शॉपिंग डेस्टिनेशन्स

सोनाली शेंडे-बोराटे
सोमवार, 11 मार्च 2019

पुणे विशेष
पुण्यासारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात खरेदीच्या पर्यायांची कमतरता नाही. गल्लोगल्ली दुधापासून इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, फर्निचरपर्यंत सर्व काही मिळेल, अशी विविध छोटी-मोठी दुकाने, मॉल्स पाहायला मिळतात. तरीही पुणेकरांच्या जिव्हाळ्याची काही ‘शॉपिंग डेस्टिनेशन्स’ आहेत. या ‘शॉपिंग डेस्टिनेशन्स’विषयी...

प्रत्येक शहरातील बाजारपेठेचं आपलं म्हणून काही वेगळेपण असतं. पुण्याच्या बाबतीत सांगायचं तर वह्या, पुस्तकं म्हटलं, की आप्पा बळवंत चौक आठवतो. फळं-भाज्या, धान्यासाठी मंडई किंवा मार्केट यार्ड, तर घाऊक खरेदीसाठी रविवार पेठ आणि फर्निचरच्या लाकडासाठी टिंबर मार्केटकडं पावलं वळतात. जुन्या किंवा दुर्मिळ वस्तूंच्या शोधात असणाऱ्यांसाठी जुना बाजार हा चांगला पर्याय असतो. सायकली, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंसाठी सोमवार पेठ आणि बॅग, गरम कपडे, तयार कपडे, पारंपरिक पेहराव, दागिने यासाठी बुधवार पेठ, तुळशीबाग आणि लक्ष्मी रस्त्यावर एक चक्कर मारली जाते. फॅन्सी, वेस्टर्न काही हवं असल्यास कॅम्प किंवा फर्ग्युसन रस्ता डोळ्यासमोर येतो. आता प्रत्येक उपनगरात यातील बहुतांश गोष्टी उपलब्ध झाल्या असल्या, तरी कित्येक पुणेकर लग्नकार्य, समारंभाच्या खरेदीसाठी खास वेळ काढून याठिकाणी येतातच.

पुण्याची तुळशीबाग : स्वस्तात मस्त!
तुळशीबाग म्हटलं, की डोळ्यासमोर येते ती विविध वस्तूंनी गजबजलेली आणि माणसांच्या गर्दीनं फुललेली पुण्यातील मध्यवर्ती भागातील बाजारपेठ! तुळशीबाग हे समस्त महिला वर्गाचं हक्काचं खरेदीचं ठिकाण. आत्ताचा हा वर्दळीचा परिसर शंभर-दीडशे वर्षांपूर्वी मात्र शांत, रम्य परिसर होता. आता व्यापारकेंद्र झालेल्या तुळशीबाग, मंडई या परिसरात पूर्वी वाडे, बागा होत्या. पेशवे दरबारातील सरदार खासगीवाले यांच्या मालकीची ही विस्तीर्ण जागा होती. तेव्हा देवाला वाहण्यासाठी फुले, बेल, तुळस यांच्याही बागा लावल्या जायच्या. खासगीवाल्यांचीही तुळशीबाग होती. सरदार खासगीवाले यांनी ही जागा सरदार नारोअप्पा खिरेंना दिली. पेशव्यांच्या दरबारात असलेले नारोअप्पा खिरे ‘सरदार तुळशीबागवाले’ म्हणून ओळखले जात. १९७१ मध्ये नारोअप्पांनी राममंदिर बांधलं. त्या काळात पुणं कसबा पेठेपुरतंच मर्यादित होतं. तुळशीबाग परिसर मंदिरांसाठी ओळखला जात असे. हळूहळू मंदिराच्या परिसरात फुलं, पूजासाहित्य विक्रीसाठी ठेवलं जाऊ लागलं. नंतरच्या काळात इतिहासाच्या या खाणाखुणा लोप पावत गेल्या. नव्या मंडईची उभारणी झाल्यानंतर आणि शनिपार ते मंडई हा रस्ता झाल्यानंतर, तर ही बाजारपेठ आतून-बाहेरून फुलून गेली. त्यामुळेच आजच्या पिढीसाठी तुळशीबागेची ‘शॉपिंग डेस्टिनेशन’ हीच ओळख बनली आहे. 

