बदलते इंटिरियर

वनिता पंडित
सोमवार, 23 मार्च 2020

प्रॉपर्टी स्पेशल
 

इंटिरियर ही संकल्पना आता फक्त माफक फर्निचरपुरती मर्यादित राहिली नसून विविध ट्रेंड्स इंटिरियरमध्ये समाविष्ट झाले आहेत. आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार, बदलत्या गरजेनुसार नवनवीन ट्रेंड्स इंटिरियरमध्ये येत आहेत. पूर्वी इंटिरियर ही संकल्पना जास्त अस्तित्वात नव्हती. लोक आपल्या गरजेनुसार रेडीमेड फर्निचर बाजारातून विकत घेत असत. 

बैठकीच्या खोली(लिव्हिंग रूम)चा विचार केला, तर माफक गोष्टीच तेथे दिसून यायच्या, जसे की लाकडी कपाट, लाकडी खुर्च्या, अँटिक टेबल कॉर्नर शेल्फ, एखादे कॉर्नर टीव्ही युनिट, त्याच युनिटमध्ये शटरचे स्टोअरेज, भारतीय बैठक, त्याखाली खूप मोठ्या प्रमाणात केलेली स्टोअरेजची योजना किंवा लिपिंग वापरून केलेले किंवा मोल्डिंग कार्व्हिंगचे काम असलेले अँटिक फर्निचर जास्त पाहायला मिळायचे. भिंतींवर एका ओळीमध्ये लावलेल्या फ्रेम्स, कुटुंबाचे फोटो, सरसकट एकाच रंगाचे केलेले पेंटिंग, प्रत्येक रूममध्ये टिपिकल ट्यूब लाइट आणि झिरोचा बल्ब असे. स्वयंपाकघराचा विचार केला तर आधी कडप्प्याचा ओटा आणि सिंक, ओट्याखाली मोकळ्या जागेत शेल्फ तयार केले जायचे आणि इतर भांड्यांसाठी किंवा मोठ्या गोष्टींसाठी कडप्प्याचे कप्पे असायचे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींसाठी क्वचितच ओट्यावर एकच पॉइंट दिला जायचा आणि त्या एकाच पॉइंटवर सर्व इलेक्ट्रिक गोष्टी चालवल्या जायच्या. बेडरूममध्येही बऱ्याच वेळा एक बेड, टेबल फॅन, लोखंडी कपाटे, ड्रेसिंग टेबल अशा गोष्टींनी रूम भरलेली असायची. यामुळे खोलीला एकसंधपणा कधी मिळत नसे. पूर्वी पडदे, बेडशीट, पिलो कव्हर याही गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जात नसे. पण कालांतराने यात मोल्डिंग अँटिक वॉल फर्निचर उपलब्ध होत गेले. आता आपण ज्याला लॅमिनेट म्हणतो, ते पंधरा-वीस वर्षापूर्वीच सनमाइकाचे फर्निचर म्हणून उपलब्ध होऊ लागले. सिलिंग पीओपी यांच्या डिझाईनमध्येही खूपसे आमूलाग्र बदल होत गेले. 

पूर्वी दोन बाय तीनच्या पीओपीच्या शीट्स मिळायच्या. आत्ताही त्या मिळतात, पण त्यावर भरगच्च डिझाईन आणि भडक रंग वापरलेले असतात. आता इंटिरियरमध्ये नावीन्यपूर्ण असे ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत. नवीन ट्रेंड हा सिंपल, सोबर, स्लिक फर्निचरचा आहे. रूममध्ये अगदी गजबज न करता नेमके फर्निचर केले जाते आणि घरातील प्रत्येक गोष्टीला तिची अशी स्वतंत्र जागा तयार केली जाते.

