उद्यानासाठी हवा कोपरा

प्रिया भिडे
सोमवार, 23 मार्च 2020

प्रॉपर्टी स्पेशल
आज अनेक मोठमोठ्या गृहनिर्माण संस्था ठिकठिकाणी उभ्या आहेत. या संस्थांना उपलब्ध जागेत स्वतःचे उद्यान तयार करण्याची संधी असते. आजच्या घडीला उद्याने ही काळाची गरज आहे. भुवनेश्‍वरसारख्या गजबजलेल्या शहरातही औषधी वनस्पतींचे एक उद्यान साकारले आहे. असे उद्यान आपल्याकडच्या सोसायट्यांमध्ये साकारता येऊ शकेल...

भुवनेश्वर शहरातील अत्यंत गजबजलेल्या भागातील बिंदुसागर हा एक विस्तीर्ण जलाशय. बिंदुसागराला एका ठिकाणी पायऱ्यांचा घाट, तर बाकी जलाशयाभोवती जांभा दगडाची भिंत होती. या जलाशयाच्या कडेने एक छोटेसे तरीही अतिशय लोभस असे उद्यान आहे. मंदिरांचे शहर अशी ओळख असलेल्या या शहरातील प्रसिद्ध लींगराज मंदिरासमोर बिंदुसागर हा जलाशय आहे. पूर्वी या शहराला एकाम्ब्रवन असेही म्हणत असत. एका आम्रवृक्षाखाली बसून शंकरांनी तपस्या केली ते हे ठिकाण म्हणून एकाम्ब्रवन! बिंदुसागर जलाशयाभोवती वनखाते व पर्यावरण खाते यांनी मिळून औषधी वनस्पतींचे उद्यान तयार केले आहे, त्याचे नाव ठेवले एकाम्ब्रवन. या उद्यानाकडून प्रेरणा घेऊन गृहनिर्माण संस्थांमध्येही उद्यान साकारता येऊ शकते.

एकाम्ब्रवनात जांभा दगडाच्या छोट्याशा कमानीतून आत गेले, की उजवीकडे तिकीट खिडकी आहे. निव्वळ पाच रुपये देऊन हे उद्यान बघता येते. रस्त्याकडून जलाशयाकडे उतारावर असलेल्या या उद्यानाची रचना पायऱ्या पायऱ्यांची आहे. वरच्या बाजूला औषधी वृक्ष आहेत. मधल्या पायऱ्‍यांवर विविध आकारात मधे वाफे केले आहेत.

सुरुवातीला आहेत तुळशीचे वाफे; वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या सुवासाच्या, तसेच हिरव्या, काळपट रंगांच्या पानांच्या राम तुळस, कृष्ण तुळस इथे लावलेल्या दिसतात. प्रत्येक तुळशीसमोर स्थानिक नाव, वनस्पतीचे शास्त्रीय नाव लिहिलेले आहे.

त्यानंतर माका, ब्राह्मी, अनंतमूळ, शंखपुष्पी, पानफुटी, धोत्रा, वेखंड, ओवा, अडुळसा, गुळवेल अशा काही माहीत असलेल्या, तर हेमकेदार, बलासारख्या काही माहीत नसलेल्या औषधी वनस्पती लावल्या होत्या. अक्कलकारा लावून दोन चौकोनी वाफे केले होते. पिवळ्या चॉकलेटी फुलांचा अक्कलकारा जिभेला लावताच चुरचुरणाऱ्या संवेदना देतो. आमच्या लहानपणी याचा वापर आम्ही गंमत म्हणून करायचो, आता फारच थोड्या जणांना माहीत असेल. एका ठिकाणी अर्धगोलाकार वाफ्यामध्ये निळे, पांढरे, लाल चित्रक फुललेले होते. पांढरी, निळी अपराजिता म्हणजे गोकर्ण दोन वाफ्यात पसरली होती. एका बाजूने वाळा, गवती चहासारखी सुगंधी गवते वाऱ्यावर हलकेच डोलत होती. तलावाकडेच्या जांभ्याच्या लालुंग्या वाफ्यात पुदिना, मरवा लावला होता. शतावरीच्या नाजूक वेलाला लालबुंद मण्यांसारखी फळे लगडली होती. एरवी आपल्याला तण वाटणाऱ्या भुईआवळ्याचे वाफेच केले होते. नागकेशर, नागरमोथा एक ना दोन; वनस्पतींची विविधता इतक्या नजाकतीने जपली होती हे पाहून मन तृप्त झाले.  

एका मोठ्या आवळ्याच्या झाडाभोवती चौकोनी पार बांधला होता. त्याला चारी बाजूंनी कोरीव कामाचे देखणे दगड बसवले होते. पाराच्या दोन बाजूला जाळीवर पिंपळीच्या वेलांनी गर्द हिरवी भिंत तयार केली होती. पानापानाला करंगळीएवढ्या पिंपळ्या लगडल्या होत्या. लेंडी पिंपळी फारच औषधी म्हणे! पिंपळीचे वेल मी प्रथमच पाहत होते.