आत्ताच्या तुळशीबागेचं वैशिष्ट्य म्हणजे सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी इथल्या बाजारपेठेत दाखल झालेल्या असतात. दोन-तीन महिन्यांनी तुळशीबागेत चक्कर झाली, तर तुम्हाला नक्कीच नवं काहीतरी बाजारात आलेलं दिसेल आणि खरेदीचा मोह आवरणार नाही. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, मंडई परिसर यांच्यामध्ये साधारणपणे एक एकर परिसरात तुळशीबाग विस्तारली आहे. विश्रामबाग वाड्यापासून लक्ष्मी रस्त्याला समांतर असलेल्या गल्लीतून सरळ गेलं, की तुळशीबाग सुरू होते. गल्लीच्या दोन्ही बाजूंना विविध वस्तूंची दुकानं आहेतच, पण या दुकानांच्या समोर छोट्या विक्रेत्यांनी आपले स्टॉल लावलेले दिसतात. याच गल्लीतून सरळ पुढं गेलं, की चौकात पुण्यातील मानाच्या चौथ्या गणपतीचं म्हणजे तुळशीबाग गणपतीचं दर्शन होतं. त्याच्याच थोडं पुढं गेलं, की उजव्या बाजूला एका वाडा दिसतो. इथं तुळशीबागेतील ऐतिहासिक राममंदिर आहे. देवांच्या मूर्ती, पूजासाहित्य पाहत आत आल्यानंतर मात्र शांत, प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळतं. दोन मिनिटांपूर्वी असलेल्या गोंधळ-गर्दीचा इथं मागमूसही नसतो. तुळशीबागेत लक्ष्मी रस्त्याला, तसेच मंडईच्या रस्त्याला जोडणाऱ्या आणखी छोट्या गल्ल्या आहेत. त्या त्या सिझननुसार कपडे, मूर्ती, पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तू, प्लॅस्टिकच्या वस्तू, पादत्राणे, खेळणी, पडदे-चादरी, इमिटेशन ज्वेलरी, भेटवस्तू, संसारोपयोगी भांडी, बॅग्ज अशा कितीतरी छोट्या-मोठ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिला तुळशीबागेत येतात. विक्रत्यानं काहीही किंमत सांगितली, तरी तुम्हाला घासाघीस करता आली पाहिजे. भाव करून स्वस्तात मस्त खरेदी, हे तुळशीबागेतील खरेदीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. अलीकडं अनेक दुकानांमध्ये ‘एकच भाव’ ही पाटी पाहायला मिळते. तरीही छोट्या विक्रेत्यांकडे, काही दुकानांमधून भाव कमी करून खरेदीचा आनंद महिलांना लुटता येतो. सकाळच्या वेळेत तुळशीबागेत तुरळक गर्दी असते. मात्र, जसजसा दिवस सरकत जाईल, तसतशी गर्दी वाढत जाते. संध्याकाळनंतर नवख्या माणसाला या गर्दीत खरेदी करताना गोंधळल्यासारखं वाटू शकतं. एरवी गर्दीत हरवलेली तुळशीबाग एखाद्या कारणाने संप होतात, तेव्हा बंद असते आणि त्यावेळी इथले रस्ते किती मोठे आहेत, याचा अंदाज येतो. 

खरेदीबरोबरच खाद्यपदार्थांचा आस्वादही इथं घेता येतो. ज्यूस, वडापाव, भेळ-पाणीपुरीचे स्टॉल्स, बुढ्ढी के बाल, चणे-फुटाणे विकणारे फिरस्ते, पेरू-जांभळे-चिंचा-बोरे अशी त्या त्या ऋतूतील फळं विकणारे विक्रेते असतील किंवा अगत्य हॉटेल, श्रीकृष्ण भुवनची मिसळ, कावरे आइस्क्रीम अशी इथली न चुकवता येणारी ठिकाणं खरेदीनंतरचा शीण दूर करायला मदत करतात. सणासुदीची किंवा काही विशेष प्रसंगांची खरेदी करण्यासाठी कितीतरी जणी हमखास तुळशीबाग, लक्ष्मी रस्त्यावर येतातच. पुण्याबाहेरून येणाऱ्या लोकांनासुद्धा तुळशीबागेचं आकर्षण असतं. अनेकदा परदेशी नागरिकसुद्धा हातात कमी वेळ असूनही कुतूहल म्हणून तुळशीबागेत चक्कर टाकतातच. 

