वेध ‘पुणेकर’ दुर्गांचा

ओंकार ओक
सोमवार, 11 मार्च 2019

पुणे विशेष
 

पुणे! केवळ हा शब्द उच्चारला, तरी कितीतरी गोष्टी डोळ्यासमोर तरळून जातात. पेठेतल्या खाद्यसंस्कृतीपासून ते विसर्जनातल्या वाद्यसंस्कृतीपर्यंत आणि तळजाईच्या वृक्षराजीपासून ते सिंहगडाच्या कांदा भजीपर्यंत अनेक गोष्टींची यादीच डोळ्यासमोर क्षणार्धात उभी राहते. ऐतिहासिक वारसा हे तर पुण्याचं खरं वैभव. अनेक ऐतिहासिक पिढ्या या शहरानं पाहिल्या. त्यांचा रोमांचक इतिहास अनुभवला आणि स्वतःचं अढळस्थान या जगात निर्माण केलं. प्रत्येक पुणेकराला या सगळ्या गोष्टींचा जाज्वल्य अभिमान आहे. पण, पुण्यातल्या गिर्यारोहकांसाठी मात्र, पुणे जिल्हा हे एक वेगळंच रसायन आहे. सह्याद्रीची भरभरून कृपा लाभल्यानं सुमारे २५ ते ३० किल्ल्यांवर या पुणे जिल्ह्याची स्वतंत्र मालकी आहे. अगदी हाकेच्या अंतरावर हे सगळे किल्ले असल्याने एका दिवसाच्या ट्रेकसाठी उत्तमोत्तम पर्याय पुणे जिल्ह्यात उपलब्ध आहेत.

पुणेकर गिर्यारोहकांचं आराध्य दैवत म्हणजे सिंहगड. अर्थातच याचा मान पहिला. ‘आमच्या खिडकीतून सिंहगड दिसतो,’ इथपासून ‘सिंहगडाच्या झुणका-भाकरीसारखी आणि खेकडाभजीबरोबर मिळणाऱ्या त्या लाल ठेच्याची चव जगात तरी कोणत्या पदार्थाला आहे का?’ इथपर्यंत प्रत्येकानं आपला स्वतंत्र हक्क या लाडक्‍या किल्ल्यावर प्रस्थापित केला आहे. दर रविवारी मोकळा वेळ मिळाला, की दृष्टांत झाल्यासारखी पुणेकरांची पावलं सिंहगडाकडं वळतात. बाहेरच्या पाहुण्यांना दाखवण्याचं ‘पेटंट’ ठिकाण म्हणजे सिंहगड. त्यामुळं साधारणपणे पुण्यातल्या गिर्यारोहकांच्या ट्रेकिंग कारकिर्दीची सुरुवात सिंहगडापासूनच होते आणि पुढं त्याला एक सदाबहार रूप प्राप्त होतं.

आता सिंहगडानंतर मग ट्रेकर्ससाठी अनेक पर्याय असतात. तीन दिवस राजगडावर जाऊन ‘पडी’ टाकण्यापासून ते एका दिवसात आरामात पाहून होणाऱ्या लोहगड-विसापूरपर्यंत ट्रेकर्सच्या वाऱ्या सुरू होतात. एस. टी. महामंडळ आणि रेल्वे विभागाच्या वरदहस्तामुळं एका दिवसाच्या ट्रेकच्या किल्ल्यावर जाण्यासाठी शासकीय सोय आहे. साधारणपणे पावसाळ्यात लोहगड-विसापूर, तुंग-तिकोना, रोहिडा-केंजळगड, रायरेश्‍वर, तोरणा, पुरंदर-वज्रगड यांना पसंती जास्त मिळते. वर्षाऋतुमध्ये बहरलेलं ते सह्याद्रीचं हिरवंगार लोभसवाणं रूप, या सगळ्या सह्यप्रेमींसाठी एखाद्या चुंबकाचं काम करतं. राजमाचीच्या त्या खळाळत्या ओढ्यांनी आणि कोसळणाऱ्या धबधब्यांनी आगळाच साज चढवलेल्या मार्गावरून चालताना खरोखरच भान हरपतं. त्याचे आस्मानाला भिडलेले ते श्रीवर्धन-मनरंजन हे बालेकिल्ले म्हणजे राजमाचीचा खरा आत्मा! पावसाळा संपताना कोरीगडावर पसरलेला तो सोनकीच्या फुलांचा पिवळाजर्द गालिचा म्हणजे स्वर्गसुखच! चढायला सहजसाध्य असलेल्या या कोरीगडाच्या पदरात निसर्गानं भरभरून दान दिलंय. सासवडजवळच्या मल्हारगडाची ती एकसलग आखीवरेखीव तटबंदी लांबूनसुद्धा कोणाचंही लक्ष सहज वेधून घेते. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून मान मिळालेला राजगड आणि मराठेशाहीतला शेवटचा बांधला गेलेला मल्हारगड हेही पुण्याचेच रहिवासी. भोर तालुक्‍यातल्या रोहिडा-केंजळगड आणि रायरेश्‍वरावर इतिहासानं उदंड प्रेम केलं आणि त्यांचं नाव सुवर्णाक्षरात कोरलं.