लिव्हिंग रूममध्ये सोफा सेट, आरटिस्टिक सेंटर टेबल, साइड टेबल, टीव्ही युनिट पॅनल विथ ड्रॉवर, आर्टिफॅक्ट शोकेस डिस्प्ले, डिझाइनर शेल्फ यांमध्ये सिंपल आणि सोबर असणारे फर्निचर तयार करून घेण्यात लोकांचा कल वाढत आहे. तसेच फर्निचर आणि रूमच्या रंगाला साजेसे, सिलिंगमधून येणारे पॅनेल लाइट्स लावले जातात. यामुळे नेहमीच्या ट्यूबलाइटपेक्षा तुलनेने जास्त प्रकाश मिळतो. जास्त प्रकाशामुळे घरात जाणवणारा फ्रेशनेस पॅनेल लाइटमुळे खुलून दिसतो. त्याबरोबरच वॉर्म लाइटचा घरात वातावरण निर्मितीसाठी (ॲम्बिअन्स) उपयोग होतो. इंटिरियरमध्ये अशा लाइट्सचा नवीन ट्रेंड रुजतो आहे. त्याशिवाय साइड टेबलवर कॉर्नर हँगिंग डेकोरेटिव्ह लाइट्सही या नवीन ट्रेंडचाच एक भाग आहे. फॅमिली फोटो फ्रेम्स या वेगवेगळ्या पॅटर्नच्या कोलाजमध्ये एकाच वॉलवर लावल्या जातात. लिव्हिंग रूममध्ये कॉर्नर शेल्फ न घेता डिझाईनर पद्धतीच्या शेल्फ, बुकशेल्फ केल्या जातात.

स्वयंपाकघराबाबत बोलायचे झाले, तर मॉड्युलर किचन हा स्वयंपाकघराच्या इंटिरियरमधील नवीन ट्रेंड आहे, ज्यामध्ये इंटिरियर सुटसुटीत आणि गरजेपुरतेच केले जाते. फ्लॅटमध्ये किचन हे जास्त मोठे नसते, त्यामुळे किचन ट्रॉली, पुल आउट, प्लेन ट्रॉली देऊन मोजक्याच गोष्टी किचनमध्ये ठेवता येतात. त्यामुळे नको असणाऱ्या वस्तूंवर आळा घातला जातो. क्रोकरी युनिट, ओव्हरहेड स्टोअरेज यांद्वारे किचनमधील स्टोअरेजची जागा वाढवली जाते. बदलत्या काळानुसार किचनमध्ये विविध प्रकार पाहायला मिळतात, ज्यामध्ये हार्डवेअरवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. उदा. ओट्याचा कॉर्नर पार्ट व्यवस्थित वापरता येत नाही. तिथे मॅजिक कॉलर्ससारखे फिटिंग घेऊन तो कॉर्नर व्यवस्थित वापरात आणला जातो. मॉडेल किचनमध्ये फुल हाइट व्हर्टिकल स्टोअरेजमध्येदेखील डबल स्टोअरेजचे रॅक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मॉडेल किचनमध्ये सर्व गोष्टी या हार्डवेअरवर अवलंबून असतात, हार्डवेअरमुळे खूप खूप सोयीस्कर पद्धतीने किचनचा वापर करता येतो. मार्केटमध्ये हजार रुपयांपासून करोडोंपर्यंत किचन इंटिरियर उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या आहेत. स्वयंपाकघराच्या इंटिरियरमध्ये जास्तीत जास्त सोयीसुविधा असणे आवश्‍यक आहे. आपल्या गरजेनुसार स्वयंपाकघर सजवणे आणि वापरासाठी सोयीस्कर असणे या दोन गोष्टी नेहमी पाहाव्यात. गरज नसलेल्या गोष्टींसाठी खर्च करू नये, त्यामुळे होणारा नाहक खर्च वाचवता येतो आणि तोच खर्च इतर गोष्टींवर करता येतो. मॉड्युलर किचन पद्धतीनुसार खूप गोष्टी या सोयीस्कर पद्धतीने करता येतात. स्वयंपाकघरात चिमणी, इंडक्शन, डिश वॉशर, फ्रिज या तांत्रिक गोष्टींचा समावेश असावाच.