रविवार पेठ : मनमुराद खरेदीचा आनंद
नव्या मंडईतून सरळ पुढं चालत गेलं, की मिर्झा गालिब चौक लागतो. या चौकातून मिर्झा गालिब रस्त्यानं सरळ पुढं जात राहिलं, की आजूबाजूच्या दुकानांवरील ‘होलसेल विक्रेते’ अशा पाट्या वाचून रविवार पेठ सुरू झाल्याचं लक्षात येतं. क्रोकरी, खास एकाच प्रकारच्या भांड्यांची दुकानं, प्लॅस्टिकच्या वस्तूंची दुकानं अशी झलक आपल्याला पाहायला मिळते. आज रविवार पेठ म्हणजे सर्वकाही एकाच ठिकाणी व तेही होलसेल दरात असं स्वरूप असलं, तरी दोनशे वर्षांपूर्वीची रविवार पेठ खूप वेगळी होती. सतराव्या शतकात पहिल्यांदा रविवार पेठेची उभारणी केली गेली. त्यावेळी मलकापूर या नावानं ही पेठ ओळखली जात असे. निजामशाहीत पुणं उद्‌ध्वस्त झाल्यानंतरच्या काळात थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पुन्हा या पेठा वसवल्या. सुरुवातीला त्या त्या वाराच्या पेठेत त्या दिवशी आठवडी बाजार भरत असे. नंतरच्या काळात अनेक सराफी व्यापाऱ्यांनी रविवार पेठेत दुकानं उघडल्यानं सराफी कट्टा म्हणूनही ही पेठ ओळखली जात असे. हळूहळू इतर व्यापाऱ्यांनी आपली दुकानं कायमस्वरूपी याठिकाणी हालवल्यामुळं पेठेला आत्ताच्या मार्केटचं स्वरूप आलं. धान्य, भाजीपाला, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू वगळता रोज लागणाऱ्या जवळपास सर्वच ग्राहकोपयोगी गोष्टी रविवार पेठेच्या परिसरात उपलब्ध आहेत. छोट्या गल्ल्यांमध्ये कागदी प्लेट्‌स, सजावटीचं साहित्य बाहेर अडकवलेली एकाला एक लागून असलेली दुकानं दिसतात. रविवार पेठेत सोन्या-चांदीचे दागिने, फेटे, पडदे, सजावटीचं सामान, भांडी, कपडे, प्लॅस्टिकच्या वस्तू, बॅग्ज, इमिटेशन ज्वेलरी, बांगड्या, इमिटेशन ज्वेलरी-डिझायनर कपड्यांसाठी लागणारा कच्चा माल, सौंदर्य प्रसाधनांपासून ते हार्डवेअरपर्यंत सर्व गोष्टी होलसेल किंवा किरकोळ दरातही मिळतात. पुणे परिसरातील तसंच बाहेरगावचे दुकानदार, व्यावसायिक कच्चा माल किंवा रेडिमेड माल खरेदी करण्यासाठी रविवार पेठेत येतातच. पण, त्याशिवाय लग्नसमारंभ, पार्टी, सणवार अशा निमित्तानं होणाऱ्या किरकोळ खरेदीसाठीसुद्धा अनेक महिला वर्षानुवर्षं रविवार पेठेत येत आहेत. या परिसरात सुभानशा दर्गा, तांबोळी मशीद, सोमेश्वर मंदिर, चतुःशृंगी मंदिर, राम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, विठ्ठल मंदिर अशी प्रार्थनास्थळंदेखील आहेत. रविवार पेठेतील काही दुकानं रविवारी, तर काही सोमवारी बंद असतात. खरेदीबरोबरच इथल्या प्रसिद्ध कुल्फी, साबुदाणा वडा, चहाचा आस्वाद घेता येतो.

