरतात. वॉशिंग मशीनमध्ये गोदरेज, एलजी, सॅमसंग, हायर इत्यादी कंपनीचे प्रॉडक्ट्स आहेत. काही वॉशिंग मशीन्समध्ये ऑटो रिस्टार्टचा पर्यायही आहे, तर काहींना एलईडी डिस्प्ले आहे. एलजीमध्ये साधारण सात किलो कपॅसिटीपासून पुढे मशीन्स असून किमती १६ हजारांपासून आहेत. यामध्ये सेमी ऑटोमॅटिक हे हायर कंपनीचे वॉशिंग मशीन इतरांच्या तुलनेत स्वस्त आहे. हायरची मशीन्सदेखील ७.२ किलोपासून पुढे उपलब्ध आहेत, तर यांच्या किमती १४ हजारांपासून पुढे आहेत.

फिलिप्स, मॉर्फी रिचर्ड्स, बजाज मॅजेस्टी, प्रेस्टीज, ओर्बीट, पिजन, उषा आणि अशा बऱ्याच ब्रॅंडचे टोस्टर उपलब्ध आहेत. या टोस्टरची कपॅसिटी दोन किंवा चार स्लाइसची असते. फिलिप्सचे टोस्टर १५०० पासून उपलब्ध आहे. बजाजचे दोन हजारांना उपलब्ध असून यामध्ये रीमुव्हेबल क्रंब ट्रे आणि रीहीटची सोयही आहे. मॉर्फी रिचर्ड्सच्या चार स्लाइस कपॅसिटीच्या टोस्टरची किंमत २५०० रुपये आहे. प्रेस्टीजचे टोस्टर्स १५०० पासून उपलब्ध आहेत. प्रेस्टीजच्या टोस्टर्समध्ये डीफ्रॉस्ट, रीहीट आणि कॅन्सलचे पर्याय दिले आहेत.

इतर अप्लायन्सेसप्रमाणे आटा चक्कीही हल्ली घरोघरी दिसत आहेत. या एक तर आकाराने लहान असतात आणि वापरायलाही सोयीच्या असतात. शिवाय आपल्या गरजेनुसार कोणतेही धान्य घरच्या घरी आणि कमीतकमी प्रमाणात दळता येते. यांच्यामध्ये नटराज फ्लोरेन्स, मिल्टन, मिलसेंट, ज्योती आटा मेकर्स, हायस्टार अशा अनेक ब्रॅंडच्या आटा चक्की उपलब्ध आहेत. या चक्क्यांची कपॅसिटी किलोमध्ये असते. तसेच फ्रंट डोअर आणि टॉप डोअर या दोन प्रकारात या उपलब्ध आहेत. यांच्या सर्वसधारण किमती १५ हजार ते २५ हजारांच्या दरम्यान आहेत. यामध्ये नटराजच्या चक्कीला जास्त मागणी दिसते.

फॅनमध्ये सिलिंग आणि टेबल फॅन दोन्हीही तेवढेच घेतले जातात. घरात वापरण्यासाठी जास्तकरून सिलिंग फॅन घेतला जातो, तर छोट्याशा ऑफिससाठी टेबल फॅन बेस्ट असतो. यामध्ये फिलिप्स, बजाज, अँकर, सॅमसंग, उषा, एलजी इत्यादी कंपन्यांचे फॅन बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष दुकानातून खरेदी करायचा म्हटले तर यामध्ये ठराविक कंपन्या दिसतील, पण ऑनलाइन खरेदी करताना अनेक पर्याय आहेत. सिलिंग फॅनच्या किमती तीन हजारांपासून सात हजारांपर्यंत आहेत, तर टेबल फॅनच्या किमती १५०० पासून चार हजारांपर्यंत आहेत. ल्युमिनसचे काही नवे आणि स्टायलिश फॅन्सही बाजारात आले आहेत. 
वॉटर प्युरीफायरमध्ये युरेका, अॅक्वागार्ड, केंट, फॅबेर गॅलक्सी प्लस, बल्यू स्टार, अॅक्वा प्युअर ग्रॅंड, एलजी प्युरीकेअर, अॅक्वा फ्रेश इत्यादी ब्रॅंड उपलब्ध आहेत. यांच्या किमती पाच हजारांपासून सुरू होतात. अॅक्वागार्डमध्ये अॅक्टिव्ह कॉपर आणि मिनरल  टेक्नॉलॉजी, स्टेनलेस स्टील टॅंक इत्यादी वैशिष्ट्ये असून चार लिटर कपॅसिटी असलेल्या या प्युरीफायरची किंमत ३५ हजार आहे. 

टीव्हीमध्येही अनेक ब्रॅंड आहेत. उदा. सोनी, सॅमसंग, एलजी, हायर, पॅनासॉनिक इत्यादी. यांच्या किमती टीव्हीच्या साइजवरून ठरतात. साधारण किमती बघितल्या तर १४ हजारांपासून पुढे अगदी लाखांमध्येही हे टीव्ही उपलब्ध आहेत. या ब्रँड्‌समध्ये जास्त मागणी सोनीच्या टीव्हींना दिसते. तसेच हल्ली फक्त एलईडी टीव्हीच घेतले जात असून ते २४ इंचापासून उपलब्ध आहेत.

ग्रीलर, टोस्टर, कॉफी मेकर, टी मेकर, आटा मेकर, रोटी मॅटीक, इलेक्ट्रिक चॉपर्स या होम अप्लायन्सेसनाही सध्या चांगली मागणी आहे. या सर्व होम अप्लायन्सेसवर किमान सहा ते दोन वर्षांची वॉरंटी नक्की दिली जाते. 

लेखात दिलेल्या वस्तूंच्या आकारात आणि किमतीत बदल होऊ शकतो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या