बेडरूममध्ये टीव्ही पॅनेलची संकल्पना सध्या रूढ होत आहे. प्रत्येकाला स्वतःची अशी स्पेस हवी असते आणि प्रत्येकाला स्वतःच्या आवडीनिवडीनुसार वेगवेगळे चॅनल्स पाहायचे असतात, त्यामुळे ही संकल्पना प्रचलित झाली आहे. बेडरूममध्ये नुसते वॉडरोब न करता त्याबरोबर लॉफ्टही येतात. लॉफ्टची आणि वॉल ड्रॉपची मांडणी प्रत्येकाच्या आवडीनुसार बदलू शकते. सध्या बेडरूममध्ये प्रचलित असणारा प्रकार म्हणजे वॉकिंग वॉल ड्रॉप. या संकल्पनेनुसार बेडरूमचे दोन भाग होतात. एका भागात बेड, टीव्ही पॅनेल असते तर दुसऱ्या भागात वॉशरूम/टॉयलेट असते. वॉकिंग वॉल ड्रॉप ही संकल्पना सध्या तरी मोठ्या बंगल्यांच्या प्रोजेक्टमध्ये करता येते. पूर्वी बेडरूममध्ये फॉल्स सिलिंग नसे, पण सध्या बेडरूममध्येही फॉल्स सिलिंग केले जाते. त्या मागचे कारण म्हणजे वातावरण निर्मिती आणि पूर्ण नैसर्गिक प्रकाश! मेन स्वीच बोर्डच्या खाली फूटलाइट देण्याची पद्धत आहे. हे फूटलाइट स्विच बोर्ड डायरेक्शनही दाखवते आणि रात्रीच्यावेळी झिरो लाइटचेही काम करते. बेडरूममध्ये डेकोरेटिव्ह लाइट्सचा वापरही केला जातो. स्पॉट लाइट, डेकोरेटिव्ह ड्रेसिंग लाइट, साइड टेबल लाइट, हँगिंग लाइट, फ्रेम लाइट अशा अनेक पॉइंट्सचा बेडरूममध्ये समावेश केला जातो. पण यासाठी नवीन पॉइंट्स आणि वायरिंगचे काम तेवढे वाढते.

सेफ्टी डोअरमध्ये टिपिकल एमएसचे डोअर न घेता दारामध्ये कट आउट करून एमएस किंवा एसएस जाळीमध्ये अर्धे ओपन - अर्धे क्लोज सेफ्टी डोअर केले जाते. त्यातही विविध डिझाईन्स करता येऊ शकतात. 

घरातील नेहमीच्या वापरण्यातील या वस्तूंचे प्रदर्शन न करता त्या जास्तीत जास्त बंद कपाटात ठेवाव्यात. शूज, झाडू, न्यूज पेपर्स, मॅगझिन्स यांसारख्या वस्तू क्लोज स्टोअरेजमध्ये ठेवणे योग्य, जेणेकरून त्या दृश्य स्वरूपात नसतील. 

मुलांच्या खोलीचे इंटिरियर
खरे पाहिले तर किड्स रूम अशी रूम आहे जेथे पालकांचा म्हणावा तसा इंटरेस्ट पाहायला मिळत नाही. एक तर किड्स रूम लहान असते म्हणून तिची स्टोअर रूम केली जाते किंवा रेडीमेड फर्निचर आणून रूम भरली जाते. ज्याप्रमाणे किचन, हॉल, बेडरूमचे इंटिरिअर होते त्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे मुलांच्या रूमचे इंटिरियर होऊ शकते. त्यासाठी डिझाईनरच्या कल्पक दृष्टीबरोबर क्लायंटकडून मिळणारे अचूक आउटपुट गरजेचे असते. जसे की आपल्या मुला-मुलींच्या आवडी, सवयी, एकमेकांमधील भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ, बहीण-बहीण हे नाते, मुलांचे वय यावरून रूमचे प्लॅनिंग कसे करायचे हे ठरवता येते आणि ते प्लॅनिंग पुढील पाच ते दहा वर्षे आउटडेटेड वाटणार नाही याची डिझाईनर म्हणून आम्ही काळजी घेत असतो.