लक्ष्मी रस्ता : दीपवणारं वैभव!
पुण्याच्या मध्यवस्तीतून जाणारा लक्ष्मी रस्ता म्हणजे खरेदीचा केंद्रबिंदू आहे. डेक्कनच्या टिळक चौकातून सुरू झालेला हा रस्ता कॅंन्टॉन्मेंटच्या हद्दीपर्यंत आहे. साधारणपणे दोन किमी लांबीचा हा पूर्व-पश्‍चिम रस्ता अगदी सरळ आहे. १९४० पर्यंत हा रस्ता म्हणजे गल्लीतल्या रस्त्यासारखाच होता. त्याला आजच्यासारखे महत्त्वही नव्हते. शिवाजी रस्त्यावरचा बुधवार चौक, सोन्या मारुती चौक या भागात बहुतांश व्यापारकेंद्रं होती. लक्ष्मी रस्त्याचं काम टप्याटप्यानं पूर्ण होताच रविवार पेठ, खणआळीतील व्यापाऱ्यांनी या रस्त्यावर आपली दुकानं सुरू केली. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या रस्त्याला लक्ष्मी रस्ता असं नाव दिलं गेलं. अलीकडच्या काही वर्षांत लक्ष्मी रस्ता पूर्ण बदलून गेल्याचं बुजुर्ग सांगतात. या रस्त्यावरील रावळगाव चॉकलेट, टॉफीचं दुकान, दुग्धमंदिर अशी कितीतरी दुकानं पाहिलेली ही पिढी त्या काळात हरवून आठवणींचा खजिना आपल्यासमोर उलगडते. आज विजय टॉकीजपासून बेलबाग चौकापर्यंतच्या भागातील दागिन्यांची, कपड्यांची मोठमोठी दालनं ग्राहकांना आकर्षित करताना दिसतात. लग्नसमारंभ, दिवाळीसारखे सण असोत, की आणखी काही, लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांमध्ये खरेदी केल्याशिवाय अनेकांची खरेदी पूर्णच होत नाही. इथल्या कपड्यांच्या वा दागिन्यांच्या मोठ्या दालनांमध्ये स्वतःचं वेगळेपण जपण्यासाठी विशिष्ट थीम घेऊन खास कलेक्‍शनही सादर केलं जातं. सणासुदीच्या काळात विशेषतः दिवाळीत या रस्त्याचा थाट पाहण्यासारखा असतो. नवं कलेक्‍शन सादर करताना सजवलेली, विद्युत रोषणाई केलेली दुकानं मोहवून टाकतात. गणपती विसर्जनाला या मानाच्या रस्त्यावरून निघणाऱ्या मिरवणुका पाहणं हाही एक विलक्षण अनुभव असतो. अलीकडच्या काही वर्षांत लक्ष्मी रस्त्याला समांतर असलेल्या कुमठेकर रस्त्यावर, तसंच मधल्या जोड रस्त्यांवरही अनेक मोठी दुकानं सुरू झाली आहेत. दुकानांच्या समोर पथारीवरही आपल्याला रेडिमेड ब्लाऊज, ओढण्या, ॲक्‍सेसरीज, कापडी पिशव्या, हातमोजे, पायमोजे, टोप्या, रुमाल अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी वाजवी दरात मिळू शकतात. मोठ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी जाताना मात्र, तुमचा खिसा भरलेलाच असायला हवा. या रस्त्यावर पार्किंगसाठी मात्र खूप शोधाशोध करावी लागते.

एफसी रोड, फॅशन स्ट्रीट : फूड, फॅशन आणि तरुणाई!
अत्याधुनिक व पाश्‍चिमात्य संस्कृतीची आवड असणाऱ्यांना फर्ग्युसन कॉलेज रोड (अर्थातच नामदार गोपाळकृष्ण गोखले पथ) आणि कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटची ओळख करून देण्याची आवश्‍यकता नाही. डेक्कन परिसरातील जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर कपडे, पादत्राणे, घड्याळे, बॅग्ज अशा विविध वस्तूंची मोठी दालनं आहेत. त्याबरोबरच मॅकडोनाल्ड, केएफसी, डॉमिनोज, बार्बेक्‍यू नेशनसारख्या नावाजलेल्या फूडचेन्स आणि गुडलक, वाडेश्वर, वैशाली-रुपालीसारखी लोकप्रिय रेस्टॉरंट्‌स इथं आहेत. त्याशिवाय सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या ॲक्‍सेसरीज, कपडे, पादत्राणं असं सगळं एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी अनेक छोटी छोटी दुकानंही आहेत. तरुणाईला हव्याहव्याशा वाटणाऱ्या फूड आणि फॅशनची अशी रेलचेल असलेल्या एफ. सी. रोड आणि फॅशन स्ट्रीटवर तरुणाईची गर्दी नसेल तरच नवल! अलीकडच्या पंधरा-वीस वर्षांत छोट्या विक्रेत्यांनी या रस्त्यांवर आपलं बस्तान बसवलं. 