खरं तर पुणे आणि रायगड जिल्ह्याची हातमिळवणी करणाऱ्या अनेक घाटवाटा आहेत. अंधारबन, ताम्हिणी, मढे, उपांड्या, सिंगापूर-बोराटा असे अनेक अनगड घाट पुणे जिल्ह्यातून सुरू होतात आणि रायगड जिल्ह्यात विसावतात. मुळशी जवळचे सवाष्णी आणि नाणदांड हे असेच ट्रेकर्समध्ये गाजलेले दोन घाट. यातल्या सवाष्णीवर करडी नजर ठेवायला तैलबैला आणि नाणदांडवर लक्ष ठेवायला घनगड हे आकाराने लहान पण महत्त्वाचे असलेले किल्ले पुणे जिल्ह्यातलेच! हा तैलबैला म्हणजे भन्नाटच प्रकरण आहे. भूगर्भशास्त्राचा अजब आविष्कार असलेल्या तैलबैल्याच्या त्या जुळ्या कातळभिंती म्हणजे खऱ्या अर्थाने प्रस्तरारोहकांची पंढरी! पावसाळा सोडला तर वर्षभर हा तैलबैला ट्रेकर्सचा सहवास अनुभवत असतो. पानशेतपासून सुमारे तीस किलोमीटवर घोळ नावाचं एक गाव आहे. या गावापासून कोकणात कावळ्या घाट नावाची एक पायवाट उतरली आहे. साडेतीनशे वर्षांपासून या वाटेवर भेदक नजर रोखलेला आणि समोरच्या त्या राजधानी रायगडाच्या डोळ्याला डोळे भिडवून उभा असलेला कोकणदिवा हा किल्ला. उपेक्षित किल्ल्यांमध्ये याचा पुढचा क्रमांक. पण एकदा याच्या माथ्यावर पाऊल ठेवून तर बघा. त्या अजस्र विस्ताराच्या रायगडाचं जे काही रूप कोकणदिवा पेश करतो, ते केवळ अवर्णनीय! रायगडाचं जगदीश्‍वर मंदिर आणि नगारखाना एवढ्या लांबूनही स्पष्ट दाखवणारा कोकणदिवा हा पुणे जिल्ह्यातला एकमेव किल्ला असावा. अतिशय सुंदर निसर्गसहवास लाभलेला हा कोकणदिवा सध्या थोडा प्रकाशात आला आहे.

पुणे-नाशिक महामार्गाच्या आजूबाजूला जे किल्ले आहेत त्यांच्यात चाकणचा संग्रामदुर्ग, इंदोरीचा गढीवजा भुईकोट, राजगुरूनगरजवळचा नितांत सुंदर निसर्ग बहाल झालेला भोरगिरी आणि पुढं नारायणगाव जवळचा नारायणगड यांचा उल्लेख होतो. जुन्नर तालुक्‍यातले हडसर, शिवनेरी, चावंड, निमगिरी, जीवधन आणि बुलंद कातळकड्यांनी सजलेला सिंदोळा या किल्ल्यांनी आपल्या रांगड्या रूपानं ट्रेकर्सवर खरोखरच जादू केली आहे. शिवजन्मस्थान असलेला शिवनेरी आणि सातवाहन काळापासून अस्तित्वात असलेला पुरातन नाणेघाट यांनी जुन्नर तालुक्‍याला एक नवीन ओळख मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. बेलाग कातळकड्यांचा जीवधन, करवतलेल्या कातळपायऱ्या धारण केलेला हडसर, सात टाक्‍यांचा आणि माथ्यावरून अविस्मरणीय दृष्य दाखवणारा चावंड, हीच खरी जुन्नर तालुक्‍याची आणि पर्यायाने पुणे जिल्ह्याची खरी रत्नं आहेत.

तर असं हे पुणेरी दुर्गांचं आख्यान. एका लिखाणात यांचा महिमा वर्णन करणं खरोखरच अवघड आहे. पण, पुणे जिल्हा किल्ल्यांच्या बाबतीत महाराष्ट्रात आघाडीवर आहे, हे मात्र नक्की. यातल्या प्रत्येक किल्ल्यानं स्वतःच्या अंगभूत वैशिष्ट्यानं आपली एक जगावेगळी ओळख निर्माण केली आहे. मग तो राजगडाचा बालेकिल्ला असो किंवा लोहगडाचा विंचूकाटा, तोरण्याची झुंझार माची असो किंवा तैलबैल्याच्या आभाळाला गवसणी घालणाऱ्या कातळभिंती. आज यातला प्रत्येक दुर्ग गिर्यारोहकांना सदैव साद घालतो आणि आपल्या उत्तुंगतेने त्याच्या पायाला कायमची भिंगरी लावतो.  

संबंधित बातम्या