इंटिरियर म्हटले, की बेसिक फर्निचर आलेच. त्यामध्ये मुलांचे फर्निचर कपाट, बिछाना, स्टडी टेबल याबरोबर ड्रेसिंग युनिट, स्टोअरेज या सर्व गोष्टी आपसूकच येतात. ते सर्व कलात्मक पद्धतीने बसवण्यात डिझाईनरचे कौशल्य असते. 

किमान वय वर्ष पाच ते दहा या वयोगटातील मुलांसाठी रेडीमेड फर्निचरचे ऑप्शन्स उपलब्ध असतात. त्यात त्यांना बेड, स्टोअरेज, स्टडी टेबल, बंक बेडच्या विविध डिझाईन्स विविध स्वरूपात उपलब्ध असतात. अशा डिझाईन्स आपल्या रूम साईजनुसार तयार करून देणाऱ्या कंपन्याही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मुलांच्या रूमचे फर्निचर डिझाईन करताना जास्तीत जास्त स्टोअरेजचा विचार करण्यात यावा. त्यामध्ये नुसती बंद कपाटे न करता काही ओपन बॉक्स स्टोअरेज स्वरूपात आणि काही क्लोज बॉक्स स्टोअरेज स्वरूपात असावे. त्यांची खेळणी, पुस्तके, ट्रॉफी अशा वस्तूंसाठी स्टोअरेज ओपन बॉक्स स्वरूपात असावे. कपडे, शूज, दप्तर, स्टेशनरी, स्कूल बुक्स, नोटबुक्स, यांसाठी स्टोअरेज क्लोज बॉक्स स्वरूपात असावे. स्टडी टेबल करताना शक्यतो टेबलाखाली कमीत कमी स्टोअरेज देऊन ओव्हरहेड स्टोअरेजचा जास्त विचार करावा आणि मुले लहान असतील तर ट्रॉली स्टोअरेजचा खूप उपयोग होतो. चेस्ट ऑफचाही चांगल्या पद्धतीने उपयोग होतो, जेणेकरून त्यामध्ये वस्तूंनुसार ड्रॉव्हर्सचे चांगल्या पद्धतीने वर्गीकरण करता येते. इतर आर्टिफॅक्ट्ससाठी तसेच पुस्तकांसाठीही डिझाईनर शेल्फचा विचार करावा. स्टडी टेबलपाशी सॉफ्ट बोर्ड, ब्लॅकबोर्ड, मोटिव्हेशनल कोट्स या गोष्टी कल्पक पद्धतीने समाविष्ट करता येऊ शकतात. अभ्यास करण्यासाठी ज्या वातावरण निर्मितीची गरज असते, त्या गोष्टींचा समावेश करण्यात यावा, जसे की योग्य बैठक, उत्तम प्रकाश योजना, उत्कृष्ट रंगसंगती. 

मुलांच्या रूममध्ये कपाटाच्या आतील कप्प्यांची मांडणी आवश्यकतेनुसार करता येते. जसे की स्पोर्टचे कपडे, नेहमीतील वापरायचे कपडे, कार्यक्रमातील कपडे, लॉकरचे ड्रॉव्हर्स, हँगिग. आजच्या जीवनशैलीनुसार कपाटाच्या खाली गरजेनुसार पुलआउट दिले जाते. जेणेकरून कार्यक्रमाच्यावेळी घालण्याचे सँडल्स, शूज, चप्पल तेथे ठेवू शकतो. त्यामुळे मेन शूरॅकवर या जास्तीच्या फुटवेअरचा लोड येत नाही.

वॉडरोब करताना त्याच्या ओपनिंग्ज कशा असाव्यात हे आधीच ठरवावे लागते, फुल ओपनिंग किंवा स्लायडिंग ओपनिंग. स्लायडिंग ओपनिंगमध्ये फक्त पन्नास टक्केच जागा उघडता येते. ओपनिंग शटलमध्ये मुबलक जागा आवश्यक असते. तसेच लॉफ्टसाठी ओपनेबल शटर किंवा पुलअप शटर करता येते. त्यात पुलअप शटरच्या हार्डवेअरचे कॉस्टिंग तुलनेने जास्त येते.