डेक्कनच्या बसस्थानकासमोर जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्याला जोडणारी गल्ली म्हणजे हाँगकाँग लेन. ही लेन साधारणपणे १५०-२०० मीटरची गल्ली आहे. इथं अगदी छोट्या छोट्या जागेत एकाला एक लागून दुकानं आहेत. बेल्ट, हेअर ॲक्‍सेसरीज, फोन कव्हर, बॅग्ज, की-चेन, वॉलेट, टॉप्स, कुर्ते, गळ्यातलं, कानातलं असा मोठा खजिना वाजवी दरात खरेदी करता येतो. इथूनच पलीकडं फर्ग्युसन रस्त्याला लागलं, की रस्त्याचं वेगळेपण दिसायला सुरुवात होते. पथारीवर मांडलेली पेपर बॅक कॉपी असलेली पुस्तकं, गळ्यातल्या माळा लक्ष वेधून घेतात. त्यामागच्या दुकानांतून रंगीबेरंगी स्टोल्स, टॉप्स, चपला, ॲक्‍सेसरीज पाहताना पावलं दुकानाकडं कधी वळतात ते कळतही नाही. पुस्तकांची, कपड्यांची, गिफ्ट आर्टिकल्सची दुकानं, वेगवेगळ्या फुलांचे आकर्षक गुच्छ पाहिल्यावर तरुणाईला प्रिय व्यक्तीला काहीतरी सरप्राईझ गिफ्ट देण्याची कल्पनाही सुचू शकते. संध्याकाळच्या वेळी तसंच शनिवार-रविवारी मात्र, इथली गर्दी उच्चांक गाठते. अनेकजण सहज भटकायलाही इकडं येतात. याच गर्दीत बासरी वाजवून, स्केच काढून, फुगे किंवा ग्रीटिंग्ज विकून किंवा थालीपिठासारखे छोटे स्टॉल्स चालवून पोटापाण्याचा प्रश्न सोडवणारेही असतात. नवीन वर्षाचं स्वागत असो, किंवा भारतानं क्रिकेट सामन्यात मिळवलेला विजय असो, तो आनंद साजरा करण्यासाठी तरुणाईची पावलं फर्ग्युसन रस्त्याकडं आपसूकच वळतात. 

असाच काहीसा माहोल कॅम्पमधल्या महात्मा गांधी रस्त्यावरील एफ. एस. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फॅशन स्ट्रीटवरही असतो. या परिसरातील फेरीवाल्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा असावी, म्हणून फॅशन स्ट्रीटची सुरुवात झाली. याठिकाणी साधारणपणे चारएकशे स्टॉल्स असतील. टी-शर्ट, जीन्स, टॉप्स, टोप्या, स्कार्फ, बॅग्ज, हेअर ॲक्‍सेसरीज, शूज, पर्फ्युम्स, इमिटेशन ज्वेलरी, गॉगल्स, ब्रेसलेट्‌स अशा तरुणाईच्या दैनंदिन वापरातील सर्व गोष्टी इथं मिळतात. फॅशनच्या बदलत्या ट्रेंडप्रमाणं इथल्या वस्तूंमध्येही बदल दिसतो. तुम्हाला थोडंफार बार्गेनिंग येत असेल, तर ही खरेदी आणखी आनंद देऊन जाईल.

अलीकडच्या काही दशकांत पुण्याची हद्द वाढत गेली. आजूबाजूची गावं आता शहराची उपनगरं झाली. बहुतांश सर्व उपनगरांमध्ये मोठमोठे मॉल्स, दैनंदिन गरजेच्या, ग्राहपयोगी वस्तूंची बाजारपेठ उभी राहिली. घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करण्याचे पर्यायही उपलब्ध झाले. तरीही तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, सोमवार पेठ, आप्पा बळवंत चौक याशिवाय पुणेकरांची (पुण्याला भेट देणाऱ्यांचीसुद्धा) खरेदी 
होऊ शकत नाही. याठिकाणांशी त्यांच्या कित्येक आठवणी, भावनिक बंध जुळलेले असतात. त्यामुळं तासभर प्रवास करावा लागला तरी चालेल, पण खरेदी याठिकाणीच होते. तीच गोष्ट तरुणाईची. त्यांच्या भाषेत सांगायचं तर एफ.सी, एफ.एस.ला महिन्यातून दोन-तीन वेळा गेल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.  

संबंधित बातम्या