त्यानंतरच्या भागात उतारावर हिरवळ लावून त्यामध्ये कदंब, मुचकुंद, बेल, सीता अशोक असे वेगवेगळे औषधी वृक्ष लावले होते. मोठ्या वृक्षांवर पक्षांसाठी छोटी छोटी मडकी बसवली होती. बिक्सा या वृक्षाच्या बिया केशरी रंगाच्या असतात, त्यापासून श्रीखंडाचा रंग तयार करतात. या बिक्साचे एक-दोन छोटे वृक्षही कळ्यांनी डवरले होते. दालचिनी, लवंग, अर्जुन, बेहडा असे अनेक देखणे वृक्ष हिरवळीवर विराजमान झाले होते. कांचन वृक्ष जांभळ्या फुलांनी आकर्षक दिसत होता. याच्या कळ्यांची भाजी व लोणचे करतात, अशी माहिती गाइडने दिली. 

अनेक उद्यानांच्या रचनांमध्ये वृक्षांना अधिक महत्त्व दिले जाते, परंतु वेली, महावेली याकडे जरा दुर्लक्ष होते. हे उद्यान त्याला अपवाद दिसले. वृक्षाच्या बाजूला महावेलींना स्थान दिले होते. माधवीलता, कांचन वेल असे वेगवेगळे वेल वृक्षांना बिलगले होते. त्यांच्या जाडजूड झाडांवरून त्यांचे वय लक्षात येत होते. चौदा पंधरा वर्षांच्या कालावधीत या महावेलींनी त्यांच्या खोडांचे झोपाळे तयार केले होते. अशी उद्याने आपल्याकडे गृहनिर्माण संस्थांमध्ये निर्माण झाली तर काय बहार येईल असे वाटले.

ओडिशा म्हणजे भरपूर पावसाचा प्रदेश, त्यामुळे उद्यानाच्या वरच्या भागात वरून वाहणारे पाणी जलाशयाकडे नेण्यासाठी अतिशय कलात्मकरीत्या पाणी वाहण्याची योजना केलेली दिसली. जलाशयात पाणी पडण्यासाठी मंदिरात असतात त्याप्रमाणे काही ठिकाणी हत्तीच्या सोंडेतून, तर काही ठिकाणी मगरीच्या तोंडातून, वराहाच्या तोंडातून पाणी जलाशयात पडेल अशी रचना केली आहे. एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह कमल कुंडामध्ये पडेल अशी रचना आहे, या कुंडामध्ये पांढऱ्या रंगाची कमळे होती. पायऱ्‍यांच्या कठड्याला पांढऱ्या सुगंधी फुलांच्या वेलींनी सुशोभन केले होते. कुंदाचे ताटवे लालूंच्या कळ्यांनी बहरले होते. 

उद्यानाच्या एका कोपऱ्यात जुन्या दरवाजात कोरीव दगड व हिरवळीने सुशोभन केले होते. दोन-तीन महिला अतिशय तन्मयतेने उद्यानाची स्वच्छता करण्यात गुंतल्या होत्या. त्यांना आवर्जून सांगितले, की उद्यान खूप छान व स्वच्छ आहे, ही सारी तुमची मेहनत! त्याही आनंदल्या.

आपल्याकडे उभ्या राहणाऱ्या असंख्य ‘टाउनशिप’मध्ये उद्यानासाठी भरपूर जागा असते. परंतु, बहुतेक वेळा या उद्यानात पारंपरिक औषधी वनस्पतींना स्थान नसते. हे उद्यान पाहिल्यावर असे वाटले, की आपल्याकडेही असे औषधी उद्यान प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत जरूर असावे, त्यांना नावाच्या योग्य पाट्या लावलेल्या असाव्यात. या स्थानिक वनस्पतींचे अधिवास आपण फार वेगाने नष्ट करत आहोत. त्याचबरोबर या औषधी वनस्पतींची नवीन पिढीला माहितीही नाही. आपल्या जैवविविधतेची, स्थानिक औषधी वनस्पतींची माहिती सहजपणे लोकांना अशा उद्यानातून मिळू शकेल. स्थानिक वनस्पतींना अधिवास मिळावा, या हेतूने प्रत्येक उद्यान रचनाकारांनी अशा पद्धतीची उद्याने गृहनिर्माण संस्थांमध्ये निर्माण करावी, तसेच सदनिकाधारकदेखील त्यांच्या छोट्याशा गच्चीत कोरफड, गवतीचहा, वाळा, अडुळसा या वनस्पती सहज लावू शकतात. नव्हे त्यांनी लावाव्यातच.  

एकाम्ब्रवनात सकाळच्या कोवळ्या उन्हात, मातीच्या मार्दवातून तरारलेल्या, चैतन्यमयी वनस्पतींच्या सहवासात फेरफटका मारणे हा अतिशय आनंददायी अनुभव होता. तलावाशेजारी असलेल्या उकिरड्याचे, राजकीय इच्छाशक्ती व वनखात्याच्या सर्जनशील दृष्टीने दोनशे प्रकारच्या औषधी वनस्पतींचे हे छोटेसे उद्यान तयार झाले. उद्यानातील गाइडने वनस्पतींचे औषधी उपयोगही आम्हाला सांगितले. तसेच औषधी वनस्पतींची रोपवाटिकाही आहे अशी माहिती दिली. आज सर्वच ठिकाणी शहरीकरणाचा रेटा वाढला आहे व अनेक मोठ्या गृहनिर्माण संस्था उभ्या राहत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी अशा पद्धतीचा उद्यानाचा एखादा तरी कोपरा गृहनिर्माण संस्थेमध्ये जरूर करावा त्यासाठी हा लेखन-प्रपंच.

संबंधित बातम्या