रूममधले सर्वांत महत्त्वाचे फर्निचर म्हणजे बेड. मुलांच्या बेडरूममध्ये बेड साइज हा फ्लेक्झिबल घेता येतो. बेड फिक्स किंवा मुव्हेबल करू शकतो. जागा कमी असेल तर फोल्डेबल बेड ही संकल्पनाही वापरता येते. एका रूममध्ये दोन मुले असतील, तर ट्रॉली स्वरूपातही दोन बेड घेऊ शकतो. बंक बेडमुळे पन्नास टक्के जागा वाचते आणि रूमचे सौंदर्य आणखीनच खुलून येते. रेडीमेडमध्ये एमएसमध्ये किंवा मॉड्युलर फर्निचरमध्ये अनेक बंक बेड उपलब्ध असतात, पण सुताराकडूनही आपल्या मनासारखा बेड करून घेता येतो. मुलांच्या खोलीतही फॉल्स सिलिंगचा पर्याय विचारात घेता येऊ शकतो. रूमचे डिझाईन करताना कलर कॉम्बिनेशन युनिक सिलेक्ट करावे, कारण मुले मोठी झाली की, त्यांची आवड बदलत जाते. त्यानुसार रंगाची निवड करावी. 

ऑफिस इंटिरियर
ऑफिस इंटिरियरमध्येही काळानुसार आमूलाग्र असे बदल झाले आहेत. ऑफिस इंटिरियर करताना कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त डेकोरेटिव्ह गोष्टी देणे, कर्मचाऱ्यांसाठी काम करण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी वातावरणाची निर्मिती करणे, ऑफिसमधील केबिन्स, वर्क स्टेशन्स, रिसेप्शन एरिया, डायरेक्टर केबिन, मीटिंग रूम्स, कॉन्फरन्स केबिन, पॅन्ट्री, वॉशरूम या सर्व गोष्टींचे व्यवस्थित प्लॅन करून इंटिरियर केले जाते. ऑफिसचे वातावरण आल्हाददायक करणे, जेणेकरून कामाचा ताणतणाव वातावरणात जाणवला नाही पाहिजे असा प्रयत्न असतो.

केबिन्सचे पार्टिशनही वेगवेगळ्या मटेरियलमध्ये करता येते. पूर्वी ॲल्युमिनियम पार्टिशनमध्ये केबिन्स केल्या जात. पण सध्या अनेक संकल्पना पार्टिशनमध्ये आल्या आहेत, ज्यामध्ये ग्लास पार्टिशनही मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी संकल्पना आहे. ग्लास पार्टिशनमुळे योग्य प्रकाश मिळणे, संपूर्ण कर्मचारी वर्ग बॉसच्या दृष्टिक्षेपात राहणे अशा विविध गोष्टी साध्य होतात. त्याबरोबरच ऑफिसचे सौंदर्य आणखीन खुलून येते. ग्लासमध्ये मेक पेंटेड ग्लास, कलर ग्लास असेही पर्याय पार्टिशनसाठी उपलब्ध आहेत. ग्लास पार्टिशनवर थीमनुसार ग्लास फिल्मिंग केली जाते. ऑफिस इंटिरियरमध्ये फॉल्स सिलिंग न करता मूळ स्लॅब तसाच ठेवून त्यावर इलेक्ट्रिकल पॉइंट्स घेतले जातात आणि पायपिंग केली जाते. यामुळे बराचसा फॉल्स सिलिंगचा खर्च वाचतो. मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या मटेरियलचा वापरही ऑफिस इंटिरियरमध्ये केला जातो. व्यावसायिक वातावरण निर्मितीसाठी छोट्यातील छोटी ऑफिसेस, शोरूम्स, स्पा, पार्लर यांचा इंटिरियर करण्याकडील कल वाढत आहे. नवीन ट्रेंडनुसार कामाचे ठिकाण सजावटीने परिपूर्ण केले जाते, त्यामुळे तेथे आर्थिक, वैचारिक, सामाजिक सुबत्ता नांदत आहे असे बोलले जाते.

संबंधित बातम्या