पाऊस, चहा आणि कांदा भजी!

मृणाल तुळपुळे
सोमवार, 19 जुलै 2021

झडझिम्मड

मुसळधार पाऊस, वाफाळता चहा आणि सोबत गरमागरम भजी - आहाहा!! नुसते ऐकूनच तोंडाला पाणी सुटते. भजी हा पदार्थ सर्वांचाच अतिशय आवडता आहे. त्यामुळे घरी दुपारच्या खाण्यासाठी किंवा जेवणात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची भजी केली जातात. असे असले तरी पावसाळ्यात भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते. 

रखरखीत उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाचे आपल्याला नेहमीच कौतुक वाटते. हिरवागार, तजेलदार  निसर्ग आणि पाऊस सगळ्यांचाच लाडका, पण त्याचा आनंद घेण्याची कल्पना मात्र प्रत्येकाची निरनिराळी असते. पक्षी मुक्तपणे पाऊस अंगावर झेलत असतात आणि रानात मोर आपला पिसारा फुलवून नाचत असतो. लहान मुले पावसात भिजण्याचा, पावसाची गाणी म्हणण्याचा आणि कागदाच्या होड्या करून त्या पाण्यात सोडायचा आनंद लुटत असतात. पावसाचा आवाज आणि ढगांचा गडगडाट ऐकू आला की बऱ्याचदा मंडळी पाऊस बघायला चहाचा कप  घेऊन खिडकीजवळ जातात. काहीजण आपापल्या घरी पुस्तकात रमतात, मित्रमंडळींसमवेत गप्पांमध्ये रंगतात किंवा संगीताच्या साथीत रमतात. 

मात्र अशावेळी गरम भजी खाण्याची तल्लफ सगळ्यांनाच येते आणि त्या पावसाळी वातावरणात भज्यांचा आस्वाद घेत गप्पा आणि आठवणी जास्तच रंगतात. पावसात मनसोक्त खेळून घरात गेल्यावर मुलेदेखील गरमागरम भजी खायला एका पायावर तयार असतात. तरुण वर्गाचे पावसाची मजा लुटण्याचे मार्ग अगदीच वेगळे असतात. लाँग ड्राईव्हला जाणे, मोटरसायकल, स्कूटरवरून भिजत फिरायला जाणे, डोंगरदऱ्‍यांतून भटकणे, ट्रेकला जाणे आणि रस्त्यात थांबून टपरीवर चहा आणि भज्यांचा आस्वाद घेणे यामध्ये ते मनापासून रमतात. काहीजण निसर्गरम्य ठिकाणी जातात, तर काहीजण डोंगरावरून पडणारे धबधबे आणि दुथडी भरून वाहणाऱ्‍या नद्या बघायला जातात. 

असा हा पाऊस म्हणजे आठवणींचा साठा, मस्तीची उधळण आणि खवय्यांचा एक सणच असतो. चिंब भिजलेल्या पावसात सर्वांनाच काहीतरी झणझणीत आणि चमचमीत खाण्याची इच्छा होते. पावसाचा आनंद लुटायला त्याच्यासोबत गरमागरम चहा, खमंग भजी, कोळशाच्या शेगडीवर खरपूस भाजलेले मक्याचे कणीस आणि चविष्ट वडापाव असे पदार्थ असतील तर मग बघायलाच नको. त्यामुळेच ठिकठिकाणी असलेल्या चहाच्या टपरीवर आणि भजीच्या गाड्यांभोवती पावसाच्या दिवसात विशेष गर्दी दिसू लागते.

रिमझिम पाऊस पडत असतो आणि गाड्यांवरच्या भज्यांचा घमघमाट सुटलेला असतो. अशावेळी एखादा कोणीतरी भिजत भिजत त्या भजीच्या गाडीवर जातो आणि सर्वांसाठी गरमागरम भजी घेऊन येतो. भज्यांच्या गाडीभोवतालचा आसमंत मस्त खमंग वासाने भरून गेलेला असतो. गाडीवरच्या ताटलीत गरम भजी तळून काढलेली असतात आणि शेजारच्या तळणीत भज्यांचा नवीन घाणा पडलेला असतो. गाडीवाला आठ दहा गरम गरम भजी, त्याबरोबर तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोरडी लाल चटणी असे वर्तमानपत्राच्या पुड्यात बांधून देतो... आणि आणलेल्या भज्यांवर ताव मारला जातो. सोबत आल्याचा किंवा मसाला चहा असेल, तर त्या भज्यांची लज्जत आणखीनच वाढते. 

कोणी तरी म्हणालंय,

पावसाचे थेंब आणि गार हवा, 

गरम भजीबरोबर चहा पण हवा.

हाती चहाचा पेला आणि बाहेर पाऊस ओला 

सोबत गरम कांदाभजी, तुम्ही येता का बोला.

संबंधित बातम्या